॥ अथ सप्तमोऽध्यायः॥

श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ गांवा गेला प्राणनाथ । पतिव्रता वाट पाहत । तों पत्र आलें अकस्मात । मग धांवें श्रवण कराया ॥२॥ निर्धनासी सांपडें धन । कां जातांधासी आले नयन । कीं तृषेनें जाता प्राण । जीवन शीतल मिळालें ॥३॥ तैसें ऐकावया कथा पुराण । धांवावें सर्व काम टाकून । निद्रा-चिंता दूर करून । श्रवण सादर करावें ॥४॥ वक्ता पंडित चातुर्यखाणी । नमावा तो सद्गुरु म्हणूनी । कीं हा शंकरची भावूनी । धरिजे भजनिं आदर ॥५॥ सुरभिच्या स्तनांतुनी दुग्धधारा । सुटली जैसी सुधारस धारा । तेवीं वक्ता वदतां शिवचरित्रा । कर्णद्वारें प्राशन कीजें ॥६॥ कथानकांच्या ओघांतून । बरेच पुढें गेलों निघून । थोडें मागें पाहुयां वळून । पूर्वाश्रमांत समर्थांच्या ॥७॥ त्यांच्या पूर्वाश्रमाची नव्हती । विशेष कोणालाच माहिती । तेणें तर्क वितर्क करिती । जन आपुल्या मतीनें ॥८॥ परि समर्थांच्या कृपेंकरून । पूर्वाश्रमाची झाली जाण । तें उचित वाटलें म्हणून । विदित मी करितसें ॥९॥ समर्थ पत्नी जनाबाई । ती ही मुंबईस येई । कामाठीपुऱ्यांत राही । नंतर सूर्यकुंडी माझगांवांत ॥१०॥ काम करितसे गिरणींत । पतिला ठेविलें सोबत । परि ते मात्र अलिप्त । तीन वर्षें राहिले जवळी ॥११॥ त्यांचें चित्त न लागे संसारांत । सदैव मग्न ईश्वर चिंतनांत । पत्नीला होतें विनवित । माणगावला जाणें मजलागी ॥१२॥ पतिची पाहूनी निवृत्ती । पत्नीनें दिली अनुमती । परि केली नम्र विनंती । चरणांजवळी पतिच्या ॥१३॥ वंशवृद्धि व्हावी म्हणून । इ्छा धरिली मनांतून । तिचें करावें पूर्ण पालन । नंतर जावें कुठेही ॥१४॥ तेव्हां पत्नीस दिलें वचन । योग्य वेळी देईन फलदान । परि जेथें मी तेव्हां असेन । तेथें यावें लागेल तुला ॥१५॥ ऐसे उभयतांचे झाले भाषण । वेंगुर्ल्याचें तिकीट दिलें काढून । आगबोटीत दिलें बैसवून । स्वयें जनाबाईने समर्थांना ॥१६॥ कुरमुरे घेतले मागून । ते उभयतांनीं खाल्ले मिळून । ऐसे प्रेमें निरोप देऊन । समर्थ संसारालिप्त जाहले ॥१७॥पुढें अंबोलीच्या घाटांत । राहिलें ते साधन काळांत । त्याचा सांगितला वृत्तांत । मागील अध्यायी तुम्हांला ॥१८॥ ऐसें असतां ते दाणोलींत । पत्नीला देती ते दृष्टांत । दाणोलीला यावे त्वरित । दर्शनार्थ माझिया ॥१९॥ तेव्हां जनाबाई जाती दाणोलींत । समर्थ होते हनुमान मंदिरांत । औदुंबर वड पिंपळाच्या संगतीत । बैसले होते शांत कीं ॥२०॥ पत्नीनें केलें विनम्र वंदन । इच्छेचें केलें मनांत उच्चारण । तोंचि समर्थ देती उचलून । एक पेरु तिच्या ओटीत कीं ॥२१॥ पुत्रवती होशील म्हणून । आशिर्वाद दिला उत्तम छान । वरी रुमालांत पैसे बांधून । देते झाले तिला ते ॥२२॥ आणि सांगितले निक्षून । कीं साटम वंश झाला क्षीण । त्याचें न होईल कल्याण । शापित कुळ ते जाहलें ॥२३॥ तरी तावडे यांचे घरीं जाऊन । त्यालाच द्यावें हें वंशदान । त्याचें नांवानें ह्याचें जीवन । फळेल फुलेल कीं चांगलें ॥२४॥ तूं न करावी त्याची चिंता । मीच वंशाचा पालनकर्ता । परि लौकिक दृष्ट्या सुखकर्ता । तावडेस नियुक्त केला मी ॥२५॥ त्याचें होईल लालन पालन । उत्तम लाभेल तो शिक्षण । नंतर माझे कार्य सांभळून । कृतार्थ होईल जीवनीं ॥२६॥ माझे समाधीचे पूर्व काळांत । तुम्हांला भेटेन मी मुंबईंत । चिंता न करावी जावें निश्र्चिंत । ऐसें सागितलें प्रेमानें ॥२७॥ त्यानंतर जनाबाईला । पुत्रलाभ झाला भला । तो तावडे यांना अर्पण केला । दत्तक विधी करोनियां ॥२८॥ वसंत ठेविलें नामाभिदान । दोणोलीस नेला दर्शनाकारण । ऐसा हा साटम कुलभूषण । वाढतसे अन्य घरीं ॥२९॥ जैसा देवकीचा नंदन । यशोदा घरीं वाढे आनंदुन । कीं रघुपती कुलभूशण । ऋषि कुलांत वाढती तैसे ॥३०॥  परि याची न झाली कुणां जाण । पत्नीने गुप्त ठेविलें हें वचन । समर्थांची केवळ आज्ञा म्हणून । शिरसावंद्य मानुनियां ॥३१॥ असो, आतां येऊ परत । पुनश्र्च पूर्वीच्या प्रवाहांत । दाणोलीमधली रंगत गंमत । श्रवणसुखानें अनुभवूंया ॥३२॥ सर्व भक्तगण मिळोनी । उत्सव करिती उत्साहानीं । शिवरात्रीची येतां पर्वणी । आनंदास उधाण येतसें ॥३३॥ परगांवींचे येती भक्तगण । पूर्ण लोटतसें कीं कोकण । कैलासपतिचें घ्याया दर्शन । दाणोली माजी धांवती तें ॥३४॥ प्रशांत मोकळ्या मैदानावर । भव्य मंडप मांडला सुंदर । सिंहासन ठेवीले उंचावर । सकलां अवलोकन करावया ॥३५॥ सनई वाजंत्री चौघडे । भजन मंडळी चालती पुढें । समर्थ मात्र उघडे । गाडींत होते बैसलेले ॥३६॥ जनसमुदायाच्या मधून । गाडी हळुं हळुं जाती घेऊन । लोकांना द्यावया दर्शन । मध्यें मध्यें थांबवीत होते ते ॥३७॥ जैसी गाडी जाई थांबून । बिल्वदळें उधळती डोक्यावरून । हारही फेकती अंगावरून । जयजयकार त्यांचा करोनियां ॥३८॥ समर्थ उभे राहती गाडींत । हात उंचावुनि देती आशीर्वाद । अति शांत प्रसन्न विलोभित । रूप त्यांचें दिसतसें ॥३९॥ ऐसें फिरती पूर्ण पटांगण । संतोषविती देऊन दर्शन । नंतर जाती त्यांना घेऊन । उंच मंचकाजवळी हो ॥४०॥ चांदीच्या मोठ्या चौरंगावर । समर्थांना बैसविती सत्वर । राजघराणें सभोंवार । कर जोडुनि उभें असे ॥४१॥ बापुसाहेबांची मेहुणी । जी कोल्हापुरची महाराणी । चांदीच्या कलशानें घाली पाणी । समर्थांच्या अंगावर ॥४२॥ सावंतवाडीची  महाराणी । बापुसाहेबांची धर्मपत्नी । साबण लावी स्वकरांनीं । सर्वांगाला समर्थांच्या ॥४३॥ बापूसाहेब चोळती सर्वांग । प्रेमांत होऊनियां दंग । पंचामृतानेही अभ्यंग । स्नान घातलें समर्थांना ॥४४॥ जन पाहती हा सोहळा । आनंदाश्रूंनी भरला डोळा । कंठ दाटूनि भरला गळा । प्रेम उचंबळुनि वाहतसें ॥४५॥ पाणी वाहे जें मंचकावरून । तें जन करिती प्राशन । सद्गुरु चरणांचे तीर्थ  म्हणून । भक्तियुक्त प्रेमानें ॥४६॥ जैसें स्नान जाई आटपोनी । तैसे राणीसाहेब घेती उचलोनी । कडेवर आपल्या बैसवोनी । पतिजवळी नेती आपुल्या ॥४७॥ राजे धांवती रुमाल घेऊन । सर्वांग पुशिले कीं परिपूर्ण । वस्त्रें नेसविलीं नूतन । धोतर झब्बा सुंदरसा ॥४८॥ नंतर बैसविती सिंहासनावर । तों भक्तांनी केला जयजयकार । पूजन करुनी षोडशोपचार । दीप उजळिले मंचकावरी ॥४९॥ आरती धरोनियां हातांत । समस्त उभे राहती भक्त । जयजयकाराच्या उंचरवांत । आरती गाऊं लागली मंडळी ॥५०॥ शंखध्वनी केला जोरांत । साथीला वाद्यें आली धांवत । भजन मंडळीही सुरांत । सूर मिळवते झालें कीं ॥५१॥ ॐनमोजी शिवा अपरिमिता ।आदि अनादि मायातीता । पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । साटम समर्था जगद्गुरो ॥५२॥ ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचालका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥५३॥ हे सच्चिदानंद निर्मळ । शिव शांत ज्ञानघन अचळ । जो भानुकोटितेज अढळ । सर्वकाळ व्यापक जो ॥५४॥ भव भवांतक भवानीवर । स्मशानवासी गिरा-अगोचर । जो स्वर्धुनीतीरविहार । ‘विश्र्वेश्वर’ काशिराज जो ॥५५॥ व्योमहरण व्यलभूषण । जो गजमदन अंधकमर्दन । ‘ॐकार अमलेश्र्वर ‘ आनंदघन । मदगर्वभंजन अज अजित जो ॥५६॥ अमितगर्भ निगमागमनुत । जो दिगंबर अवयवरहित । उज्जयिनी ‘महांकाळ’ कालातीत । स्मरणें कृतान्तभयनाशी ॥५७॥ दुरितकाननवैश्र्वानर । जो निजजनचित्तचकोरचंद्र । वेणूनृपवर महत्पापहर । ‘घृष्णेश्र्वर’ सनातन जो ॥५८॥ जो उभा हृदय पंजरकीर । जो निजजनहृदयाब्जभ्रमर । तो ‘सोमनाथ’ शशिशेखर । सौराष्ट्रदेशविहारी जो ॥५९॥ कैरवलोचन करुणासमुद्र । रुद्राक्षभूषण रुद्रावतार । भीम भयानक ‘भीमाशंकर’ । तपा पार नाही ज्याच्या ॥६०॥ नामदमन नागभूषण । नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान । ज्योतिर्लिंग ‘नागनाथ’ नागरक्षण । नागाननजनक जो ॥६१॥ वृत्रारिशत्रुजनकवरदायक । बाणवल्लभ पंचबाणांतक । भवरोग वैद्य त्रिपुरहारक । ‘वैजनाथ’ अत्यद्भुत जो ॥६२॥ त्रिनयन त्रिगुणातीत । त्रितापशमन त्रिविधभेदरहित । ‘त्र्यंबकराज’ त्रिदोषानलशांत । करुणाकर बलाहक जो ॥६३॥ कामसिंधुर विदारक कंठीरव । जगदानंदकंद कृपार्णव । हिमनगवासी हैमवतीधव । ‘हिमकेदार’ अभिनव जो ॥६४॥ पंचमुकुट मायामलहरण । निशिदिन गाती आम्नाय गुण । नाहीं जया आदि-मध्य-अवसान । ‘मल्लिकार्जुन’ श्रीशैलवासी ॥६५॥ जो शक्रारिजनकांतप्रियकर । भु-जासंतापहरण जोडोनि कर । जेथें तिष्ठत अहोरात्र । ‘रामेश्र्वर’ जगद्गुरु ॥६६॥ ऐसिया शिवसाटम सर्वोत्तमा । अज अजित ब्रह्मानंदधामा । तुझा वरणावया महिमा । निगमागमा अशक्य ॥६७॥ ऐशा  बारा ज्योतिर्लिंगांना स्मरून । आरती केली आनंदून । अनंत कोटी ब्रम्हांडनायकाचा आवर्जून । जयजयकार दूमदूमविला गगनांत ॥६८॥त्या समयीं समर्थांचे ध्यान । विलोभनीय होतें अति प्रसन्न । धन्य जाहले भक्तांचे नयनकर्ण । कृतार्थ अंतरी जाहले ॥६९॥ ऐसा हा शिवरात्रीचा उत्सव । पहावया आले गगनांत  देव । भक्तांमनी उमटले जैसे भाव । तैसे समर्थ त्यांना पावले हो ॥७०॥ ऐशा या कृतार्थ जनसंख्येंत । रामगडचे होते भाग्यवंत । यशवंत मालोंडकर सुभक्त । ज्यांनी सोहळा पाहिला हा ॥७१॥ त्यांच्याच या अनुभवावरून । विस्तृत केलें मी वर्णन । तेणें प्रत्यक्ष पाहिल्याचें समाधान । अंतरीं पावलों आपणच  कीं ॥७२॥ मधुकर पेडणेकर म्हणून । मुलगा आला कुडाळ गांवांतून । सवें आजीला आपल्या घेऊन । दाणोलीमाजी एकदा ॥७३॥ जैसा तोच स्पर्शे समर्थ चरण । तैसे समर्थ बोलती कीं हंसून । अरे, तू माझाच मुलगा म्हणून । ओढून घेती प्रेमानें ॥७४॥ मोठा होऊनि काम कर ।  ऐसें म्हणुनी देती बियर । स्वतः पिती वारंवार । आग्रह करीत मुलांस त्या ॥७५॥ परी अपेय पान म्हणून । मधुकर देई तो झटकून । तों समर्थ देति ढकलून । मांडी वरून रागाने ॥७६॥ हातांत होता जो प्याला । तो भिरकाऊनी मारिला मुलाला । शिव्यांचा भडिमारही केला । शाप दिधला स्वमुखें ॥७७॥ तूं घेत नाहींस म्हणून । जा माझ्याचसारखा दारू पिऊन । मरशील रे पोरा जाण । उर्वरीत आपुल्या जीवनीं ॥७८॥ ग्लास मारिला जो मुलाला । तेणें खोंक पडली डोक्याला । पाहूनी या विचित्र प्रसंगाला । आजी घाबरून गेली कीं ॥७९॥ कुणास घ्यावें सावरून । की कुणाचे करावें सांत्वन । तिज उमजें न कांहीं म्हणून । रडू लागली बिचारी ॥८०॥ इकडे मात्र मधुकरला । जैसा जोराचा मार पडला । पूर्वजन्म त्याचा दिसला । चित्रासारखा समोर कीं ॥८१॥ जिकडे पाहे तिकडे सदाशिव । तूं ही शिव मी ही शिव । अन्य नव्हता कोणताच भाव । सश्र्चिदानंद अनुभविला ॥८२॥ प्रत्यक्ष सदाशिवापुढती । असंख्य शिवरुपें दिसती । त्यांत स्वतः आणि गुरुमूर्ती । प्रत्यक्ष पाहिलीं नयनीं ॥८३॥ उभय करीत होते अमृतपान । एकमेकांचे पेले बदलून । ऐसें पाहतां तो आनंदून । जागृत झाला झडकरी ॥८४॥ समर्थांचे धरिले घट्ट चरण । क्षमा याचना केली विनवून । समर्थही झाले शांत तत्क्षण । आशीर्वाद दिधला प्रेमानें ॥८५॥ पहा शापाचा कैसा झाला उःशाप । जरि जनांत दिसला प्रकोप । समर्थांचे ऐसे शिव्या शाप । आशीर्वादरूप होती कीं ॥८६॥ पुढें मधुकर झाले मोठे संत । समर्थकृपेनें झाले भाग्यवंत । पेडणेकर महाराज म्हणुनी प्रख्यात । सासवने अलिबागेंत जाहले ॥८७॥ पुढें गुरुंचे स्मरण म्हणून । दारू पिती ते प्रसाद म्हणून । लोककल्याणार्थ जीवन । अर्पण केलें समर्थांपरी ॥८८॥ जैसा परीस स्पर्शतां लोहास । सुवर्ण होई बावनकस । तैसा संत परीसाचा स्पर्श । जीवनोद्धार करितसे ॥८९॥ जो जो येईल संतसंगती । त्याला होईल उपरती । सकल ईच्छेचिही पूर्ती । सद्भक्तीमधून लाभतसे ॥९०॥ ऐसे हे शिवसाटम समर्थ । प्रकटले कीं जनकल्याणार्थ । सुलभ करूनी देती परमार्थ । केवळ पदस्पर्शानेंआपुल्या ॥९१॥ परि पाहिजे शुद्ध मती । अल्पही नसावी अशुद्ध ती । किंचित शंकाही दुर्मती । सिद्ध जाण करितसे ॥९२॥ निस्वार्थी निर्मळ शुद्ध प्रेम । हेंचि सद्गुरु साटमांचे धाम । तेथेंचि करिती ते विश्राम । परमधाम त्यांचे तें ॥९३॥ समोर येतसे जो जीव । त्याचा जाणुनि घेती स्वभाव । उत्कट दिसता भक्तिभाव । उचलुनि घेती त्याला तें ॥९४॥ अन्यथा शंकाकुशंका दुर्मती । याची जीवांत दिसता प्रवृत्ती । उचलुनी त्याला फेकुनी देती । तांदळतल्या अळी परी ॥९५॥ राजहंसापरी हे समर्थ जाण । नीरक्षीरांचें करिती परिक्षण । सुक्ष्मांत सुक्ष्म ह्यांचे लोचन । ज्ञानैकनिष्ठांस उचलती ॥९६॥ भोळा भक्तिभाव पाहून । कणव येतसे त्यांना मनांतून । त्यांचेही करिती ते जीवन । सफळ पूर्ण कृपेनें ॥९७॥ त्यांच्या तळमळ होते मनांत । की जन गुंतले संसार कर्दमांत । त्यांना देऊनिया आपुला हात । उचलुनी घ्यावें वाटतसें ॥९८॥ परि त्या अर्थानें कोणी । जवळी नाहीं आला म्हणोनी । चिंतित असती ते दिनरजनीं । खंत सांगती सुभक्तांना ॥९९॥ पुता, इथें जो टिकेल कोणी । तो शिकणार नाही प्राणी । इथें शिकेल जो प्राणी । तो टिकणार नाहीं जनीं ॥१००॥ सत् चित् आनंदाचे ज्ञान । देऊनी घडवितों प्रभूचें दर्शन । परि अज्ञानांत मानिती समाधान । सत्य न जाणू पाहती कोणी ॥१०१॥ ऐसी त्यांची तळमळ जाणून । भाऊदास घेई पदीं लोळण । कूर्मदृष्टीनें आम्हांस पाहून । कृपा करावी म्हणुनियां ॥१०२॥ चुका झाल्या असंख्यांत । त्या तुम्हीं घालव्या पोटांत । अक्षम्य अपराधांचे पर्वत । पदरी झाकावे समर्था ॥१०३॥ असंख्य अपराध करून । कर्दमांत गेलो उरफटून । त्यावरी अज्ञानाचें लेपन । जन्मजन्मांतरीचें बैसले कीं ॥१०४॥ तुमच्या करुणेचा इवला किरण । जन्मांतरीचें जाळील अज्ञान । आम्हां होईल संपूर्ण ज्ञान । सच्चिदानंद कैसा तो ॥१०५॥ त्या सच्चिदानंदाचें दर्शन । इहजन्मीं घडावें परिपूर्ण । ऐसी आशा मनीं धरून । चरण हृदयीं धरिलें मी ॥१०६॥

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य सप्तमोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]