।।  श्री समर्थ सौरभ ।।

परमपूज्य श्री साटम महाराजांचे ओवीबद्ध चरित्र

लेखक: श्री मधुकर गजानन सुळे, बडोदे

                       मनोगत 

            श्री समर्थ साटम महाराजांचे चरित्र म्हणजे श्री शिवलीलामृत व श्री गुरुचरित्र यांचा परममंगल संगम आहे. काशीची गंगा, गाणगापूरची भीमा व वाडीची कृष्णा यांचा दाणोलीच्या नागझरीत जणू त्रिवेणी संगम झाला आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

           श्रीधर स्वामींनी ‘शिवलिलामृत’ ग्रंथात व श्री कावडी बुवांनी ‘दत्तप्रबोध’ या ग्रंथात श्री सदाशिवाचें व श्रीदत्तात्रेयांचे गुणविशेषणयुक्त अशा ओव्यांनी जें वर्णन केले आहे तें इतके समर्पक व सुंदर आहे कीं, हे आमचे भूदेवसंत, त्या त्या गुणविशेषणास सुयोग्य असे वर्तन करून त्या ओव्यांच्या अथवा अभंगांच्या सत्यतेची साक्ष पटवून देतात. खरे म्हणजे देवांचे किंवा संतांचे गुण अगोदरच ज्ञात झालेले असतात व त्यानुसार अभंग व ओव्या लिहिल्या जातात. तरीसुद्धा कीर्तनकार कथा सांगण्याकरितां ज्या एखाद्या अभंगाचा ‘प्रमाण’ म्हणून उपयोग करतात, तसा मी शिवलिलामृत व दत्तप्रबोध या ग्रंथांतील निवडक ओव्या प्रत्येक अध्यायाच्या पूर्वरंगात ‘प्रमाण’ म्हणून घेतल्या आहेत. उद्देश हाच कीं याच सुंदर गुणविशेषण यांनी युक्त अशा ‘श्रीसमर्थ लीला’ कशा घडत गेल्या त्यांचे समसादृश्य लक्षांत यावें हा होय.

             प.पू. अवधूतानंद महाराजांनी जीं पूर्वी लिहिली गेलेली समर्थ चरित्रें मला वाचावयास दिली होती त्यांची सूची शेवटी दिली आहेच. त्यात श्री रघुनाथ वायंगणकर यांचे साटम महाराज हें चरित्र अति उत्कृष्ट भक्तीने ओथंबलेले व जवळून अवलोकन केलेले असे वाटले. त्यांतील पुष्कळशा प्रसंगांचे माझ्याकडून सही सही ओवीकरण घडून आले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्याचें श्रेय त्यांनाच.

                एक एक अध्याय लिहून झाला कीं तो मोठ्या आवडीने व प्रेमाने त्यापासून देणारे माझे वडील गुरुबंधू डॉक्टर अण्णा बोंद्रे यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. या सौरभा चे पहिले ९अध्याय त्यांनी तपासले व त्यानंतर वयाच्या 85 व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. श्री. बाबांच्या वरील अतीव प्रेमा मुळे या सौरभाला प्रस्तावना लिहिण्याचे त्यांनी मान्य केले होते.

                त्यांची इच्छा अपूर्ण राहिली याची मला खंत जाणवत आहे. तरीही त्यांनी दिलेल्या मौलिक सल्यामुळे माझे लेखन कार्य फारच सुरळीत होऊ शकले. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे.

                प. पू. अवधूतानंद बाबांनी माझ्या करवीं श्री समर्थ साटम महाराजांची सेवा करून घेतली व प.पू. भाऊकाकांचे चरणी माझी भक्ती अधिक दृढ केली. आपल्या ऐशा कृपादानाने त्यांनी मला कायमचे उपकृत केले आहे. मग…….

              ‘ज्याच्या कृपेचे मज लाभ झाला । विसरू कसा मी गुरुपादुकांला’ आणि ‘एकमेका सहाय्य करू ।अवघें धरूं सुपंथ’  

  या भावनांनी माझ्या या पवित्र कार्यांत, ज्यांच्याकडून अल्पशी सुद्धा मदत झाली त्यांचा नाम निर्देश केला नसला तरी त्यांचे सुद्धा सेवा समर्थ चरणी रुजू झाली आहे यांत तिळमात्र शंका नाही.

श्री मधुकर गजानन सुळे उर्फ भानुदास

शके 1913 प्रजापती नाम संवत्सर आषाढ शुद्ध एकादशी 22 जुलै 1991


Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]