Sawali Saurabh
Sawali Saurabh

॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥

           माझ नाव सौ अस्मिता अमोल कर्णिक राहणार कल्याण येथे माझ्या मोबाईलवर जानकीआईची सावली वाचताना आलेला अनुभव शेअर करा असा मेसेज आला. तेंव्हा असे वाटले की असा कोणता अनुभव पाठवावा? कारण ज्यांनी सावली वाचली त्यांना चांगले अनुभव येतातच.

             माझे सासर मुळचे गणदेवी मधले, कै. शंकरराव कर्णिक ह्यांचा उल्लेख सावलीतील ९ व्या अध्यायात नाना कर्णिक असा आढळून आला आहे. जानकी आईच्या घराजवळ म्हणजे दोन-तीन घरे सोडून माझे आजेसासर होते. गुजरात सारख्या ठीकाणी मराठी माणसे व सी.के.पी. समाजामुळे आपसुक जानकीआईच्या परिवाराशी जवळीक निर्माण झाली. कालांतराने माझे आजेसासरे निवर्तल्याने आपसुकच माझ्या सासऱ्यांवर घराची जबाबदारी आली आणि त्यांना मुंबई अर्थात कल्याणला आपल्या विवाहीत बहीणीकडे नोकरीनिमित्त येणे झाले.

           माझे लग्न झाल्यावर घरातील जानकीआईची होणारी नित्यपुजा व सावलीचे वाचन बघुन मला आकर्षण निर्माण झाले मी सासुला जानकी आईं बद्दल विचारू लागली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जानकी आईबद्दल जाणुन घेण्यासाठी तु सावलीचे वाचन कर. पण माझे मन तयार होईना अशातच एका रात्री मला स्वप्नात एक स्त्री खुर्चीत बसलेली दिसली. पण आकृती अस्पष्ट दिसत होती. सकाळी उठल्यावर अचानकच माझी नजर आमच्या बेडरूमच्या भिंतीवरील जानकीआईच्या फोटोवर गेली. लग्नास एक वर्षाचा काळ लोटला तरी माझी नजर ह्या फोटोवर का गेली नाही ह्याचे आश्चर्य वाटले. डोळे मिटून परत रात्रीच्या स्वप्नातील त्या स्त्री आकृतीचा चेहरा बघण्याचा प्रयत्नकरू लागले आणि आश्चर्य की ती खुर्चीत बसलेली स्त्री म्हणजे दुसरे तीसरे कोणी नसून जानकीआई होती आणि माझे नकळतच हात जोडले गेले. 

          मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की जी सावली आमच्या घरी आहे ती पोथी सौ. कुसुमआत्यांनी माझे सासरे श्री रमेश शंकरराव कर्णिक ह्यांना भेट दिली होती. ज्या पहिल्या आठ आवृत्या तयार झाल्या त्यातील एक प्रत आमच्या घरी आहे. तसे माझे सासरे आजारी असल्यामुळे पोथीची प्रत प्रवास करत आमच्यापर्यंत पोहचली. प्रथम ही पोथी श्री यशवंत दुर्वे ह्यांच्याकडे माझ्या सासऱ्यांपर्यंत पोहचवण्यास सांगितले. सासरे मुंबई येथे दवाखान्यात अॅडमिट असल्यामुळे ती पोथी दुर्वेह्यांनी माझे सख्खे चुलत सासरे श्री परशुराम कर्णिक ह्यांच्याकडे सुपूर्त केली. त्यांच्या पत्नीने विचार केला की अनायसे पोथी घरी आली आहे तर वाचुन घ्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पोथी वाचनास सुरुवात केली. पण त्यांना झोप येवू लागली, म्हणून आज नको उद्यापासून वाचूया असे ठरवीत सावलीचे वाचन सुरवात करण्यापूर्वीच बंद केले. सतत दोन तीन दिवस हेच घडू लागल्याने त्यांनी ही गोष्ट माझ्या सासुबाईंना निरोपाद्वारे कळवली. माझ्या सासुने त्यांना असे सुचविले की ती पोथी ज्यांच्या नावाने आली त्यांना ती प्रथम द्यावी. कदाचित जानकीआईच्या मनात वेगळे काही असु शकते. ती पोथी माझ्याघरी आल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी व सासुन त्याचे प्रथम पठण केले. त्यानंतर आमच्या परिवारातील प्रत्येकाने त्याचे पठण केले.

          आता मी सकाळी पोथितील एक पान दररोज वाचन करून माझा दिनक्रम सुरु करते. वेळीप्रसंगी येणारी संकटात फक्त जानकीआईचे नाव डोळे मिटून घेतले की आपसुकच त्या संकटाचा प्रभाव कमी झालेला जाणवतो व त्या संकटाशी लढण्याचे बळ निर्माण होते.

          गेली तीन वर्षे आम्ही जानकीआईचे लॉकेट बनवण्याचे प्रयत्न करत होतो की एक सेवा म्हणून रामनवमीला ठाण्यास होणाऱ्या उत्सवात त्याचे वाटप करु. पण आम्हास असंख्य अडचणी येत होत्या. एकदा सहज आम्ही श्री गणपती क्षेत्र टीटवाळा येथे गेलो होतो. तेथील गणपतीचे लॉकेट बघून आम्ही त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी मुंबईतील पत्ता दिला. आम्ही तडक मुंबईला त्या पत्याच्या शोधात गेलो. पण म्हणतातना योग जुळुन आला नव्हता. त्यादिवशी महाशिवरात्री निमित्त भुलेश्वर येथील सर्व दुकाने बंद होती. आम्ही हताश होऊन परत घरी परतलो. मी सहजच माझ्या पतीच्या मित्रास श्री पराग बागुल ह्यांना जे मुंबईत कामानिमित्त जात होते त्यांना विनंती केली की लॉकेट बनविणऱ्याचा पत्ता शोधावा आणि काय आश्चर्य ज्या दुकानाच्या पायरीवर आम्ही हताश होऊन बसलो होतो तेच दुकान लॉकेट बनविण्याचे होते. तदनंतर लॉकेट बनविण्यास कोणतीच अडचण आली नाही. कदाचित जानकीआई भक्तांची परिक्षा घेत असावी.

           असो असेच बरेच अनुभव सांगण्यासारखे आहेत. पण मर्यादेमुळे वरिल दोन अनुभव लिहीले गेले. हे अनुभव पाठवताना एक मानसिक आनंद येत आहे. तरी जानकीआई तिच्या सर्व भक्तांवर अशीच कृपा दृष्टी राहूदे ही जानकीआईच्या चरणी प्रार्थना. 

सौ. अस्मिता अमोल कर्णिक (कल्याण)

मो. ९६१९३३०४८१

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *