ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय दहावा ॥ 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ आता नमन श्री गुळवणी महाराजांना । काकांच्या श्रीसमर्थ सद्गुरूंना । अनंत नमने या श्रीचरणा । विनम्र भावे करीतसे ।।२।। मीही किती भाग्यवान । मज त्यांचे घडले दर्शन । चरणसेवाही घडली हातून । जवळ बसविले प्रेमाने ।।३।। एकदा वासुदेव निवासात । उभय गेलो दर्शनार्थ । स्वामी एकटेच होते खोलीत । सत्संग लाभ झाला असे ।।४।। त्यांचे पायाजवळ बसून । चरणसेवा केली आनंदून । त्यांनीही स्वीकारली मनापासून । आशीर्वाद दिधला प्रेमाने ।।५।। गुरुसेवा घडेल हातून । प्रपंचही होईल छान । दत्तकृपा लाभेल परिपूर्ण । जीवन सेवेत घालवावे ॥६।। तेव्हा पासुनी माझ्या मनात । उत्सुकता जागली सतत । महाराजांचे वाचावे जीवनवृत्त । परमार्थ पथ जाणावया ।।७।। एकदा वासुदेवानंद सरस्वती । वाडीस असता त्यांची वसती । श्लोकबद्ध हाराची करुनी निर्मिती । गळ्यात घातला प्रेमाने ।।८।। वामनरावाची भक्ती पाहून । महाराजांनीही प्रसन्न होऊन । मंत्रसिद्ध प्रसाद पेटी करून । हाती बांधण्यास दिली असे ।।९।। ऐसे गुरुशिष्याचे जडले नाते । भक्तिप्रेमरसाला आले भरते । आसन, प्राणायाम, यौगिकासने । अजपाजपही शिकविला ।।१०।। महाराज झाले परिपूर्ण । सरस्वतींच्या आशीर्वादाकारण । पुढे लोकनाथतीर्थाचे झाले दर्शन । शक्तिपात दीक्षा लाभली असे ।।११।। महाराजांची जाणुनी योग्यता । लोकनाथांनी दिली विशेष सत्ता । शक्तिपात करावा इच्छुक भक्ता । अधिकार त्यांना दिला असे ।।१२।। फायदा घेतला असंख्य भक्तांनी । जागृत करुनिया कुंडलिनी । उन्नत भक्तीचा लाभ घेउनी । परमार्थ प्रगती केली असे ।।१३।। महाराजांना घडले जे दत्तदर्शन । ते चित्रीत केले उत्तम छान । अमर चित्रकलेचे प्रदर्शन । दत्तभक्तांना वाटतसे ।।१४।। महाराजांचे शिष्य झाले बहुत । त्यात विशेष मज वाटे देवदत्त । त्यांचे लिहावया चरित्रामृत । आशीर्वाद पदपंकजी मागतसे ।।१५।। सौ. रंजना गुप्ते यांनी । पतीची सांगितली कहाणी । हृदयविकाराच्या झटक्याने । आजारी पडले तेव्हाची ।।१६।। जैसे दुखू लागले छातीत । तैसे दाखल करिती दवाखान्यात । परि दुसराही आला त्वरित । स्थिती गंभीर झाली असे ।।१७।। सर्वच डॉक्टर होते घरांत । ते सर्व धावले सहाय्यार्थ । लीलावतीच्या दवाखान्यात । तातडीने आणले सर्वांनी ।।१८।। अतिदक्षता विभागांत ठेवले । सर्व प्रयोगही सुरू झाले । अँजिओग्राफी करण्याचे ठरले । ऑपरेशन त्यानंतर ।।१९।। दोन ब्लॉक आहेत म्हणून । डॉक्टर सांगती ते पाहून । तेणे भीतीने गेल्या गांगरून । रंजनाताई मनोमनी ।।२०।। त्यांचा मित्र प्रेमरजपूत । त्याला फोन केला रात्रीत । मी आहे अत्यंत चिंतीत । काय करू सांगावे ।।२१।। त्याने काकांचा दिला नंबर । म्हणे हकीकत सांगावी लौकर । उपाय सांगतील ते बरोबर । आशीर्वाद घ्यावा त्यांचाही ।।