ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय चौदावा ॥

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१।। बडोद्याच्या ब्रह्मचारी महाराजांना । माझी हृदयस्य मानवंदना । शतशः साष्टांग विनम्र नमना । वारंवार मी करीतसे ।।२।। दत्तभक्तीचा लागता ध्यास । सेवेस राहिले गाणगापुरास । दत्तप्रभूनी पाठविले कोल्हापुरास । कृष्ण सरस्वतींच्या सेवेत ।।३।। सेवेची होता पूर्ण पुर्ती । तेही मोरेश्वरास आज्ञापिती । नर्मदाकाठीचे सच्चिदानंद सरस्वती । यांचे सेवेत जावे की ॥४॥ इथे गुरू शिष्याची जुळली नाती । अद्वैत प्रेमाची लाभली प्रचिती । योगसामर्थ्याची झालीसे प्राप्ति । संन्यास दीक्षा दिली असे ।।५।। स्वामींची अनन्य गुरुभक्ती । आदर्शाची ही आदर्श होती । संदीपकाने केली जी गुरुभक्ती । त्यावरही कडी केली स्वामींनी ॥६।। गुरूस न विसंबती एकही क्षण । रूप पाहण्यास आसुसती लोचन । स्वये मागून आणती भिक्षाअन्न । जेवू घालती स्वहस्ते ॥७॥ जेव्हा असती ते बडोद्यात । चतुर्मास करिती गुरूचे संगतीत । स्नानाला नर्मदाजल असे लागत । त्यांच्या सच्चिदानंद सद्गुरुला ।।८।। भल्या पहाटे उठती लौकर । पवनवेगाने जाती भराभर । चांदोदचा गाठती नर्मदातीर । हंडा खांद्यावर वाहून आणती ।।९॥ ऐसी सेवा करिती ते प्रतिदिन । गुरूची आज्ञा मानती प्रमाण । गुरुचे इच्छित असे जे अंतर्मन । क्षणात हजर करती प्रेमाने ।।१०।। स्वामी लंगडे होते एका पायाने । परि तीळभरही न राही कर्म उणे । गुरूचा शब्द वरच्यावर झेलणे । याहून अन्य सेवा मान्य नसे ।।११।। गुरूंच्या जीवनी स्वामींचे प्राण । स्वामींच्या जीवनी गुरूंचे मन । ऐसे द्वंद्वातीत झाले दोघेजण । अभंग भक्तीसीमेवर एकवटले ।।१२।। स्वामी कार्य करिती भक्तांसाठी । त्याचे श्रेय अर्पिती गुरूचे गाठी । सर्वस्व सर्व अर्पिले प्रेमापोटी । प्राणही अर्पिला श्रीचरणी ।।१३।। मी स्वतःस समजतो भाग्यवान । मज करवी झाले चरित्रलेखन । मज सेवाव्रताचे लाभले समाधान । भाऊकाकांच्या कृपेमुळे ।।१४।। ऐसे महाराजांचे उत्तुंग जीवन । गुरुभक्तीचे असीम उदाहरण । सुभक्ताने वाचावे आदर्श म्हणून । भक्तीत मुक्ती साधावया ।।१५।। अंधेरीच्या सीमा गोरे यांनी । पुत्र निखीलची सांगितली कहाणी । आर्किटेक्ट झाला प्रतिष्ठेने । मार्गी लागला चांगला ।।१६।। प्रकृतीने होता सुदृढ चांगला । परि जैसा जाई तो कामाला । तैसा तैसा थकून जाऊ लागला । याची जाण होऊ लागली ।।१७।। कामावरून जैसा येई घरात । तैसा आडवा होई तो पलंगात । घामाने डबडबे तो शरीरात । अती अशक्तता जाणवे तयाला ॥१८॥ वाटे दगदग होई जी प्रवासात । ती सहन करण्याची नसावी ताकद । परि कामधंदा करणे असे प्राप्त । टॉनिक वगैरे सुरू केले ।।१९।। दिवसेंदिवस होई तो अशक्त । बघणाऱ्यांच्या येई ते लक्षात । सीमा आईस टोकती सतत । डॉक्टरांना तरी दाखवावे ।।२०।। डॉक्टरांना दाखविती प्रकृती । सर्व परीक्षा करून पाहती । तपासात काही न सापडे विकृती । नेमके कारण कळेचिना ॥२१।। जेव्हा आरोग्यात न सापडे कारण । तेव्हा शंका मनात झाली उत्पन्न । दृष्ट किंवा करणीचे असावे लक्षण । मनास घोर लागली ।।२२।। परि कुणास न दाखवी ते बोलून । म्हणतील हे तो मूर्खाचे लक्षण । उलट अंधश्रद्धाळू आहेस म्हणून । बोल लावतील घरातले ।।२३।। आजच्या सुविद्य विज्ञानयुगात । विश्वास असावा ऐशा गोष्टीत । विवेकबुद्धीच नसावी जागृत । सुशिक्षितांचा मानस झाला असे ।।२४।। परि जोवरी न येई आपत्ती । तोवरीच ऐशा गोष्टी सुचती । सुज्ञ म्हणती जे स्वतःला ।।२५।। जेव्हा प्रसंगाचे चटके न बैसती । सापडता संकटाच्या ज्वालेत । तेव्हा शहाणपणा जातो चुलीत । तेव्हा श्रद्धाच येते धावत । सहाय्य कराया मनुष्याला ।।२६।। जैसे सीमाच्या आले लक्षात । तैसे ती देवाला राही प्रार्थीत । कुलस्वामिनीला झाली शरणागत । नवससायास बोलली ।।२७।। माझ्या बाळाला करावे औक्षवंत । माझे अपराध घालावे पदरात । वाटल्यास माझे त्याला द्यावे जीवित । पदरात दान मागते मी ।।२८।। तिची दयार्द्र विनंती ऐकून । योग आणला असावा जुळवून । श्रीकृष्ण केंद्राचे नामसंकीर्तन । आयोजित घरी केले असे ।।२९।। कृष्णभजनात गेले रंगून । भक्तीत दिसले गोकुळ-वृंदावन । कृष्णलीलेचे ऐकून कीर्तन । भक्ती वृद्धिंगत झाली असे ।।३०।। देवा तुझे आहे ना वचन । जेथे चालतसे माझे कीर्तन । तेथे मी प्रत्यक्ष असतो प्रकटून । भक्तास माझ्या रक्षावया ।।३१।। घरी होतास दिवस तीन । माझ्या मनातला रंग गेला बदलून । तुझ्या अस्तित्वाची झाली जाण । निखीलवर कृपा  करावी ।।३२।। ऐसी सीमाने केली नम्र विनंती । भजनाची झाली समाप्ती । भक्त प्रसाद घेऊनिया । निघती । प्रतिभा सावंत थांबल्या ।।३३।। सीमा तुझा विश्वास आहे का करणीवर । मज वाटतसे हाच प्रकार । कोणीतरी केला आहे निखीलवर । दाट शंका मज वाटतसे ।।३४।। एक शेवटचा प्रयत्न म्हणून । याला काकांचे कडे जावे घेऊन । तिथे करणीचे होईल निवारण । मज पूर्ण खात्री वाटतसे ।।३५।। तैसे धावतच गेली घेऊन । काकांच्या सन्मुख बैसले दोघेजण । काका पाहताच वदले पटकन । सर्व संपले आहे बाळाचे ॥३६।। फक्त सातच दिवस आहे आयुष्य । ऊशीर केला इथे आणण्यास । हे वाक्य ऐकून मातृहृदयास । काय यातना व्हाव्यात? ॥३७।। पायाखालची जमीन गेली सरकून । मोठ्याने रडू न शकती म्हणून । अश्रू ओघळती नयनामधून । हुंदके देऊ लागल्या ।।३८।। परी निखीलने सावरले आईला । आई, उगाच न रडावे या वेळेला । जो भोग नशिबी आहे लिहिला । चुकणार आहे का सांगावे ।।३९।। काकांनी जेव्हा केले स्पष्टीकरण । तेव्हा मित्राचेच दिसले कारस्थान । त्याच्या मनात असुया झाली उत्पन्न । त्यानेच करणी करविली असे ।।४०।। परि काकांनी दिले आश्वासन । मुळीच नका जाऊ घाबरून । मी सांगतो तैसे करा प्रयोजन । सातच दिवसांत बरा होशील निश्चित ।।४१।। काकांचे ऐकून हे मृदू वचन । सीमाचे झाले असे समाधान । म्हणे बाहेर बसावे जाऊन । मंत्र प्रयोग मी करितसे ।।४२।। तैसे सन्मुख बसविले निखिलला । मंत्रप्रयोग सुरू केला । निखिल शांतपणे बैसला । काकांच्याकडे पाहत । ४३।। जैसे नयनाला भिडले नयन । तैसा प्रकाश निघाला तत्क्षण । काकांच्या तेजस्वी डोळ्यांमधून । श्रीकृष्णाचे दर्शन झाले असे ।।४४।। सुवर्ण बासरी होती करांत । सुवर्ण अलंकाराने होते मंडित । पिवळा पितांबर होता झळकत । सस्मित मुद्रा पाहिली ।।४५।। क्षणांत दर्शन गेले देऊन । आनंद ऊर्मी उमटल्या देहातून । प्रसन्नतेने भारले असे मन । निराशा उखडून गेली असे ॥४६॥ आईला सांगे तो घरी जाऊन । सर्व वातावरणच गेले पालटून । काकांचा प्रयोग केला विश्वासून । सर्व मंगलमांगल्ये झाले असे ।।४७।। श्रीकृष्णाचे केले जे संकीर्तन । तोची धावला काकांचे माध्यमातून । याची पक्की झाली सर्वांना जाण । दीर्घायुषी पुत्र झाला असे ।।४८।। काकांच्या मार्गदर्शनाखाली । त्याला कामेही मिळू मिळाली । प्रकृती उत्तम असे सुधारली । वेगळे सांगणे न लगे ।।४९।। काकांना कोटी कोटी प्रणाम । आता तुम्हीच आमचे सुखधाम । पवित्रचरणी लाभावा आराम । सन्मती द्यावी सुभक्ताला ।।५०।। सचिन मोहिले बोरिवलीचा । एजंट होता एलआयसीचा । व्यवसाय तसा बरा चालायचा । अडचणीतून वाट काढीत असे ॥५१॥ परि या व्यवसायाकरिता । त्याला हिंडावे लागे शोधण्याकरिता । तेव्हाच कोठे लाभे सफलता। तेणे कष्टप्रद सर्व वाटतसे ।।५२॥ चर्चा चालतसे ही घरात । श्री गजाननाला सांगावी हकीकत । व्यवसायाला लाभावी बरकत । आशीर्वाद आपुला असावा ।।५३।। मोहिले घरातील सर्व मंडळी । शेगावी जाती वेळोवेळी । प्रकटदिनाचे पुण्य वेळी । गुरुपौर्णिमेला हमखास ।।५४।। श्री गजानन विजय वाचती । महाराजांना प्रेमे स्मरती । महाराजांचेवर अनन्यभक्ती । मोहिले मंडळीची आहेच ।।५५।। परि कधी कधी अकस्मात । काही प्रसंग घडती प्रश्नांकित । अशावेळी सल्लामसलत । कोणासंगे करावी वाटतसे ।।५६।। ऐशा या विचारांच्या  गमतीत । चर्चा चालत असे घरात । तेव्हा सरला मावशी असे सांगत । मार्गदर्शन  घ्यावे काकांचे ।।५७।। आपण भक्त असू गजाननाचे । काकांना कैसे विचारायचे । ऐशा काही शंकाकुशंकांचे । द्वंद्व मनात चालत असे ।।५८॥ प्रश्नांचे उत्तरही सापडेल । समाधान लाभेल मनाला ।।५९।। सरला मावशीचे पटले मनोगत । तरीही विचार नव्हते थांबत । तेव्हा महाराज देती दृष्टांत । सचिनच्या स्वप्नात येऊनी । सचिनला दिसले स्वप्नात । गजानन महाराज आले घरात । सोफ्यावरती बैसले शांत । उद्देशून बोलले सचिनला ॥६१॥ तुझ्या सरला मावशीने सांगितले । तिथेच जावे होईल भले । तिथे म्हणजे कुठे ऐसे विचारले । सचिनने श्री महाराजांना ।।६२।। काकांकडे का म्हणून । तैसी होकारार्थी हलविली मान । सचिनचे झाले समाधान । शंकासमाधान झाले असे ।।६३।। प्रसंग गजानन विजय मधला । सचिनच्या नजरेसमोर आला । रामदासी शिष्य बाळाभाऊला । समर्थरूपात दिसल्याचा ।।६४।। दासनवमीच्या उत्सवाकरिता । गडावर जाई दर्शनाकरिता । परि वृद्धत्वाची येता अवस्था । अशक्य जाणे झाले असे ॥