ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय पंधरावा ॥

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। आता नमन नाना सरखोतांना । काकांच्या परमपूज्य गुरूंना । ज्यांनी काकांना शिकवली उपासना । सन्मुख आपुल्या बैसवोनी ।।२।। ते अध्यात्माचे होते अधिकारी । परि कोणासही नव्हती जाणकारी । सर्वांना वाटे ब्राह्मण व्यापारी । शेतकरी साधा वाटतसे ।।३॥ ते शेतीच्या होते व्यवसायात । तसा मशीनचाही व्यवहार होते करीत । तेणे जावे लागत असे मुंबईत । व्यापारधंदा करावया ॥४॥ मुंबईहून उशिरा निघती । अपरात्री डहाणूस न जाती । मध्ये दहिसरलाच उतरती । भाटलादेवीच्या मंदिरात ।।५।। रात्र काढती ते मंदिरात । ओसरीवर झोपती शांत । पहाटे उठुनी होती ध्यानस्थ । आराधना करिती देवीची ।।६।। सकाळी उठोनी जाती डहाणूस । शेतीकडे लक्ष देती विशेष । गृहस्थाश्रमांतही राहुनी दक्ष । संसार-परमार्थ साधतिते ।।७।। त्या भाटलादेवीचे मंदिरात । एक साधू होता राहत । नित्य राही काळ्या कपड्यांत । मंदिराची देखभाल करीतसे ।।८।। जे दर्शनाकरिता येती भक्त । त्यांना खोबऱ्याचा प्रसाद असे देत । सर्वांशी प्रेमाने राही तो बोलत । नानांची ओळख झाली असे ।।९।। एकदा नाना झोपले असता पडवीत । साधू बोलला करुनी जागृत । किल्ल्या देऊनी त्यांचे हातात । म्हणे लक्ष देऊनी ऐकावे नीट ।।१०।। मंदिर सोपविले तुझे करांत । देवीसेवा करावी अखंडित । किल्ल्या दिल्या पूर्ण विश्वासात । सर्वेसर्वा तूच या मंदिराचा ॥११।। नानांनी किल्ल्या घेतल्या झोपेत । हो बोलल्याचे नाही आठवत । सकाळी उठोनी पाहतात तो । साधू स्वर्गवासी झाला असे ।।१२।। सर्व मंदिराची जबाबदारी । नानांच्या पडली अचानक शिरी । मशीन, शेतीवाडीचा व्यापारी । काय काय म्हणुनी बघावे ।।१३।। काय ठेवावे काय सोडून द्यावे । वचन साधूचे कैसे पाळावे । काय धरावे जिवेभावे । प्रश्न त्यांना पडला असे ।।१४।। देवीसेवेच्या आले निर्णयावर । धंदा गृहस्थी सोपविली मुलांचेवर । देवीसेवाच करणे आयुष्यभर । मंदिरातच राहू लागले ।।१५।। मणिकांचन योग आला जुळून । काकांना भेटले घट्ट बिलगून । आलिंगन दिले शिष्य म्हणून । अध्यात्मप्रेम पाझरले ।।१६।। काकांना शिकविले ध्यानधारण । सकल अर्पिले मंत्राचे धन । यौगिक क्रिया घेतल्या करून । शिष्यास पूर्णत्व दिले असे ।।१७।। काका त्यांचे पुण्यस्मरण करिती । भाव वाहती श्रीचरणावरती । त्यांची घेऊनिया अनुमती । शिष्य गुणगान मी पुढे करी तसे ।।१८।। एक बाई आल्या पालघरहून । खूपच पिडलेल्या आल्या दिसून । दीनदुबळ्या वाटल्या म्हणून । काकांनीच प्रश्न विचारला असे ।।१९।। एकंदर त्यांच्या अवतारावरून । गरिबीचे लक्षण आले दिसून । काय प्रश्न आलात घेऊन । चिंताग्रस्त दिसता की ।।२०।। सर्व आयुष्यच गेले चिंतेत । संसाराशी राहिलो झगडत । कधी न विसावलो सुखसावलीत । दारिद्र्यात जीवन जगलो ।।२१।। आम्ही सहा बहिणी असून । एक भाऊ आहे लहान । सर्वांची लग्ने झाली असून । नशिबाने दुर्दैवीच ठरलो ॥