ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय अठरावा ॥

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। काकांनी संपूर्ण जीवित । वाहिले माऊलीच्या सेवेत । दत्तप्रभूची लाभली संगत । भक्ती वृद्धिंगत होत असे ।।२।। दर्शनास येती भक्तगण । सावलीचे करण्या सांगती वाचन । त्यांच्या मनोकामना होती परिपूर्ण । श्रद्धाभक्ती वाढतसे ।।३।। बायजींचे हे श्रद्धास्थान । सर्वांगाने करावे परिपूर्ण । तेणे पादुकांचे करावे अधिष्ठान । सदिच्छा अंतरी दृढावली ।।४।। सगुण पादुकांचे करिता पूजन । सकल भक्तांचे होईल कल्याण । निर्गुणातून घडेल सगुण दर्शन । प्रेमभक्ती उचंबळेल ।।५।। ऐसा सुज्ञ विचार करून । माऊलीच्या पादुका घेतल्या करून । रामनवमी पुण्यतिथी दिन । पुण्यप्रदान दिन झाला असे ।।६।। ऐसा हा पूण्य प्रदान दिन । आजन्म स्मरणांत राहावा म्हणून । पालखी मिरवणुकीचे केले आयोजन । बायजी गौरव वाढविण्या ।।७। बायजींचे अवतार कार्यकारण । कधीच लोपू नये समष्टीतून । त्याचे अधिकश्च अधिक व्हावे विस्तारण । कलियुगी कीर्ती पसरावी ।।८। ऐशा निर्मल शुद्ध भावनेने । काकांची चालती जी यत्ने । ती या पालखीच्या प्रयत्नाने । शुभारंभ त्यांनी केला असे ।।९।। पालखीचे करावया वर्णन । मज शब्दांची पडतसे वाण । भक्तांचे तृप्त झाले मन कान लोचन । अपूर्व सोहळा पाहताना ।।१०।। छोट्याशा चकचकीत पालखीत । माऊली प्रतिमेच्या  संगतीत । रुपेरी पादुका ठेवल्या पेटीत । सगुण रूप आईचे ।।११।। प्रतिमा केली सालंकृत । हळदी कुंकवांनी भरला मळवट । ओटी भरुनी ठेविली पुढ्यात । विविध सुवासिक हार घातले ।।१२।। पालखी शृंगारली फुलांनी । सप्तरंगीत गुच्छ होते चहूबाजूंनी । मृदूमुलायम भक्तीभावनांनी । आनंदाचा साज चढविला असे ॥१३।। जैसे सुवासिनींनी केले पूजन । काकांना नम्र केले वंदन । तू हो पुढे मी आहेच म्हणून । साक्ष आरोळीने दिली असे ।।१४।। ऐसे मिळता आश्वासन । काकांनी उचलली पुढती राहून । मागे मी उचलली हात देऊन । जयजयकार आईचा केला असे ।।१५।। तुतारीने दिली ललकारी । भजनांत रंगले वारकरी । पुष्पवृष्टी झाली पालखीवरी । आतीषबाजीने शोभा वाढविली ।।१६।। जानकीआईचा फोटो होता  गाडीवर । मागे भजनी नाचती तालावर । पालखी मात्र होती मध्यावर । पुरुष पुढती स्त्रिया मागुनी येणे परी ।।१७।। फुलांचा होत होता वर्षाव । जय जानकीत रंगला भक्तिभाव । मिरवणुकीचा पडतसे प्रभाव । मार्गात जन वंदिती आदरे ।।१८।। कोणी घेऊनी येई आरती । कोणी भक्तिभावे भरती ओटी । कोणी तान्ह्याला ठेवती चरणावरती । आशीर्वाद घेण्या माऊलीचा ।।१९।। परि उत्साहाला आली रंगत । स्त्रिया सरसावल्या पदर सावरीत । गरबा फुगडी खेळती आनंदात । झांज तालावर नाचती त्या ।।