ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय सतरावा ॥ 

 श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ।। श्री कुलदेवतायै नमः ।। श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ श्री दत्तात्रेया परम उदारा । राजराजेश्वरा योगेश्वरा । श्री दत्ताच्या चतुर्थ अवतारा । माणिक प्रभो तुज नमो ॥२॥ दिशाहीन झालेल्या समाजात । आणि राज्यकर्त्यांचे जुलमांत I समाज न राहिला सुरक्षित । नेतृत्वहीनता झाली असे ।।३।। आशा आकांक्षा, वैभव कीर्ती । यांची सर्व झाली होळी माती । अंकुर उमलण्यापूर्वीच मरती । सखेसोयरे वैरभावे ।।४।। ऐशा अस्थिर दिशाहीन काळांत । तुम्ही प्रकटला हुमणाबादेत । समाज आणला आपल्या कवेत । श्रद्धाभक्ती प्रकटली ।।५।। आपले अतर्क्य चमत्कार पाहून । यवन होती मनात हैराण । मुसलमान धर्माचे होईल परिवर्तन । हिंदू धर्म वाढेल सर्वत्र ।।६।। जारण मारणाचे प्रयोग करिती । बाटविण्याच्या खटपटी करिती । परि पत्करावी लागे शरणांगती । याऽऽअल्लाची जाण झाली असे ॥७॥ हाच यवनांचा परवर दिगार । हिंदूंचा दत्तगुरू अवतार । सर्व धर्मांचा एकच आधार । माणिकप्रभू झाले असे ।।८। यवन धर्माचा राखूनी मान । अन्य सर्व धर्माचे केले रक्षण । कोणीही नसे सान-महान । समसमानता शिकविली असे ।।९।। माणिक नगरीच्या दरबारात । प्रभुकृपेची प्रचिती येत असे ।।१०।। जैसे संत दामाजीकरिता । विठू महार झाला होता । तैसे यवन भक्ताकरिता । हुंडी वटविण्यास धावले ॥११।। जैसे मीरेचे केले विषप्राशन । स्वये श्री कृष्णाने दिले संरक्षण । तैसे प्रभुनेही भक्ता कारण । वीष सर्वांगावर जिरवले ।।१२।। वाटे विष्णूची वैकुंठनगरी । उतरून आली माणिकनगरी । सुख-शांतीत नांदती नरनारी । आनंदकंद माणिक प्रभू ।।१३।। ऐशा या राजयोगी माणीक प्रभूंना । लोटांगण  घालुनी करितो प्रार्थना । मज नम्र सेवेची द्यावी प्रेरणा । इतुकीच भाक मागतसे ॥१४॥ मान्य करुनी घ्यावी विनम्र सेवा । माझा निर्मळ हेतू पुरवावा । चैतन्यगाथेला आपलाही असावा । वरद अभयकर प्रेमाचा ।।१५।। एक प्रज्योत कर्णिक सज्जन । मज भेटती उत्सवाकारण । गोष्टीत गोष्ट निघाली म्हणून । अनुभव सांगती स्वतःचा ।।१६।। कोल्हापुरात असता नोकरीनिमित्त । काही अल्प अडचणी होत्या उद्भवत । तेणे काकांशी करिती सल्लामसलत । उपाय सांगावा म्हणून ॥१७॥ म्हणे पन्हाळगडावर जाऊन । दिवा लावावा  मंदिरातून । तुझे कार्य होईल रे संपन्न । निःशंक जावे लौकर तू ।।१८।। तैसे सुट्टीचा दिवस पाहून । प्रज्योत पन्हाळगड गेला  चढून । सर्वत्र मंदिर पाहिले शोधून । विचारपूस करू लागला ।।१९।। गडाची माहिती सांगण्याकरिता । मार्गदर्शक होते सहाय्याकरिता । त्यांचेजवळ चौकशी करिता । माहिती नाही सांगितले असे ॥२०॥ म्हणे बरेच वर्षांपासून देतो माहिती । एकही मंदिर नाही गडावरती । वाटे गावकऱ्यांना असावी माहिती । त्यांनाही विचारून पाहिले ।।२१।। परि गावकरी तैसेचिच सांगती । कुणालाच नाही मंदिराची माहिती । तैसे प्रज्योत आश्चर्य पावला मनाती । काकांना फोन केला असे ।।२२।। काका देवस्थानातून सांगती । तू उभा आहेस ज्या भागावरती । तिथून थोडे उतरावे खालती । एक तटबंदी भिंत लागेल ।।२४।। त्या भिंतीलाच लागून । एक मारुतीची मूर्ती आहे छान । जी रामदासांनी केली स्थापन । स्वतः पूजा करीत होते ते ।।२५।। तैसे तो उतरला खालती । तो भिंतीत मारुतीची मूर्ती होती । भावविभोर झाला तो मनांती । साष्टांग नमन केले असे ।।२६॥ मनोभावे केले स्तोत्र पठन । दीप उजळला आनंदे भरून । मूर्ती पाहिली डोळेभरून । आश्चर्य पावला मनांतरी ।।२७।। पुराणवस्तू संरक्षण समितीला । इतकी वर्षे शोध न लागला । तो देवस्थानात बैसोनी सांगितला । याहून आश्चर्य काय असावे ।।२८॥ पुढे त्यांचे कार्यही झाले । मारुतीराव प्रसन्न झाले । मजसन्मुख धावतची आले । अनुभव आपला सांगावया ॥२९।। काकांना लाभली संजयदृष्टि । तेणे सर्व दिसे नजरेपुढती । सुक्ष्म मनांतील विचार-कृती । जाणती ते सर्वज्ञपणे ।।३०।। मिनीत भोगले म्हणून । अमेरिकेत आहेत वसती करून । त्यांची पत्नी आहे अमेरिकन । सुकन्या त्यांना मिश्कीली ।।३१।। त्यांच्या घरात घडती गोष्ट । अचानक ऐशा चमत्कृती । आश्चर्यासह वाटे भीती । परि कार्यकारण कळेचिना II ३२II  कधी खाऊ ठेविता वाटीत । तो अचानक होई गायब । कोणी वावरतसे खोलीत । भास त्यांना होतसे ।।३३।। हळदकुंकू असता कुयरीत । तेही गायब होतसे त्वरित । रोज नवीन ठेवीतसे ते मिलीत । पूजेस आपल्या नित्याच्या ।।३४।। त्याची अकरा महिन्यांची मिश्कीली । नित्य दिसतसे घाबरलेली । रडून रडून दिसे थकलेली । विचित्र हातवारे करितसे ॥३५।। ऐसे घडत असता घरात । वार्ता कळविली ती मुंबईत । मिलीतची आई गेली धावत । देवस्थानात काकांकडे ॥३६।। त्यांची संजयदृष्टि झाली जागृत । चित्र दिसले असे नजरेत । एक युरोपियन बाई आहे झग्यात । डोक्यास स्कार्फ बांधलेला ॥३७॥ तिच्या संगे लहान मुलगा । ते उभय वावरती घरातून । तेचि त्रास देती कन्येलागून । घटना ही चांगली नसे ।।३८।। त्वरित उपाय करावा म्हणून । आईने विनंती केली कळवळून । पिवळी राई दिली असे मंत्रून । एक्सप्रेस पोस्टाने पाठविली जी ।।३९।। म्हणे घराभोवती टाकावी पसरून । तिज मंत्राने घातले बंधन । ती फिरकणार नाही परतून । त्रासमुक्त झाला काकाकृपे ॥४०।। एकदा फोटो सापडला अकस्मात । एका युरोपियन बाईचा । डोक्यास स्कार्फ होता बांधलेला । संगे मुलगा होता बिलगलेला । मिनीतच्या डोक्यात प्रकाश पडला । संदर्भ जाण झाली असे ॥४२।। तैसे फोटो दिलासे फेकून । संकट कायमचे गेले निघून । केवळ काकांच्या कृपेकारण । भोगले कुटुंब सुखावले ॥४३।। ठाण्याचे सचिन दुर्वे म्हणून । यांचे लग्न झाले नूतन । पती-पत्नी शोभती छान । लक्ष्मी-नारायणासारिखे ॥४४॥ परि एकदा गेले पुण्यात । प्रख्यात ज्योतिष्याच्या आले संपर्कात । म्हणे याचे नाहीच नशिबात । संतती योग मुळीच की ।।४५।। तैसे मनात गेले घाबरून । काकांच्याकडे आले विनम्र होऊन । प्रश्न विचारला शंकित होऊन । सत्य काय ते जाणावया ॥४६।। काका खात्रीपूर्वक सांगती । तुमचे नशिबात आहे पुत्रसंतती । मनातून काढा शंका-भीती । भविष्य खोटे आहे ते ॥४७॥ मी कागदावर देतो लिहून । तुमचे उदरी आहे पुत्रसंतान । मी सांगतो ते पाळावे वचन । पिठोरीपूजन करावे ।।४८।। म्हणे कुळात नाही पिठोरीपूजन । त्यावरी उपाय आहे दुसरा छान । ज्याचे घरी असेल पिठोरीपूजन । तिकडे जाऊन दर्शन घेणे ॥४९।। या जोडप्याने घेता दर्शन । पिठोरी माता होईल प्रसन्न । त्यांची इच्छा होईल परिपूर्ण । प्रयत्न करून पाहावा ॥५०॥ पुढे लौकरच योग आला जुळून । पिठोरीचे घडले असे दर्शन । आणि दोनच महिन्यात आळे कळून । बाळाची चाहूल लागली असे ।।५१॥ पती-पत्नी झाले भाग्यवान । दुर्वे  घरी आला बाळनंदन । कुळधर्मातही असते आशीर्वचन । जाण याची झाली असे ।।५२॥ सुप्रिया दुर्वेची चुलतवहिनी । आईसंगे आली देवस्थानी । काकांना सांगती चिंताकहाणी । कामे कैशी अडती ते ।।५३॥ म्हणे कामात येती अडचणी । विलंब लागे विनाकारणी । जे जे इच्छावे व्हावे म्हणुनी । कार्य भाग नासतसे ॥५४॥ कधी कामे होती फलद्रूप । परि पैसा न येई समीप । तेणे चित्तात  वाढतसे प्रकोप । अकारण सर्व घडतसे ।।५५।। ऐशा अनेक व्यथा सांगती । ऐशी कैसी असते दैवगती । कधी लाभेल का मनःशांती । उपाय काही सांगावा ।।५६।। काका सांगती दृश्य पाहून । म्हणे खोपोलीला या जाऊन । टाकीच्या देवीचे घ्यावे दर्शन । ओटी भरून यावे की ।।५७।। तैसे ओटी घेऊनी जाती त्वरित । चौकशी करिती ते लोकांत । परि टाकीची देवी नाही माहीत । खोपोलीच्या गावकऱ्यांना ॥५८॥ तैसे काकांशी बोलती तेथून । या गावात नाही ऐसे स्थान । अरे मज टेकडी येते दिसून । तलाव जवळ बांधलेला ।।५९।। तैसे तलावाची सांगता खूण । सर्व ओळखती ते तत्क्षण । तिथे चौकशी करिता आले कळून । पाण्याची टाकी बांधलेली ॥६०। पूर्वी इथे होते देवीचे स्थान । जवळच टाकी बांधली म्हणून । टाकीचे देवी म्हणून । स्थानमाहात्म्य झाले असे ।।६१।। काकांच्या बोलण्याची सत्यता पटली । ओटी भरताच समाधान पावली । उलटी दैवगती सुलटी झाली । सांगणे न लगे तुम्हाला ।।६२।। इंदापूरचे दत्ताशेठ कुलकर्णी म्हणून । त्यांची शेतीवाडी होती उत्तम छान । तिचे कामासाठी म्हणुन । नित्य जाती ते माणगावला ॥६३।। असेच एकदा गेले शेतात । देखरेख करण्याचे होते निमित्त । परि पाय दुखू लागले अकस्मात । तैसेची माघारी परतले ॥६४।। दोन्ही पाय पोटरीपर्यंत । पिवळे पडले अकस्मात । ठणका लागला दोन्ही पायात । मनात घाबरून गेले ते ॥६५।। अमावास्येचा होता तो दिन । अनंत शंकेने ग्रासले त्यांचे मन । घरी आले असे परतून । भयभीत झाले दत्ताशेठ ।।६७।। ऐसे दोन तीन अमावास्ये लागून । पाय दुखती पिवळे होऊन । एकटे राहू न शकती भीतीकारण । सोबत कुणाची लागत असे ।।