२२।। ज्या ज्या घरात पडल्या बहिणी । तेथे दारिद्रय गेल्या घेऊनी । सर्वच कुटुंबे पिडलेली असुनी । शापित भोगात अडकली ।।२३।। आम्ही सर्वच बंधूभगिनी । दैवहीन ठरलो जीवनी । सुखास पारखे झालो जन्मापासोनी । भविष्य आमुचे काय हो ॥२४॥ तेव्हा काका प्रश्न विचारती । तुमच्या वडिलांची काय होती स्थिती । बाई विचार करुनि सांगती । स्मृती आपल्या बालपणीची ।।२५।। मी तीन वर्षांची होते लहान । तेव्हापासुनी मज आहे जाण । वडील शून्यात नजर लावून । भ्रमिष्टासारखे बैसती ॥२६॥ त्यांनी काहीच न केले कामधाम । घरात बैसोनी केला आराम । ते व्यवहारात झाले निष्काम । शून्यवत जीवन जगले ॥२७।। आम्हाला बालपणापासून । आईने वाढविले कामे करून । तिने अपार कष्टे उपसून । लग्ने करून दिली असे ।।२८।। हाल उपेक्षा उपवासतापास । याचा बालपणीच घडला सहवास । नशिबातच नव्हता सुख सहवास । ऐसे मोठे झालो आम्ही ।।२९॥ सुखाकरिता फिरतो वणवण । कुठे दिसेल का आशेचा किरण । म्हणूनी आलो तुम्हाला शरण । काहीतरी मार्ग दाखवावा ।।३०।। तैसे काका घेती करदर्शन । म्हणे मी सांगतो याचे कारण । तुमच्या जन्मापूर्वीचे प्रकरण । मजसन्मुख दिसते जे ।।३१।। जेव्हा तुम्ही होता लहान । तेव्हाचा हा प्रसंग असून । तुम्हा मुलींना त्याची नाही जाण । आईला विचारून पाहावा ।।३२।। तुमच्या घरासमोरील शेतात । शेताचे कुंपणालगत । चार गुंड येऊनी संगत । एका आदिवासीचा खून केला असे ॥३३।। तो भरपूर केसाळ आदिवासी । ओळखीत होता तुमच्या वडिलासी । ते सन्मुख होते त्या दिवशी । खून होताना पाहिला असे ।।३४।। त्याने वडिलांना केली खूण । की मज वाचवावे संकटातून । परि वडील घाबरून गेले दृश्य पाहून । गुंडाची भीती वाटुनिया ।।३५।। त्या आदिवासीच्या होते मनात । त्यांनी सहाय्यार्थ यावे धावत । जीव परम आशेने होता पाहत । वडिलांवर नजर स्थिरावली ।।३६।। त्याच्या या करुण अवस्थेत । तो घायाळ होऊनी झाला मृत । वडिलांवरचा राग राहिला मनांत । त्याचा सूड तो घेत असे ।।३७।। तेव्हा पासुनि वडिलांची स्थिती । भ्रमिष्ठा सारखे होऊनी फिरती । त्यांची केविलवाणी झाली परिस्थिती । तेव्हापासुनी आजन्म ।।३८।। तो आदिवासी झाला संतप्त । श्रापाचे बळी जाहलात ।।३९।। त्याच आत्म्याचे शापाकारण । तुमचे उद्ध्वस्त झाले जीवन । जोवरी त्याचे न होईल शमन । तोवरी तुमची सुटका नाही ।।४०।। काकांचे ऐकून हे गूढ प्रकरण । त्या बाईंना स्मरले पूर्वजीवन । हा प्रकार होते मी ऐकून । परि गंभीरता कधी न पटली ॥४१।। यावर एक उपाय आहे अजून । त्या आत्म्यास तुम्ही मूक्ती देऊन । सर्वांची सुटका घ्यावी करून । दुःखमुक्ती लाभेल ।।४२।। त्यांना पूजेअर्जेचा उपाय सांगून । काकांनी पूर्ण केले मार्गदर्शन । पुढे काय झाले ते न आले कळून । बाई पुन्हा आल्याच नाहीत ।।४३।। वरील गोष्ट सांगण्याचे कारण । पितृदोष कैसे होतात निर्माण । जे अज्ञानातच होती उत्पन्न । भोगणे प्राप्त असे पिढीला ।।४४।। जेव्हा पितृदोष दाखविती पत्रिकेत । तेव्हा सांगितलेले उपाय करावे त्वरित । हलगर्जीपणा करू नये कर्ममार्गात । विषाची परीक्षा पाहू नये ।।४५।। इंदापूर माणगावचे रहिवासी । देशमुख कुटुंबात दरवर्षी । एखादी घटना घडे ऐशी । अपघात प्राप्त होतसे ।।४६।। देशमुखांचे घराणे होते श्रीमंत । शेतीवाडी आणि सुखवस्तूत । शेव्हरलेट गाडी होती दारांत । ऐशी वर्षांपूर्वी त्यांचेकडे ।।४७।। यावरून वैभवाची कल्पना । सहज कळेल ती सर्वांना । परि त्यांच्या दुखावल्या भावना। एकाच विचित्र घटनेने  ॥४८॥ प्रत्येक वर्षी घडतो अपघात । कुटुंबात होई रक्तपात । याचे कारणही नाही कळत । चिंता ग्रासली सर्वांना ॥४९।। एक भाऊ येत असता गोव्याहून । त्याचे गाडीला अपघात होऊन । त्याचे रस्त्यातच झाले मरण । रक्त सांडले ऐसे की ।।५०।। दुसऱ्या भावाला झाला मेंदुविकार । शस्त्रक्रियेचा झाला प्रकार । रक्तस्राव झाला भरपूर । विकलांग झाला विकाराने ।।५१॥ त्यांच्या वडिलांची अशीच गोष्ट । मुसलमान वकील झाला रुष्ट । त्याने सुरी खोचुनिया पोटात । खून त्यांचा केला असे ॥५२॥ ऐशा घटना घडती क्रमाक्रमांनी । रक्त वाहतसे कुटुंबामधुनी । परि कोणास सांगावी दुदैवी कहाणी । मार्ग काही सापडेना ।।५३।। ऐसे कुटुंब असता चिंतीत । काकांचा समजला वृत्तांत । धावत आले देवस्थानात । काकासन्मुख बैसले ।।५४।। काकांना सर्व केले विदीत । तैसे काकांनी पाहिले हातात । सर्व स्पष्ट झाले दृष्यांत । विस्मृती जागृत केली असे ।।५५।। तुमच्या कुटुंबात कोणीतरी । लग्नात बोलले देवीसमोरी । चांदीचे खड्ग अर्पीन तुझे करी । नवस ऐसा केला असे ।।५६।। तो आजपर्यंत न केला पूर्ण । तो नवस मोडल्याकारण । कुटूंबावरती येती ऐसे विघ्न । देवी रक्त मागतसे ।।५७।। जोवरी नवस न कराल पूर्ण । असेच रक्त वाहील कुटुंबातून । शिवाय तुमचे देणे राहिले असून । कुलाचार भंग झाला असे ।।५८॥ तुमची तळ्याची कुलस्वामिनी । कालिकेचे स्वरूप असुनी । तिला देणे देण्याची प्रथा असुनी । तुम्ही ती मोडली असे ।।५९।। देणे न लागत असे देवीला । परि ते लागत असे तिचे गणाला । जो सदैव धावती कुलरक्षणाला । देवीआज्ञा पाळती ॥६०।। गणांना उपाशी ठेवून । आपण कैसे होऊ वैभवसंपन्न । गणही तिचीच मुले असून । मातृहृदय उचंबळते ॥६१।। आपणासारिखे ती गणांना सांभाळते । त्यांचे लालनपालनही करिते । त्यांनाही भरणपोषण द्यावे लागते । ते कुळाचारांतच सामावले असते ।।६२।। देवीसप्तशतीत आहे वर्णन । जरी राक्षसांचे केले निर्दालन । तरी त्यांचेही साधिले कल्याण । तिज सर्व प्राणिमात्र समान असे ।।६३।। ती दुर्गुणांना करिते नष्ट । सद्गुणांना करिते धष्टपुष्ट । ती तेव्हाच होते रुष्ट । जेव्हा तुम्ही कर्तव्यभ्रष्ट होतात ।।६४॥ काकांचे ऐकून सर्व निवेदन । देशमुख बाईंचे झाले समान । म्हणे ऐशीच कथा घडली असून । अपराध आमुचा झाला असे ।।६५।। आमच्या कुटुंबामधील कोणी । नवस बोलल्याचे स्मरते ध्यानी । चांदीचे खड्ग देऊ श्रीचरणी । पदर पसरून तिच्यापूढे ॥