श्री सरस्वत्यै नमः

उपकार

ब्रह्मकुमारी विणाधारिणी देवी करी उपकार

विद्येचा मज प्रकाशुनी मती, घडवी साक्षात्कार ।। धृ ।।

वीणेवर झंकार देऊनि, नवरस निर्मियले 

शब्द बोलके चैतन्याने अमृतमय केले

चराचरातुन तुझेच दिसते, स्वरूप शब्दाकार ।। १ ।।

ब्रह्म अगोचर शब्दातुन तूं सकला दर्शविले 

अर्थ होऊनि ज्ञानांमृत ते, प्राशुनि तोषविले 

रूप सांवळे भगवंताचे, शब्द करिती साकार ।।२।।

व्यास मुखांने तूंच प्रसवली, अमृत रसवंती 

तूंच वाल्मिकी मुखे पसरवी, रामायण कीर्ति 

श्रीकृष्णाच्या मुरलीचे तूं, सप्त सूर झंकार ।।३।।

तूंच प्रगटली ज्ञानेशाच्या रसाळ ओवींत 

भक्ति गुंफली तुकयाच्या तूं अभंग वाणीत 

वेद-पुराणी अक्षर झाला, तुझाच गे संसार ।।४।।

प्रसन्न होऊनि हंसवाहिनी, देशिल कां वरदान 

तुझ्या कृपेने मजला करणे, श्रीगुरुचे गुणगान 

प्रगट करी मज गुरुभक्तिचे, देवि मूक्तिद्वार ।।५।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]