यानंतर राजा दुष्यन्तास इंद्राकडून बोलावणे आले आणि तो त्याप्रमाणे इंद्राकडे आकाश मार्गी गेला. इंद्राने सोपविलेले असूर विजयाचे काम त्याने सहजपणे पार पाडले. त्याच्या शौर्याबद्दल देव सभेत इंद्राने त्याचा बहुमान केला. त्याला अर्ध्या आसनावर बसविले. इंद्राच्या रथावर आरूढ होऊन भूतलावर येत असता, आपण अति वेगाने खाली येत आहोत –सर्व वृक्ष केवळ पर्णा छिन्न भासत आहेत — नद्यांची पात्र व प्रवाह प्रथम तुटक आणि बारीक दिसत आहे–असे राजास वाटले. आता तर प्रवाह स्पष्ट व सलंग दिसू लागले .भूमंडळ गतीने आपल्याकडे येत आहे असे दिसले . मातली राजास म्हणाला, “ हा हेमकूट पर्वत आहे . याच्यावर किं. पुरुष वास करतात. हे तप सिद्धीचे उत्तम परम क्षेत्र आहे. ” “ गंधर्वाच्या हेम कुटावर I पवित्र एक ठिकाण –”
मातली : गंधर्वाच्या हेम कुटावर पवित्र एक ठिकाण
राहती मारिच ऋषि भगवान II धृ II
वसुंधरेचे हे नंदनवन
तप सिद्धीचे उत्तम साधन
सुरवर मिळवी इथे तपो-धन
धरेवर परम क्षेत्र महान II १ II
कल्पतरूंचे सुंदर जरि वन
मुनि नांदती वायु -भक्षुन
हेम जलाने शिव अभिषेकुन
करिती रत्न – शिळेवर ध्यान II २ II
करिती अप्सरा आत्म संयमन
लक्ष्मी घरी करि वैराग्यची मन
प्राप्तिस्तव ‘परब्रम्ह’ ऋषि गण
आचरी घोर तपानुष्ठान II ३ II
गेले काश्यप महान होऊन
तेज रवी घे त्यांचे पासुन
विष्णू अंश घे ऋषि तेजातुन
धरण्या वामन रुप लहान II ४ II
सुरवर किन्नर इथेच येऊन
नित्य दर्शने होती पावन
कृपावंत मारिच दयाघन
याचका इच्छित दे वरदान II ५ II