२०।। म्हणे आई नाचत होती गरब्यात । तिला आवडीची द्यावी साथसंगत । तीच आपल्यासवे आहे चालत । पालखीतून सर्वांना बघतसे ॥२१॥ ऐसी पालखी गाजत वाजत । मिरवणूक आली स्थानाप्रत । तो सन्मुख आला लेझीम पथक । मानवंदना देण्यास ।।२२।। छोट्या छोट्या शाळकरी मुलांनी । स्वागत केले लेझीम खेळांनी । फटाक्यांनी सलामी दिली गर्जुनी । पालखी मंडपात आली असे ।।२३।। मंडपात झाले सुस्वागत । जयजयकारांनी दुमदुमले आसमंत । मंगलआरतीने केली सुरूवात । ॐ शांती शांतीने स्थिरावले ।।२४।। नंतर सुरू झाले सावलीचे वाचन । भक्तगण वाचती सेवा म्हणून । ऐसे माऊलीचे चाले गुणसंकीर्तन । सायंकाळपर्यंत सर्वांचे ।।२५।। इकडे सुरू झाले अनुभवन कथन । तिकडे सौभाग्यवतींचं ओटीभरण । नंतर देवदत्तांचे सुंदर मार्गदर्शन । दिन आनंद स्मरणात राहिला ।।२६।। दोन हजार सातचे चैत्री नवरात्र । आजन्म स्मरणात राहील सर्वत्र । श्री दत्तात्रय-जानकी आले एकत्र । काकांच्या माध्यमातून समष्टीत ।।२७।। असो आता व्हावे सावधान । तुम्हा कथिले काकांचे जीवन । वाचिता होईल आत्मज्ञान । सद्गुरूभक्ती करावयाचे ।।२८। सद्गुरुभक्ती करावी कैशी । श्री गुरुगीतेत कथिली तैशी । संवाद करिता शिवपार्वतीशी । त्याच ओव्या कथितो मी । पार्वती पुसे श्री शिवासी। की भवार्णव तरावयासी । जीव कैसे पावती ब्रह्मत्वाशी। उपाय कोणता असे ।।३०॥ दुःखे गांजला धरणीवर । मनुष्यमात्र होई बेजार । तरी हे श्री करुणाकर । कैवल्यपंथा मज दावी ।।३१।। प्रश्न ऐकून श्री शंकर । प्रसन्न होती पार्वतीवर । म्हणे प्रश्न पुसिला सुंदर । लोकोपकारक कल्याणदायी ।।३२।। त्रिभुवनात आहे दुर्लभ । सद्गुरूब्रह्माचा लाभ । परि गुरुचरण धरिता लोभ । सुलभ प्राप्त होईल ।।३३।। जडा चाड पराभक्ती । तेणे सद्गुरू सेवावा एकांती ।। गुरुतत्त्व न जाणती । मूढमती जन कोणी ।।३४।। होवोनी निःसंशय । सेवावे सद्गुरुपाय । भवसिंधू तरणोपाय । तत्काळ होय जडजीवा ।।३५।। सर्व तीर्थांचे माहेर । सद्गुरु चरणतीर्थ निरंतर । सद्भावे सदशिष्य  नर । सेविता परपार पावले ॥३६।। शोषण पापपंकाचे । ज्ञान तेज करी साचे । वंदिता चरणपद्म सद्गुरूंचे । भवाब्धीचे भय कायी ॥३७।। अज्ञान मूलहरण । जन्मकर्म निवारण । ज्ञानसिद्धीचे कारण । गुरुचरण तीर्थ ते ।।३८।। गुरुचरण तीर्थप्राशन । गुरुआज्ञा उच्छिष्ट भोजन । गुरुमूर्तीचे अंतरी ध्यान । गुरुमंत्र वदनी जपे सदा ।।३९।। गुरुमूर्ती नित्य स्मरे । गुरुनाम जपे आदरे । गुरुआज्ञा पालन नरे । नेणिजे दुसरे गुरूविना ।।४०।। गुकार तो अज्ञान अंधःकार । रूकार वर्ण तो दिनकर । स्वयंप्रकाश तेजासमोर । न राहे तिमीर क्षणभरी ॥४१।। म्हणोनी आराधावा श्रीगुरू । करोनी दीर्घदंड नमस्कारू । निर्लज्ज होऊनिया परपारू । भवसागरू तरावा ।।४२।। ब्रह्मा, विष्णू, सदाशिव । गुरूरूपते स्वयमेव । गुरू परब्रह्म सर्व थेंब । गुरू गौरव न वर्णवे ।।४३।। अखंड मंडलाकार । जेणे व्यापिले चराचर । तये पदी केले स्थिर । नमस्कार या गुरुवर्या ।।४४।। ज्याचे स्मरणमात्रे ज्ञान । साधका होय उत्पन्न । जे निजसंपत्ती जाण । दिधली संपूर्ण गुरूराये ॥४५।। अनेक जन्मींचे सुकृत । निरहंकृती निर्हेत । तरीच प्रबोध प्राप्त । जरी श्रीगुरूहस्त मस्तकी ।।४६।। ध्यानमूल गुरुराय । पूजा मूल गुरुपाय । मंत्र मूल निःसंशय । मोक्ष मूल गुरूकृपा ॥४७॥ सद्गुरूहुनी परात्पर । नाही नाही वो साचार । नेती शब्दे निरंतर । श्रुतीशास्त्रे गर्जती ॥४८॥ सद्गुरूपरते अधिक काही । आहे ऐसा पदार्थ नाही । अवलोकिता दिशा दाही । न दिसे तिहीं त्रिभुवनी ॥४९।। क्षोभतां देव ऋषी काळ । सद्गुरू रक्षीण लगे पळ । दीनानाथ दीनदयाळ । भक्तवत्सल श्री गुरू ।।५।। सद्गुरुचा क्षोभ होता । देव ऋषिमुनी तत्त्वता । रक्षिती हे दुर्वार्ता । मूर्खही सर्वथा न ऐकती ॥५१।। उपदेश होता पार्वती । गुरुमार्गी होय मुक्ती । म्हणोनी करावी गुरूभक्ती । हे तुजप्रती बोलत असे ।।५२॥ यावरून सुभक्तजन । अंतरी घ्यावे हे उमलून । सद्गुरुभक्ती श्रेष्ठ जाण । शिवपार्वतीच्या संवादे ।।५३।। विषयाचे करावया स्पष्टीकरण । त्या ओव्या कथिल्या निवडून । वाटे नवनीत निघे संवादातून । सुभक्ता लागी द्यावया ॥५४ नवनीताचे करावे सेवन । आनंद हृदयी भरून । तेणे कायाकल्प होईल जाण । सबाह्यअंतरी भक्त ।।५५।। जरी न घडेल जपतप साधन । नित्य करी रे मानस पूजन । सहजसुलभ श्रेष्ठ जाण । याहून अन्य काही नसे ॥५६।। या न लगे कवडी दमडी । फक्त पाहिजे अत्युच्च आवडी । सर्व सुखा त्वरित जोडी । मानसपूजा श्रीगुरूंची ।।५७।। निर्मळ करोनिया मन । आसनावरी बैसावे आपण । काकांचे आगमन प्रार्थून  । मनोमनी सुस्वागतम् म्हणावे ।।५८॥ यावे यावे देवदत्ता सदया । मानसपूजा माझी घ्याया। मी विनवीतसे तव पाया । वाट पाहतो लोचनी ॥५९।। तुम्ही न करावा उशीर । माझा जीव होतो अधीर । हे करुणाकर मजवर । कृपापाखर करावी ॥६०॥ जैसे बालक आणि माता । वाट पाहे भेटीकरिता । तैसेचि मी दर्शनाकरिता । वाट पाहे देवदत्त सदया ।।६१।। रत्नजडित मयूरासन । मी हृदयी कल्पिले जाण । त्यावरी स्वस्थ बैसोन । विश्राम करी सद्गुरू सदया ।।६२।। काका बैसले मयूरासनी । मनी ऐसी कल्पना करोनी । विंझण केले स्वहस्तानी । श्रमपरिहार करावया ॥६३।। स्वहस्ते पुसला घाम । पावन करी रे हृदयधाम । ऐसेच राहू दे प्रेम । म्हणोनी विनवितो परोपरी ।।६४।। विविध सुगंधित तेलांनी । पदप्रक्षालन केले मनोमनी । भवभयहारक श्रीचरणी । अनन्यशरण झालो असे ।।६५।। गोरस, दधी, धृत । मधू, शर्करा, पंचामृत । करोनिया मिश्रित । स्नानालागी बोलविले ।।६६।। गंगा यमुना गोदावरी । नर्मदा सिंधू कावेरी । चांदीच्या भरोनी घागरी । स्नानालागी आणल्या ।।६७।। केशरमिश्रित उटी घेऊनी । काकांच्या सर्वांगा चर्चुनी । एकेक पवित्र जलाने । अभिषेक करितो मनोमनी ।।६८।। सुवर्णपात्र घेतले भरोनी । हर गंगे, नर्मदे म्हणोनी । सोडिले काकांचे शिरावरून । हर्षानंदे मनोमनी ।।६९।। चरणतीर्थ केले प्राशन । स्वशरीरी केले प्रोक्षण । करावया पापक्षालन । मी प्रार्थिले काका सदया ।।७०।। अंग पुसिले त्यांचे स्वकरांनी । शुभ्र पैरण दिले नेसवोनी । ब्रह्मसूत्र दिले गळ्यात घालोनी । झब्बाही दिला साजेसा ।।७१।। ऐसे वस्त्राते  देऊनी । पुनरूपी मयूरासनी बैसवोनी । गंधाक्षता शिरी लावुनी । भावे पूजन केले मी ।।७२।। बहुविध सुगंधित फुलांनी । शमी, बिल्वादिक, गुलाबांनी । मोगरा, चंपक, गुंफोनी । पुष्पमाळा गळा घातली ।।७३।। भस्म कस्तुरी केशर । लाविले हीना केवडा अत्तर । श्रीललाटी लाविले सुंदर । काकांना प्रिय असे म्हणोनी ।।७४।। ऐसे काकांना सालंकृत करोनी । धूपदीप दिले उजळोनी । शुद्धभावने प्रेमेभरोनी । आरती काकांची करीतसे ॥७५।। आपल्या या चैतन्यगाथेमधून । जे जे वर्णिले असे गुणवर्णन । त्याचे संक्षिप्त ऐसे आवर्तन । देवा इथे मी गातसे ।।७६।। बालपणी नित्यानंदाचे दर्शन । नंतर गुणवणींचे लाभले मंत्रधन । गिरिनारी घडले श्री दत्तदर्शन । विद्याविभूषित झाला असे ॥७७।। संसार मांडला उत्तम छान । नोकरीत लाभले यशसिद्धी धन । परि नशिबाने पलटी मारली म्हणून । गरिबी, बेकारीही पाहिली असे ।।७८॥ दुग्धविक्री पाहिली करून । तेणे कष्ट उपसले रात्रंदिन । मंत्र सिद्ध झाल्याची होता जाण । जनहित कार्य आरंभिले ॥७९।। त्यात सप्तऋषींचे घडले दर्शन । देवदत्त नामे दिले आशीर्वचन । संजयदृष्टीचे लाभता वरदान । भूत-भविष्य सांगणे सुरू केले ।।८०। एक-एक विक्षिप्त गोष्टी ऐकून । विश्वास न वाटतसे मनातून । परि आचरिता ते श्रद्धा ठेवून । सहज इच्छापूर्ती होतसे ।।८१॥ भक्त आश्चर्याने होती चकित । अशक्य शक्य होतसे त्वरित । काकांच्या काय आहे वाणीत । बोले तैसेची घडतसे ।।८२।। काका कोण आहेत म्हणून । प्रश्न उत्पन्न होई मनातून । पुलय्याच्या कळले कथेतून । पूर्वसुकृत बलवत्तर असे ।।८३।। फकीरदास बाबा म्हणून । तुमचे पूर्वाश्रमींचे होते जीवन । नेपाळात आजही समाधी असून । लोक मन्नत मागती प्रेमाने ।।८४।। भूतानात आहे दुसरे स्थान । शिलेवरती उमटली पदचिन्ह । तेही जागृत परमपावन । स्थान तुमचे आनंदे फिरतसे अंगावरून । सर्वाभूती एकच आत्मा असून । सर्वात्मक भाव जागला असे ।।