
जानकी आईबद्दल लिहिणे म्हणजे एक मोठ्या संताबद्दल तेजाबद्दल माझ्यासारख्या पामराने काय लिहावे हा मोठा प्रश्न सावली ग्रंथात, ग्रंथकार श्री मधुकर सुळे यांनी दुर्गा उर्फ जानकी देवी सुळे ह्या एका महान संताबद्दल, तेजाबद्दल लिहीले आहे.
जानकी आईची खरी ओळख ह्या ग्रंथातून होते. एकूण १८ अध्यायात गुंफलेल्या त्यांच्या लिला खरंच खूप काही शिकवून जातात. लहानपणी आजोळी वाढलेल्या ह्या दुर्गेचे बालपणाचे दर्शन होते. बालपणी आळूच्या झाडावर चढून बालगोपालांना फुले वाटणारी दुर्गा, महादेवाला दूध देणारी दुर्गा आणि देवांचा सहवास लाभलेली दुर्गा, दुर्गेच्या शांत सात्वीक रूपाचं दर्शन होतं. चित्र्यांची ही लेक मालुस्ते गावाहून सुळ्यांकडे गणदेवीला स्थायिक झाली. पती शांताराम अतिशय तापट, घरात दारिद्र्य, स्वतः निरक्षर परंतू तरीही सर्व भाषा त्यांना अवगत होत्या. दुःखिताचे कष्ट दूर करण्यासाठी, दारिद्र्य निवारण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
पशु-पक्षी मानव सर्वांवर सारखीच माया केली. सतत परोपकार केले. दुसऱ्याचे दुःख स्वतः अंगावर झेलून घेऊन स्वतः झिजल्या. फुलांनी, मुलांनी बहरावे, बागडावे, सुखाने नांदावे त्यासाठी प्रयत्न केले, आणि भक्तांचे जीवन समृद्ध केले. प्रत्यक्ष गंगा नदी त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्याजवळ आली. श्री गणेश आणि देवांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला. त्यांना यज्ञाचे आमंत्रण दिले, श्री गणपती साक्षात त्यांना भेटावयास आले होते.
आपल्या मुलींना विनोदाने कित्येक गोष्टी त्यांनी सांगीतल्या, तसेच प्रत्यक्ष काही गोष्टीचे दर्शन सुद्धा घडविले. कितीतरी दूर पर्यंत त्यांची ख्याती पोहोचली होती. दूरवरून लोक त्यांना भेटावरयास येत आणि जानकी आई सुद्धा त्यांच्या हाकेला धावून जाऊन, त्या व्यक्तीस संकट मुक्त करीत.
जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्याची प्रचीती जानकी आईच्या सावलीतून होते. त्यांच्या लिला, त्यांचे कार्य अगाध आहे. साक्षात देव इंद्र ह्यांचा त्यांना सहवास लाभला, सर्व देवता त्यांच्यावर प्रसन्न होत्या.
आपल्या कृपेने त्यांनी मुक माणसास वाचा दिली. अंधाला नयन दिले, जानकी आई सतत आनंदी, समाधानी असत. त्यांना भक्तांच्या भूत, वर्तमान, भविष्य या बद्दल समजत असे. सर्वांना त्यांनी भय मुक्त करून अभय दिले. देवी वाहन वाघ प्रत्यक्ष भेटावयास आले होते. कालीका देवीने प्रत्यक्ष चांदीच्या कळशातून त्यांना पाणी आणले. जानकी आई शांत, पावन होत्या, परंतू कोपल्या की बडवानल, मग मात्र कोणालाच क्षमा नसे. घरात रात्रभरापासून लागलेल्या आगीला फक्त तीर्थ टाकून त्यांनी शांत केले. अंधश्रद्धेपासून त्या सर्वांना दूर ठेवीत. एक अलौकीकपणा त्यांच्या जवळ दिसून येतो. भूजंगाने त्यांची प्रेमाने भक्ती करीता त्यांनी त्याला सुद्धा मुक्ती दिली. कुठल्याही प्रकारच्या दिमाख न दाखविता अत्यंत प्रेमाने, मायेने आणि आपुलकीने त्यांनी सर्वांना मदत केली, आणि परोपकार केला.
अशी ही दुर्गेश्वरी उर्फ जानकी आई सर्वांच्याच पाठीशी त्यांची प्रेमाची सावली बनून, सतत भक्तांच्या पाठीशी आहे. तिच्या ह्या प्रेमळ कृपाछत्राची सावली अशीच कायम आम्हा भक्तांच्या पाठीशी राहो हीच मनी सदीच्छा.
माझ्या प्रेमळ मातेस लाख लाख प्रणाम!
प्रा. अनिता किशोर सुळे
मो. ९८२२३०७१५८ (चिंचवड)