ChaitanyaGaatha

॥ श्री ॥

॥ अध्याय बारावा ।I 

श्री गणेशाय नमः । ।। श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। जय जयाजी भाऊराया ।अनंत नमने तुमच्या पाया। अपरंपार केली मजवर माया । निर्मळ शुद्ध भावनेने ॥२॥ काही पूर्वजन्मीचे असावे पुण्य । तेणे इहजन्मी भेट आली घडून । मज आपलेपणा देऊन । जवळ घेती प्रेमाने ॥३॥ नित्य भेटीस बोलावती । देव वेतोबाचे आशीर्वाद घेती । तेही कल्याणमस्तु म्हणती । प्रसन्न असती मजवरी ॥४॥ देव वेतोबाचे मानितो आभार । गुरू आणुनी दिला समोर । माझ्या आयुष्याचा केला उद्धार । इहजन्मी भेट घडविली ॥५।। मज घेऊनी जाती आळंदीत । समाधीसन्मुख बैसती ध्यानस्थ । स्वये ज्ञानदेव करिती उपकृत । आशीर्वाद देती आम्हाला ॥६॥ भाऊकाकांच्या प्रेमळ छायेत । माझ्या भक्तीचा अंकूर गेला फुलत । प्रेमजलाने राहिले सिंचीत । आज बहरला वसंतापरी ॥७॥ माझ्याकरवी घेतले लिहून । जानकीआईचे पवित्र जीवन । वाटे पुनश्च आली प्रकटून । सावली ग्रंथातून वावरावया ।।८।। संतचरित्रांचे केले लेखन । त्यात माझे काहीच नसून । फक्त गुरुआज्ञेचे केले पालन । मज कर्तेपणा दिला असे ।।९।। जिने भाऊंच्या पश्चात सांभाळले । त्या गुरुमाऊलीस मी नमिले । तिचे पवित्र चरणी मस्तक टेकिले । स्मृतीने गहिवर दाटला असे ।।१०।। काही सांसारिक येता अडचणी । देव वेतोबास करीतसे विनवणी । तोही निवारीतसे ते तत्क्षणी । आजन्म ऋणी झालो असे ॥११॥ गुरुभक्तीने गुह्यज्ञान । प्रकट झाले असे माऊलीकारण । गुरुमाऊलीची कृपा जाणून । अनन्यशरण मी झालो असे ।।१२।। आज मी जो आहे जीवनात । ते केवळ गुरुकृपेचे आहे फलित । त्यांचा शिरावरी आहे हस्त । अदृश्यरूपे आम्हावरी ।।१३।। गुरुऋण कधीही न फिटती । ते जन्मोजन्मी वाढत जाती । गुरुऋणांत राहणे भाग्य कीर्ती । सम मज ते वाटतसे ।।१४।। जेव्हा भाऊंच्या होतो संगतीत । उभयतांस घेती आलिंगनात । म्हणे तुम्ही माझेच आहात निश्चित । डावे उजवे हात रे ।।१५।। तुमचे सर्वांगी सुखी होईल जीवन । निश्चिंत राहावे स्मरण करून । संतसेवेत घालावे उर्वरित जीवन । सर्व संतात मज पाहावे ॥१६॥ भाऊकाकांचे हे शब्दवचन । मज समजले संत दर्शनामधून । अपरोक्षरीत्या तुमच्याच सेवे कारण । चैतन्यगाथा मी लिहीत असे ॥१७।। कमळे उमलता तळ्यातून । भुंग्यांना न द्यावे लागे आमंत्रण । मकरंद पिण्या येती धावून । संत तैसेची असती बा ।।१८।। तैसे संतांना धुंडाळीत । भक्त येतात ना शोधीत । कुसुमबेन आली तैशाच रीत । पार्लेश्वर मंदिरी शोधत ।।१९।। तिला दहा बारा वर्षांपासून । सफेद कोड उठले अंगावरून । विद्रूप झाले देहदर्शन । स्वतःचीच भीती वाटतसे ।।२०।। जो कोणी पाहे समोरून । तोंड टाकीतसे मुरडून । तिरस्काराचे दर्शवी लक्षण । कुठे भेटले ध्यान हे ।।२१।। लोकांच्या ऐशा मुद्रा पाहून । ओशाळल्यासारखे होई मनातून । आपल्या मुखाचे न व्हावे दर्शन । बाहेर जाण्या भीती वाटतसे ।।