अशारितीने त्या बालकाला पहात असता, त्याच्या गळ्यात असलेला ताईत सुटून पडला. राजा दुष्यंताने तो उचललेला पाहुन तपस्वीनिला फारच आश्चर्य वाटले. कारण त्या ताईताला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त त्या बालकाला आणि त्याच्या मातपित्यांनाच होता . हा वृत्तांत तिने शकुंतलेला कथन केला . इतक्यात प्रमद वनात अदृश्य रितीने अवलोकन केलेला राजाचा शोक वृत्तांत सानुमतीने सांगितला आणि राजा दुष्यंतास झालेल्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला आहे असेही सांगितले. हा सर्व प्रकार ऐकून तिला गहिवरुन आले. तिच्या मनातील किल्मिषे क्षणार्धात विरघळली . तिचे नेत्र आनंदाश्रुंनी भरले. भरल्या अंतःकरणाने ती राजा पुढे आली आणि म्हणाली, “ चंद्रवदन पाहिले नृपा तुझेच लोचनी— “
शकुंतला : चंद्रवदन पाहिले नृप तुझेच लोचनी
भाग्य उदय जाहला, फुले वसंत जीवनी II धृ II
चंद्र दर्शनास जेवि रोहिणी झुरे मनी
ग्रहण संपता घडेल दर्शना नभांगणी
चातकापरी तुझीच वाट पाहे लोचनी II १ II
विरह यातना मलाच भोगणे असे मनी
फुका तुम्हास बोलले न राग हा धरा मनी
पदी क्षमेस याचिते नृपा तुझीच भामिनी II २ II
हेम मुद्रिका नकोच दुष्ट विरह दायिनी
मूर्तिरूप प्राणनाथ ‘मुद्रिका’ असे मनी
बालरुप हे तुझेच मोद देइ मन्मनी II ३ II
हा वियोग संपलाच बाळ जन्म होऊनी
पुत्र दर्शने पित्यास शुभ-सुयोग मीलनी
धन्य जाहले मनांत सौख्य लाभ जीवनी
दर्शनास जाऊया चला सुपुत्र घेऊनी II ४ II