इकडे राजा दुष्यन्त आपल्या नेहमीच्या राजकार्यात आणि क्षेम आरामात गुंग झाला. कंचुकीनें पुढे येऊन राजास प्रणाम केला आणि म्हटले “ महाराज, हिमगिरीच्या पायथ्याशी अरण्यामध्ये राहणारे तापस , कण्व मुनिंचा निरोप घेऊन आले आहेत. राजाची आज्ञा होताच शाङ्गरव, गौतमी, तपस्वी आणि शकुंतला हे राजासमोर उभे ठाकले . शाङ्गरवाने राजास प्रणाम केला आणि त्याचा जयजयकार केला.
शाङ्गरव : नृपा तव करितो जयजयकार
उदंड आयु मिळुनी वाढू दे I तुझा राज्य विस्तार II धृ II
दक्ष पालनी साधु प्रजाजनी
प्रजेस सुखवी ताप हारुनी
चंड -भानुपरि गगनी राहुनी
नष्ट करी अंधार II १ II
नम्र तरु फलभारे होती
नवजल भारे मेघहि लवती
सदा लीनता सज्जन वृत्ती
सदैव अंगिकार II २ II
श्रेष्ठ कुलांतील श्रेष्ठ भूपति
मुनि कन्या ही सुशील मूर्ति
प्रीति संगमा कण्व मानती
सुखे करी संसार II ३ II
कण्वांनी तव कुशल इच्छिले
उपदेशाचे शब्द बोलले
जे मी तुजला अतांच कथिले
करुनि तुझा सत्कार II ४ II
गर्भवती तव भार्या असुनी
निज गृही ती योग्यच म्हणुनी
कण्वाज्ञेने दिली आणुनी
करी नृपा स्वीकार — II ५ II