अंबरीष दुर्वासऋषी (अ-३)

भक्तासाठी कमलापतिहे, गर्भवास सोसती 

वैकुंठाचे वैभव सोडुनि, भूवरी अवतरती           ।। धृ ।। 

एकादशीचे व्रत भूपति हे, अंबरीष करिती 

दुर्वासा सह अवचित मुनिगण, पारण्यास येती 

सरिता तटी परि स्नान मिषाने, विलंब ते करिती   ।। १।। 

अतिशय होता विलंब मुनिला, एकादशी भंगते 

मुनिविण अनुचित भोजन करणे, नृपास की वाटते

तुलशीदलाचे तीर्थ प्राशुनी, द्वादशीं ते सोडती       ।।२।।

अंर्तज्ञाने जाणुनी कोपुनी, नृपा घरी येती 

आणि अतिथी अपमानास्तव, शाप तया देती 

“दश समयी जा गर्भवास” तुज घेणे नृपती           ।।३।।

शाप ऐकता अंबरीषाने, स्मरला कमलापती 

त्वरित धाडले चक्र सुदर्शन, फिरे ऋषि भोंवती 

घाबरले दुर्वास प्रभूला, मनी शरण जाती               ।।४।। 

अभय नृपाला देऊन प्रभु हे शाप स्वतः घेती 

जनकल्याणा उपअवतारे, गर्भवास सोसती

अंबरीष दुर्वास जनांवर, उपकारच करिती             ।। ५।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]