नभो मंडळातुन भूतलावर आल्यावर राजा दुष्यन्त आणि मातली, मारिच ऋषिच्या आश्रमाकडे वळले . अशोक वृक्षाच्या दाट छायेखाली आल्यावर राजा दुष्यन्तास तेथे थांबण्यास सांगून मातली इंद्र गुरु मारिचाकडे निघून गेला. तेथे एका सिंहाच्या छाव्याशी खेळत असलेला बालक त्याच्या दृष्टीस पडला. त्याच्या अवखळ बाळलीला पाहुन प्रथम दर्शनीच राजाच्या मनात स्नेहभाव निर्माण झाला. त्या बालकाविषयी त्याला अकल्पीत प्रेम वाटू लागले. तो बालकास उद्देशून म्हणाला,
“बघुनिया अवखळ बाळलिला ___”
राजा दुष्यन्त : बघुनिया अवखळ बाळलिला
मनाला मोह अति पडला II धृ II
दिसे गोजिरे सुंदर बालक
रवि तेजाचे इवले द्योतक
सिंह शिशूचे नमवी मस्तक
चिमुकला शौर्यांकुर गमला II १ II
पटपट वाटे घ्यावे चुंबन
हृदयी बालका घट्ट कवळुन
नकळत माझे मन घे मोहुन
प्रीतिचा मनीं पाझर फुटला II २ II
मधुर बोबड्या बोला ऐकून
घेती अंकी बाळा उचलुन
वसने मळती धुलिकण लागुन
धन्य तो तात जगी झाला ii ३ II
पित्यास अधिकची सुखवी बालक
स्पर्श मला करी अति सुखदायक
धन्य पुत्र हा धन्यची पालक
चंद्र हा भूवरी अवतरला II ४ II
चंद्रवदन पाहिले नृपा तुझेच लोचनी >>