ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय सोळावा ।।

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। भजनातून सांगितला वेदांत । भजनातून शिकविला भक्तिपंथ । भजनातून दाखविला भगवंत । भक्तराज महाराजांनी भक्तांना ।।२।। अनंतानंद साईंनी दिनूला । परमशिष्य करुनी घेतला । मायाबाजारात सोडुनी दिला । भवभयभंजन शिकण्याला ।।३।। भक्तराजांची गुरुभक्ती होती प्रखर । त्यांनी पराभक्तीचे गाठले शिखर । भजनातून केला भक्तिसंचार । भजनानंद वाटला संसारी ।।४।। पेटीतबला घेती डोक्यावर । चालत गाठती भक्तांचे घर । भजने रंगविती ते रात्रभर । भान विसरती ऐकणारे ।।५।। भजनांत सांगती व्यवहार । भजनांत सांगती जीवनसार । भजनांत सांगती करुणाकर । प्रेमाने कैसा आळवावा ॥६।। भले देह असो द्यावा संसारी । चित्त असावे श्रीचरणावरी । भजनात सदा रंगावी वैखरी । अन्य मार्गी जाणे नको ।।७।। भजने स्रवती जी मुखांतून । भक्तिमार्ग प्रदीप्त करिती शब्दांतून । प्रत्यक्ष भगवंताचे घडे दर्शन । ब्रह्मानंद भोगती भजनांत ।।८।। ज्या ज्या भेटती संतविभूती । त्यांना गुरुतुल्याचा मान देती । भक्तिभावे त्यांची सेवा करिती । सेवक होती विनम्रपणे ॥९॥ संत असुनी संतसेवा करिती । प्रेमभावे करिती दास्यभक्ती । वाटे अनंतानंदाची गुरुमूर्ती । या संतामाजी विराजते ।।१०।। भ्रमण भजन भंडारा । हाच संसार केला खरा । नामाचा पिटला डांगोरा । भजनी रंगविला भक्तवृंद ।।११।। नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी । ही नामदेवांची जीवनसूत्री । स्वये आचरून सिद्ध केली ॥१२॥ त्यांनी कुणा न दिला अंगारादोरा । वा व्रतवैकल्यांचा पसारा । भावे भजनाचा घेता आसरा । सकल चिंता हरतसे ।।१३।। भजन दिव्य साधन असून । ती तादात्म्य देते साधून । हे सूत्र बिंबविले भजनांतून । सहस्रावधी भक्त हृदयात ।।१४।। अलौकिक भक्तियोगी विभूती । भक्तराज हे मज गमती । त्यांच्या चरणारजाची लावुनी विभूती । आशीर्वाद मी घेतला असे ।।१५।। जिसकू राखे राम कृपाळू । उसको कचू न होय । कृपा होय श्रीरामकी । तो बाल न बांका होय ।।१६।। सहकुटुंब परिवारासहीत । निखील गोरे येण्या निघाला मुंबईत । व्होल्वो गाडीने निघाले सुरक्षित । खोपोलीपर्यंत येती ते ।।१७।। जैसे खोपोलीच्या आले घाटात । कळे न काय घडले अकस्मात । गाडी आडवी झाली रस्त्यात । चक्रांकित ती फिरली असे ।।१८।। रस्त्याचे दुसऱ्या बाजूस अडकली । आडव्या स्थितीतच थांबली । सर्व मंडळी आत ठेचाळली । क्षणात सर्व घडले असे ।।१९।। निखील कसातरी निघाला बाहेर । गाडी उभी केली मार्गावर । मावशीला काढले बाहेर । इतरही सर्व निघाले ।।२०।। सर्वांना सुखरूप पाहून । निखीलने आईला केला फोन । गाडीला अपघात झाला असून । मंडळीसह मावशी ठीक आहेत ।।२१। ऐसी मंडळी थोडी सावरली । सामानाची आवराआवर केली । निखीलची तब्येत बिघडली । उभे राहणे अशक्य झाले ।।२२।। त्याच्या लगेच आले लक्षात । संपूर्ण शरीर आहे । दुखत । कळा येती मानमणक्यांत । हालचाल बंद झाली असे ।।२३।। अँब्युलन्स बोलावली त्वरित । निखील व मावशीला नेती दवाखान्यात । पनवेलच्या डॉक्टरांनी त्वरित । एक्सरे काढून पाहिले ॥२४।। तपासाअंती कळले कारण । मावशीची प्रकृती बरी असून । निखीलचे गंभीर होते प्रकरण । अतिनाजूक स्थिती वाटली ।।२५।। निखीलच्या पाठीला धक्का लागून । मणके सरकले स्थानावरून । वेदनेने सर्वांगी गेला त्रासून । शक्ती क्षीण झाली असे ।।२६।। मुंग्या येती सर्व शरीरातून । वाटे मंद होतसे शरीर चेतन । त्याच्या मनात चाले बायजी स्मरण । मंत्र कृष्णाचा तैसाच की ।।२७।। डॉक्टर आले निर्णयापर्यंत । याचा उपाय होईल फक्त मुंबईत । एमआरआय काढणे निश्चित । शस्त्रक्रिया अटळ आहे ।।२८।। तैसे काकांना सर्व केले विदीत । त्यांनी विनायकरावांना सांगितली हकीकत । जे सेनाप्रमुख होते पनवेलात । व्यवस्था करण्यास विनविले ।।२९।। त्यांनी व्यवस्था दिली करून । रात्री ११ वाजता आले नानावटीत । आप्पा व काका आले धावून । सन्मुख निखीलला पाहिले ।।३०।। पेण ते मुंबईपर्यंत । प्रवास झाला वेदनायुक्त । मुंग्या येती सर्व शरीरात । अर्धांग बधिर झाले असे ।।३१।। तो बायजीला होता स्मरत । मंत्र कृष्णाचा होता जपत । काकांचा धावा होता करीत । सर्वस्व जीवन सोपवुनी ।।३२॥ जेव्हा काकांना पाहिले समोर । तेव्हा मनात आला थोडा धीर । काकांनी हात फिरविला अंगावरून । थियेटरमध्ये नेले असे ।।३३।। सर्व शरीर तपासू एक्सरेमधून । एमआरआय पाहू काढून । ऐसा निर्णय सर्वांना सांगून । डॉक्टर तपासण्यास गेले की ॥३४।। परि ईश्वरी इच्छा बलियसी । विजच नव्हती ते दिवशी । काहीच न घडले त्या रात्रीसी । इंजेक्शन देऊन झोपविले ॥३५।। जैसा तो झोपला बिछान्यात । सर्वांचे मंत्र होता जपत । कृष्णकाका त्याचे संगतीत । बायजीसह सर्व होते ।।३६।। सकाळी जाग आली लौकर । वाटे सर्वांग आहे सुंदर । वेदनांचाही पडला विसर । आश्चर्य त्याला वाटले असे ॥३७॥ तरीही एमआरआय, एक्सरे काढती । डॉक्टर आश्चर्याने वदती । रुग्णाची आहे उत्तम स्थिती । शस्त्रक्रियेचे कारणच नाही ॥३८।। याला घरी जावे घेऊन । हा पूर्ण नॉर्मल असून । काळजी करण्याचे नाही कारण । ईश्वरी कृपा वाटतसे ॥३९।। जेव्हा वरील प्रकार घडला रस्त्यात । तेव्हा काका बेचैन होते देवस्थानात । हे आप्पांच्या आले लक्षात । सहज प्रश्न विचारला असे ॥४०॥ निखीलची मावशी सीरियस आहे म्हणून । तुम्ही झालात का बेचैन । अरे निखील सीरियस आहे म्हणून । मज चिंता त्याची वाटतसे ॥४१।। काकांना पूर्वीच सर्व होते ज्ञात । हे आप्पांच्या आले लक्षात । सद्गुरूच्या असता संगतीत । कृपासावली लाभतसे ॥४२।। म्हणोनी कुणाच्या तरी असावे छायेत । संसाराच्या या धुमश्चक्रीत । कायावाचा व्हावे समर्पित । पूर्णत्व साधावया जीवनी ।।४३।। अलिबागच्या श्री. मनोहरांनी । सांगितली एक विचित्र कहाणी । जी अनुभवली असे त्यांनी । फसगत कैसी झाली असे ॥४४।। काही घरगुती प्रसंगानिमित्त । ते जात  होते डोंबिवलीत । बसने होते प्रवास करीत । ओळख झाली शेजाऱ्याशी ।।४५।। सहज ऐशा। । गोष्टीकरिता । त्याने स्वतःची सांगितली श्रेष्ठता । म्हणे माझी विशेष आहे योग्यता । आध्यात्मिक मार्गदर्शन करितो मी ॥४६।। मज ज्ञान शिकविले जे गुरूनी । ते मी सर्वांना वाटतो सेवा म्हणुनी । मज सर्वच काही येते कळुनी । मनोहरविषयी बोलू लागला ।।४७।। मज स्पष्ट दिसत आहे नजरेत । कुलदेवीचा दोष आहे कुटुंबात । तुमच्या बहिणीच्या येऊनी अंगात । आशीर्वाद देण्यास इच्छित असे ॥४८॥ परि वास्तुदोष आहे तुमचे घरात । तेणे ती येऊ न शके अंगात । होम केल्यास अलिबागचे घरात । सर्व काही सुरळीत होईल ॥४९।। त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून । मनोहर पूर्ण गेला हुरळून । त्याने योग आणलासे जुळवून । सर्व कुटुंब एकत्रित जाहले ।।५०।। महाराज आले पत्नीसहित । पूजेच्या लागले तयारीत । कुंकवाचे रिंगण केले सुशोभित । बहिणीला आत बैसविले ॥५१।। तिची पूजा केली देवी म्हणून । डोक्यावर हात ठेविला मंत्र म्हणून । तैसी ती घुमू लागली देवी म्हणून । सर्व वंदन करिती लांबून ॥५२॥ म्हणे, मी तुमची देवी असून । तुमचे वरती झाली असे प्रसन्न । माझी ओटी भरावी सर्वांनी मिळून । काळजी मुळीच करु नये ।।५३।। तैसे सर्व धावले नमस्कारा करिता । प्रश्न सांगण्या होई अधिरता । महाराज उत्तर देई सर्वांचे करिता। आरति ओवाळणे सुरु झाले ॥५४॥ हा सर्वच चालु असता  प्रकार । सर्वच घुमु लागल्या ।।५५।। तैसे महाराज येऊनि आनंदात । म्हणे, तुम्ही सर्व आहात भाग्यवंत । तुमचे सर्व दोष आले संपुष्टात । तेणे, देवता प्रकटू लागल्या ।।५६।। ऐसे म्हणुनि तो गेला निघून । मधाचे बोट गेला चाटवून । परी रत्नागिरीची बहिण झाली बेभान । विचित्र चाळे करू लागली ॥५७।। अंगावरची वस्त्रे फाडून । निसर्ग विधी करी बिछान्यातून । कोणाला न देई ती झोपून । धिंगा मस्तीत आवरे ना ।।५८।। बराच वेळ चाललेला प्रकार पाहून । गैरप्रकार झाल्याची झाली जाण । कोण सोडवील या संकटातून । चिंता करू लागली मंडळी ।।५९।। तोचि एकास झाली आठवण । काकांचे वेळीच झाले स्मरण । म्हणे एकच व्यक्ती संरक्षण । देईल यातून आपणाला ।।६०॥ आता दुसऱ्या महाराजांना आणून । कशास संकटाला देता आमंत्रण । ऐसे शंकित विचार आले मनातून । भीती वाटली बोलविण्या ।।६१।। तरीही सकाळी फोन केला घरातून । काका भेटले नशीब म्हणून । त्यांनी सर्व प्रकार घेतला ऐकून । तत्क्षण जाण झाली असे ।।६२।। काकांचे शांत मृदू शब्द ऐकून । थोडे मनाचे झाले समाधान । चांगले होईल स्वामीकृपेकरून । काळजी मुळीच करू नये ।।६३।। त्या महाराजाने तांत्रिक विद्या करून । सर्व प्रेमात्मे आणले गोळा करून । देवतांची खोटी नावे सांगून । चेटूक विद्या केली असे ॥