
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
॥ ऋणानुबंध ॥
२४ मार्च, १९८०, राम नवमी, ह्या दिवशी “सावली” चे प्रथम वाचन बडोदे येथे श्री जानकी दुर्गेश्वरीची मुलगी, सौ. कुसुम आत्या गुप्ते ह्यांच्या घरी झाले. तेव्हा व्यासपीठावरून सावलीचे वाचन करण्याचे सद्भाग्य मला लाभले. माझे वडील श्री मधुकर गजानन सुळे ह्यांनी सावलीचे लेखन त्यापूर्वी अवघ्या पाच महिन्यात केले होते. जानकी दुर्गेश्वरीची ती वाङ्मय मूर्ती घडताना बघण्याचा, तो अनुभव, आजही माझ्या मनाला आनंद देणारा आहे. त्यावेळीच सावलीचे आणि माझे जणू ऋणानुबंध बांधले जात होते.
माझ्या वडिलांनी सावली हा ग्रंथ लिहिल्यानंतर जानकी दुर्गेश्वरीच्या सर्व मुलांनी माझ्या वडिलांना आपला भाऊ मानले आणि अशारितीने ती माझी आजी झाली. जानकी दुर्गेश्वरीनी मला आपल्या सावलीत घेतले, ती तिची नात म्हणून. तेव्हापासून मी तिला जानकी आजी म्हणू लागले. आईची आई किंवा वडिलांची आई माझ्या खूप लहानपणी गेल्याने माला त्या फारश्या आठवत नाहीत. पण सावलीतल्या गोष्टी वाचून आपल्यालाही एक लाड करणारी, हट्ट पुरवणारी आजी प्रत्यक्ष मिळाली अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. पण ती माझा जिवाभावाचा आधारस्तंभ झाली ते माझा स्वत:चा संसार चालू झाल्यावर, संसारातील चटक्यांच्या झळा बसू लागल्यावर!
लग्नानंतर पुष्कर, माझा नवरा अमेरिकेत असताना नियतीने आमच्या साडे सहा महिन्याच्या बाळाला आमच्यापासून हिरवून नेले आणि मी जबरदस्त हादरले. त्याच अवस्थेत मी अमेरिकेत पोचले. पूर्णपणे नवीन आणि अनोळखी वातावरणात. महिना, दिड महिन्याशिवाय पत्रसुद्धा न पोचण्याचा तो काळ होता. आजच्या सारखे फोन आणि प्रवास सहजसाध्य नव्हते. नवीन मातीत रुजू पाहणाऱ्या माझ्या नवऱ्याचे कष्ट आणि मनःस्थिती मी पहात होते. तोही मला त्रास होईल म्हणून न बोलता त्याच दुःखाचे झळ सोसत होता. बोलणार तरी काय, कसे आणि कोणाशी? अशावेळेस मला माझे दुःख मोकळे करायला आणि पुन्हा उभं रहायला मदत करणारी ठरली ती माझी जानकी आजी! त्यावेळी जमेल त्याप्रमाणे, शक्यतो रोज सावलीचा एक अध्याय वाचायची सवय लागली. सावलीतील गोष्टींनी मनाला दिलासा मिळू लागला. आता आपली जानकी आजी आपल्या सतत बरोबर आहे आणि आपली काळजी घेत आहे अशी श्रद्धा निर्माण झाली. तिची कृपादृष्टी लाभली.तिच्याच कृपेने नवीन कर्मभूमीत आमची संसार वेली रुजली, बहरली आणि त्यावर ओंकार आणि शिवांगी सारखी दोन गोंडस फुले उमलली.
जानकी आजी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. संसारातील काळज्या, चिंता, मागण्या, हट्ट मी तिच्या समोर मांडू लागले आणि तीही माझा सर्व चिंताभार वाहते ह्याची मला प्रचिती येऊ लागली. ह्याविषयीचा एक मजेदार अनुभव सांगायचा म्हणजे माझ्या एका भारत भेटीमध्ये मी, माझा भाऊ रवी, वहिनी ऋचा ह्यांच्या बरोबर जानकी आजीच्या गणदेवी स्थानावर दर्शनाला गेले. जानकी आजीची पूजा, ओटी भरून झाल्यावर मी गाभऱ्यातच बसले होते. भाऊ आणि ऋचा बाहेरील फोटोला चुंदड्या घालत होते. इतक्यात माझ्या मनात एक मजेशीर विचार आला. मला वाटलं, आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा तेथे पूजारी आपल्याला प्रसाद द्यायला असतो, पण इथे तर तसे कुणीच नाही.आपल्याला प्रसाद देणार कोणी असत तर किती बर झालं असत आणि अचानक, कुठूनही वाराही यायला जागा नसताना समोरील चांदीचे छत्र जोरजोरात हलले, त्यातील घुगरांचा खुळखुळ आवाज झाला आणि जानकी आजीच्या फोटोला घातलेल्या दोन वेण्या एका पोठोपाठ माझ्यासमोर जणू उड्या मारून पडल्या. भाऊ आणि ऋचानेही तो आवाज ऐकला आणि ते दोघे, “मंगल, अग काय झाले? तू एव्हढे जानकी आजीशी काय बोललीस?” म्हणून धावत येऊन मला विचारू लागले. मी स्तंभितच झाले. ती आदिमाता. आदिशक्ती, जानकी दुर्गेश्वरी खरंच माझ्यासमोर बसली आहे. माझ्या मनातलं बोलणं ऐकतेय हे जाणल्यावर, मी अतिशय हर्षाने नतमस्तक झाले. माझ्या अंतरातल्या आवाजाला तिचा तो प्रतिसाद म्हणजे माझी किती काळजी वाटते, माझे हट्ट पुरविते, लाड करते त्याची साक्ष होता. मी आनंदाने त्या वेण्या प्रसाद म्हणून घेतल्या, एक माझ्यासाठी आणि एक रुच्यासाठी! आजही ती वेणी मी जपून ठेवली आहे.
