राजा दुष्यन्त आपल्या सारथ्यासह शिकारीला निघाला. बराच वेळ त्याला एकही सावज सापडले नाही. इतक्यात सूर्याच्या सुप्रसिद्ध अश्वांनादेखील मागे टाकील असे एक चपल हरीण त्याचे दृष्टीस पडले. त्या हरिणावर तो बाण सोडणार तोच ——–” थांबा थांबा बाण सोडू नका “ असे उदगार त्याचे कानी आले. राजाच्या रथासमोर कण्वशिष्य वैखानस आपल्या दोन शिष्यांबरोबर समोर येउन म्हणाला , “ राजन, आपले शस्त्र आर्त ,दीन व अनाथ यांच्या संरक्षणाकरिता आहे. तेव्हा बाण सोडून कण्वाश्रमाच्या या हरीणास वधू नये. “सोडू नको बाण नृपा आवरी तुरंग “————-
वैखानस :
सोडू नको बाण नृपा , आवरी तुरंग
पाळीव हा आश्रमीचा वधू नको कुरंग II धृ II
जवळ येथुनी वसे , मालिनी नदी तिरीं
विद्यार्जन आश्रमात कुलपति करी तिरीं
अध्यापनि मुनि सहित नांदती मृगे परी
मृगयेने शांति सुखा करू नकोस भंग II १ II
परपीडा हरुनि नृपा रक्ष दुर्बलांशी
शौर्यबळे रक्षुनि जन भूषवी कुलांशी
निरपराधि जीवांचा जनक नृपा होई
मृगयेमधि व्यर्थ नृपा होऊ नकोस दंग II २ II
श्रमपरिहार करुनि जाई आश्रमासी
बहरे तरु पुष्प फळे गाति गान पक्षी
झुळझुळ त्या तालावरी वेद मुनि घोषी
गुंजारव करिती किती कमलावर भृंग II ३ II
आश्रमात सत्कारिल तुला कण्व बाला
कुशल कार्य मग्न असे आश्रमी शकुंतला
ग्रहशांती करुनि येति कण्व आश्रमाला
सोमतीर्थी असति मुनि होम हवंय दंग II ४ II
चक्रवर्ति उदरी तुझ्या पुत्र जन्म घेई
संतोषूनि आज नृपा आशीर्वचे देई
समिधा वनी मेळवुनि येऊ मठालाही
तोवरी आतिथ्य घेई सर्व यथासांग II ५ II