६६॥ तैसेची देणे जे झाले होते खंडित । ते पूर्ण करू या नवरात्रात । कुलधर्म करू सर्व एकत्रित । देशमुख कुटुंब मिळुनिया ।।६७।। काकांच्या सांगण्यावरून । त्यांनी पालन केले दिलेले वचन । आज कुटुंबात आहे समाधान । देवीकृपा झाली असे ।।६८।। या देवी सर्व भुतेषु । शक्तिरूपेण संस्थिता । मातृरुपेण संस्थिता । याची पूर्ण जाण झाली असे ।।६९।। काकांचे लाभावे मार्गदर्शन । सर्वांचेच व्हावे कल्याण । देवाइतुकेच आम्हा द्यावे दान । सबुद्धी होऊ दे जाण्याची ।।७०।। संतासन्मुख जाताना । विकल्प न येऊ द्यावे मना । तेव्हाच पुरतील मनोकामना । अमलभाव मनात असावा ।।७१।। पाटील कुटूंबातल्या एक बाई । परिस्थितीने गांजलेल्या राही । नित्य संकटाशी झगडत राही । कंटाळून गेली संसाराला ।।७२।। तिला एक मुलगा एक मुलगी असून । त्यांच्या लग्नाचे वय गेले निघून । तरीही लग्ने न जुळती म्हणून । चिंता चितेसम जाळतसे ।।७३।। नित्य आर्थिक भासे चणचण । त्यात मुलगा हाताशी नाही म्हणून । नोकरीचे कोठे न येई जुळून । पती वारले काळजीने ।।७४।। मंत्रतंत्र पाहिले करून । पूजा नवसही झाले पाहून । ज्योतिषीही पाहिले धुंडाळून । सर्वच व्यर्थ गेले असे ।।७५।। ऐशा निराश असता मनातून । कोणी काकांचे नाव सुचविले म्हणून । वाटे हाही प्रयत्न पाहावा करून । काकांच्याकडे येती बाई ॥७६।। तुमची देवी कोण म्हणून । नित्याचा विचारला असे प्रश्न । कोकणातील चामुंडेश्वरी म्हणून । पाटील बाईंनी सांगितले ॥७७।। तुम्ही जेव्हा जाता मंदिरात । तेव्हा डावीकडे नाही पाहत । गणपती आहे कोनाड्यात । त्याला दुर्लक्षून पुढे जाता ।।७८।। ती अडीच फुटाची मुर्ती असून । एक वरती एक पाय खाली सोडून । सुंदर मूर्तीचे आहे ध्यान । त्याला वंदन करीत नाही ॥७९।। तिला अव्हेरून जाता म्हणून । त्याच्या कोपास झालात कारण । जोवरी विनायकाला न जाल शरण । तोवरी तरणोपाय नाही ।।८०।। पाटील बाईंच्या आले लक्षात । आपण धावत जातो गाभाऱ्यात । चामुंडेश्वरीचे दर्शन घेतो मनसोक्त । दुर्लक्षुनी श्री गणेशाला ।।८१।। कधी विचार नाही आला मनात । श्रीगणेशाला वंदुनी जावे गाभाऱ्यात । हा अपराध वा चूक आहे निश्चित । मज मान्य आहे सर्वस्वी ।।८२।। तेव्हा समजावून सांगती । लवकरच जावे दर्शनाप्रती । श्री गणपतीचे घेऊनी अनुमती । देवीदर्शनास जावे नेहमी ।।८३।। जैसा गणपती आहे विघ्नहर्ता । तसा तोही आहे विघ्नकर्ता । म्हणोनी आपण व्हावे शरणागता । विनम्र भावे पायासी ।।८४।। आता गणपतीला जावे शरण । माफी मागावी पदर पसरून । गूळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून । शेंदूर फासावा मूर्तीला ।।८५।। ऐसा गणेशाचा करिता सन्मान । तो तुमच्यावरती होईल प्रसन्न । तुमची चिंता काळजी जाईल निघून । प्रयत्न करून पाहावा ।।८६।। पाटील बाईचे झाले समाधान । कोकणात गेल्या धावून । श्रीगणेशाला नैवेद्यपूजा करून । क्षमायाचना केली असे ।।