सर्व मंडळी निरोप देण्यासाठी आश्रमापासून बरीच दूर आली . शास्त्राप्रमाणे सर्वांनी उदकाच्या तिर्थापर्यंत येऊन अखेरचा निरोप दिला . शकुंतलेने कण्वांना नमस्कार केला. कण्वांनी तिला प्रेमाशिर्वाद दिला. आणि पुढे मार्गस्थ होण्यास आज्ञा दिली . बरेच पुढे चालून आल्यावर सर्व नौकेत बसले. नांव चालू लागली. प्रियदर्शन व प्रियसमागम यासाठी ती मोठी उत्सुक झाली. राजाचे बोलावणे आले नसतानाही आपण जात आहोत याची जाणीव होताच ती मनात साशंक झाली. नावेबरोबर तिचा देह पुढे पुढे जात होता पण जीव मात्र आश्रमांत गुंतला होता. अशा द्विधावस्थेत ती नाविकेला उद्देशून म्हणाली , “नाविके तुझ्या सवेच देह चालला पुढे ….. “
शकुंतला : नाविके तुझ्यासवेच देह चालला पुढे
जीव मात्र गुंतुनीच आश्रमामध्ये अडे II धृ II
लोभले पहावयास भावि सौख्य जे पुढे
मोह अंतरातलाहि लोचना पुढे अडे
मोह प्रीत माझिया मनास पाडती तडे II १ II
माझी आश्रमी जनास कां उणीव भासली
हरिण शावके, शकुंत यांसी ओढ लागली
तात कार्य माझिया विना पदोपदी अडे II २ II
काय चालले असेल आश्रमा मध्ये गडे ?
काय पाहण्या मिळेल दृश्य ते नृपा कडे ?
येति आसवे भरुन अंतरात धडधडे —- II ३ II
प्रीत ज्याची मी मनात दिवस रात्र चिंतली
त्या वियोगिकास कां माझी ओढ लागली
हृदय जाळितो विचार येऊनी मनापुढे — II ४ II
वाहुनी जलावरुन जीवनात सोडिते
परोपकारी नाविके तुलाच शल्य सांगते
हा प्रवास माझिया मना न सौख्य दे गडे II ५ II