८६।। आता भूक लागली म्हणून । सुवर्णाचे ताट घेतले कल्पून । षड्रस परीकर पक्वान्न । मिष्टान्न वाढले मनोमनी ।।८७।। स्वकरे भरविला गोड घास । जेवण्यास कथिले सावकाश । जे जे आवडले काकांस । पोट भरून वाढले असे ॥८८॥ उशीर झाला म्हणून । क्षमा घेतलीसे मागून । शेष मजकरी देती उचलून । जो प्रसाद म्हणुनी भक्षिला असे ॥८९।। ऐसे प्रेमे  केल्यावर भोजन आणि करिता मुखप्रक्षालन । तांबूल श्रीफळ देऊन । सुवर्णदक्षिणा दिली असे ।।९०॥ रत्नदीपांची आरती कल्पून । काकांना मी ती ओवाळून । त्यांचे भोवती प्रदक्षिणा करून । लीन झालो पदपंकजी ।।९१।। आता करितो गायन भजन । जय जयाजी देवदत्ता म्हणून । तुमचे करावया गुणगायन । स्फूर्ती मजला द्यावी हो ॥९२॥ सद्गुरूंच्या कृपेची होता जाण । वाटे सकलांचे करावे कल्याण । अज्ञान तिमिराचे करावया हरण । करुणा उपजोनी सरसावला ।।९३।। संसारचक्र भवसागरात । गटांगळ्या खाती जे सुख-दुःखात । त्यांचा हात घेऊनि हातात । भक्तिमार्ग सुलभ दाखविला ।।९४।। कुणाला सांगितला कालसर्प विधी । कुणाला नवग्रह पूजाविधी । कुणाला मिळवुनी दिली सुसंधी । वास्तुशास्त्राच्या आधारे ॥९५।। कुणाच्या सोडविल्या अडीअडचणी । पूर्वाश्रमींच्या संचित करणी । इहजन्मींच्याही पापश्रेणी । मार्गदर्शन सोडविल्या ॥९६।। कुणाला वाचविले आजारातून । भयंकर ऐशा अपघातातून । कुणाची दैवते दिली शोधून । कुळधर्मही जागविला ।।९७।। भूतपिशाच्च बाधेमधून ।  लीलया केले स्तंबनष बंधन । देवस्थानामध्येच बसून । मंत्रसामर्थ्याने आपल्या ॥९८।। जादूटोणा काळी करणी । याची सहजच केली झाडणी । पूर्वाश्रमींची  असता देणीघेणी । कर्मकांडातून सोडविली ।।९९।। कुणाला दाखविले साईरूप । कुणाला दिसले स्वामीस्वरूप । कुणी पाहिली देवतांची रूपे । आपापल्या प्रेमाची ॥१००।। बायजींच्या अपार प्रेमाकारण । चांदीच्या पादुका घेतल्या करवून । मिरवणूक सोहळा झाला उत्तम छान । अविस्मरणीय असा पार्ल्यात  ।।१०१।। देवदत्त देवदत्त म्हणून । भक्त आनंदे गाती गुणगान । गुरूरूपांत आपल्याला पाहून । भक्तिभावात सुखावतो ।।१०२॥ ऐसे काकांना आळवून । भाव पुष्पांजली केली अर्पण । सर्व कायावाचामने होऊनी लीन । मानस पूजा पूर्ण केली ।।१०३।। रत्नजडित मयूरासनावर । काकांची मूर्ती केली स्थिर । काकांनी उंचावला वरदकर । माझ्या शिरी ठेविला असे ।।१०४।। म्हणे प्रसन्न झालो असे मधुकर । सांग कोणता देऊ मी वर । देवा कृपा करावी मजवर । गुरूप्रेमास पात्र व्हावे मी ।।१०५।। म्हणे धन्य धन्य माझ्या बाळा । तुज लागला गुरुभक्तीचा लळा । तोचि पुरवीन मी वेळोवेळा । जन्माचे सार्थक केले असे ॥