६८।। कुलकर्णीबाई गेल्या घाबरून । काकांशी बोलती संपर्क साधून । म्हणे उतारा करावा पतीवरून । अमावास्या दिन साधावा ।।६९।। पुढे अमावास्या दिन साधून । उतारा केला गड्याचे हातून । संकटाचे झाले निवारण । त्रास न झाला पुन्हा कधी ॥७०।। त्यांच्या सूनबाई होत्या पुण्यात । गर्भस्थ होत्या सातव्या महिन्यात । त्यांना डॉक्टर सांगती स्पष्ट शब्दात । सुलभ प्रसूती होणे नाही ।।७१।। तैसे सासूबाई गेल्या घाबरून । काकांशी बोलती फोनवरुन । म्हणे कर्वे रोडला जाऊन । शितलादेवीचे दर्शन घ्यावे ।।७२।। तिची ओटी भरावी आनंदून । चाफ्याची फुले वाहवी टवटवीत ॥७२॥ कार्य होईल सुलभ म्हणून । आश्वासनपूर्वक सांगती ते ।।७३।। फुले मिळण्याची आली अडचण । परि मुलीने आणली ती शोधून । ओटी भरली भावे वंदून । फुले वाहिली प्रसन्नतेने ।।७४।। तिची प्रसूती सुलभ होऊन । आशीर्वाद लाभले उत्तम छान । डॉक्टर मात्र गेले चक्रावून । काकांचे मार्गदर्शन फळले असे ।।७५।। कांदिवलीच्या मृणाल कारखानीसांनी । राहुलची सांगितली कर्मकहाणी । कैसा नोकरीकरिता झगडला रात्रंदिनी । अपार कष्ट केले असे ।।७६।। बी.कॉम. झाल्याचे लाभले समाधान । तरीही कॉम्प्युटरचा कोर्स केला महान । वाटले नोकरी मिळेल उत्तम छान । नकार सर्वत्र लाभतसे ।।७७।। स्वतंत्र धंदा करावा म्हणून । कॉम्प्युटर प्रोग्रामिंग पाहिले करून । परि त्यातही अपयशी होऊन । निराशा अंतरी पडली असे ।।७८।। तरीही हिंमत न हरला मनातून । आईने मावाकेक दिला बनवून । ते टपरी दुकानात जाई घेऊन । विकून पैसे मिळवित असे ।।७९।। ऐसे किरकोळ धंदे करून । कामे करीतसे शांत राहून । कामात न पाहे तो हीनपण । श्रम हेचि कर्तव्य मानीतसे ॥८०।। नोकरीची वाचीत असे जाहिरात । तेथे अर्ज पाठवीतसे त्वरित । परि  नकाराची मिळे साथ । ऐकण्याची सवय केली असे ।।८१।। शेवटी एका शाळेमधून । कॉम्प्युटरचा शिक्षक म्हणून । नोकरी स्वीकारली अनुभवाकारण । पगार फक्त दोन हजार ।।८२॥ ऐशा निराशाजन्य परिस्थितीत। काकांच्या आले ते संपर्कात । धीर देऊनी सांगती निश्चिंत । राहावे आता यापुढे ।।८३।। म्हणे कुलदेवाचे घ्यावे दर्शन । नंतर शिरडीस यावे जाऊन । शनी मंत्राचा जप घ्यावा करून । मार्ग मोकळे होतील ॥८४।। जैसी जपसंख्या समाप्त झाली । उत्तम बातमी श्रवणी आली । सीटेल कंपनीत नोकरी मिळाली । पगार बारा हजार रुपये ।।८५।। हळूहळू प्रगती होतच गेली । सुदैवाला बढती लागली । पगाराचीही रक्कम वाढली । काकांच्या कृपाप्रसादाने ।।८६।। राहुलसारिख्या कितीतरी गोष्टी । मी पाहिल्या सन्मुख दृष्टी । काकांच्या मार्गदर्शनाखालती । कित्येक कुटुंबे सुखावली ।।८७।। कीती व्यंकटेश म्हणून । कीम टेलर्सचे मालक असून । काका कपडे शिवती त्यांचेकडून । घट्ट मैत्री झाली असे ।।८८।। एकदा हिरमुसलेले तोंड करून । काकांच्याकडे बैसले येऊन । म्हणे कौटुंबिक अडचणी कारण । हताश जीवनी झालो असे ॥