२२।। तिच्या मनातली खंतभावना । ती सांगू न शके इतर कुणा । सतत टोचणीची विवंचना । पचवाव्या लागती कुसुमबेनला ।।२३।। तिज दर्पणाचीही वाटे भीती । स्वतःच रागवावे स्वतःवरती । काय देवा माझी ऐशी गती । विद्रूप तुवा केली असे ।।२४।। कोणत्या जन्माचे हे पाप । मज भोगणे आले नशिबात । कैसा क्रूर झालास तू भगवंत । देह नासविला माझा का ।।२५।। मज बाळपणापासून । सुंदर दिलेस देहाकर्षण । मज वाटतसे अभिमान । संसार सुखाचा होता रे ॥२६।। परि या पांढऱ्या कोडाकारण । माझे निरस झाले जीवन । पुन्हा ते बहरणार का म्हणून । ती देवाला सतत प्रार्थीतसे ॥२७॥ डॉक्टरांचे औषध घेऊन । बरेच झाले वर्ष महिने दिन । वैद्यही पाहिले धुंडाळून । काढे घेऊनी कंटाळली असे ।।२८।। विश्वास उडाला औषधावरून । विश्वास उडाला नशिबावरून । आता एकच उरले आशाकिरण । संतकृपा व्हावी मद्भाग्ये ।।२९।। तिने वाचले होते संतचरित्र । तिने वाचले ग्रंथ पवित्र । तिने ऐकिले होते गुरुचरित्र । आप्तमंडळीकडून हो ॥३०॥ शुष्क काष्ठास घालता पाणी । तत्क्षणी बहरला पल्लवी येऊनी । कुष्ठरोग गेला शरीरामधुनी । गुरुचरित्री गोष्ट असे ॥३१॥ गजानन महाराज करिती स्नान । ती चिखल माती करी घेऊन । कुष्ठरोगी करी चिखलस्नान । पूर्ण बरा झाला असे ।।३२।। स्वामी समर्थांच्या ऐकल्या गोष्टी । ऐशा अभाग्याच्या अंगावर थुंकती  । तीच थुंकी  लाविता सर्वांगावरती । स्वच्छ शरीरी झाला असे ॥३३॥ ऐसे अनेक ऐकिले चमत्कार । कुठे गेले ऐसे संत थोर । किती अभागी मी हे प्रभुवर । मज भेटवावा ऐसा कोणी ।।३४।। ऐसे नित्याची करी । विनंती । देव मज भेटो ऐसी विभूती । जी चिंतेतून देईल मुक्ती । कृपा करावी देवराया ।।३५।। ऐशी असता ती चिंतातूर । काकांची कीर्ती आली कानावर । ती दर्शनास धावली सत्वर । भ्रमर झेपावा तैसा रे ।।३६।। देवा मी सर्वांगी होते सुंदर । परि कोड उठले अंगावर । विद्रूप होऊनी झाले पामर । कृपाकटाक्षे न्याहाळावे ॥३७॥ औषधोपचार केले बहुत । परि सर्व झाले विफलित । देवालाही नाही दया येत । कोण रक्षील सांगा हो ।।३८। विद्रूप होऊनी जगणे । हे तो जिवंतपणीचे मरणे । जगणे केवळ केविलवाणे । प्रेम न लाभे कुणाचे ।।३९।। तिची आर्त हाक ऐकून । काकांचेही द्रवले मन । उपाय सांगितला उत्तम छान । सहजशक्य तिजला तो ॥४०॥ एका चांदीचे पात्र घेऊन । ते निर्मळ जलाने घ्यावे भरून । त्यांत तुलसीपत्रे टाकून । सकाळी उन्हात ठेवावे ।।४१।। १०८ वेळा रवीचा मंत्र म्हणून । तुलसीदले जावी खाऊन । थोडे तीर्थ करावे प्राशन । उरलेले अंगास चोळावे ।।४२।। तसेच विभूती दिली मंत्रून । त्याची चिमूट करावी प्राशन । तिलकही करावे विश्वासून । दुसरा उपाय हा असा असे ॥४३।। तिसरा उपायही सांगितला । जावे नरसोबाचे वाडीला । शरण जाऊनी श्री दत्तात्रेयाला । काकांचा निरोप सांगावा ।।४४।। देवा काकांच्या सांगण्यावरून । मी विनम्र होऊनी आले शरण । मज द्यावे स्नानाचे पवित्र जीवन । सर्वांगावर चोळण्यास ।।४५।। आपली कृपा व्हावी मजवरती । माझी पुनश्च व्हावी सुंदर कांती । काकांच्या  सांगण्यावरून करिते विनंती । कृपापात्र घ्यावे करून ॥४६।। या स्नानाचे पवित्र जीवन । पळीभर  टाकावे बादलीमधून । नित्य करावे त्याचे स्नान । सर्वांगावरून आपल्या ॥४७।। ऐशा या उपायामधून । कांतीरंग जातसे पालटून । हळूहळू कांती सुंदर होऊन । कोड पूर्ण बरा झाला असे ॥४८॥ अशी ही करुण कहाणी । पूर्ण आनंदात गेली बदलुनी । काकांची आजन्म झाली ऋण । संत भेटला पूर्वपुण्ये ।।४९।। गोविंद राम दामले म्हणून । एक सज्जन येती पत्नीस  घेऊन । आपल्या नातवाचा सांगती प्रश्न । पंगुत्व घेऊनी आला असे ॥५०॥ म्हणे नातू झाला असे छान । परि एक पाय असून । चिंता उद्भवती मनांतून । भविष्य काय नातवाचे ॥५१॥ जरी डॉक्टर देती आश्वासन । मोठेपणी होईल तो छान । परि भीति वाटतसे मनांतून । पंगुत्व कैसे परिहारेल ।।५२।। तरी बाळाची पत्रिका पाहून । काही सापडेल का कारण । जेणे पंगुत्वाचे होईल हरण । उपाय काही सांगावा ।।५३।। तैसे काका पाहती हस्तदर्पणी । तो विचित्र दिसली कहाणी । म्हणे तुमचीच दिसते कर्मकरणी । माझ्याच या हातावरी ।।५४।। गोष्ट सात-आठ वर्षांपूर्वीची । तुमच्या नातलगाच्या बारशाची । चोरी झाली असे सुवर्ण वाळ्याची । स्पष्ट मज दिसत असे ।।५५।। जेव्हा बाळ दिले तुमचे हातात । सुवर्ण वाळा होता पायात । तो गळून पडला तुमचे हातात । तुम्हीच तो चोरला असे ।।५६।। तुम्ही लपविला तो खिशात । कोणाच्याही न आले लक्षांत । गवगवा झाला असे बहुत । तुम्ही ब्र शब्द न काढला ।।५७।। काकांचे ऐकून हे उद्गार । दोघेही चिडले भयंकर । म्हणे  आम्हास म्हणता चोर । लाज नाही का वाटत ।।५८॥ आम्ही पूर्ण आहोत सज्जन । ऐसे कैसे करू वर्तन । समाजात आहे मानपान । प्रतिष्ठित आहोत आजवरी ।।५९।। परि काका सांगती दटावून । मज दिसते जे दर्पणातून । ती स्वामींची कृपा असून । खोटे कधी न होईल ।।६०॥ जरी तुम्हाला हे मान्य नसेल । तरी माझा न घ्यावा अनमोल वेळ । आपणास जे योग्य वाटेल । ते करावे तुम्ही उभयतांनी ।।६१।। तैसे दोघेही मनांत चपापती । आपल्या अपराधाची देती सन्मती । म्हणे वाळा आहे आमुचे संगती । जपून ठेवला असे जो ।।६२।। आता सापडले असे कारण । तो वाळा त्वरित द्यावा परतून । आप्तांची माफी मागावी विनवून । अपराधाची क्षमा मागावी ।।६३।। म्हणे ऐसे कैसे होईल । आमची बेअब्रू  ना होईल । आप्तजन बोल ठेवतील । अपमानित होऊ आम्ही की ।।६४।। मग सांभाळून ठेवावे सन्मानपण । नातवाचे न हरेल लुळेपण । कोणते महत्त्वाचे असावे कारण । विवेकबुद्धीने करावे ॥६५॥ तैसे शरण जाऊनी धरती चरण । नातवास लाभावे सुदृढ जीवन । आम्ही क्षमा मागुनी होऊ लीन । अहंकार इथेच सोडतो ॥६५।। दामल्यांच्या या कथेवरून । एकच अर्थ घ्यावा समजून । आपलेच कर्मफल येते चालून । सन्मुख आपुल्या पुढती हो ॥६७॥ जैसे जैसे कराल पापपूण्य । ते नशीब होऊनी येते समोरून । म्हणुनी शुद्ध निर्मळ असावे आचरण । जे भक्तिपंथेची लाभतसे ।।६८।। खारचे वाडेकर म्हणून । प्रिंटिंग प्रेसचे मालक असून । एक घेती आधुनिक मशीन । एक कोटी रुपये किंमतीचे ॥६९॥ वाटे धंद्यात व्हावी प्रगती । प्रेसचीही वाढवावी कीर्ती । सुलभ होईल कार्यपद्धती । जनसंपर्कही वाढेल ॥७०॥ जुने मशीन होते चांगले । तरीही नवीन मशीन  घेतले । प्रगत कार्य पद्धतीने सुधारलेले । संशोधित तंत्र योजनेचे ।।७१।। जैसे मशीन लावले  दुकानात । तैशा अडचणी गेल्या उद्भवत । वाडेकरांची प्रकृती न राहे नीट । आजारी पडू लागले ते ।।७२।। कारखान्यात जाऊ न शकती । धंद्याची खुंटली असे प्रगती । सर्व कामे पडून राहती। नवीन मशीन जैसे थे ।।७३।। त्याचे न झाले उद्घाटन । लोकात न झाले प्रदर्शन । एक कोटीचे झाले स्तंभन । खर्च अंगावर पडला असे ।।७४।। तेव्हा मनात शंका डोकावली । या यंत्राची पडता सावली । माझी प्रकृती बिघडत चालली । लाभत नाही वाटतसे ।।७५।। तरी हे लगेच टाकावे विकून । सुटका करुन घ्यावी आजारातून । तेणे प्रयत्न करिती मनापासून । गि-हाईक शोधण्या लागले ।।७६।। परि कोऱ्या करकरीत मशीनला । समोरून न येई घेण्याला । मनस्ताप होऊ लागला । काय करावे कळेची ना ।।७७।। तैसे खाडेकरांच्या पत्नी । काकांच्याकडे येती धावोनी । शंका सांगती उघडोनी । मन मोकळेपणाने काकांना ।।७८॥ काका मशीन घेतले उत्तम छान । आधुनिक विकसित तंत्रज्ञान । घेतले एक कोटी खर्चुन । पडून राहिले जैसे थे ॥७९॥ यांची प्रकृती न राहे चांगली । मनात पाल चुकचुकली । नशिबी नसावी वैभवशाली । वस्तू वापरणे वाटतसे ।।८०।। उगाच खर्च पडतो अंगावर । उत्पन्नाचा नाही कारभार । विकण्याचा करीतसे विचार । परि यश न लाभे आम्हाला ।।८१।। काका विचार करुनी सांगती । काही कर्मकांड सुचविती । त्वरित लाभली असे यशप्राप्ती । मशीन विकले गेले की ।।८२।। पुढे थोडी सुधारता प्रकृती । जुन्या मशीनकडे लक्ष देती । वाटे करावी लागेल दुरुस्ती । चालत नाही म्हणोनिया ।।८३।। सर्व तंत्रज्ञांना बोलावती । ते तपासती ते अनेक रीती । परि कुणा न सापडे कोणती । खामी असावी मशिनांतरी ।।८४।। वेगवेगळे उपाय पाहती शोधून । परि अडकण्याचे न सापडे कारण । धंद्याला खीळ बसली म्हणून । खाडेकर पत्नी येती काकांकडे ।। ८५।। काका पाहती तळहातावर । दृश्य दिसले त्यांचे समोर । मशीनमधला मुख्य रोलर । कुठे अडला असे तो ।।८६।। एक लांब रोलर येती दिसून । तो फिरतो ज्या चक्राचे कारण । तेथे एक कूस अडकले असून । यंत्र तेथेच अडकते ।।८७।। ते न चाले हाले पुढती । सर्व कमांड अडकून पडती। यंत्राचीही ऐशी गती । अन्य कारणाने झाली असे ।।८८।। अजस्र यंत्राच्या कोपऱ्यात । चुरगळलेल्या अवस्थेत । एक कॅलेंडर येते नजरेत । कोणते आहे ते पाहावे ।।८९।। राम लक्ष्मण सीता असून I हनुमान बैसला विनम्र होऊन । ते शोधून काढावे तेथून । सन्मानून फ्रेम करावी ।।९०।। ती केबिनमध्ये लावून । नित्य करावे दीपपूजन । सर्व अडचणी जातील निघून । कार्यसफलता लाभेल ।।९१।। काकांचेच कार्यालयातून । पतीला केला असे फोन । म्हणे, कॅलेंडर पाहावे शोधून । मशीनमागे पडलेले ।।९२।। प्रथम खाडेकर नकार देती । ऐसे असल्याचे नसे स्मृती । परि खात्री करण्या परत पाहती । कॅलेंडर सापडले तेथेच ।।९३।। ते स्वच्छ करून उघडती । तो राम लक्ष्मण मिश्कील हसती । सोनेरी प्रेम करून आणती। ऑफिसमध्ये लावती प्रेमाने ।।९४।। लाकडी कूस निघाले चक्रामधून । मशीन धावू लागले आनंदून । धंद्याची घोडदौड सुरू होऊन । आनंदीआनंद झाला असे ।।९५।। काका कधी न गेले दुकानात । तरीही सर्व दिसले ते नजरेत । गुरुकृपेची किमया प्राप्त । त्यांना झाली असावी वाटतसे ॥९६।। राजन शृंगारपुरे म्हणून । पालघरमधून येती सज्जन । नित्य येती दर्शनाकारण । उत्सवात हजेरी लावती ।।९७।। एकदा त्यांचे मुलाचे पोटात । दुखू लागले असे जोरात । दुखण्याने राही तो तळमळत । रडणे त्याचे थांबेना ।।९८।। त्याचे भयंकर रडणे ऐकून । घरातील मंडळी गेली घाबरून । डॉक्टरकडे नेती तत्क्षण । उपचार व्याधीस करावया ।।९९।। डॉक्टरला न समजले कारण । म्हणुनी एक्सरे पाहती काढून । परि काही न सापडले कारण । दुखणे वाढतच राहिले ।।१००।। तरीही औषधगोळ्या देती । प्रयत्नांची करिती शिकस्ती । परि पोट न थांबे कोण्या रीती । मुलाचे रडणे थांबे ना ॥१०१।। ऐसे चार दिवस गेले होऊन । दुःख थांबण्याचे न दिसे लक्षण । राजन मनात गेले घाबरून । धाव घेती देवस्थानी ।।१०२।। काकांना सांगती सर्व प्रकार । मुलगा रडतसे अती भयंकर । औषधाचे सर्व झाले उपचार । दुःख काही केल्या थांबे ना ।।१०३।। अधीर पित्याचे करुनी सांत्वन । काका उपाय सांगती छान । पाच तुळशीची पाने घेऊन । तीन दिवस द्यावी खाण्यास ।।१०४।। वरी बायजी चरित्राचे करावे वाचन । मुळीच न जावे घाबरून । माऊलीची कृपा होईल बाळावरून । निश्चित रक्षील पुत्राला ।।१०५।। दोन दिवसांनी आला असे फोन । काका सावलीचे वाचन झाले पूर्ण । मुलाची पोटदुखी गेली थांबून । उड्या मारुनी खेळत आहे ।।१०६।। मी काकांच्या होतो देवखोलीत । तेव्हाच काका होते बोलत । मी गोष्ट ऐकली प्रत्यक्षात । शृंगारपुऱ्यांची स्वकर्णी ।।१०७।। ऐसी ही देवदत्तांची महती । भक्त प्रत्यक्षात अनुभव घेती। आपण नम्र व्हावे चरणाप्रती । कृपासावलीत घ्यावे म्हणोनिया ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय बारावा गोड हा। 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]