माझे पसायदान
याहून काही देवा, देऊ नको मला रे ।
ठेवि सदाकृपेचा, कर हा शिरावरी रे ।। धृ ।।
गाता अभंग तुमचे मन मोहरून जावे
बहरून भावनांनी, अश्रुत मी नहावे
कांही मला न कळते, तरी एकमात्र ठावे
तू मी सदा असावे… दुग्धांत शर्करा ।।१।।
जडली कशी मलारे, प्रीती तुझी कळेना
सिंधू मधील लहरी, जशी वेगळी ठरे ना
सोडून जात नाही, जशी सावली तरुंना
तू मी तसे असावे, प्रेमांत आर्द्रता रे ।। २।।
शब्दांत सूर जैसे, वृक्षांत बीज तैसे
राहो अभिन्न नाते, पुष्पांत गंध तैसे
भक्तींत दंग होण्या, मन मीन आज तरसे
रंगात भंग देवा होऊ नये कधी रे ।।३।।