२२।। परि काका होते अपरिचित कैसे उठवावे त्यांना रात्रीत । प्रसंग तसाच होता चिंतीत । धाडस केले  रंजनाने ।।२३।। काका मी रंजना म्हणून । गंभीर प्रसंगाचे केले वर्णन । परि अपरात्री त्रास दिला म्हणून । क्षमा मागते आपुली ।।२४।। कुलस्वामिनीला श्रीफळ ठेवावा । बायजी आईचा फोटो मागुन घ्यावा । एक  रूग्णाच्या उषाखाली ठेवावा । बाकी मी सर्व पाहीन ॥२५।। जैसा दिवस झाला निच्छित । तैसे काकांना कळविले वृत्त । म्हणे ‘सावली’ वाचावी सतत । ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत ।।२६।। ब्लॉक दोन नसून आहेत तीन । परि तुम्ही न जावे भिऊन । सर्व सुरक्षित होईल छान । चिंता मुळीच करू नये ।।२७॥ जोगळेकर गुरुजींचा आला फोन । की काकांचे सांगण्यावरून । केतू व दुर्गेचा जप चालू करून । आताच मी बसलो असे ।।२८।। या सर्व गोष्टीचे वाटले समाधान । काका कैसे प्रसंगी आले धावून । नाही ओळख वा आप्तजन । परपीडा हरण करण्यास ।।२९।। पुढे झाले यशस्वी ऑपरेशन । एकच टक्का होता आशेचा किरण । ऑपरेशन होते महाकठीण । डॉक्टर सांगती स्वमुखे ।।३०।। परि काका होते पाठीशी । तेणे ऑपरेशन झाले यशस्वी । भिऊ नको मी आहे पाठीशी । संतवचन सार्थ झाले ।।३१।। संत कळवळ्याची जात । याची प्रचिती लाभली साक्षात । संत न पाहती समय-जात । सुखकर्ता दुःखहर्ता होती स्वये ।।३२।। मोहन साप्ते म्हणून । काकांचेकडे आले सज्जन । नोकरीचा राजीनामा देऊन । कुवेतहून आले मुंबईत ॥३३।। काही आप्तमंडळींनी । काकांची सांगितली कहाणी । वाटे पाहूया विचारूनी । पुढे काय करावे ते ॥३४।। एका छोट्या दुकानात । काही मंडळी होती रांगेत । चौकशीअंती कळले वृत्त । देवदत्त महाराज आहेत ते ॥३५।। तैसे मोहन शिरला आत । साधारण व्यक्ती दिसली दृष्टीत । संतसाधुपरी नाही ते दिसत । खट्टू  झाले मनात ॥३६।। आलोच आहोत म्हणून । सहज पाहावे विचारून । तैसे तेच विचारती कोण कोठून । येणे झाले सांगावे ।।३७।। कुवेतला होतो वर्षे दोन । नोकरीचा राजीनामा देऊन । मुंबईत आलो सर्व सोडून । पुढे काय करावे मी ।।३८।। अरे एकाच महिनाभरात । तू पुन्हा गाठशील कुवेत । तिथेच तुझे जाणे आहे निश्चित । चिंता कशाला करतोस ।।३९।। हे मुळीच न पटले मोहनला । एकदा का व्हिसा रद्द केला । की सहा महिने लागती प्रवेशाला । कायदा कडक त्यांचा असे ।।४०।। परि आश्चर्य आले घडून । तीनच आठवड्यांत गेला परतून । काकांचे पायी विश्वास बसून । संपर्कात तेथुनी राहत असे ॥४१।। एकदा त्यांचे पत्नीचे पाठीत । दुखू लागले अकस्मात । घरगुती उपाय राहिले करीत । परि फरक काही पडेना ।।४२।। हाडाच्या डॉक्टरला दाखविती । दोन महिने उपचार करिती । परि अधिकच वाढे दुःखगती । न्यूरो सर्जनला दाखविले ।।४३।। बोन ट्युमर असे सांगती । त्याचे वेगळेच प्रकार असती । । सर्व कळेल तपासाअंती । लाखांत एकालाच होत असे ॥