
गुरु ॐ
जय जानकी दुर्गेश्वरी
अनुसंधान
कोणत्याही प्रकारच्या अभ्यासात चिंतन, मननाला फार महत्त्व आहे. शाळेचा अभ्यास असो, कॉलेजचा असो की ऑफीसचे महत्त्वाचे काम अथवा आपल्या दैनंदिन जिवनातील एखादे महत्त्वाचे कार्य असो, त्यावर चिंतन मनन केल्यास तो अभ्यास अधिक उत्तम होतो, अथवा ते कार्य आपण अधिक व्यवस्थीत करु शकतो, त्याच प्रमाणे अध्यात्मातही चिंतन मनाला खुप महत्त्व आहे. आपण संत चरित्र वाचतो, ग्रंथ वाचतो किंवा एखादा सुविचार वाचतो, त्यावर चिंतन मनन केल्यास त्यातील अर्थ, गभितार्थ अधिकाधिक स्पष्ट होत जातात. आज काल वोटस एप वर असे सुविचार खुप येत असतात. पण त्यावर विचार करतो कोण ? ते दुसऱ्यासाठी समजुन आपण पुढे पाठवत असतो. असो….
चिंतन मनाने अपली भक्ति डोळस होत असते. समृद्ध होत असते. सशक्त होत असते. दृढ, पक्की होत जाते. भक्तीत भाव भोळा असला तरी तो आंधळा नसावा. भक्ती निट समजुन केली तर कधिच फसगत होत नाही. असो…
असाच मला एक शब्द अडला “अनुसंधान”. भक्तीत अनुसंधानाला फार महत्त्व आहे. अनुसंधान म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सतत पाठीमागे लागणे. सतत लक्ष्य देणे. इथे अनुसंधान म्हणजे सतत ईश्वराचे स्मरण करणे. आपल्या आराध्याचे सतत नाम घेणे. परंतु उठता बसता, काम करता करता ईश्वराचे नाम घेणे फार अवघड काम आहे. काम करता करता आपणास नाम:स्मरण जमत नाही.दुसरे आपले मन चंचल आहे. एकाच गोष्टीवर फार वेळ टीकुन राहणे त्याला जमत नाही. परंतु ज्या गोष्टीची मनाला आवड असते, त्यात ते रंगुन जाते.
ह्या अनुसंधानाच्या संदर्भात मला “सावली” ह्या पोथीतील १३व्या अध्यायातील रोहिणी खोपकरांची कथा खुपच आवडली. त्या जानकीआई जवळच आहे असे समजुन तीच्याशी सतत बोलायच्या. प्रत्येक काम, मी हे करते, मी ते करते. आता भाजीत तिखट टाकते वगैरे सर्व सांगायच्या आणि पुढे जानकीआईने त्यांच्या मुलाचे रक्षण कसे केले ही कथा तुम्हास माहीत आहेच.
ह्या अनुसंधानामध्ये आपल्या मनाला हवे असणारे वैविध्य आहे. वेगळेवेगळे विषय आहेत. त्यामुळे आपल्या दैवताशी सहजपणे अनुसंधान घडते. आपला देव सतत आपल्या बरोबर आहे हा भाव सहजपणे, आपल्याही नकळत दृढ होत जातो. आपली भक्ती अधिक घट्ट व पक्की होत जाते. आपल्या दैवताशी असा संवाद तो कधि सुसंवाद होऊ लागतो, ते आपणास कळतही नाही. हळु हळु आपल्या लक्षात येते की जे आपण बोलतो त्याचे उत्तर देव आपणास देत आहे. त्याचे आपणा जवळील अस्तित्व आपणास जाणवु लागते. त्याच्या जवळकीच्या विश्वासाने आपल्या जिवनातल्या अनिश्चीततेची भिती, मृत्युची भिती नष्ट होते. आपण मोकळेपणाने, आनंदाने, निर्भय होऊन जगु लागतो.
श्रीकृष्णानी गीतेत सांगितले आहे की अभ्यासाने, प्रयत्न करत राहील्याने हळुहळु ते जमते. त्यांनी सांगितले की तूं जर तुझे चित्त, मन बुद्धी सहित पूर्णपणे मला देऊ शकत नसशिल तर दिवस भरात एक क्षणभर दे, आणि मग त्याला हळुहळु माझी गोडी लागेल आणि शेवटी ते चित्त मज स्वरूपच होईल.
मी ह्या अध्यात्कीक मार्गावरील एक साधा विद्यार्थी आहे. माझी भक्ती डोळस व्हावी म्हणुन चिंतन मनन म्हणून हे लिहीतो. एखादी गोष्ट जेव्हा आपण आपल्या शब्दात लिहीतो, तेव्हा ती आपल्या चांगली लक्षात राहते हे आपणास माहितच आहे. आपण ह्यावर आपले विचार व्यक्त करुन ह्या अभ्यासाला अधिक समृद्ध करु शकतो…
सावली ह्या पोथीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्याच्या अनुसंगाने आपण आपली भक्ती अधिक डोळस करू शकतो.
।।जय जानकी दुर्गेश्वरी।।
श्री. राजन सुळे (बडोदे)
खुपच सुंदर. अतिशय सोप्या भाषेत , छान विचार मांडले आहेत, समजावल आहे. धन्यवाद🙏
🙏🙂आभार