पंडीत दर्पोक्ती (अ-२७)

विप्र दोन ते पंडीत आले, चर्चा करण्या श्री पुढती 

वेदही सारे ज्ञात अम्हला, ऐशी त्यांची दर्पोक्ती          ।। १।। 

विनयाने बघ विद्या शोभे, वाद कासया श्री वदती 

परि न ऐकती गर्वे भरले, हारीपत्र द्या ते वदती         ।। २।। 

रस्त्या वरती श्रीगुरु बघती, एक मातंगी जाताना 

पाचारुनिया श्रीगुरु देती, आज्ञा सायंदेवांना             ।। ३।। 

रेषा काढा सात भूवरी, मातंगीला श्री वदती 

ओळंगुनि या सातही रेषा, एक एक तू ये पुढती       ।। ४।। 

पूर्वाश्रमीचे ज्ञान जाहले, अतर्क्य वर्ते मातंगी 

जन्मही सारे सन्मुख दिसती, तसाच बोले मातंगी    ।। ५।। 

जन्म सातवा येता बोले, वेदशास्त्र मम मुखावरी

चर्चा करण्या यावे सन्मुख, विप्र असे मी अधिकारी  ।।६।।

पंडीत दोघे सन्मुख माझ्या, बसा उभयता चर्चेला 

प्रसंग पाहुनी भयभीत पंडीत, शरणांगत श्री दत्ताला   ।। ७।। 

भविष्य उज्वल मातंगाचे, गुपीत जन्माचे कळले 

परि विस्मृति देऊनि त्याला प्रारब्धावर सोपविले   ।। ८।। 

अहंकार हा शत्रु समजा, सारे जाते विलयाला 

विनम्रतेने स्व स्वरूपाचे, वैभव लाभे भक्ताला      ।। ९।। 

कथा सांगते अन्य न कोणी, श्रेष्ठ असे या त्रिभुवनी 

गुरुकृपेने महर्षी होईल, धौम्य ऋषींची बघ करणी   ।।१०।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]