४४॥ या सर्व परिस्थितीत पत्नीला । व्हीलचेअरचा आधार लागला । अपंग झालेल्या अपर्णाला । पाहून जीव घाबरला ॥४५।। संशोधनाला लागतील पंधरा दिन । तेणे दवाखान्यांत ठेवली म्हणून । भयभीत झाले मोहन मन ।काकांची स्मृती झाली असे ।।४६।। तैसी काकांच्याकडे घेतली धाव । देवा काहीतरी सुचवावा उपाय । परदेशात लागेल का निभाव । कृपया मार्गदर्शन करावे ॥४७।। तैसे काका सांगती मोहन । प्रथम वास्तू टाकावी बदलून । अपर्णाबद्दल मी पाहून । दोन दिवसांनी कळवीन ।।४८।। दोन दिवसांनतर संपर्क साधून । काकांना विचारी हा मोहन । उपाय सांगती उत्तम छान । सहज करणे शक्य असे ॥४९।। सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत । रोज घ्यावे नियमित । पपईची एक काप खाण्यात । अकरा दिवसपर्यंत ।।५०।। पपई रोज आणावी नवीन । डॉक्टरी उपाय न द्यावा सोडून । हळूहळू पाय मोकळे होऊन । चालू लागेल रे अपर्णा ।।५१।। दहा दिवस होती दवाखान्यात । परि शक्ती न आली पायांत । जैसी पपई आली खाण्यात । थोडी शक्ती वाटू लागली ।।५२।। शस्त्रक्रियेची ठरली तारीख । तेही दहा दिवसांचे आत । काकांनी सांगितले होते स्पष्ट । अकरा दिवस पूर्ण करावे ।।५३।। मोहनची झाली पंचाईत । डॉक्टर तारीख नव्हते बदलत । अकराही दिवस नव्हते होत । अडकित्त्यात सुपारी झाली असे ।।५४।। शेवटी बायजी काकांना जाती शरण । आता तुम्हीच घ्यावे सांभाळून । तैसे अपर्णाला ताप आला सणसणून । शस्त्रक्रिया लांबली आपोआप ॥५५।। अकरा दिवस झाले पपई खाऊन । आखडलेले पाय गेले सुटून । अल्पशी शस्त्रक्रिया करुन । अपर्णा पूर्ण बरी झाली असे ॥५६॥ डॉक्टर स्वतः सांगती येऊन । तुम्ही भाग्यवान आहात म्हणून । केवळ ईश्वराची कृपा म्हणून । तुमची पत्नी वाचली असे ॥५७।। त्यांचे हे वाक्य ऐकून । मोहन गहिवरला  मनातून । मनोमनी उभयतांना गेला शरण । अनन्यभक्तीभावाने ।।५८।। पुढे सहकुटुंब आला मुंबईत । तसाच धावला दर्शनार्थ । प्रत्यक्षात घातले दंडवत । शरणांगत तो तारणहार म्हणुनी ।।५९।। अशीही काकांची महती । नव्हे अशा या संतांच्या जाती । जोवरी वावरती या । धरती । तोवरी नाही भीती हेची सत्य ।।६०॥ चैतन्य नातू देशमुख यांचा । होता फक्त दहा वर्षांचा । विद्यार्थी इंदापूर शाळेचा । खेळत होता शाळेत । पटांगणात असता खेळत ।।६१।। ठेच लागुनी पडला जोरात । पोटात दुखू लागले अकस्मात । कळवळुनी तो रडत असे ।।६२।। तैसे कळविले त्याचे घरी । रमेश धावत आले विद्यामंदिरी । त्वरित नेले डॉक्टरांचे घरी । तपासती ते चैतन्यला ॥६३।। परि त्याचे रडणे ऐकून । कुटुंब डॉक्टर गेले घाबरून । मोठ्या दवाखान्यात जावे घेऊन । उपचार इथे न होईल ।।६४।। माणगावच्या दवाखान्यात नेले । निष्णांत डॉक्टरनी तपासले । म्हणे किडनीचे कार्य थांबले । शहरात न्यावे लागेल ।।