अमेरिकेत आटलांटाला स्थिरस्थावर झाल्यावर ओळखी वाढल्या, मैत्रिणी वाढल्या, अध्यात्माची ओढ असलेल्या मैत्रिणींशी साहजिकच जवळीक झाली आणि त्यातूनच माझ्याकडे सामूहिक सावली वाचनाची सुरुवात झाली. २०१८ हे १४ वे वर्ष असेल. सर्व इच्छित भक्त आळीपाळीने एक, एक अध्याय वाचतात आणि बाकीचे ऐकतात. त्यावेळी येणाऱ्या भक्तांमध्ये काही असेही आहेत कि जे आधीच सावलीचे वाचक होते. माझी त्यांच्याशी ओळख नंतर झाली. मध्यंतरीच्या काळात, माझी आत्या, सौ नीलम चौबळमुळे कि जिने संगीत सावलीतील गाणी अतिशय सुरेल आणि भक्तिपूर्ण गाईली आहेत, जानकी आजीचे मूर्ती रूप मला मिळाले. त्यामुळे आता जानकी आजीच्या मूर्तीसमोर सावली वाचन होऊ लागले. पहिल्या वर्षापासूनच, सावली वाचनानंतर मी जमलेल्या सर्व स्त्रियांचे हळदकुंकू लावून व ओटी भरून पूजन करते. कुठलाही अपवाद न पाळता. कोणालाही न वगळता. कारण मी प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या त्या आदी शक्तीचे पूजन करत असते. परमात्म्याच्याच अंशरूप असलेल्या आत्म्याचे पूजन करत असते. “सावली” वाचनातूनच माझ्या मनाला भिडलेला, भावलेला तो अध्यात्माचा बोध आहे. त्यावेळेस वातावरणात असलेली प्रसन्नता मला नेहमीच भारावून टाकते. धन्यता वाटते कि आपल्याला पूर्वी माहीतही नसलेल्या जानकी दुर्गेश्वरीला वाङ्मय मूर्ती “सावली” चे रूपात साक्षात उभे करण्याचे खूप मोठे कार्य माझे वडील श्री. मधुकर सुळे ह्यांच्या कडून घडले आहे. नाहीतर तिच्या लीलांची माहिती अनभिज्ञच राहिली असती. “सावली’ मुळे जानकी दुर्गेश्वरीच्या लीला अनेक भक्तांपर्यंत सहजतेने पोहचल्या, अजूनही पोहचत आहेत आणि ह्यापुढेही अखंड पोहचतील आणि त्यांना सहाय्यरूप होतील ह्याची मला खात्री आहे. आज सावली वाचतानां आलेल्या अनुभवांचा अजून एक ग्रंथ तयार होईल एवढं अनेक भक्तांचे अनुभव आहेत. “सावली’मुळे त्या जानकी दुर्गेश्वरीची सेवा करणे, तिला आळवणे भक्तांना सोपे झाले. त्या आदिमाता, आदिशक्ती जानकी दुर्गेश्वरीचीच ती किमया आहे.
“सावली”चे जानकी आजीचे आणि माझे जुळलेले असे हे ऋणानुबंध! आता माझ्या मनातलं ओळखणाऱ्या जानकी आजीला, मी काही सांगण्याचीही गरज आहे असं मला वाटत नाही. प्रेमभक्तीने, भोळ्या भावाने तिला आळवण्याऱ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात ती वास करते आणि वेळोवेळी त्यांच्या हाकेला धावून संकटमुक्त करते, कल्याण करते हे मी “सावली” वाचूनच शिकले, अनुभवले, तशीच ती आता माझ्याही हृदयात आहे आणि तिच्या अखंड कृपा दृष्टीने माझं आणि माझ्या कुटुंबाचं सतत कल्याण करीत आहे अशी माझी दृढ श्रद्धा आहे. आता सावलीतील अध्याय वाचून झाल्यावर नेहमी जानकी आजीच्या मूर्तीवरील प्रसन्न हास्य पाहून मीही नकळत प्रसन्नतेने हसत “जय जानकी दुर्गेश्वरी” म्हणत नतमस्तक होते आणि सावलीतलीच प्रार्थना म्हणते,
सदा माझ्या चित्ती पदकमल हे नित्य असू दे ।
मुखी गावी किती जननिं तुमची हाचि वर दे ।।
घडावी ही सेवा, विमलपद सेवा निशिदिनी ।
कृपा व्हावी ऐसी म्हणुनी विनंती नम्र चरणी ।।
सौ. शलजा पुष्कर मेढेकर उर्फ मंगला मधुकर सुळे
अटलांटा, युएसए

खूप छान, तुमचा हा अनुभव वाचताना हा पूर्ण प्रवास आम्ही पण तुमच्या सोबतच होतो, असे वाटले.
तुमच्या अभिप्रायाबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏श्री जानकी दुर्गेश्वरीची कृपा सावली आपल्या सर्वांवर अशीच अखंड राहो ही तिच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹
Hi Shailaja Tai,
Very nicely written.
I am in NJ and will like to talk to you.
Thanks
Neha
Thank you so much 🙏Sure. You can call me anytime.