॥ अथ षष्ठोऽध्यायः ॥
श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण । ब्रम्हचारी गृहस्थ वानप्रस्थपूर्ण । स्त्री-बाल -वृद्ध तरूण । शिवकीर्तन श्रवण करावें ॥२॥ शिवस्मरण न आवडें अणुमात्र । तो अंत्यजाहूनि अपवित्र । तो लेईला वस्त्रें अलंकार । जेवीं प्रेत शृंगारिलें ॥३॥ तेणें भक्षिलें अन्न । जैसें पशु भक्षिती यथेष्ट तृण । जैसें मयूरा अंगीं नयन । तैसेच नेत्र तयांचे ॥४॥ वल्मीक छिद्रवत कर्ण । द्रुमशाखावत हस्तचरण । त्याची जननी व्यर्थजाण । विऊनी वांझ राहिली ॥५॥ तरी श्रवणीं धरावी आवडी । जेंवी पिपीलिका गुळासी न सोडी । अर्ध तुटेल परि न काढी । मुख तेथुन सर्वथा ॥६॥ कीं चुकला बहुत दिवस सूत । तेवढाच पोटीं प्रीतिवंत । त्याची शुभवार्ता ऐकतां अकस्मात । धांवती मातापिता जेवीं ॥७॥ अमृताहूनि वाड । त्या गोष्टी लागती कर्णास गोड । तैसें कथाश्रवणी ज्यांचे पुरे कोड । सर्व टाकोनी धांवे श्रवणां ॥८॥ बाळू बल्लाळ म्हणून । एक सुभक्त होता सूज्ञ । परि स्तिमित झाला मनांतून । भोजन वाढित असतांना ॥९॥ दीडशें मंडळींचें भोजन । व्हायचें होतें अजून । परि भात संपला म्हणून । चिंतित झाल अंतरीं ॥१०॥ आजपर्यंत असंख्यांत । भोजनें नित्य होतीं होत । परि अन्न नव्हतें संपत । मग कैसे घडलें अचानक ॥११॥ तेणं बाळू झाल चिंतित । वाटे समर्थांना करावें विदित । परि त्यांना सांगण्याची हिंमत । काहीं केल्या होईना ॥१२॥ समर्थ आहेत अंतर्ज्ञानी । तैसेंच पाहती अंतःचक्षूंनीं । अन्नपूर्णा उभी हात जोडूनी । असतां सांगणें उचित कां ॥१३॥ शिवाय प्रसंग घडला नजरेपुढती । मनांत त्याची जाण होती । घेऊनी आली मटण-चपाती । एक म्हतारी सुभक्त हो ॥१४॥ तिच्या मनांत होती आस । कीं मंडळींसह द्यावी समर्थांस । मनसोक्त मटण-चपाती जेवण्यांस । एकदांतरी आपण ॥१५॥ ती गरीब भोळी अज्ञानी । तिज अंदाज न ये ध्यानीं । एक रत्तल मटण शिजवोनी । चपात्यांसह आणिल्या तिनें ॥१६॥ जैसी म्हातरी आली तें घेऊन । तैसें समर्थ बोलले हंसून । आज मटण-चपातीचें जेवण । म्हातारी सर्वांना देईल कीं ॥१७॥ ऐसें ऐकतां मधुर वचन । म्हातारी गेली आनंदून । गहींवरून आलें तिचें मन । खूण जाणिली अंतरींची ॥१८॥ परि सभोवतींचा भक्तगण । बघता गेली घाबरून । कैसें समर्थांमुखी पडेल अन्न । कणही न येईल वाट्यांला ॥१९॥ परि आनंदाच्या येऊनि भरांत । डबा दिला बाळूचे हातांत । तो उघडुनि बघतां क्षणांत । बोलतां झाला समर्थांना ॥२०॥ आज ऐंशी मंडळी आहेत जेवण्यांला । इतुकें न पुरेल पंगतीला । तैसें समर्थ बोलले बाळूला । हुकमी एक्क्यांत आपुल्या ॥२१॥ प्रथम मज द्यावें काढून । बाकीचें द्यावें सर्वांना वांटून । तैसा बाळू आला घेऊन । ताटलींत वाढून झडकरी ॥२२॥ म्हतारीच्या दिली हातांत । ती स्वकरें भरवी मुखांत । समर्थ राहती वाखाणित । प्रत्येक घास कौतुकानें ॥२३॥ तिचा मातृभाव झाला जागृत । वाटे मुलांस आहोंत कीं भरवीत । आनंदाश्रु भरून आले डोळ्यांत । इच्छा पूर्ण झाली म्हणून ॥२४॥ हात पोटावरती फिरवुनी । संतृप्त मनानें ढेकर देऊनी । म्हणती यथेष्ट जेविलों पोटभरूनी । स्वादिष्ट चविष्ट जेवण मी ॥२५॥ नंतर बाळूकडे पाहून । डोळ्यानें करिते झाले खूण । आतां सर्वांना द्यावें वाढून । चविष्ट भोजन वृद्धेचें ॥२६॥ तैशा पत्रावळी लाविल्या पंगतींत । आणि वाढण्यांस केली सुरुवात । जन पोट भरूनि होते जेवित । वाखाणींत चव मटणाची ॥२७॥ वृद्धेच्या त्या डब्यामधून । काढीत होता स्वतःच म्हणून । बाळूस होती याची जाण । समर्थांच्या सर्वज्ञपणाची ॥२८॥ हा प्रसंग गेला तरळून । बाळूच्या नयना समोरून । तेणें विश्र्वास झाला उत्पन्न । अंगणांत गेला झडकरी ॥२९॥ समर्थांची छाटी होती वाळत । ती घेऊनि आला धांवत । प्रार्थना केली भक्तियुक्त । भांड्यावर झांकली झडकरी ॥३०॥ पुनश्र्च हात लाविला विश्र्वासून । जड झाल्याची झाली जाण । छाटी सारुन डोकावून । पाहतां आश्र्चर्य देखिलें ॥३१॥ रिकामें भांडे होतें म्हणून । चिंतित झाला जेणें कारण । तें भातानें गेलें भरून ।आनंद गगनीं मावेंना ॥३२॥ पंगतीवर वाढील्या पंगती । तरि भाताची न झाली क्षती । बाळूची दुणावली भक्तीस्फूर्ती । समर्थ चरणीं अढळ ती ॥३३॥ पांचवर्षीय कन्या बेबी म्हणून । तिचे लाड करिती सर्वजण । लाडसाहेब ऐसें म्हणून । समर्थ तिजला पाचारिती ॥३४॥ एकदां रडूं लागली ती अकारण । समजूतही घालिती सर्वजण । परि हट्टावर चढली विशेषकरून । कांहीं केल्या थांबेचिना ॥३५॥ तिचा वडिल बंधू नामू म्हणून । तोही आला कीं धांवून । बहिणीस रडतांना पाहून । युक्ति प्रयुक्ति योजितसे ॥३६॥ तिच्यापेक्षा तिनच वर्षांनीं । नामू मोठा होता म्हणूनी । बहिणीची समजूत घालुनी । नित्य खेळवित असे तो ॥३७॥ कधीं प्रेमानें कधीं लाडानें। कधीं धाकानें कधी चाळ्यानें । वाकुल्या दाखवुनी गाई गाणें । शांत तिला करीतसे ॥३८॥ तेणें अंगणांत आला धांवून । इकडे तिकडे पाही हिंडून । कांहीं युक्तिचें शोधी कारण । तों नजर गेली दगडावरी ॥३९॥ त्या दगडावर होती पडलेली । नाखाडीची वेल त्याला दिसली । ती सर्पासम कीं भासली । म्हणूनी पकडली ती हातानें ॥४०॥ ती खसकन घेतली ओढून । पहा साप आणिला ऐसें म्हणून । बहिणीकडे गेला तो धांवून । भिती दाखविण्यां कारणें ॥४१॥ परि क्षणांत त्याला झाली जाण । तो सापची होता कीं म्हणून । तैसा दिला तो त्यानें फेकून । वळवळत गेला झाडींत ॥४२॥ अंगणांत होते सर्वजण । हें दृश्य बघतां गेले घाबरून । तो कुसडा घोणस म्हणून । विषारी सर्प होता कीं ॥४३॥ त्याचें तोंडचि आलें हातांत । तेणें दंश न झाला प्रत्यक्षांत । समर्थ कृपा ही साक्षात । म्हणूनि मरण टळलें कीं ॥४४॥ ऐसा नामू वांचला म्हणून । ताईसह जाती गजानन । समर्थांचें घेऊनी दर्शन । प्रसंग कानीं घालावया ॥४५॥ नुकतेच अभ्यंग स्नान करून । गुलाबी छाटी अंगांत नेसून । समर्थ येती देण्या दर्शन । सभामंडपांत बाहेरच्या ॥४६॥ जैसा नमुनें केला नमस्कार । तैसा त्याचा धरूनियां कर । उठवुनि बोलती साधु खरोखर । सुपुत्र तुझा आहे रे ॥४७॥ मी याला देवाकडून । मागून घेतला म्हणून । याचें चुकलें रे मरण । तिथेंच होतों तेव्हां मी ॥४८॥ आतां न करावी याची चिंता । ऐसे उद्गार त्यांचे ऐकतां । ताई गजानन हे उभयतां । साश्र्चर्य बघत राहिले ॥४९॥ समर्थांचे लक्ष होतें म्हणून । पुत्रास मिळालें जीवनदान । अंतरी याची होतां जाण । चरण क्षाळिले अश्रुंनी ॥५०॥ गुरूचें केल्यानें स्मरण । आपोआप होतें संरक्षण । योगक्षेम लालन पालन । प्रेमानें तो करीतसें ॥५१॥श्रीमंत बापूसाहेबांची स्वारी । डायरियानें पडली आजारीं । डाॅक्टर वैद्य झाले सर्व तरी । डायरिया बरा होईना ॥५२॥ पथ्य पाळिती ते भोजनांत । तरि आजार न ये आटोक्यांत । शरीर जाहलें कीं अशक्त । चिंतित अंतरीं जाहले ॥५३॥ वाटे कीं मुंबईस जाऊन । सर्व शरीर घ्यावें तपासून । मोठ्या डाॅक्टरांना दाखवून । सल्ला घ्यावा तज्ञांचा ॥५४॥ परि जाण्यापूर्वीं मुंबईत । दर्शन घेणें वाटें उचित । श्रीगुरुंचा घेऊनि आशीर्वाद । जाण्याचें त्यांनीं ठरविलें ॥५५॥ आंबोलीच्या राजवाड्यांत । तें समयीं होते ते राहत । गाडीनें येऊनि रस्त्यांत । अर्ध्या मैलावर उतरती ते ॥५६॥ तेथोनि ते जाती चालत । ऐसा नियम होते आचरित । रूप आठवुनियां डोळ्यांत । सद्गुरुरायाचें आपुल्या ॥५७॥ समर्थांचे घेतां दिव्य दर्शन । आनंदमग्न होतसें अंतःकरण । चैतन्य जागतसें मनांतून । आनंदउर्मी फुटतात ॥५८॥ जैसें तिमीर जातसें पळून । उगवतांच कीं सूर्यनारायण । तैसें घडतां श्रीसद्गुरु दर्शन । विचार जळमटें पळतातीं ॥५९॥ तैसेंच होत असें श्रीमंतांचे । मुख पाहतां तें समर्थांचें । भान हरपती कीं देहाचें । शुद्ध बुद्ध विसरती ते ॥६०॥ जैसें पाहती देऊनि नजर । तैसा दिव्यत्वाचा घडे साक्षात्कार । संभ्रमांत पडती कीं समोर । चैतन्य सदेह साकारलें कां ॥६१॥ वाटे रूप घ्यावें कीं प्राशून । आकंठ आपल्या नेत्रांमधून । तरी न होई भुकेचें शमन । उत्कंठा अधिक वाढतसे ॥