६५।। तैसे पुण्यास जाती घेऊन । दीनानाथ दवाखान्यात म्हणून । तिथे सर्व परीक्षण सुरू होऊन । कार्य सुरू केले असे ॥६६।। एकही जखम नव्हती शरीरावरती । खरचटल्याचीही खूण नव्हती । तेणे सोनोग्राफी करून पाहती। किडनी ढुंभगलेली दिसली असे ॥६७।। किडनी काढावी लागेल म्हणून । डॉक्टरांनी सांगितले येऊन । मोठी शस्त्रक्रिया होईल म्हणून । रक्त मिळवावे लागेल ॥६८।। डॉक्टरचे हे शब्द ऐकून । भीतीचा गोळा उठला पोटातून । एका किडनीवर काढावे जीवन । कल्पना असह्य वाटत असे ॥६९।। रक्ताची धार नव्हती थांबत । थंडीने शरीर होते थरथरत । दातावर दात होते आपटत । सणसणून ताप भरला असे ॥७०।। वडिलांची स्थिती झाली बिकट । रक्त कैसे मिळवावे उत्कृष्ट । कैसे पोरावर ओढवले संकट । पुढे भविष्य काय चैतन्याचे ।।७१।। डॉक्टरांनी त्याचं बंद केले अन्नपाणी । सलाईनवर ठेवले रात्रंदिनी । लघवीचे वेळा कळा येऊनी । किंचाळुनी तो ओरडत असे ।।७२।। बाबा काकांना बोलवा म्हणून । मला बरे करा यावे धावून । त्याच्या जिवाची तडफड पाहून । काकांना फोन केला असे ।।७३।। त्याचे भाग्य चांगले म्हणून । काका मुंबईत होते ते दिन । चैतन्याची हाक ऐकून । पुण्यात धावत आले ते ।।७४।। चैतन्य होता दक्षता विभागात । काकांनी त्याला घेतले कवेत । प्रेमाने कुरवाळले लाडात । हात फिरविला सर्वांगावर ।।७५।। चैतन्याला वाटले समाधान । ठणका थोडा गेला थांबून । म्हणे किडनी चेपली गेली असून । शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही ।।७६।। जरी उशीर लागला तरी । औषधाने होईल ती बरी । काळजी न करावी मनांतरी । दिलासा देऊन गेले असे ।।७७।। ठणका थोडा कमी होऊन । त्या रात्री झोपला तो छान । परि रक्त वाहे किडनीतून । कमी न झाले तरीही ।।७८।। त्या दिवशी डॉक्टरांची परिषद । पुण्यात होती आयोजित । त्यात चैतन्याची हकीकत । विचारार्थी ठेवली असे ।।७९।। सारासार विचार करून । निर्णयावर आले सर्वजण । कॅथेटर नळी आत बसवून । लघवी मार्ग मोकळा करावा ।।८०।। तेणे रक्त जाणे थांबेल । कळाही कमी होतील । शस्त्रक्रियेची न येईल वेळ । उपाय सुलभ केला असे ।।८१।। परि यश न आले  प्रयोगाला । रक्तप्रवाह चालूच राहिला । तैसे वडिलांचा धीर सुटला । काकांना फोन केला असे ।।८२।। | गावात कोण आहे म्हणून । काकांनी विचारला त्याला प्रश्न । आजोबा घरी आहेत म्हणुन । सांगितले असे वडिलांनी ।।८३।। तैसे चैतन्याचे आजोबाला । काकांनी लगेच फोन लावला । बरोबर दुपारी बाराचे वेळेला । मी सांगतो ते करावे ॥८४।। ज्या जागेवरती चैतन्य पडला । एक झाड आहे त्याचे बाजूला । त्या बाधित जागेत तोच पडला । पछाडला असे कोणीतरी ।।८५।। तिथे मी सांगतो ते साहित्य । त्या जागेवर ठेवावे त्वरित । वेळही न दवडावा किंचित । तैसे त्यांनी केले असे ।।८६।। डॉक्टर प्रत्येक तासाला येऊन । प्रगती जाती तपासून । परि रक्त न थांबे जराही । चिंतीत झाले तेही ।।