८९॥ मला दोन मुलगे असून । ऑस्ट्रेलियात आहेत नोकरीकारण । मोठ्याचे लग्न झाले असून । अमरेंद्र लग्नाचा झाला असे ।।९०।। सवाना ओले म्हणून । ऑस्ट्रेलियन मुलीशी झाले प्रेमप्रकरण । तिला लग्नाचे देऊनी वचन । घाटकोपरला घेऊन आलासे ।।९१।। तिला उंबरठ्यावरतीच अडवून । दारातूनच दिले हाकलून । मुलाच्या धर्माबाह्य वर्तनाकारण । आई सुशीला संतापली असे ॥९२।। कीर्तीची पत्नी खाष्ट असून । टेलर तिला राहतसे घाबरून । तिची कटकट टाळण्याकारण । झोपण्यापूर्तीच घरी जात असे ।।९३।। आंध्रातील जातीची सुशिक्षित छान । मुलगी पसंत केली सून म्हणून । तिच्याशीच अमरेंद्रने लग्न करावे म्हणून । हट्ट  तिचा ती चालवीत असे ।।९४।। सवानाशीच लग्न करीन म्हणून । अथवा आजन्म ब्रह्मचारी । राहीन । असे ठामपणे आईला सांगून । उभयता ऑस्ट्रेलियाला गेले असे ॥५॥ अडकित्त्यात सापडावी सुपारी । तैशी माझ्या आकांक्षाची झाली भंबेरी । पत्नीच्या अडमूढ विचारासमोरी । मूढ मती माझी झाली असे ।।९६।। काकांच्याकडे जाऊन म्हणून । कीर्तीने प्रयत्न पाहिला करून । परि सुशीलाने दिले झिडकारून । मै न जानती काकाबिका ।।९७।। एकदा सत्यनारायणाचे दर्शनाकारण । कीर्तीने दिले काकांना आमंत्रण । तिथे काकांना पाहूनी भक्तगण । नमस्कार करताना पाहिले असे ।।९८।। काही श्रद्धा झाली असावी उत्पन्न । तिने काकांना भेटण्याचे दिले वचन । आईचा आनंद कशात असतो म्हणून । प्रश्न सुशीलेला विचारला असे ।।९९।। मुलांचे सुखात आईचा आनंद असून । सर्व कुटुंबात राहते आपलेपण । ऐसे शहाणपणाने मान्य करून । लग्नाला अनुमती दिली असे ।।१००। म्हणे पुढे कोणती न यावी अडचण । म्हणून पत्रिका पाहावी आपण । अथवा तसेच उद्भवले कारण । जबाबदार कोण राहील ।।१०१।। काका सर्वार्थाने देती आश्वासन । पत्नीचे पूर्ण केले समाधान । कीर्तीचे गहिवरून आले मन । अशक्य ते शक्य झाले असे ॥१०२।। तैसे उभयतांना घेतले बोलावून । मसुराश्रमांत गेले घेऊन । तिज हिंदू वर्णाश्रमांत घेतले मिळवून । नाव कनिष्का ठेवले असे ।।१०३।। एकटीच भारतात आल्याकारण । कन्यादान कोण करणार म्हणून । प्रश्नाचे उत्तर सुटावे म्हणून । काकांनी संमती दिली असे ॥१०४॥ आपण आमुचे गुरू असून । पाय न धुवावे आमचे म्हणून । आप्पा कुळकर्णी सरसावले पुढे होऊन । कन्यादान करावया ।।१०५।। त्यांना मुलगी नाही म्हणून । कन्यादानाचे लाभले पुण्य । हेही परमभाग्याचे लक्षण । सद्गुरुकृपे लाभले असे ।।१०६।। आपल्या हिंदू पद्धतीप्रमाणे । तिच्या हळदीचा झाला कार्यक्रम । देवस्थानाने घेतले पुढारीपण । मंगलकार्य सिद्ध झाले असे ।।१०७॥ ऐसे हे विधिलिखित मनोमीलन । काकांनी आणले घडवून । पर्यायाने घडले समाजप्रबोधन । सदयधर्म   कार्य घडतसे ॥१०८॥ 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय सतरावा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]