ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय तेरावा ॥ 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। जय जय जानकी दुर्गेश्वरी । सकल भक्तांचे कैवारी । अनंत नमने चरणावरी । पुत्र मधुकर करीतसे ।।२।। एक लपलेला भाऊ म्हणून । ताराताईने केले माझे वर्णन । ढब्बू पैसा दिला प्रसाद म्हणून । जो सर्व पुत्रांना तू दिला असे ।।३।। मज कुटुंबात घेतले मिळवून । सर्व भाऊबहिणींनी केला सन्मान । जानकी आईचा पुत्र म्हणून । मान्यता मज दिली असे ।।४।। स्व-चरित्र घेतले लिहून । मज भाग्यवान केले परिपूर्ण । जन्मजन्मांतरीची सावली देऊन । धन्य जीवनी केले असे ।।५।। केवळ तुझ्या आशीर्वादाकारण । मज गुरुभक्तीचे झाले ज्ञान । संतचरित्रे घेतली लिहून । सेवेची संधी देऊनिया ।।६।। हीच सुवर्णसंधी साधून । चैतन्यगाथेचे करितो लेखन । तीही तुझी इच्छा जाणून । सेवा रुजू मी करीतसे ।।७।। मज लिहिताना घ्यावे सांभाळून । चरित्र घडावे उत्तम छान । भक्तेच्छा कराव्यात परिपूर्ण । सदैव पाठीशी राहुनिया ।।८। सप्तशतीत दिले जे वचन । वंशोवंशी कुळे मी सांभाळीन । सावलीस दिले जे अभयदान । चैतन्यगाथेस ते लाभावे ॥९॥ जो जो वाचेल चैतन्यगाथा । त्याच्या पुरवाव्या मनोरथा । वृद्धिंगत व्हावी भक्तिसंपदा । भावे वाचील जो प्रेमाने ।।१०।। तूही भावभक्तीची भुकेली । भाव ओळखून देतेस सावली । चैतन्यगाथेत ही विसावली । अनुभव येती भक्तांना ।।११।। काकांची पाहुनी अनन्यभक्ती । तूही राहिलीस त्यांचे संगती । याची मज लाभलीसे प्रचिती । चैतन्यगाथा लिहिताना ।।१२।। ज्यांना सावली वाचावयास सांगती । त्यांच्या चिंता-समस्या सुटती।अदृश्यरूपे तुझीच कीर्ती । मातृहृदयातून दिसतसे ।।१३।। इथे मज प्रकर्षाने होते आठवण । कुसुम, काला, मालूचे पुण्यस्मरण । ज्यांच्यामुळे आईचे गुणसंकीर्तन । सहज मी लिहू शकलो ।।१४।। त्यांच्याच राहावे मी ऋणांत । त्यांचेच कार्य चालवावे समाजात । म्हणुनी सतत आहे कार्यरत । फक्त तुझे आशीर्वाद लाभावेत ।।१५।। मज संशय नाही मनात । जैसे अण्णांच्या होती संगतीत । तैसेची मज घेतले पदरात । कार्यप्रवृत्त करीतसे ।।१६।। यज्ञयाग पूजा हवन । करविले अण्णाचे हातून । माझ्याकरवी चरित्रलेखन । तुझीच लीला मी जाणतसे ।।१७।। ज्या लीलांची मज झाली जाण । त्याच लीलांचे करितो मी वर्णन । संतलीलेचे नामसंकीर्तन । मज घडू दे जन्मोजन्मी ।।१८।। असो आता पाहू अशा गोष्टी । बायजी धावली भक्तांसाठी । केवळ काकांच्या प्रेमापोटी । शब्द उचलून धरीतसे ।।१९।। एकदा अर्चनाचे वडिलांस । काका सांगती आणण्यास । सावलीच्या प्रती देवस्थानास । बडोद्याहून येताना ।।२०।। तैसे प्रती होऊन येती । काकांच्या हाती सोपविती । परि एक प्रत ते काढून देती । कन्या अर्चनास द्यावया ।।२१।। म्हणे अर्चनास द्यावी ही प्रत । तिज गरज भासेल भविष्यात । ते लौकरच होईल तिज ज्ञात । नित्य वाचावयास सांगावे ।।२२।। तैसे पनवेलला पाठविली प्रत । अर्चनाला मिळाली निरोपासहित । तिने वाचावयाला केली सुरूवात । भावभक्तीने मनोमनी ।।२३।। तीन-चार अध्याय झाले वाचून । तोच तिला झाली आठवण । याशिकेला जावयाचे आहे घेऊन । शाळेची वेळ झाली आहे ।।२४।। तिला घेऊन गेली ती रिक्षेत । स्वये उतरली असे त्वरित । मुलीला उतरण्याची आज्ञा देत । पैसे देऊ लागली ।।२५।। मुलगी उतरली असावी जाणून । ड्रायव्हर मागे न पाहे परतून । रिक्षा सुरू केली असे पटकन । पुढे सरकू लागली ।।२६।। त्याच क्षणी याशिक होती उतरत । तिचा फ्रॉक अडकला रिक्षेत । ती फरफटत गेली रिक्षेसहित । पाच-सहा मीटरपर्यंत हो ।।२७।। तोची बायजी धाव म्हणून । अर्चना ओरडली घाबरून । मुलीला वाचवावे येऊन । धावा करू लागली ।।२८।। रिक्षा होती अतिवेगात । परि अचानक थांबली रस्त्यात । अर्चना धावली पाठोपाठ । याशिकेला उचलून घेतले ।।२९।। कुठेही नव्हते तिज लागले । वा कुठेही तिज नव्हते खरचटले । सर्वांगानी सुरक्षित दिसले । निःश्वास टाकला सुटकेचा ।।३०।। परि ड्रायव्हर पाहे इकडे तिकडे । कोणास तरी शोधे चहूकडे । एक वयस्कर बाई येती पुढे । मज थांबविले हाताने ।।३१।। अरे, थांब थांब म्हणून । मज ओरडल्या रागावून । म्हणुनी गाडी थांबविली तत्क्षण । त्यांना मी पाहत आहे ॥३२।। कोण बाई केला प्रश्न । उंच किडकिडीत होती गोरीपान । बायजीचे हुबेहूब केले वर्णन । आश्चर्यचकित झाली असे ।।३३।। मज सवारी मिळाली म्हणून । मी रिक्षा थांबवली तिचे कारण । परि त्या न दिसती कोठे म्हणून । चहूकडे मी पाहत असे ।।३४।। अर्चना मनात गेली समजून । प्रत्यक्षात बायजी आली धावून । माझ्या बाळास दिले संरक्षण । काकांचा निरोप उमगला असे ॥३५।। अंधेरीचे रविकांत राणे म्हणून । हॉटेलचा धंदा होता पूर्वीपासून । परि नियतीची दृष्ट लागून । व्यवसाय बंद झाला असे ।।३६।। ऐसे वर्ष गेले असे उलटून । कोणता धंदा न आला जुळून । परिस्थितीने गेला असे वैतागून । अस्वस्थ जीवनी झाले असे ।।३७।। जिकडे तिकडे पाहे प्रयत्न करून । परि निराशाच पडे पदरातून । वाटे नशीबच फिरले असून । मनात खंगत ते चालले ।।३८।। मित्र सावंत नि मांजरेकर । राणेंना घेऊनी बरोबर । दिवस साधुनी गुरुवार । काकांकडे नेती एकदा ।।३९।। कथाव्यथा घातली कानावर । काकांनी स्थिर केली नजर । म्हणे उपाय आहे यावर । सावली ग्रंथ वाचावा विश्वासे ।।४०।। बायजीआई आहे करुणाकर । तिची कृपा लाभता शिरावर । संसारात तुम्ही व्हाल स्थिर । सर्व चांगले होईल ।।४१॥ सावली वाचावी दिवस तीन । दृढविश्वासे विनम्र होऊन । बघा तीच करेल मार्गदर्शन । धंदा चालेल चांगला ॥४२॥ काकांचे ऐकून मृदू भाषण । राण्यांना उत्साह आला मनातून । विचारांचे जळमट गेले निघून । पुस्तक घेऊन निघाले ।।