६५।। तेव्हा रामदासांना केली विनंती । आता साथ नाही देत प्रकृती । तेव्हा दृष्टांत देऊनी ते सांगती । घरीच उत्सव करावा ॥६६॥ मी स्वतः येईन तुझे घरी । माझी दाखवीन रे हजेरी । बाळाभाऊ वाट पाहतसे घरी । भिक्षा देण्यास थांबला ॥६७।। त्याची ती आर्तता पाहन । गजानन महाराज धावले  तत्क्षण।। रामदासांचे रूप दाखवून । वचनपूर्ती केली असे ॥६८॥ क्षणात स्वामी क्षणात गजानन । बाळाभाऊ गेला गोंधळून । उभयतांच्या ऐक्याची होता जाण । शरणागत चरणी झाला असे ।।६९।। पूर्वी याच देहरूपी वस्त्रात । मज रामदास होते बोलत । आता तोच मी या वस्त्रात । गजानन म्हणूनी आलो आहे ।।७०।। दोन आत्म्यांचे ऐक्य जाणून । जसा बाळाभाऊ गेला समजून । तैसेची सचिनला झाले ज्ञान । महाराज काका ऐक्याची ।।७१।। मज ज्ञात आहेत उदाहरण । संत प्रकृतिने असती भिन्न । आत्मा एकच असतो म्हणून । एकमेका सांभाळती ॥७२।। हा माझा हा तुझा भक्त । ऐसा भेद न करिती भक्तिपंथात । सकल जनांचे साधणे हित । उद्देश एक सर्वांचा ॥७३।। जैसा भेद न होई हरीहरांत । तैसा तोही न करावा संतासंतात । सर्व संत असती भेदातीत । परब्रह्मांत सामावले ।।७४।। गजाननाचा लाभता दृष्टांत । सचिनच्या आले हे लक्षात । काकांकडे जाई भग्नरहित । मार्गदर्शन घेऊ लागला ।।७५।। काकांच्या मार्गदर्शनाखाली । त्यांची सर्वांगाने झाली प्रगती । काका महाराजांची झाली युती । अंतरमनांत सचिनच्या ।।७६।। सौ. मनाली मालप यांची गोष्ट । त्यांना झाला असे दृष्टांत । कुतूहल जागले असे मनात । सत्य असत्य काय ते ।।७७।। एकदा ठाण्यास जाती माहेरी । त्यांचे जेवण झाले दुपारी । विश्रांतीस्तव पडल्या पलंगावरी । सावली पुस्तक पाहिले ।।७८।। सहज घेऊनी त्या चाळती । काही गोष्टी वाचती सोडती । परि झोपेची झाली जबरदस्ती । गाढ झोपून गेल्या त्या ।।७९।। तोची काका येती स्वप्नात । सस्मित होते ते हसत। हळूहळू रूप गेले बदलत । स्वामी समर्थ दिसू लागले ।।८०।। स्वप्नात स्वामींनी केले वंदन । आशीर्वाद दिल्याची झाली जाण । स्वामी काका नसती भिन्न । जाण तिला झाली असे ।।८१।। ती काकांना होती ओळखत । स्वामींच्याही जाई मंदिरात । परि दोघांचेही हे गूढ गुपित । दृष्टांतामुळेच उमगले ।। ८२।। आप्पा कुलकर्णीही सांगती । काकांकडे येती ज्या विभूती । अध्यात्म्याच्या उंचीवर असती । वयोवृद्ध ज्ञान सर्वथा ।।८३।। तेही विनम्र भावे बैसती । आपला अहं विसरून जाती । त्यांचीच दैवते त्यांना दिसती । काकांच्या या पावन देहात ।।८४।। ज्या ज्या व्यक्ती काकांच्याकडे येती । त्यांना पहिलाच प्रश्न विचारती । तुमची कुलस्वामिनी कोणती । नावगाव मज सांगावे ।।८५।। मजसन्मुख उभे राहून । कुलस्वामिनीचे करावे स्मरण । नंतर घेती स्वकरदर्शन । भविष्य पुढचे सांगती ते ।।८६।। परि पुष्कळ वेळा येते दिसून । बहुतेक कुटुंबामधून । कुलस्वामिनीची नसते जाण । कोण कोठली असावी ती ॥