८७।। सर्वच प्रयत्न फसले  म्हणुन । डॉक्टरही गेले कंटाळून । औषध द्यावे कोणते म्हणून । विचार विवंचना करिती ते ॥८८।। त्यांच्या मनातला गोंधळ जाणून । समीरने पृच्छा केली परतून । तेव्हा सांगती दुखऱ्या जागेवरून । स्पिरीट बोळा फिरवावा ॥८९।। तैसे डॉक्टरांची परवानगी मागती । म्हणे कोण आहे ती व्यक्ती । परि बोळा फिरविण्याची संमती देती । आनंद झाला समीरला ।।९०॥ हळुवारपणे बोळा फिरविती । तशी रक्ताची कमी होतसे गती । ठणकेलाही लाभे विश्रांती । लघवी पॉट मागितला ॥९१॥ लघवी इतकी झाली जोरात । कॅथेटर गेले सरकून । ठणकाही थांबल्या त्वरित । रक्तही जाणे थांबले असे ।।९२।। डॉक्टरही आले धावत । आश्चर्याने राहिले बघत । चैतन्याचा चेहरा होता शांत । कोरड पडली घशाला ।।९३।। त्याच्या मिटलेल्या डोळ्यासन्मुख । काकांचे दिसले प्रकाशित मुख । हात उंचावुनी होते सांगत । भिऊ नको मी पाठीशी । आहे ।।९४॥ सद्गुरूसारिखा असता पाठीराखा । उगाच करू नये शंकाकुशंका । सखासोयरा असतो देवासारखा । भावबळे आकळावा मनोमनी ॥९५।। राजेश गावडे याची गोष्ट । मज वाटली असे रास्त । ती सांगतो मी समस्त । सुभक्त वृंदासमोरही ।।९६।। त्याचे वडील होते आजारी । अशक्त झाले होते शरीरी । तसे दुखणे चालतसे वर्षभरी । बारीकसारीक कारणामुळे ।।९७।। एकदा त्यांचे दुखू लागले छातीत । तैसे पत्नीने नेले त्वरित । घाटकोपरच्या रुग्णालयात । हृदयरोग तपासण्या ।।९८।। तपासाअंती आले कळून । हृदय झाले अतीक्षीण । रक्तदाब व मधुमेह असून । स्थिती गंभीर झाली असे ।।९९।। अतीदक्षता विभागात ठेवती । तैसे काकांनाही कळविती । डॉक्टर खात्री नच देती । हृदय दहा टक्केच चालत असे ॥१००।। आजची रात्र आहे कठीण । प्रकृती सुधारेल उद्यापासून । काळजी न करावी विनाकारण । लौकर घरी येतील ।।१०१।। परि लहान भाऊ रडू लागला । त्याला वेगळाच प्रकार दिसला । त्यांचा जीव घाबरू लागला । डोळेही फिरविले त्यांनी ॥१०२।। वरिष्ठ डॉक्टर आले धावून । त्यांनी उपचार केला तपासून । किडनीवरती सूज येऊन । कठीण स्थिती झाली असे ।।१०३।। तरीही दोन दिवसानंतर । आजारातून आले बाहेर । घरीही आले लौकर । हिंडूफिरू लागले ॥१०४॥ काकांच्या पुढल्या भेटीत । राजेशला सांगती ते स्पष्ट । तात जीवनी दिली असे वाढ । फक्त शंभर दिवसच अधिक रे ।।१०५।। याचा अर्थ न उमजला राजेशला । परि नंतर तो ज्ञात झाला । शंभर दिवसांनी गेले परलोकाला । स्वस्थ जीवन जगून ते ।।१०६।। ऐसे हे संतसज्जन । आयुष्य लांबविती छान । गुरुचरित्रातले उदाहरण । मज इथे दिसले असे ॥१०७।। सतीपतीचे झाले मरण । त्याचे वाढवून देती जीवन । पुढील जन्माचे आयुष्य आणून । देती आपुल्या सुभक्ताला ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय दहावा गोड हा ।

 इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]