
प्रस्तावना
“सावली” पोथीवरची ही लेखन स्पर्धा, ही सर्वस्वी प.पू. जानकीआईचीच आहे. मी निमित्तमात्र आहे. ह्या बद्दल माझी पूर्ण खात्री आहे. त्याचे असे झाले की मी नेहमी प्रमाणे घरी देवपूजा करित असताना प.पू. जानकीआई मला काही सांगत आहे असे मला जाणवले. ती मला सांगत होती की “ते पाठवायचे होते ते पाठविलेस का?” हा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग असल्यामुळे, मला काहीच समजेना. हे खर आहे? की माझ्या मनाचे खेळ आहे? हे कळेना, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी अधिक तिव्रतेने तोच प्रकार घडला. मी देवपूजा करताना जी स्तोत्रे वगैरे म्हणतो ती आई मला म्हणूच देईना. तिसऱ्या दिवशीही हाच धोशा आईने माझ्यामागे लावला. पूजा होऊ देईना. आई काय आहे? म्हणून मी जानकीआईला विचारले, न कळत माझ्याजवळ असलेला मोबाईल माझ्या हातात आला व माझ्याही नकळत ‘जय जानकी दुर्गेश्वरी’ ह्या व्हॉटस्अप ग्रुपवर स्पर्धेविषयीचा मेसेज पाठविला गेला. माझी पूजा पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात आले की माझें मन शांत झाले आहे. हा माझ्या आयुष्यातला प.पू. जानकीआईबद्दलचा पहीलाच अनुभव असल्यामुळे मी फारच गोंधळुन गेलो होतो. जानकी आईने मला सोपविलेले हे काम पूर्ण पणे माझ्या आवाक्या बाहेरचे, क्षमते पलीकडचे आहे हे मला कळत होते. पण आता करणार काय? धनुष्यातून बाण केंव्हांच सुटला होता.
ही स्पर्धा एक निमित्तमात्र आहे. प.पू. जानकीआईचा ‘सावली सौरभ’ सर्वत्र पसरविण्याचा. ही जानकीआईचीच इच्छा आहे, असे वरील घटने वरून दिसुन येते. आपण लेख पाठवून जो उत्तम प्रतिसाद दिलात ती ह्या इच्छेची पुष्टीच करते. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल व सहकाराबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.
स्पर्धेच्या रिझल्टबद्दल बोलयचे म्हटले तर कोणता आणि कोणाचा अनुभव श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे आपण कसे ठरवणार? कारण प्रत्येकाला आलेला अनुभव हा त्या भक्तावर ओढविलेल्या त्या वेळेच्या प्रसंगानुसार श्रेष्ठच असतो. कारण प.पू. जानकीआई त्यावेळेस धावलेली असते. मग तो अनुभव कनिष्ठ कसा असु शकतो! “जया मनी जैसा भाव । तया तैसा अनूभव”.
स्पर्धा म्हटल्यावर रिझल्ट देणे हे जरी क्रमप्राप्त असले तरी आपण सर्वांनी परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाचा मान राखावा अशी मी सर्वांना विनंती करतो.
प.पू. जानकीआईने सोपविलेले हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणाऱ्या माझ्या कुटुंबीयांचे, नातलगांचे तसेच आपल्या सर्वांचा मी खुप खुप आभारी आहे. प.पू. जानकी आईचा हा “सावली सौरभ” आपल्याला देताना मला अतिशय आनंद होत आहे. जानकीआईचा हा “सावली सौरभ” सर्व सुभक्तांना मार्गदर्शक ठरो व त्यांच्या जीवनात वसंत बहरो, अशी त्या जगन्माता जानकीआई चरणी विनम्र प्रार्थना.
आपला,
जानकीआई कृपाभिलाषी,
राजन मधुकर सुळे
गुरुकृपा प्रस्तुति
मो. ७८७४८०५०३८