झाडाच्या आसपास रथ थांबवुन आपले धनुष्यबाण , अंगावरील अलंकार व आभरणे आपल्या सारथ्यास देऊन राजा दुष्यन्त उद्यानाकडे वळला .त्याचा उजवा बाहू स्फुरू लागला. या शुभ शकुनामुळे आपणास निश्चितच काही फल प्राप्त होणार आहे असे त्याला वाटले. थोडे पुढे आल्यावर लहान लहान कलश घेऊन झाडांना पाणी घालीत असलेल्या बऱ्याच ऋषि कन्या त्याला दिसल्या . त्यांची आपसात थट्टा चाललेली पाहुन वैखानसाने कथन केलेली कण्व कन्या शकुंतला कुठली असावी हे राजाने अचूक ओळखले. तो त्या झाडाजवळ उभा राहून त्यांचे संभाषण ऐकू लागला. शकुंतला सख्यांना म्हणाली, “प्रियंवदे सखी अनसूये ,येई येई झणी इकडे “———
शकुंतला :
प्रियंवदे सखी अनसूये
येई येई झणी इकडे
तरु लतांवर जल शिंपाया
कटीवर घट घेऊन गडे II १ II
तरु लतांची शीतल छाया
अपार वाटे करिती माया
प्रीत आपुल्या वरती कराया
प्राजक्ताचे टाकी सडे II २ II
फळे फुले हि देती तरूवर
कल्पतरु हे दुसरे भूवर
टवटवी त्यांना येण्या नवथर
जलाशयाचे शिंपू सडे II ३ II
आम्रतरूची वधू वन ज्योस्ना
मोगरीस या विसरु शकेना
वृक्ष वेलीच्या मंगल मिलना
जलाक्षता शिरी टाकू गडे II ४ II
पदर लाडके हरिण ओढते
हळुहळु माझे अंग चाटते
मृदू हस्ते मी घांस भरवते
दुडुदुडु संगे ते दवडे II ५ II
आवळलेल्या कंचुकीची या
सैल गांठ करी सखि अनसूया
दुखते माझी कोमल काया
वल्कल झाले घट्ट गडे II ६ II
पहा भ्रमर अंगास झोंबतो
हाकलता नच लवभर सरतो
कमल सोडुनी मज का छळतो
सांग सखे मज हे कोडे ? —–II ७ II