१०६। ऐसे बोलती न बोलती । तोच जानकीआईची प्रकटली मूर्ती । बघता प्रसन्न झालो मी चित्ती । चरणी मस्तक ठेविले असे । चैतन्यगाथा घेऊनी हातात । मी आईच्या पुढती गेलो सस्मित । माऊली स्वीकारावे हे ओटीत । यथाशक्ती मती जे लिहिले असे ।।१०८।। आपल्या पुत्राचे चरित्रगायन । मनोभावे केले परिपूर्ण । ते आपल्या ओटीत करुनी अर्पण । भाऊइच्छा मी राखीतसे ।।१०९।। प्रेमे स्वीकारुन ते पदरात । माझ्या शिरी ठेविला वरदहस्त । वरी स्वयेच बोलली वचनामृत । मज चरित्र प्रिय झाले असे रे ॥११०।। या चरित्राचे करील जो पारायण । तो मला होईल प्राणासमान । त्याचा निर्मळभाव जाणून । सर्वथा सहाय्य करीन मी ।।१११।। ज्याची जैसी जैसी भावना । तैशा तैशा पुरवीन मनोकामना । संसाराच्या सर्व विवंचना । पासून सोडवीन मी निश्चित ।।११२।। माझ्या पुत्राचे हे सुधागीत । तुम्हाला लाभेल जणू संजीवनयुक्त । भावभक्तीने राहावे वाचीत । वरदकृपा त्या असेल की ।।११३।। ऐसे  बोलती न बोलती । तो अदृश्य झाली वरदमूर्ती । मज क्षणात आली असे जागृती । भानावरती मी आलो असे II ११४II माझे आनंदाश्रूनी भरले लोचन । पाहता काकांचे प्रसन्न वदन । म्हणे तुझ्या चैतन्यगाथेचे गायन । मलाही प्रिय झाले असे II ११५II  तू आईच्या घातलेस हे ओटीत । तेणे प्रसादाचे रूप झाले प्राप्त । वाचने भक्तांचे पुरतील मनोरथ । मीही सहाय्यरूपहोईन II ११६II  दिनशुद्धी पाहुनिया छान । संकल्प सिद्धता द्यावी म्हणून I  चैतन्यगाथेचे करावे पारायण । मनोमनी प्रार्थना करावी ।।११७।। जैसी जैसी तुमची भावना । तैशाच सिद्ध होतील कामना । माझ्या पायी सोडाव्या विवंचना । विश्वासाने संपादेल प्रीती ॥११८।। विश्वासाने होईल प्राप्ती । माझ्या कृपेची तुम्हाला । दृढभक्ती आणि सबुरी । याची सिद्धतेला असते जरुरी । हे सत्य बाळगावे मनातरी । परमार्थपथ चढावया ।।११९।। त्यातून मी आहेच ना पाठीशी । चित्ती चिंता न बाळगा मनाशी । संतवचनांच्या अक्षय बोलाशी । वचनबद्ध मी आहेच ना ।।१२१॥ तुमचे समृद्ध बहरेल जीवन । सुखशांती लाभेल परिपूर्ण । परमेश्वराचेही घडेल दर्शन । निरामय जीवन जगाल ।।१२२॥ शुद्ध असता अंतःकरण । एकेक अध्याय वाचावा प्रतिदिन । तुमचे अभ्युदयाकडे वळेल जीवन । चैतन्य रक्षेल कवचापरी ।।१२३।। ऐसे देवदत्ताचे लाभता आशीर्वचन । मी धन्य झालो असे मनातून । चैतन्यगाथेचे हे लेखन । पूर्ण झाले गुरुकृपे ।।१२४।। शके एकोणीसशे एकोणतीस साली । वैशाख कृष्ण एकादशी आली । ते दिनी ग्रंथसेवा पूर्ण झाली । बडोदेनगरी माझी हो ।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत

 भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय अठरावा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]