इतकी अतिमानुष संभवाची अप्रतीम रुपलावण्य युक्त शकुंतला पाहिल्यापासून राजाची मनःस्थिती फारच बिघडलेली होती . त्यातुन त्याने तिची स्तुती करताना ती लाजलेली पाहुन तर राजाला फारच हर्ष झाला होता. अशी रूपवती ऋषि कन्या त्याने प्रथमच पाहिली होती. सौंदर्याच्या अर्कातुन घडवलेल्या नयन मनोहर शकुंतलेचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करुन तो आपल्या मैत्रेयास म्हणाला ,”आज पाहिली ऋषि कन्या मी रुपवती भूतली “
राजा:
आज पाहिली ऋषि कन्या मी रुपवती भूतली
सौंदर्याच्या अर्कातुन जणू विधीने घडविली II धृ II
पुष्पा मधले पराग कोमल एकत्रित केले
कोमल सारे भाव विधीने सोमरसी ओतले
चुरुनी चंद्रिका तेजी मुलायम कांतिवर लिंपली II १ II
इंद्र धनूची कमान सुंदर भुवईवर रेखिली
गगन निलीमा नयन कुपीतुन शीतल ओसंडली
चमक लोचनी बिजलीची ती नयनांतरी भरली II २ II
मदिरेतली उन्मादकता सर्वांगे भरली
वक्षभार जणू तारुण्याने अधिकच मुसमुसली
विकसित कमलापरी हासली ,खुलली कुंद कळी II ३ II
शकुंतला जणु वसंत ऋतुचा मोहर हा पहिला
अथवा ताजा मधुमोहोळ हा कुणि नसे चाखला
सरोवरातील नच खुडलेल्या कमलापरी दिसली II ४ II
चंचल चपला शकुंतला ही मन मोहुनी गेली
नेत्र कटाक्षे विव्हळलो मनी तळमळ ही उरली
कुणा भाग्यवंताच्या नशिबी विधिने हिस लिहीली II ५ II