८७।। अश्रूभरल्या लोचनांनी । श्री गजाननाला केली विनवणी । कोप न करावा म्हणून । पदर पसरला आस्थेने ।।८८।। त्यांची ती विनंती ऐकून । गजाननाचे द्रवले असावे मन । कारण मुलांची लग्ने होऊन । चिंता चिरंतनाची दुरावली ।।८९।। यावरून ठेवावे लक्षात । जेव्हा कोणत्याही जाणे मंदिरात । मूर्ती असती ज्या द्वय बाजूत । वंदुनी पुढती जावे हो ।।९०।। त्यांची घेतल्याविना अनुमती । मुख्य देवाची न मिळे संमती । याची कधी न व्हावी विस्मृती । शिष्टाचार संमत असे हे ।।९१।। म्हणोनी नंदी, कासव, उंदीर । जे प्रवेशिताच दिसती समोर । त्यांना करोनिया , नमस्कार । पुढे जाणे योग्य असे ।।९२।। ते देवास देती माहिती । भक्त आलासे दर्शनाप्रति । त्यांची ऐकावी नम्र विनंती । कृपापात्र करावे ।।९३।। आपल्या कधी न येई लक्षात । की शिष्टाचार असतो देवाचे दारात । तो सर्वत्र आहे शास्रसंम्मत । संसारात असतो तैसाच की ।।९४।। म्हणुनी काका सांगती निक्षून । शिष्टाचार असतो संसारातून । तोची पाळावा देवास सन्मानून । कर्तव्यदक्षता असावी ।।९५।। काका होते नोकरीनिमित्त । अहमदनगरला होते राहत । चितळे रोडच्या मंदिरात । सहज गेले दर्शनाला ।।९६।। तिथे त्यांना समजले । संत मोरेदादा आहेत आले । त्यांचे प्रवचन असे चालले । म्हणुनी ऐकावया थांबले ।।९७।। खूपच गर्दी होती मंदिरात । मंडळी उभी होती दारापर्यंत । काका उभे राहिले कोपऱ्यात । प्रवचनानंद घेण्यास ।।९८॥ ऐसे चालू असता प्रवचन । विठ्ठलाची रंगात आली धून । जयजयकाराची गर्जना करून । क्षणभर थांबले सर्वजण ॥९९।। तोची दादांनी काकांना पाहिले । त्वरित जवळ बोलावले । शेजारी आदरे बैसविले  । उद्देशून बोलले श्रोत्यांना ।।१००।। तुम्ही पाहिलेत संतमहंत । परि आश्चर्याने व्हाल चकित । हे गृहस्थ आहेत महान संत । तुम्ही ओळखणार नाही ।।१०१।। यांनी न घातले झब्बाधोतर । टिळा माळांचा नाही हार । उपरणे पागोटे नाही डोक्यावर । पॅन्टशर्टात दिसती हे ।।१०२।। संत न ओळखावा वेशावरून । तो अंतरी नामात असतो लीन । वरवरच्या सोंगावरून । संत ओळखणे कठीण असे ।।१०३।। विठ्ठलाच्या गळ्यातला हार आणून । काकांच्या गळ्यात घातला आनंदून । प्रेमाने करुनीया वंदन । प्रवचन पुढे केले असे ।।१०४।। जैसे प्रवचन गेले संपून । काका करू लागले वाकून वंदन । परि त्यांना तिथेच अडवून । गळाभेट घेतली दादांनी ।।१०५।। तुळशीहारातील एक पान काढून । मुखात घातले प्रसाद म्हणून । काकांना पुनश्च वंदन करून । निघून गेले मोरेदादा ।।१०६।। भक्तांच्या या भाऊगर्दीत । लोक काकांना होते शोधीत । परि काका पळाले अकस्मात । स्कूटरवरून घराकडे ।।१०७।। आपण किती भाग्यवान । देवदत्तांचे घडते दर्शन । सत्संग मिळतो चैतन्यगाथेतून । स्मरणे पुण्य जोडावे।।१०८॥ 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत

 भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय पंधरावा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]