८७।। त्यांच्या अजाणपणातून । अन्य देवतांचे घडते पूजन । मातृदेवता वगळली जाते म्हणून । सांसारिक अडचणी येतात ।।८८।। आईला सोडून मावशीला पुजणे । हे तो आईवरती अन्याय करणे । आईचा मानापमान कुळधर्म करणे । शास्त्रसंमत असताना ।।८९।। कुलस्वामिनी असते प्रत्येक कुळातून । तीच कुळाचे करीते रक्षण । तीच कुळाचे करिते कल्याण । अभ्युदय करणे कर्तव्य तिचे ।।९०।। देवी सप्तशतीत दिले वचन । वंशोवंशी कुळे मी सांभाळीन । त्यांनी कुळधर्माचे करावे पालन । कृपाछत्रात घेईन मी ।।९१।। पण आपणच विसरलो आईला । ती शोधत राही मुलाला । कैसी विस्मृती झाली बाळाला । वाट पाहत बैसली असे ।।९२।। अन्य दैवतांचा धरून हात । मुलगा चालतसे संसाराची वाट । आई अदम्य आशेने राही तिष्ठत । बाळ भेटेल केव्हातरी ।।९३।। तिची सदिच्छा चिंता आणि खंत । अडचणी होऊनी येता संसारात । परि आपल्याला ते नाही कळत । नशीब म्हणुनी स्वीकारतो ।।९४।। परि काकांसारिखे संत । या गोष्ट करिती स्पष्ट । ठावठिकाण्यासहित । कुलस्वामिनीची नांव सांगती तुम्हाला ।।९५।। असेच एक गृहस्थ येती । काकांच्या सन्मुख बैसती । काका हाच प्रश्न विचारती । कुलदेवता कोणती असे ।।९६।। पती पत्नी गेले गोंधळून । सासूबाई सांगत असती म्हणून । तुळजाभवानी असावी म्हणून । तिचे स्मरण करितो ।।९७।। कुळधर्म करिता का म्हणून । काका विचारती दुसरा प्रश्न । म्हणे आम्हास कल्पना नसून । दर्शनास जातो केव्हातरी ।।९८।। तेव्हा काका करिती करदर्शन । म्हणे मज वेगळीच येते दिसून । खारेपाटलाची कालभैरव भवानी । कुलस्वामिनी तुमची असे ॥९९।। तुमचा कुळाचार राहिला असून । तुमची वाट पाहत राहिली बसून । तिचा ठावठिकाणा त्यांना सांगून । त्वरित शोधण्यास पाठविले ।।१००।। तैसे आश्चर्य वाटले मनातून । ज्याची तीन पिढ्या नव्हती जाण । ती क्षणात कैसे उकलून । काकांनी या दाखविली ।।१०१।। तिथे गुरवांनी सांगितली माहिती । पूर्वी मालप आडनावाने ओळख होती । देवीच्या काही विशिष्ट चालीरीती । मालपांनीच करण्याची प्रथा होती ।।१०२॥ परी देवीचे कूळच गेले हरवून । तेणे प्रथाही गेली मोडून । त्यामुळे कुळधर्म गेला राहून । अनेक वर्षेपर्यंत ।।१०३।। याची मालपांना झाली जाण । कुळधर्माचे केले पालन । हृदय भरून आले आनंदून । ऋणमुक्तीचे समाधान लाभले ।।१०४॥ देवीला देण्याची असते रीत । परि प्रथेला राहती अव्हेरीत । तेणे रोषाला होती बाधित । अडवणूक त्यांची होत असे ।।१०५।। हे देणे न लागतसे देवीला । तिला देणे असे तिचे गणाला । जे कुळाच्याच धावती मदतीला । देविआज्ञा पाळण्यास ॥१०६।। तिचे गणांना उपाशी ठेवून । तुम्ही कैसे व्हाल भाग्यवान । म्हणुनी नित्य असावे सावधान । कुळधर्म पाळावा ।।१०७।। ज्यांना माहीत नाही कुलदेवी । त्यांनी बायजीस मानावे मातृदेवता । ती सन्मुख आणील तुमची कुलदेवता । सावलीत वचन दिले असे ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय चौदावा गोड हा। 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]