
विषय २
प्रथम पारितोषिक
आणिकांचे दुःख पाहुनीया डोळां ।
येतसे कळवळा तोचि संत ॥
स्वामी स्वरूपानंदांचे हे शब्द किती अर्थपूर्ण आहेत ! संत कोणाला म्हणावे हे त्यांनी अतिशय साध्या, सोप्या भाषेत सांगितले आहे. तसे पाहिले तर संपूर्ण विश्वातल्या संतमंडळींनी हेच सांगितले आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याचे अंत:करण द्रवते, कळवळते, तोच खरा संत म्हणावा, हीच संतांची खरी ओळख आहे.
संतपदाला पोचलेली विभूती ‘स्व’ विसरून ‘अवघे विश्वचि माझे घर’ या विशाल भावनेने दुःखितांचे अश्रु पुसायला, त्यांना मायेने पोटाशी धरायला नेहमी तत्पर असते. इतकेच नव्हे, तर त्यांचे दुःख, संकटे यांचे निवारणही करते.
संतांचे चित्त, वाणी आणि कृती यांच्यात नेहमी सारखेपणा असतो. म्हणूनच, ‘चित्ते. वाचि, क्रियायां च साधूनां एकरूपता ।। असे म्हटले जाते. मन, बोलणे, आणि कृती यांच्यात असलेली करुणामय एक वाक्यता अशा थोर विभूतींच्या मुखमंडलावरून ओसंडत असते, आणि भक्तांना धीर देत असते. करुणा, जिव्हाळा, आपुलकी, कळवळा यांचा मेळ तिथे सहज अनुभवता येतो.
परमपूज्य श्री जानकीआईंचेच पहा ना! त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले नसले, तरी नुसते त्यांचे छायाचित्र पाहताक्षणीच मनात आदर आणि एक प्रकारची जवळीक निर्माण होते. असे वाटते की, ही तेजस्वी पण त्याचबरोबर प्रेमळ, प्रसन्न मुद्रा असलेली स्त्री आपली आई-आजी-पणजी असावी आणि नकळत हात जोडले जातात.
ती, जानकी आई बद्दल मला तसे उशीराच, म्हणजे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी कळले. विर्भात अजूनही त्यांच्याविषयी कायस्थांना सुद्धा फारसे माहित नाही. अर्थात् तसा योगही यावा लागतो!
माझी बहीण कल्याणला रहात होती. तिला आमचे चुलतबंधू श्री पु. वि. देशमुख (आतोणेकर) यांनी पूज्य जानकीआईची पोथी दिली. ती वाचून तिने लागलीच आम्हां सर्व बहिणींसाठी पोथ्या घेऊन त्या माझ्याकडे पाठवल्या. अशाप्रकारे आमच्या घरी ‘सावली’च्या रूपाने ती जानकी आईचे आगमन झाले, हा आमचा भाग्य योगच म्हणावा लागेल.
‘सावली’च्या पहिल्या वाचनानेच मन एका विलक्षण अनुभूतीने भरून आले. आम्ही आतोणेकर देशमुख असल्यामुळे, पूज्य जानकी आईंसारखी अलौकिक विभूती आपल्या दूरच्या का होईना, नात्यात आहे, या भावनेने खूपच आनंद आणि अभिमानही वाटू लागला. त्यातील काही संदर्भ परिचयाचे असल्यामुळे जवळीक वाढली.
कोणतीही पोथी आपण जेव्हा मनापासून वाचतो, तेव्हा त्यातील दैवत, संत, महात्मे यांच्याशी एकरूपता होत जाते, आपल्या मनी – मानसी त्यांचाच ध्यास असतो. स्वाभाविकपणे त्यातील चमत्कार वाचून, आपल्याही बाबतीत ते घडू शकतील असा विश्वास वाटतो. कोणतीही अनुकूल गोष्ट घडली की तो पोथी-वाचनामुळे आलेला अनुभव आहे याची खात्री पटून धन्यता वाटते. पण तेवढ्यावरच थांबू नये. पोथी वाचून आलेल्या अनुभवांवरच समाधान न मानता, ती वाचल्यावर आपल्याला काय समजले? आपल्या वागण्या-बोलण्यात कोणता सकारात्मक बदल झाला? याचा अंतर्मुख होऊन विचार करणे जास्त गरजेचे आहे.