६४।। परि तुम्ही न जावे घाबरून । मी बंदोबस्त करितो इथून । तुम्ही उतारा करावा बहिणीवरून । उपाय त्यांना सांगितला असे ॥६५।। तिला संध्याकाळपर्यंत येईल भान । सांगितलेले करावे दिवस तीन । चौथ्या दिवसापासून । सर्व सुरळीत होईल ॥६६।। आणि आश्चर्य आले घडून । काकांनी बंदोबस्त केला घरातून । इथे सर्व सुरक्षित आले घडून । आनंदी आनंद झाला असे ॥६७। कोणी ही न केला येता आमने सामने । सर्व निवारली असती विघ्ने । संतपुरुषाची ही लक्षणे । ध्यानात ठेवावी सकलांनी ।।६८॥ रामदास स्वामी देती इशारा । संतसद्गुरूची ही पारख करा । त्यांचीही तुम्ही परीक्षा करा । नीरक्षीर या न्यायाने ॥६९।। जगात फसवे गुरू असती बहुत । ते फक्त साधती स्वार्थहित । परपीडेने जे होती व्यथित । तोचि संत ओळखावा ॥७०।। स्वतः काया वाचा मने झिजती । जनहित काळजी वाहती । ऐशा संतसज्जनांच्या विभूती । बहुत सुकृते लाभतसे ॥७१॥ आपण किती भाग्यवान । काकांची कृपागंगा वाहे समोरून । स्नान करू होऊ पावन । कोरडे पाषाण राहू नये ॥७२॥ सदाशिव पालांडे रत्नागिरीचे । राहणार आसुर्डे गावाचे । महामार्गाला लागूनच त्यांचे । टुमदार घर वसतसे ॥७३॥ सुंदरशा त्यांच्या वाडीत । फणस, आंब्याची आहे बागायत । सतत वर्दळ राहतसे घरात । पंधरा-वीस माणसांची कायम ॥७४।। परि  काही दिवसांपासून । विचित्र प्रकार येई घडून । जैशी  झोपाझोप होई रात्रीतून । एक आकृती पलंगावर बैसत असे ।।७५।। रात्री बारा ते चारपर्यंत । पलंगावरती येऊनी बैसत । याची जाण होता भयभीत । अंतःकरण होऊ लागले ।।७६।। ती सावली होती पारदर्शक । तिचे माध्यमातून समोरचे होते दिसत । तिचा कोणताच नव्हता त्रास । अस्तित्व भयावह वाटतसे ।।७७।। केव्हा केव्हा वाटे ती आहे रडत । कधी हुंदके ऐकू येती स्पष्ट । ऐशा भीतीच्या वातावरणात । खोलीत कोणी झोपत नसे ।।७८।। पिशाच्याची स्पष्ट होता जाग । काही मांत्रिक आणले बोलावून । त्यांनी प्रयोगही पाहिले करून । परि सर्व व्यर्थ गेले असे ।।७९।। पुष्कळ वेळा गोठ्यालगत । रात्रीची गुरे राहती ओरडत । त्यांना जाण होतसे नैसर्गिक । ऐशा गोष्टीची वाटतसे ।।८०।। पूर्वी काका झोपती खोलीत । परि ते होता भयभीत । सदाशिव झोपला धीरोदात्त । अनुभव तोचि आला असे ।।८१।। ऐसे सर्व वातावरण होता भयभीत । काही उपाय होते शोधीत । मित्र साळुंके आला अकस्मात । हकीकत विदीत केली असे ।। ८२।। म्हणे काकांची असता हजेरी । कशास चिंता बाळगता उरी । दुसरेच दिवशी गाठती अंधेरी । देवस्थानात पोहोचले ।।८३।। काका करिती स्वकर दर्शन । प्रसंग सांगती उकलून । दोन अडीच वर्षांपूर्वीचे वर्णन । पाहा कैसे सांगती ते ।।८४।। मुंबई-गोवा हायवेवर । घराच्या हाकेच्या अंतरावर । एका मारुती गाडीला भयंकर । अपघात तेथे झाला असे ।।८५।। त्यात दगावले चौघेजण । एक छत्तिशीची स्त्री होती तरुण । तीच येते भूत होऊन । तुमचे घरात बसत असे II८६II  तुम्ही चिंता न करावी मनातून । मी सांगतो ते करावे दारात । पुन्हा कधीच न येईल घरात । बंदोबस्त मी केला असे ।।