६२॥ वाटे कीं परमशांत नेत्रसुख । सदैव असावें की सन्मुख । परमानंद प्राप्तीचें आत्मसुख । समर्थ दर्शनें लाभतसें ॥६३॥ ऐशा सुखद स्मृतींत जाती गुंतून । तों आजारपण गेले विसरून । भावोत्कटतेनें करुनी वंदन । भजनीं मंडळींत बैसती ते ॥६४॥ पहा श्रीगुरुच्या दरबारांत । राजा व रंक बैसती कीं संगत । विसरोनी आपुले वर्णभेद । तूं माय मी लेकरूं या भावनेनें ॥६५॥ टाळ मृदंगाची साथ । झांज पेटीच्या सुरांत । भजन येई रंगात । भक्तवृंद डोलतसे ॥६६॥ हरि तुझी भक्ती मला देई । हरि तुझी प्रीति मला देई । भवसागरीं या भक्तसाई । तारक नौका होई ॥६७॥ हरिचें घेतां मंगलदर्शन । क्षणांत होतो सुभक्त पावन । हरिनामाचें अमृत सिंचन । अक्षय सुख देतें ॥६८॥ जैसा अभंग येई रंगांत । समर्थ जाती समाधीत । रूप जात असें कीं बदलत । तेजस्वी आरक्त दिसतसें ॥६९॥ श्रीमंतांना आलें गहींवरून । रूप समर्थांचें तें पाहून । आनंदाश्रु झरती नयनांतून । सार्थकता अंतरीं वाटतसे ॥७०॥ भजन गेलें कीं संपून । तरी उठण्याचें न राही भान । भानावर आणी कोणी म्हणून । लगबग उठती दर्शनार्थ ॥७१॥ जैसें समर्थचरण वंदिले । तैसें उद्गार कानीं पडले । जिवाचे हाल कारे चालविले । चकली, लाडू खात जा ॥७२॥ श्रीमंत गेले कीं समजून । हाच आदेश दिला म्हणून । द्वितीय दिनीं सर्व आणून । नैवेद्य दाखविती समर्थांना ॥७३॥ देवा तुझा हा प्रसाद जाण । औषध म्हणुनि करितों भक्षण । जिवाचे हाल नको म्हणून । आदेश तुमचा पाळितसें ॥७४॥ निःशंक होऊनि ते खाती । तैसी व्याधींची झाली समाप्ती । डाॅक्टर वैद्य आश्र्चर्य करिती । मति कुंठित होतसे ॥७५॥ समर्थांचे विचित्र बोलणें । तैसेची विचित्र कीं वागणें । विचित्र उपायही सांगणें । ज्ञानवंतांस आकळे ना ॥७६॥ एक गणेश वडेर म्हणून । समर्थ भक्त होते जाण । नाना उद्योग पाहती ते करून । परि जम कशांतचि बसेना ॥७७॥ ऐशा असतां ते मनःस्थितींत । समर्थ दर्शनालागीं येत । विनोंदे सांगती समर्थ गोष्ट । तिसऱ्याकडे बघून ते ॥७८॥ रात्र झाली कीं झाडांवर । माकड ठरवी बांधण्याचें घर । परि दिवस उगवतां सत्वर । विचार व्यर्थ जातसे ॥७९॥ पुष्कळ उड्या मारतो माकड । दांत घासण्यांस न मिळे सवड । ऐसी उड्यांची मोठी आवड । तैसा विचार करूं नये ॥८०॥ तरि आधीं घासावे दांत । ऐसें विनोदें होते सांगत । परि वडेर समजले कीं मनांत । व्यवसाय किल्ली गवसली ॥८१॥ तोचि आशीर्वाद समजून । वडेर येति धांवून । त्यांचे गळ्यांत हार घालून । वंदन करिती प्रेमानें ॥८२॥ तों समर्थ बोलती हंसून । तुज दोन लाख दिले म्हणून । परि नफा होता ऐसा जाण । निम्मा द्यावा मजला तूं ॥८३॥ तों वडेर बोलती आनंदून । तैसेचि देतों मी वचन । धंद्यामधील अर्धें उत्पन्न । अर्पण तुम्हांस करीन मी ॥८४॥ पुढें येती ते मुंबईंत । तों पारशी मित्र येई धांवत । म्हणे मित्रा मजसंगत । धंद्यांत सहभागी व्हावें तूं ॥८५॥ एक रासायनिक कारखाना । विकत घेणें आलें मना । परि तुझ्या सहकाराविना । कार्य व्यर्थ होईल रे ॥८६॥ पैसा लाविन मी धंद्यांत । तुझ्या बुद्धीचातुर्यासंगत । परि अर्ध्याअर्ध्या भागिदरींत । कारखाना उभय चालवूं या ॥८७॥ ऐसा करार झाला सम्मत । तो आाॅर्डर मिळाली आफ्रिकेंत । सौंदर्य प्रसाधनासंगत । दंतमंजनें निर्यात करिती ॥८८॥ पुढें माकडछाप दंतमंजन । बाजारांत आले ते घेऊन । धंदा वाढला कीं सपाटून । घोड्यापरि दौडतसे ॥८९॥ पाहतां पाहतां वर्षांत । खर्च वजा जातां हातांत । दोन लाख मिळाले फायद्यांत । शब्द स्मरला समर्थांचा ॥९०॥ ऐसे असतां ते आनंदांत । तों समर्थ प्रकटले पुढ्यांत । म्हणे पैसे द्यावे त्वरित । वचनाप्रमाणें माझिया ॥९१॥ तैसे वडेर करिती सुपुर्त । एक लाख त्यांचे हातांत । तों समर्थ झाले आज्ञापित । शेगडी आणावी म्हणून ॥९२॥ तैशी शेगडी आणली पेटवून । समर्थांशेजारी दिली ठेवून । वडेर ही बैसती येऊन । समर्थांजवळी विनम्रपणें ॥९३॥ तेंव्हां गमति जमतिच्या गोष्टी । रंगांत येऊनी सांगती । एक एक नोट काढिती । शेगडीत टाकती जाळून ॥९४॥ ऐसें एक एक करून । लाख रूपये टाकिले जाळून । वरी गेले संतोषूनी । अंतरी समाधान पावले ॥९५॥ वडेरांचे खांद्यावरून । हात फिरविला संतोषून । मज पैसे पावले म्हणून । शाबासकी दिली प्रेमानें ॥९६॥ वडेर झाले अत्यंत श्रीमंत । तैसे भक्तही झाले परमश्रेष्ठ । गुरुवर लिहीती अभंग भजन । भक्तियुक्त प्रेमानें ॥९७॥ अतिशय बियर पिण्याची आवड । हेंच समर्थांचे होते वेड । त्यांचे पुरविती लाडकोड । भक्तश्रेष्ठ वडेरजी ॥९८॥ जेव्हां येत असे त्यांना लहर । बाटलीवर बाटली पिती सत्वर । परि दूर करिती ते रोग आजार । थोडी भक्तांस पाजुनियां ॥९९॥ बीयर पिऊनी बरा झाला । ऐसा कित्येकांना अनुभव आला । तरि एक मनुष्य आला । शंकित अंतरीं होऊनियां ॥१००॥ समर्थांसारख्या अवधूताला । खाण्यापिण्याचा निषेध कुठला । कफनि लुगडें दिगंबराला । सारखेंच मात्र वाटतसें ॥१०१॥ सुग्रास अन्न वा कदान्न । एकाच चविनें करिती भोजन । तैसें बियर आणि जलपान । सारखेंच त्यांना वाटतसें ॥१०२॥ कुऱ्हाडीवरी पाय मारून । जखम घेती कीं करून । परि देहातीत असतां मग्न । आनंद दुःख जाणवेना ॥१०३॥ देहांत असुनि देहातीत । ऐसें ज्यांचे नित्य विहित । त्याला कैसे हित अहित । पथ्य कुपथ्य सारखेंच ॥