शकुंतलेला सर्वांचा निरोप घेताना फारच गहिवरुन आले. बालपणापासून सुखाचा सहवास देणाऱ्या त्या आश्रमाला ,आपल्या सख्यांना ,आपल्या गर्भिणी हरिणीला ,आपल्या कण्व बाबांना ,सर्वांना सोडून जाण्यास तिचे पाऊलच उचलत नव्हते. तिच्या नयनातून घळघळ अश्रू वाहू लागले. ही केविलवाणी अवस्था पाहून कण्वांनी तिला हृदयाशी कवटाळले . शकुंतला आपल्या सख्यांना म्हणाली,” सख्यांनो ! बालपणी जशी मिठी मारीत होतात तशी पुन्हा एकदा मिठी मारुन मला कडकडून आलिंगन द्या. “सख्यांनो आलिंगन द्या मला”
शकुंतला : बालपणीच्या मिठीत एकदा I कडकडुनि घ्या मला
सख्यांनो आलिंगन द्या मला II धृ II
आजवरी वाढलो संगती
धृढ प्रीतिची जडली नाती
वियोगिता मनी उपजे भीती
साहवे न मजला II १ II
प्रेम निरंतर ममता तुमची
वेणीफणी त्या कोमल करिची
या पुढती मज मिळेल कैसी
प्रश्न मना पडला II २ II
मृगी लाडकी असे गर्भिणी
जीव तिजसवे जाई गुंतुनी
अतीव दु:खे जाते सोडुनी
प्रेमे सांभाळा II ३ II
वनजोत्सनेवर माझी प्रीति
जीव वाहिला मी तिजवरती
सोडुनी जाते तुम्हा संगती
फुलवा शिंपुनी जला II ४ II
बाबांचा कृश देह तपाने
अधिकच होईल मम चिंतेने
नका भासवू उणिव सेवने
आश्वासन द्या मला II ५ II
नाविके तुझ्या सवेच देह चालला पुढे >>