धन्यपूण्य अशा हस्तिनापुरामधील राजा दुष्यंताची पाऊले कण्वाश्रमास लागली . राजा दुष्यन्तास पाहुन शकुंतलेच्या मनांत प्रीति उत्पन्न झाली. शकुंतला अति लज्जित झाली. राजाचे स्वागत करण्याचे तिला भान राहिले नाही . तिची गोंधळलेली मनःस्थिती राजाच्या सहजच लक्षात आली. अल्पशा परिचयानंतर शकुंतलेची ओळख करुन घेण्याच्या हेतुने राजा दुष्यन्त म्हणाला , “ कण्व ऋषि नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत , तेव्हा कण्वांची ही कन्या शकुंतला हे कसे काय ?” यावर सखी अनसूया म्हणाली , “राजन , हि एक महर्षि तपस्वी विश्वामित्र यांची कहाणी आहे, ऐकावे “—-
“कौशिक गोत्री श्रेष्ठ प्रतापी राजर्षि झाले –”

अनसूया:
कौशिक गोत्री श्रेष्ठ प्रतापी राजर्षि झाले
तप सामर्थ्ये सुरवर त्यांनी भयकंपित केले II धृ II

लोह हलाहल सेवित मुनिने घोर तपा केले
‘इंद्र पदाला पुण्ये जिंकील ‘ सुर शंकित झाले
चिंता व्याकुळ इंद्र मनी हो, व्युह त्यांनी रचिले II १ II

तपोधनाचे तप भंगाया , मेनकेस कथिले
स्वर्ग सुंदरी अप्सरेस या भूवर धाडियेले
ऋतुराजासह येऊन मुनिचे मन मोहित केले II २ II

विश्वामित्रा मदन शराने पराजितची केले
रति मोहाने आलिंगुनी तिज करी बद्ध केले
कर्म जन्मले ,तपा भंगुनी ,सुरवर मनी धाले II ३ II

पापवाचुनि शाप नशिबी या बाळा आले
जन्मताच तिज मातपित्याने वनांत सोडियलें
तेंव्हा पासुनि पितृ वत्सले कण्वे संभाळियलें II ४ II

कण्व मुनिंची मानस कन्या शकुंतला झाली
उपवर होता योग्य वरास्तव चिंता जाणवली
नृपा तुझ्या या आगमनाने हेतु पूर्ण झाले II ५ II

आज पाहिली ऋषि कन्या >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *