ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय अकरावा II

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। आता वंदू श्री अवधूतानंद । दाणोलीश्वरांचा आनंदकंद । नामभक्तीत व्हावे धुंद । भक्तिलक्षण सांगती ।।२।। संसारात नामसाधना । उत्तम भक्तीचे लक्षण । प्रभुनामाचे खानपान । सुलभ भक्तिपथ दाखविती ।।३।। नामाने लाभे समाधान । नामाने होई दुःखहरण । नामाने चिंतेचे होई शमन । प्रभुनाम संजीवनी ।।४।। प्रभुनामाचे करिता गायन । सुखसमृद्धी येते चालून । प्रभुनाम हे आनंद घन । सतत वर्षे सुभक्तावरी ।।५।। प्रभुनामाने लाभे भक्ती । प्रभुनामाने लाभे कीर्ती । प्रभुनामाने लाभे शांती । मुक्ती-भुक्तीसहित ती ।।६।। अशक्य शब्द न मिळे नामस्मरणात । सर्वच शक्य होते सुकर्मात । फक्त दृढभक्ती असावी मनात । श्रद्धा-प्रेम गुरूवरी ॥७।। ऐसी नामसाधनेची महती । बाबा सर्वत्र सांगत फिरती । सद्गुरू समर्थ स्वामी समर्थ । मंत्र देती प्रेमाने ।।८।। बाबांचे ऐकून हे प्रवचन । सर्व कृतार्थ होती भक्तजन । नामामृताचे सुलभ साधन । वाटत फिरती गावोगावी ।।९॥ यज्ञयाग करिती वाडीत । अतिरुद्र, महारुद्र करिती अमित । श्रेय वाटती भक्तमंडळीत । सकल भक्तजन हिताय ।।१०।। प्रतिवर्षी करिती वारी । भक्तांचे घरी आणि मंदिरी । भक्तांचे होऊनिया कैवारी ।  मातृहृदये सांभाळती ।।११।। माऊलीनामे चरित्रलेखन । मज करवी घेतले लिहून । साटम सौरभाचे ही महान । कार्य करविले कृपेत घेऊन ।।१२।। जेव्हा राऊळ महाराज भेटती । आपल्या आसनावर बैसविती । स्वये बाबांचे पाय चेपती । प्रत्यक्ष तू दत्तच आहेस म्हणून ।।१३।। अनेक संत देती सन्मान । बाबांना मानती दत्तात्रय म्हणून । भक्तांना सांगती निक्षून । चरण बिसंबू नका क्षणभरी ।।१४।। इथेच लाभेल अमृत जीवन । इथेच मिळेल आजन्म कल्याण । म्हणुनी मी ही घेतले आशीर्वचन । चैतन्यगाथेस माझ्या या ।।१५।। कथा एका इस्त्रायली बाईची । तिला आलेल्या अनुभवाची । तिच्या भारतातल्या वास्तव्याची । पेणकर कुटुंबात आल्याने ।।१६।। ओरियन पेणकर म्हणून । इस्रायलला गेले नोकरीकारण । आयरनच्या प्रेमात पडून । विवाहबद्ध झाले असे ।।१७।। भारतातल्या ऐकून कथा । तिला अधिकच वाटे उत्सुकता । येथील चालीरीती वा प्रथा । आश्चर्यकारक वाटतसे ।।१८॥ ऐशा उत्सुकतेचे पोटी । भारतात येण्याचे प्रयत्न करिती । सात वर्षाने झाली इच्छापूर्ती । पेणला आले राहावया ।।१९।। परि सासरकडील स्थिती । साधारणच होती परिस्थिती । तेणे ओरियनची गृहस्थी । हलाकीची थोडी जात असे ।।२०।। त्यात मुली होत्या दोन । कामधंदा न चाले छान । दोन टोकांचे मीलन । करणे कठीण जात असे ।।२१।। पैसा आणला जो परदेशातून । हळूहळू गेला तो संपून । घराचे हप्ते थकले म्हणून । लिलाव नोटीस लागली असे ।।२२।। सांसारिक परिस्थिती झाली क्षीण । दोनवेळचे महागले जेवण । मुलाबाळांची आबाळ होऊन । चिंता चितेत जळती ते ।।२३।। ऐशा दारुण परिस्थितीत । ते देवाला होते आळवीत । तोची । रिंकू नाईक आली धावत । जणू देवानेच तिज पाठविले ।।२४।। ती काकांचेकडे जाई घेऊन ।। परिस्थितीचे करिती वर्णन । सांगताना येती डोळे भरून । आयरन पेणकरांचे तेधवा ।।२५॥ शांतपणे केली विचारपूस । म्हणे ईश्वरावर ठेवावा विश्वास । तोची यातून सोडवील खास । प्रार्थना मनोभावे करावी ।।२६।। तुमच्या भाषेतील म्हणावे श्लोक । मनातला झटकून टाका शोक । मी सांगतो ते नीट ऐक । विश्वासात घेतले आयरनला ।।२७।। देवाला न द्यावा दोष । दोष असतो आपुल्या दैवात । दैव असते आपुल्या हातात । प्रार्थना धावते सहाय्याला ।।२८।। तिज वडिलांची झाली आठवण । वाटे वडीलच बोलती समोरून । मायेचे घातले पांघरुण । हळुवार प्रेमळपणे समजावुनी ।।२९।। तिज आधार विश्वास वाटला । जीवन जगण्याचा अर्थ लाभला । आत्मविश्वासही वाढला । काकांच्या वरती तिचा हो ॥३०।। काकांनी सांगितले जे करावयास । ते सर्वच केले ठेवुनी विश्वास । आणि परिस स्पर्शावा लोहास । तैसे चक्र फिरले असे ।।३१।। ओरियनचा वाढला आत्मविश्वास । जोरात सुरू केला व्यवसाय । ऑफिसही मिळाले जवळपास । धंद्यास जम बसला असे ।।३२॥ गेलेले सर्व मिळाले परत । घरही आले असे ताब्यात । दुर्दैव फिरले असे सुदैवात । गाडीही घेतली असे छान ॥३३।। परि हा चमत्कार आला घडून । केवळ काकांचे मार्गदर्शन । वाटे परमेश्वर भेटला समोरून । श्रद्धाभक्ती दृढावली ।।३४।। बायजी आईचा फोटो देऊन । म्हणे नित्य घ्यावे हिचे दर्शन । जय जानकी दुर्गेश्वरी म्हणून । नित्य स्मरण करावे प्रेमाने ।।३५।। आईचा हा फोटो पाहून । तिज इस्त्रायली देवतेचे होई स्मरण । वाटे तीच जानकीरूप घेऊन । मज रक्षावया आली असे ।।३६।। एकदा मित्र पाटीलांचे बरोबर । कणकवलीच्या मार्गावर । केशरी घाटाच्या वळणावर । ओरियन जाती कामाला ॥३७।। परि अचानक काय घडले । गाडीसह सर्व दरीत पडले । अठरा ते वीस फूट उंचावरूनी पडले । गाडीचा चुराडा झाला असे ।।३८।। परि सर्वच जिवंत राहिले । कुणालाही नाही खरचटले । सर्व सुखरूप वरती आले । रक्षिले कोणी कळे ना ।।३९।। सावध होऊनी पाहती सन्मुख । आईचा फोटो होता फक्त हसत । तत्क्षणी आले लक्षात । अन्य न कोणी दुजे असे ।।४०।। तिची पाहुनी निर्मळ भक्ती । आई प्रसन्न होती आयरनवरती । काकाही लाभले वडिलाप्रती । इस्रायली कन्येस आमुच्या ।।४१।। पंकज जैन म्हणून । संसारात गांजलेले सज्जन । घसरतही चालले व्यवसायातून । संकटे झेलती शिरावरती ।।४२॥ संकटांना सामोरे जावून । निराशेने भरले त्यांचे जीवन । कोणी सहाय्यास न ये म्हणून । त्रागा स्वतःवर करती ॥४३॥ विशेष कोणी नव्हते आप्तजन । तसेच नव्हता कोणी मित्रगण । मदतीस कोणी यावे म्हणून । तेही त्याला कोणी नसे ॥४४।। जो जो भेटेल ज्योतिषी म्हणून । त्यास पत्रिका दाखविती उघडून । परि लालूच दाखविती सर्वजन । मिथ्या सर्व गेले असे ॥४५॥ केवळ भविष्य घेण्याजाणून । अडीच लाख टाकले होते खर्चुन । ते अक्कलखाती जमा होऊन । कफल्लक झाला बिचारा ।।४६।। ज्योतिष्याचे नाव नका काढू  म्हणून । तो मित्राला सांगे संतापून । पैसे उकळविण्याचा धंदा काढून । लाचार लोकांना  फसविती ।।४७।। तरीही संजय थत्ते म्हणून । त्याला सांगे शांत करून । काका त्यातले नसती जाण । प्रत्यक्ष तुवा बघावे ।।४८।। संजय पंकजला गेला घेऊन । भेट हॉटेलात आली घडून । काकांनी सर्व घेतले ऐकून । शांतपणे दुर्दैवी कहाणी ॥४९।। म्हणे कुलदेवीचे करावे स्मरण । मजकडे पाहावे लक्ष देऊन । काकांनी त्याचे रिडिंग घेऊन । भविष्य उकलून दाखविले ।।५०।। त्यांनी भोगलेले सर्व जीवन । काकांनी सांगितले वर्णन करून । अजूनही भोग न गेले संपून । स्पष्टपणे सांगितले असे ।।५१।। भोग घेऊन येतो संचित म्हणून । ते भोगल्यावाचून न कोण । सांग सुटला असे जगतातून । संतदेवही गुरफटती ।।५२॥ तिथे मनुष्याची काय गती । इथे तर सर्व पामरांची वसती । ठेविले अनंते ऐसी ठेवावी सन्मती । श्रद्धासबुरी बाळगावी ।।५३।। जरी काकांनी केले समाधान । तरी पटले नसे मनातून । काही महिने वाट पाहून । पुनश्च त्यांना भेटले असे ।।५४।। जेव्हा जेव्हा भेटे समोरून । त्याचा एकच राहे हाच प्रश्न । कधी येतील चांगले दिन । टुमणे सारखे लावतसे ।।५५।। त्याचे सारखे टुमणे ऐकून । काका थोडे बोलती रागावून । मी समोरून तुला सांगीन । तगादा ऐसा लावू नये ।।५६।। परि काकांचे वरती रागावून । तो मुंबई गेला सोडून । काही महिन्यांनी आला परतून । आशेने फोन केला असे ॥५७।। तेव्हा काका सांगती समोरून । पंकज चांगली वेळ आली असून । मज आजच भेटावे येऊन । दुपारी रिकामा असेन मी ।।५८।। उभयता जाती आरे कॉलनीत । बाकावर बसती ते शांत । काका थोडे बसती ध्यानस्थ । पुढे सांगू लागले ॥५९।। १८ ऑक्टोबर २००१ पासून । तुमची घोडदौड सुरू होऊन । मागे पाहण्या परतून । वेळच मिळणार नाही तुला रे ।।६०।। सीएनजी युनिट बसविण्याकरीता । त्याच्या दुकानात होती व्यवस्था । परि पगार आणि भाडेसुद्धा । भरणे कठीण झाले होते ।।६१।। परि काकांच्या वचनाची आली प्रचिती। हायकोर्टाची मिळाली माहिती। सीएनजी बसविण्याची केली सक्ती । सर्वच रिक्षाटॅक्सीवाल्यांना ।।६२।। काकांना फोन केला आनंदून । अरे सुवर्णाचे आले दिन । आता मागे न पाहावे परतून । कदम कदम बढाये जा ।।६३।। काकांची ही भविष्यवाणी । पंकजला वाटली अमृतपर्वणी । विश्वासुनी राहता गुरुवचनी । अक्षय आशीर्वाद लाभतसे ।।६४।। इंद्रा पाडलिया चितोडगडचा । पंकजचा मित्र होता सच्चा । तेणे काकांच्याही परिचयाचा । सहज झाला असे तो ॥६५।। आरे कॉलनीच्या मंदिरात । त्यांची झाली असे भेट । तेव्हा इंद्राने अडचणीबाबत । सहज प्रश्न विचारला असे ॥६६।। म्हणे प्रत्येक कामात येती अडचणी । सुलभ न होई एकही म्हणुनी । प्रयत्नाची करिता शिकस्त म्हणून । किंचित यश लाभतसे ॥६७।। काका सांगती रिडिंग घेऊनी । तुमच्या तीन पिढ्या पूर्वीपासोनी । ऐशा कार्यात येतात अडचणी । पणजोबा कारण असती रे ।।६८।। तुमच्या पणजोबाकडून । घासीलालचा झाला अपमान । त्याची जमीन हडप करून । हकलून दिले असे त्याला ॥६९।। त्याने शाप दिला आक्रोशोनी । तळतळाट घेतला ओढोनी । तेणे उद्ध्वस्त वस्त झाली तुमची घराणी । पापशाप भोगता हे ।।७०।। जोवरी न होईल शापविमोचन । तोवरी नाही सुंदर । जीवन । फक्त शापाचे बळी होऊन । जगणे असे तुम्हाला ॥७१॥ तेव्हा इंद्राने धरिले पाय । काका सांगा सांगा उपाय । तीन पिढ्यांचा हा शापपाश । कैसा सुटेल माझ्याने ॥७२॥ मज या शापाची नाही माहिती । आजवरी कुणा न झाली स्मृती । कोण, कुठे कशी असावी व्यक्ती । कैसी जाण होईल ॥७३।। गावातल्या घराशेजारी । जैन मंदिराचे वळणारी । घासीलाल राहतसे शेजारी । तपास पाहावा करून ।।७४॥ त्याच्या वंशातील शोधून । व्यक्ती आणावी सन्मानून । त्याची क्षमायाचना करून । आदरातिथ्य करावे ॥७५।। घासीलालचा आत्मा होईल संतुष्ट । तुमचे दोष होतील रे नष्ट । तुमचे साध्य होईल उद्दिष्ट । चांगले दिवस येतील पुन्हा ।।७६।। परि तीन पिढ्यांपूर्वीची । हकीकत कोणाला विचारायची । कुणाला स्मृती असेल का गोष्टीची । आकलन काही होत नसे ।।७७।। नातेवाईकांना पाहे विचारून । परि सर्वांचा नकार जाणून । चुलतभावालाही पाहे विचारून । तेथे दुजोरा मिळाला असे ।।७८।। म्हणे मज निश्चित आहे माहिती । अशी घटना घडली होती । नावगाव कोण व्यक्ती । सविस्तर माहिती दिली असे ॥७९॥ त्याला आश्चर्य वाटले मनातून । कैसे काकांना आले सर्व कळून । ज्याची तीन पिढ्यांना नव्हती जाण । अशक्य ज्योतिष्यांनाही जे ॥८०॥ त्याचा आत्मा झाला संतुष्ट । आशीर्वाद लाभले उत्कृष्ट । तीन पिढ्यांचे संपले कष्ट । वेगळे सांगणे न लगे ।।८१॥ अल्ताफ कोणकर म्हणून । एक लांजेचा होता यवन । अल्लाचा नित्य नमाजी म्हणून । भक्त ओळखला जात असे ॥८२।। जितकी निष्ठा होती अल्लावरती । तितकीच निष्ठा होती काकांचेवरती । काकांना विचारतसे प्रत्येक गोष्टी । करण्यापूर्वी निष्ठेने जो ।।८३।। काकांचे मार्गदर्शनाखाली । त्याची चालतसे जीवनशैली । काकाही विचारती ख्यालीखुशाली । जेव्हा जेव्हा भेटे समक्ष ।।८४।। एकदा त्याच्या पत्नी रेश्माला । सहावा महिना असे लागला । म्हणुनी गेली तपासावयाला । डॉक्टरकडे सहज ती ॥८५।। तपासाअंती आले कळून । काही गडबड असावी पोटातून । तेणे सोनोग्राफी घ्यावी करून । डॉक्टर सांगती रेश्माला ।।८६।। सोनोग्राफीत आले दिसून । बाळ पूर्णपणे उलटले असून । सुलभ न होईल बाळंतपण । शस्त्रक्रिया अटळ आहे की ।।८७।। ऐसे सांगता ते कारण । अल्ताफ गेला असे घाबरून । सांगता झाला पाय धरून । संकट कैसे निवारेल ।।८८।। काका सांगती न जावे घाबरून । मी उपाय सांगतो एक छान । परि तुला वाटेल तो कठीण । करणे होईल का ते सांगावे ।।८९।। तुम्ही जो उपाय सांगाल । तो माझ्या अल्लाचा असेल बोल । तोची सत्य मार्ग असेल । मनोमनी मी जाणत असे ।।९०।। तरी उपायाचे करावे कथन । त्याचे विश्वासाने करीन पालन । माझे अधीर झाले असे मन । पत्नीस निर्भयता लाभावी ॥९१॥ उद्याच सकाळपासून । शिवमंदिरात जावे पाणी घेऊन । ॐ नमः शिवाय मंत्र म्हणून । शिवलिंगावर अभिषेक करावा ॥९२॥ जोपर्यंत पत्नी होईल प्रसूत । | तोपर्यंत आचरावे हे व्रत । एकही दिवसाचा न पडावा खंड । अभिषेक या देवाचा ।।९३।। अभिषेक  करावा बारापर्यंत । मनात नव्हते चिंतीत । रेश्मा सुरक्षित होईल प्रसूत । देवावर विश्वास  ठेवावा ।।९४॥ काकांनी लोटा आणला भरून । स्वतः गेले मंदिरातून । मंत्र घेतला असे वदवून । अभिषेक शिकवला स्वहस्ते ।।९५।। पुढे आठव्या महिन्यात । पत्नी गेली तपासण्याकारण । म्हणे सोनोग्राफी घ्यावी करून । डॉक्टर सांगती रेश्माला ।।९६।। सोनोग्राफीत आले दिसून । बाळ पूर्ण  सुलटे झाले असून । शस्त्रक्रियेचे न उरले कारण । सुलभ प्रसूती शक्य असे ॥९७।। डॉक्टरांचा हा निर्णय ऐकून । पतीपत्नी गेले आनंदून । डॉक्टरही चकित होऊन । सांगते झाले कोणकरांना ।।९८।। काका अल्लाकडे गेला धावत । बाळ जाहलेसे सुरक्षित । शिवकृपा झालीसे प्राप्त । केवळ काकांच्या मार्गदर्शने ।।९९॥ आता अभिषेक देऊ का सोडून । काकांना विचारता झाला प्रश्न । तैसे काका बोलती रागावून । स्मरत नाही का सांगितलेले ।।१००।। जोवरी रेश्मा न होईल प्रसूत । तोवरी आचरावे हे व्रत । मध्येच सोडणे नाही प्रस्तुत । लक्षात ठेव हे चांगले ।।१०१।। काका मज जाणे बाहेर गावात । कामधंद्याचे कामानिमित्त । तेथे कैसे आचरावे हे व्रत । खंड पडेलना माझा हो ।।१०२।। एक पाण्याची बाटली घ्यावी बरोबर । जेव्हा जाशील तू प्रवासावर । वाटेत दिसेल जे शिवमंदिर । अभिषेक करावा उतरोनी ।।१०३।। तेणे खंड न पडेल रे कर्मात । बाळंतपण होईल सुरक्षित । शिवकृपाही लाभेल सतत । तुमच्या सर्व कुटुंबांवर । पुढे तैसेची केले आचरण । काकांचे शब्दांवर विश्वासून । नवव्या महिन्यात झाले बाळंतपण । गोंडस कन्येला जन्म दिला ॥१०५।। ऐसा हा अल्ताफ भक्त यवन । जो काकांना मानी अल्लासमान । चरणी अर्पियले सर्व जीवन । वचनाबाहेर जाई ना ।।१०६।। ऐसी असावी गुरुभक्ती । जिला जातपातीची नसावी भीती । फक्त असावी प्रेमभक्ती । निर्मळ सात्विक अंतरी ।।१०७।। गुरू भावभक्तीचा भुकेला । त्याला मोहचा न लागे वशिला । भाव तेथेची तो धावला । भक्तवत्सल ब्रीद रक्षावया ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय अकरावा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]