१०४॥ एकदा समर्थ असतां निद्रित । तो मनुष्य आला शंकित । म्हणे मित्रा कैसा हा विक्षिप्त । संत दारू पिणारा ॥१०५॥ मन शंकेनें येते भरून । साधुत्वाचें न दिसें लक्षण । तों त्याचें तोंड बंद करून । मित्र रागावला कीं ॥१०६॥ तों समर्थ उठति झोपेंतून । छाटी फेकून देती चिडून । कोण म्हणतो मी देव आहे म्हणून । ओरडूं लागले मोठ्यानें ॥१०७॥ मी दारू पितों मी कोंबडी खातो । तेथें का कधीं देव असतो । देव देवळांतची असतो । चलेजाव साले येथूनी ॥१०८॥ शिव्या देऊनी बाहेर पडती । तों शंकिताला वाटली भिती । आपुल्या बोलण्याची परिणती । झाली असें वाटलें ॥१०९॥ तो मनांत गेला घाबरून । परि वाग्बाण गेला सुटून । आतां कोपाला होऊनी कारण । मनोमनीं क्षमा मागतसे ॥११०॥ तैशाच त्या नग्नावस्थेंत । समर्थ फिरती बाजारांत । शिव्या अश्लील होत्या मुखांत । सोनाराजवळ थांबले ॥१११॥ मी मांसमच्छी खातों । मी बियर, दारुही पितों । साधु कधीं ऐसा असतो । बडबड त्यांची चालतसे ॥११२॥ त्या सोनाराचें दुकानांत । तेजाब होतें भांड्यांत । तें उचलुनियां हातांत । घटाघटा पिऊन गेले ॥११३॥ समर्थ प्याले तेजाब । बाजारांत झाली एकच बोंब । त्या शंकिताला झाला जुलाब । मरण भितीनें अंतरी ॥११४॥ परि तेजांब पितां तें क्षणीं । समर्थ झाले शांत मनीं । जैसें कांहीं न घडले म्हणुनी । मठांत फिरती माघारीं ॥११५॥ पुढे तो शंकित गेला शरण । समर्थभक्त झाला अनन्य । ऐसे हें नाटक रचून । शंका विछिन्न केलीसें ॥११६॥ राग लोभ मोह मत्सर । याहूनी संत असती पार । परि माया पांघरुनी अंगावर । भक्तां निःशंक करिती ते ॥११८॥ ऐशा या समर्थांच्या कथा । कर्णोपकर्णीं पसरती सर्वथा । आकर्षून घेती भक्त चित्ता । मधुमक्षिका बनुनी धांवती ॥११९॥ समर्थांच्या वास्तव्येंकरून । दाणोली झाली परमपावन । वाटे कैलास कीं आलें उतरून । भूमिवरती रहावया ॥१२०॥ जेथें वास्तव्य करिती श्रीशंकर । तेंचि कैलास वा काशीनगर । येथें कोणी न राहे पामर । दर्शने पुण्य जोडितसे ॥१२१॥ पूर्व संचिताचें ओझें घेऊन । जे जे येती दर्शना कारण। त्यांचे संचित जात असें जळून । शुद्धात्मा तेचि होतात ॥१२२॥ वाटे कल्पतरू, कामधेनु, चिंतामणी । यांचा संगम झाला त्रिवेणी । दाणोलीश्र्वराच्या पावनचरणीं । सकलां मनोवांछित द्यावयां ॥१२३॥ ऐशा या त्रिवेणी संगमांत । भाऊदास प्राशितो चरणांमृत । सुभक्ता देतो तिर्थप्रसाद । एक एक अध्याय गोड हा ॥१२४॥
इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य षष्ठोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।