‘सावली’ वाचून मलाही काही अनुभव आले. पूज्य जानकीआईची नात सौ. सुरेखाताई कळकर्णी (ठाणे) यांची ध्यानीमनी नसताना झालेली भेट, त्यांचे अगत्यशील बोलणे, त्यांनी दाखवलेली जानकीआईची फोटोतली अप्रतिम नथ आणि तिचा दिव्य स्पर्श, हा मला आलेला अद्भुत अनुभव आहे. तो वेगळाच सांगायला हवा. हा नुसता उल्लेख आहे. कारण ‘सावली’ वाचून मला काय समजले ? याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे.
सर्व संत विभूतींना आपल्या जीवन चरित्रातून समाज प्रबोधन करायचे असते. ‘बुडते हे जन, न देखवे डोळा’ या भूमिकेतून लोक शिक्षण आणि लोकजागृती करणे हेच त्यांचे जीवितकार्य असते. ते करीत असलेले चमत्कार हे त्यांचे मोक्षमार्गातल्या सिद्धीरूप पायऱ्या असतात. त्यांचे त्यांना अजिबात आकर्षण नसते. त्यांना ध्यास असतो, तो परमेश्वरप्राप्तीचा. पण ईश्वरकृपेने लाभलेल्या या सिद्धींचा उपयोग या संतविभूती स्वत:साठी न करता, ‘परोपकाराय सतां विभूतयः।’ या वचनानुसार लोकांचे दुःख, चिंता, संकटे दूर करण्यासाठी करीत असतात, ‘सावली’त अशी कितीतरी उदाहरणे आहेत. कित्येकांना पूज्य आईंनी अनेक देव देवतांची दर्शने सगुण रूपात घडवली, चिचुंद्रयांची गुलाबपुष्पे झाली, चिंबोऱ्यांमधून शिवलींगे प्रकटली, जन्मांध बालकाला दृष्टी मिळाली अशा अनेक प्रसंगांमधनू त्यांच्या अंगी असलेल्या दिव्य शक्तीची जाणीव होते. आपण त्यापासून एवढाच बोध घ्यायचा, की आपल्या जवळ जर काही चांगले, दुसऱ्याला उपयोगी पडणारे असेल, तर ते त्याला जरूर द्यावे. केवळ आपल्याच कुटुंबीयांचा विचार न करता, इतरांचे भले कसे होईल हे पहावे. ‘सावली’तून समजलेली आणखी एक गोष्ट म्हणजे सहनशक्ती आणि समाधान या गुणांचे महत्त्व. आज या गोष्टी जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पण पूज्य जानकी आईची सहनशक्ती आश्चर्य करण्यासारखी आहे. एकच लुगडे आणि चिंध्यांची चोळी अशा परिस्थितीतही त्यांनी सुखाचा संसार केला, इतकेच नव्हे, तर किडा, मुंगी, पशू-पक्षी, सापसारखे प्राणी यांच्यावर मायेची पाखर घातली.
आज अनेक जण स्वत:ला बुद्धिवादी म्हणवतात चमत्कारांवर त्यांचा विश्वास नसतो. पाप, पुण्य, पुनर्जन्म, मुक्ती, अतृप्त आत्मे वगैरेंची ते हेटाळणी करतात. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना अंधश्रद्धा म्हणून हिणवले जाते.
पण आजच्या विज्ञानयुगातही अशा अविश्वसनीय गोष्टी घडू शकतात याचा पडताळा पूज्य जानकी आईंनी दिला, आणि तो अनेकांनी अनुभवला.
अतर्क्य, अगम्य गोष्टींच्या फार आहारी जाऊ नये, तसेच त्यांना धुडकावूनही लावू नये. त्यातील मर्म शोधण्याचा प्रयत्न करावा हेच पूज्य आईंनी समजावून दिले.
आजची परिस्थिती अतिशय अस्थिर झाली आहे. केव्हा काय घडेल याचा नेम नाही. कशाचाच भरवसा राहिला नाही. एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात दबा धरून बसलेली असते. अशावेळी श्रद्धेचा आधार हवा असतो. तो आधार ‘सावली’ वाचून नक्कीच मिळतो हेही समजले.
कोणतीही पोथी फक्त पारायणसंख्या वाढवण्यासाठी वाचायची नसते. तिचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘सावली’ वाचून मला जे समजले, ते सांगण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
पूज्यश्री जानकी आईंचे चरणी, साष्टांग दंडवत!
प्रा. सरोज म. देशमुख (आतोणेकर)
(वर्धा)