८७॥ पुढे तैसेचि आले घडून । सर्वांची भीती गेली निघून । सर्व वातावरण गेले आनंदून । काकांची कृपा पाझरली ।।८८।। शहापूरच्या सवितादेवीनी । सांगितली दृष्टांत कहाणी । काकांना ओळखिती म्हणुनी । प्रसंगी जाणे येणे होत असे ।।८९।। एकदा सविता पडली आजारी । औषधोपचार केले सर्वतोपरी । परि ताप न उतरे थोडातरी । अंगात कणकण राहत असे ।।९०।। सतत ताप राही अंगात । तेणे अशक्तता राही शरीरात । अखंड राहती त्या गुंगीत । दोन-तीन महिने झाले असे ।।९१।। या संपूर्ण कालावधीत । त्यांना जाणे न जमले देवस्थानात । फक्त मनातच त्या होत्या स्मरत । काका मजकडे पहा हो ।।९२।। जैसी हाक पोहोचली कानापर्यंत । तैसा दृष्टांत झाला रात्रीत । सात विडे ठेवावे देव्हाऱ्यात । आठव्या दिवशी विसर्जवावे ।।९३।। जैशा झाल्या त्या जागृत । पतिला दृष्टांत केला विदीत । त्याने सकाळी विडे आणिले सात । देवासन्मुख ठेविले ।।९४।। म्हणे काकांनी दिला दृष्टांत । त्यात नक्कीच असेल तथ्य । काही चांगलेच होईल निश्चित । विश्वासे वंदन केले असे ।।९५॥ जैसे विड्याचे केले विसर्जन । ताप उतरू लागला तेव्हापासून । आणि स्वप्नात केलेले मार्गदर्शन । अक्षय उपाय ठरला असे ।।९५।। काकांचे प्रेमळ शब्द ऐकून । सविता मनात गेली विरघळून । पुढे सांगण्याचे नव्हते कारण । सर्वेश्वर सर्वज्ञास वंदिले असे ॥९८।। एकदा उत्कर्ष मंडळामार्फत । ट्रिप निघाली असे शिरडीत । त्यांच्या काकाही होते सोबत । काकीसह भक्तमंडळी ।।९९॥ काकांच्या संगतीत शिरडीत । म्हणजे पांडूरंगासवे पंढरीत । वा श्रीदत्ताचे संगतीत वाडीत । मणिकांचन योग वाटतसे ॥१००।। ऐशा आनंदात कंदाच्या संगतीत । दुपारचे पोहोचले ते शिरडीत । सर्व खंडोबाच्या थांबले देवळात । द्वारकामाई धुनी दर्शन केले असे ।।१०१।। जैसे निघते झाले चावडीत । एक शुभ्र गाय आली धावत । काकांना शोधिले तिने गर्दीत । सन्मुख उभी राहिली ॥१०२।। ती गाय उगाच मारेल म्हणून । भीतीने बाजूला झाले सर्वजण । परि मायेने हात फिरविला पाठीवरून । काकांनी जवळीक दिली असे ॥१०३।। तिने डोके घासुनी छातीवर । मनोभावे केला असावा नमस्कार । काका थोपटती तिचे सर्वांगावर । लाड पुरविले वासराचे ॥१०४॥ सर्व भक्तगण पाहत होते गंमत । काका तिजसंगे होते बोलत । तिच्या मूक इच्छेला देत होते साद । आशीर्वाद तिला दिला असे ।।१०५।। नंतर स्वतःच गेली निघून । मंडळी मारुतीचे घेती दर्शन । ती पुनश्च आली परतून । लाड तैसेचि केले असे ।।१०६।। तेव्हा तिचे कोठे झाले समाधान । पुन्हा ती न दिसली परतून । प्राणिमात्र ओळखती संतसज्जन । श्वान विशेष प्रवीण असे ।।१०७।। सर्व प्राणिमात्रावर असते प्रीती । तिच ओळखावी संत विभूती । आपपर भाव नसतो त्यांची प्रीती । सर्वत्र समभाव दिसतसे ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय सोळावा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]