नंदी नामा

तुझा मी अपराधी देवा

कधीं न स्मरले, नच पूचियले, नच केली सेवा    ।। धृ।। 

कष्टच उदरीं होतो भोगत 

गर्भवास मी मुकाच सोसत

विदेह स्मरणाविन मी तुमचा, करु कसा धांवा     ।। १।। 

सरले खेळुन सुरम्य शैशव 

खेळण्यातही गेले यौवन

विवेक सोडुन, पाहुन भुलला, इहलौकिक वैभवा  ।। २।। 

तारुण्यातील माझे मी पण

गेले मोहामध्येंच रंगुन

पार बुडालो संसारातिल, सेवित मी गोडवा     ।। ३।। 

वृद्धपणाने मला गांठले 

संसारातील लक्ष उडाले

उमगे अंति नसे तुझ्याविण, कोणी तारक जीवा   ।। ४।। 

असे संपले माझे जीवन 

तुमचे अंति घडले दर्शन 

उद्धारावे सदगुरुराया, शरणांगत या जीवा       ।। ५।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]