४३।। भावभक्तीने वाचली सावली । मनोभावे पूजाही केली । थालीपिठाची ताटली ठेविली । प्रसाद म्हणुनी माऊलीला ।।४४। आम्ही बालक असतो अज्ञानी । चुका पदरात घ्याव्यात ।।४५।। ऐसे मनोमनी तिज प्रार्थून  । त्याने सहज उघडले लोचन । तो पुढील चमत्कार पाहून । आश्चर्य मनी पावला असे ॥४६।। थालीपिठाचा एक घास । तुटलेला दिसला नजरेस । त्याने पाहिले आजूबाजूस । कोणीही नव्हते खोलीत ।।४७।। वाटे माऊलीने स्वीकारला प्रसाद । मजवरती झाला कृपाप्रसाद । काकांचेकडे गेला धावत । प्रकार सर्व सांगितला ॥४८।। काकाही गेले आनंदून । म्हणे वा वा फारच झाले छान । आईची कृपा झाली असून । चिंतेचे कारण संपले II ४९II  पुढे तैसेचि आले घडून । हळूहळू धंद्याची घडी बसून । हॉटेल उभारले पुनश्च छान । संसार सावरला राण्यांचा ।।५०॥ असेच भाग्य लाभो भक्तजना । त्यांच्या सुटाव्यात विवंचना । यावे कामधेनूच्या दर्शना । तुमच्यासाठीच जो बैसला असे ।।५१।। सौ. पुष्पा दामले या बाईला । एकदा ब्रेन ट्युमर झाला । तेणे दाखल केले जेजेला । मुंबईच्या दवाखान्यात ।।५२।। तिला पूर्ण पाहिले तपासून । रुग्णस्थिती दिसली नाजूक म्हणून । धैर्य न होई करण्या ऑपरेशन । परत घरी पाठविले ।।५३॥ डॉक्टरचा दुसरा विचार घ्यावा म्हणून । बॉम्बे हॉस्पिटलला गेले घेऊन । तिथे यशस्वी झाले ऑपरेशन । चिंता दूर झाली असे ।।५४।। परि काही दिवसांनंतर तिच्यात । काही विकृती दिसली नजरेत । असंबद्ध बोलतसे ती घरात । फरक जाणवला सर्वांना ॥५५।। तेव्हा परत डॉक्टरला दाखविती । म्हणे मुळीच नाही ही विकृती । थोड्या दिवसांचीच ही स्थिती । पूर्ण बरी होईल ती ।।५६।। ऐसे डॉक्टरांनी केले समाधान । म्हणुनी घरी आले घेऊन । परि विस्मृतीची झाली जाण । स्मृती पुसट होत चालली ॥५७।। डोक्यात पाणी झाले असून । ते या गोळ्यांनी जाईल सुकून । परि तैसे काही न आले घडून । सर्व हवालदिल झाले असे ।।५८॥ घरातील मंडळी गेली घाबरून । डॉक्टरांचे उपाय हरले म्हणून । तेव्हा काकांची झाली आठवण । सन्मित्र होते दामल्यांचे ।।५९।। काका रीडिंग घेऊनी सांगती । काही जप करावे ऐशा रीती । उपासना बायजीची सांगती । सावली प्रार्थनेसहित वाचावी ॥६०।। जैसे सावलीचे सुरू केले वाचन । डॉक्टरांना उपाय सुचला छान । म्हणुनी परत घेतले बोलावून । छोटे ऑपरेशन केले असे ।।६१।। एक नळी काढली डोक्यातून । ती शरीरात दिली सोडून । पाणी जातसे निघून । लघवीद्वारे बाहेर ते ।।६२।। जैसे पाणी जातसे साठत । ते बाहेर पडतसे सतत । सुधारणा झाली असे स्मृतीत । पुष्पा ओळखू लागली ॥६३।। स्वतः काका आले बघावयास । म्हणे सुधारणा होईल सावकाश । ऐशा चिंता गेली विलयास । सावली पावली पुष्पाला ।।६४॥ ऐशा बायजींच्या अद्भुत लीला । सर्व मांगल्याची मंगला । अपरोक्षरीत्या धावते मदतीला । काका जाणती सर्वज्ञपणे ।।६५।। अशोक दामलेनी सांगितली कथा । त्यांच्या पत्नीची पायव्यथा । रस्त्यात पडल्या असता एकदा । दुखणे सुरू झाले असे ॥६६।। पाय घसरून पडल्या रस्त्यात । तेणे हाडाला झाली दुखापत । दुखणे वाढू लागले सतत । चालणे कठीण वाटतसे ।।६७।। चालणे चढणे वाटे कठीण । कंठाशी येती की प्राण । देहात न राहती त्राण । चढउतार करण्याचे ।।६८।। जेव्हा चालण्याचा करणे प्रकार । तेव्हा देव आठवतसे समोर । सहन करणे हा भयंकर प्रकार । जीव घाबरा होतसे ॥६९॥ वजनही वाढल्याकारण । चालणे अधिकच वाटे कठीण । धाप हृदयास लागे म्हणून । दमून जाती सहज त्या ।।७०।। जरा जास्त होता हलनचलन । थकवा वाटल्याची होई जाण । पायही न देती साथ म्हणून । डॉक्टरांना दाखविती ।।७१।। जैसी थकव्याची होई जाण । हृदयविकाराचे असावे कारण । ऐशी शंका होई उत्पन्न । विशेष तज्ज्ञांना दाखविती ।।७२।। विशेषज्ञ तिला तपासती । हृदयरोगच आहे सांगती । तेणे केईएममध्ये करती भरती । एन्जोग्राफी करावया ।।७३।। एकंदर ऐकता हे प्रकरण । घरातील मंडळी गेली घाबरून । काकांकडे जाती दर्शनाकारण । आशीर्वाद त्यांचे घ्यावया ।।७४।। काका स्वकर दर्शन करिती । म्हणे मनात न ठेवावी भीती । अभिषेक करावा शंकरावरती । जानकी उपासना करावी ।।७५।। सावलीचे सुरू केले वाचन । मनोभावे तिज प्रार्थून  । तिज सौभाग्याचे कुंकू लावून । दाखल ऐसे केले असे ।।७६।। जैसे सर्वांगांनी पाहती तपासून । तैसे आश्चर्य आले दिसून । हृदयरोगाचे नव्हते लक्षण । ऑपरेशनचा प्रश्न मिटला असे ॥७७। ती सर्वार्थांनी होती शुद्ध छान । केवळ शंकेने झाली हैराण । भीतीने विकृत होते मन । श्रद्धाभाव तारतसे ।।७८।। भक्तीत नसावी भीती । भक्तीत असावी प्रीती । भक्तीत असावी नीती । अमल भाव मनांतरी ।।७९।। वाटे बायजीची कृपा झाली । शंका भीती पारच उडाली । हळूहळू मीना बरी झाली । कृपेस पात्र झाली असे ।।८०।। कांदिवलीचा सचिन कारखानीस । नोकरीला असतो दुबईस । जानकी आईवरील त्याचा विश्वास । अपूर्व मजला वाटतसे ।।८१।। बायजी आईवरील श्रद्धाभक्ती । नित्य तिजसवे करितो गोष्टी । जे जे घडेल काही दिवसापोटी । सर्व तिजला सांगत असे ॥८२।। नोकरीचा अर्ज केल्यापासून । व्हिसाची येत असे अडचण । पासपोर्टचेही ऐसेच कारण । आईला तो सांगत असे ।।८३।। ऐसे त्याचे वर्ष गेले निघून । काहीच न कळे समोरून । तैसे काकांना केला असे प्रश्न । गणदेवीस जावे सांगती ।।८४।। गणदेवीस गेला दुसरे दिन । माऊलीचे वंदिले श्रीचरण । अडचणींचे करावे निवारण । विनम्र विनंती केली असे ।।८५।। वाटे विनंती त्याची स्वीकारली । अडचणींची चिंता दूर झाली । भराभर अनुमती पत्रे मिळाली । दुबईत शेवटी गेला असे ।।८६।। दुबईच्या मोठ्या कंपनीत । इंजिनीअर म्हणून आहे कार्यरत । शारजामध्ये आहे तो राहत । दुबईला बसने जात असे ॥८७।। एकदा दुबईहून जाता परत । बसचा प्रवास होते करीत । गाडी १३०च्या गतीने होती पळत । अपघात कैसा झाला असे ।।