गोपीसुताची भक्ती (अ-८)

प्रसंन्न झाला गोपी सुतावर 

सदाशीव, निलकंठ, उमावर ।। धृ ।।

पाषाणाचे कल्पुनी मंदीर 

आंत बसविली पिंडी सुंदर

गंध अक्षता पाषाणावर 

पाषाणाचे बिल्व शिवावर ।। १ ।।

गोपी सुतांचा खेळ रंगला

पाषाणावर भाव वाहिला 

कल्पनेतल्या नैवेद्यावर 

झाला संतोषीत हा कर्पुर ।।२।।

जयशिव शंकर, जयशिव शंकर 

गोपीसुत गर्जतात हर हर SS

निर्मळ भोळा भाव ही दृढतर 

बघुनि नाचे प्रभू निरंतर ।।३।।

पाहूनी गोपी सुताची प्रीति 

प्रसन्न झाला पार्वती पति 

कोटी प्रभेचा प्रकटे दिनकर 

ठेवि सुतावर वरद अभयकर ।।४।।

जो प्रेमाने भाव वाहतो

भार तयाचा प्रभू झेलतो 

वसे त्याच्या प्रभू निरंतर

सभोवताली सबाह्य अंतर ।। ५ ।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]