८८।। गाडी धावत असता रस्त्यात । एक पुढील टायर अकस्मात । फाटल्याचे आले लक्षात । वेडीवाकडी धावू लागली ॥८९।। सर्व प्रवासी गेले घाबरून । मृत्यू दिसू लागला समोरून । ड्रायव्हरचा ताबा गेला सुटून । आपटणार तो कोठेतरी ।।९०॥ सचिनच्या आले हे लक्षात । बायजीचा फोटो होता खिशात । हाक मारुनी घेतला हातात । धाव माऊली म्हणुनिया ।।९१।। फोटो ठेवला छातीवरती । आता काही क्षणांचाच सोबती । मारणे तारणे तुझेच हाती । डोळे बंद केले असे ॥९२।। ऐसे झगडत असता ते रस्त्यात । वादळ उत्पन्न झाले अकस्मात । एक टेकडी उभी राहिली वाळवंटात । गाडी घुसून थांबली असे ।।९३।। कैसा चमत्कार घडला रस्त्यात । हे तो माऊलीच आहे जाणत । भीती फिरली असे शांतीत । सुटकेचा श्वास घेतला असे ।।९४|| सचिन पाहे डोळे उघडून । तो गाडी थांबल्याची झाली जाण । अश्रू ओघळले फोटोवरुन । कृपेची जाणं झाली असे ।।९५॥ सर्वांनाच आश्चर्य वाटले मनातून । कैसे टेकडी झाली असे उत्पन्न । कोणा पुण्यात्म्याचे कारण । गंडांतर टळले ऐसे हे ।।९६।। सचिनने फोन केला मुंबईत । अकस्माताची सांगितली हकीकत । कैसे सावलीने सावरले जीवित । आजन्म ऋणी झाला असे ।।९७।। काकांच्याकडे येती अनेक स्त्रिया । आपुल्या वैयक्तिक सांगती समस्या । पतीपत्नीच न राहे प्रेममाया । कलह भांडणे घरातली ।।९८॥ जिकडे तिकडे मातीच्याच चुली । सर्वत्र हीच म्हण सिद्ध झाली । सत्पुरुषासही नाही चुकली । दैवगती ही नशिबाची ।।९९।। ऐशीच एक अनामिका आली । काकासन्मुख निराश बैसली । म्हणे माझी इच्छाच सर्व उडाली। संसारामधून पूर्णपणे ।।१००।। मी प्रेम केले नवऱ्यावरती । मनोराज्ये पाहिली त्याचे संगती । संसार करू उत्तम रीती । एकनाथासारिखा आदर्श ॥१०१।। परि काही वर्षांनंतर । प्रेमाचे भीतीत झाले रूपांतर । संसार झाला असे असार । भ्रमनिरसन झाले असे ॥१०२।। मुलेही तैसीच निघाली । वडिलांचेवरती मात केली । सासू दीर भावजय सगळी । एकाच सूत्रांत ओवलेली ।।१०३।। ज्याचेकरीता आले सर्व सोडून । त्याचे रावणात झाले परिवर्तन । कोणत्या रामास मी जावे शरण । सीतेपरी अभागिनी वाटतसे ॥१०४।। म्हणे जानकीआईस जावे शरण । सावलीचे करावे नित्य वाचन । तीच सर्वांचे करील परिवर्तन । सर्व सुखमय होईल तिच्या कृपे ॥१०५॥ जैसे करू लागली ती वाचन । घरात परीस फिरल्याची झाली जाण । पतिदेव शांत झाले मनातून । रामात रूपांतर झाले असे ।।१०६।। मुलांत दिसले बंधुप्रेम । सर्व कुटुंब झाले आनंदधाम । पत्नीस याहून अनुपम । काय श्रेष्ठ वाटतसे सांगावे? ।।१०७।। म्हणूनी काका सर्वांना सांगती । जानकी सर्वभुतेषु मातृरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै । नमस्तस्यै नमो नमः ॥१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय तेरावा गोड हा। 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]