ChaitanyaGaatha

।। श्री ॥ 

॥ अध्याय नववा ॥ 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। आता नमन रंगअवधूत स्वामींना । नारेश्वरीच्या श्री दत्तप्रभूना । ज्यांची अखंड नामसाधना । श्वासोच्छवासाते चालतसे ॥२॥ श्वासेश्वासे प्रभुनाम स्मरामी । ऐसे सांगती बापजी स्वामी । ध्वजा फडकवली नारेश्वर ग्रामी । रंगभक्ती दुमदुमली ।।३।। दत्तभक्तीचा महाप्रचार । गुजरातेत केला अपरंपार । गुरूपरि केला साहित्यसंचार । भक्तिपररचना केली असे ।।४।। नारेश्वर होते घनदाट जंगल । दत्तभक्तीने केले पूर्ण सुनिर्मळ । दत्तधाम झाले परममंगल । रेवा तटीच्या किनारी ।।५।। अनेक जातीधर्माचे लोक येती । परमार्थाची करिती प्राप्ती । संसाराची ही परिपूर्ती । बापजी मार्गदर्शने लाभतसे ।।६।। गुरुलीलामृत लिहून । उघडून दाखविले संजीवन ज्ञान । सर्व सुभक्तांचे केले कल्याण । जन्मजन्मांतरीचे त्यांनी ॥७॥ दत्तबावनी जणू भक्तिसंजीवनी । सुभक्तांना दिली रचुनी । भक्त गाती ते दंग होऊनी । सुलभ साधना लाभतसे ।।८।। भक्तांना येतसे प्रचिती । प्रश्न पटापट सुटती । वरी होतसे परमार्थप्राप्ती । संसार सुखाचा होत असे ।।९।। आम्ही भाऊ काकांच्या संगती । गुरुवारची करीत असता आरती । अचानक बापजी प्रकटती । दर्शन दिधले भाऊंना ।।१०।। अरे बघा बघा भाऊ म्हणती । श्रीरंग अवधुतसन्मुख प्रकटती । दिव्य प्रभेसम श्री दिसती । आशीर्वाद देती सर्वांना ॥११॥ क्षणात प्रकाशमय होती । भाऊकाकांच्या भृकुटीत शिरती । भाऊ-अवधूत एकच होती । एकमेकांत विरले दोघेही ।।१२।। ऐसी मज लाभली प्रचिती । दोघे सद्गुरू एकची असती । कोण कोणाची प्रतिकृती । सांगणे कठीण वाटतसे ॥१३॥ मज भाऊकाका जे सांगती । त्याला रंगअवधूतांची असणारच अनुमती । तरीही त्यांचा आशीर्वाद घेऊनी संगती । चैतन्यगाथा पुढे नेत असे ।।१४।। चैतन्यगाथा जणू गंगाप्रवाह । जो निववेल संसारदाह । प्रत्यक्ष बघावा त्याचा प्रभाव । भक्तीभाव अंतरी ठेवुनी ।।१५।। असो, एक अनिस नामे मुसलमान । काकांना ओळखे म्हणून । त्याची वली वसीमला घेऊन । काकांकडे आली असे ।।१६।। एकाएकी त्यांचे घरात । मंडळी आजारी होती पडत । त्रास उद्भवे कैसा अकस्मात । कारण काही कळेना ।।१७।। पतीपत्नीत होई भांडण । घराचे बिघडले वातावरण । सुखसमाधान गेले हरपून । शंकाकुशंका वाढती ।।१८।। ऐशी झाली असता स्थिती । काकांची झाली स्मृती । पुत्र वसीमला घेऊनी संगती । त्याची पत्नी आली असे ।।१९।। तसे काका त्यांना विचारती । कधी तुमच्या दारावरती । थापा मारल्याच्या ऐकू  येती । ऐसा भास होतो का? ।।२०।। अथवा तुमच्या जिन्यात । काळी मांजर पडते का  नजरेत । तैसी पत्नी झाली भयभीत । ओरडूनच हो म्हणाली ।।२१।। या अल्ला ! अहो असेच असते होत । मी पतीला असते सांगत । परि त्यांचा विश्वासच नाही बसत । दूर्लक्ष करितो बोलण्याकडे ।।२२।। ही गोष्ट खरी आहे म्हणून । काका वसीमला बोलती उद्देशून । तुमचे घराखालती आहे दुकान । एका वयस्क चाचाजीचे ।।२३।। आठदहा दिवसापूर्वी तो मेला । मरण्यापूर्वी तुला तो भेटला । तेव्हा तुझ्याशी काही बोलला । आठवते का सांग तुला ।।२४।। वसीमला आश्चर्य वाटले । काकांना हे कैसे समजले । त्याने आपल्या अम्मीला सांगितले । हे सांगतात ते बरोबर आहे ।।२५।। मरण्याचे दोन दिवस अगोदर । मज भेटले चाचा दुकानदार । विचारपूस केली मजेदार । रत्नागिरीके होना म्हणून ।।२६।। तुमचे वेगळेच असते खानपान । चमचमीत असते जेवण । चावल, रोटी, झिंगा फ्राय म्हणून । चविष्ट असते कितीतरी ।।२७।। माझ्या तोंडाला सुटते पाणी । जरी कधी घरी केले अम्मीने । मज बोलवावे आठवणीने । ऐसे हसत हसत वदला असे ।।२८।। ऐकले का म्हणून । वसीमच्या मम्मीला बोलले हसुनी । त्याचा आत्मा राहे घुटमळुनी । जिन्यात तुमच्या येत असे ॥२९॥ या अल्ला! अब क्या होगा म्हणून । अम्मी ओरडली घाबरून । काकांनी तिला शांत करुनी । उपाय एक सुचविला ।।३०।। एक तांदळाची भाकरी करून । झिंगा फ्राय त्यावर वाढून । दाराचे बाहेर ठेवावा रात्रीतून । चाचा संतुष्ट होईल ।।३१।। जेव्हा तो पोटभर जेवेल । तुम्हाला मनापासून दुवा देईल । पुन्हा कधीही न दिसेल । इच्छातृप्ती झाल्याने ।।३२।। या अल्ला ! मम्मी बोलली आनंदून । कोणतीही गोष्ट न राहे लपून । काकांच्या दिव्य नजरेतून । दुवा मागून गेली असे ।।३३।। जैसे त्याला दिले इच्छाभोजन । तो आत्मा संतुष्ट होऊन । निघून गेला दुवा देऊन । केवळ काकांच्या मार्गदर्शने ।।३४।। अशीच दुसरी एक घटना घडली । अतृप्त आत्म्याची तृप्ती केली । रहस्यमय कथा सांगितली । एक चाचा दुकानदाराला ।।३५।। त्याचे गोरेगावात होते दुकान । छोटा धंदा चाले छान । उत्पन्न होते महान । ऐश्वर्य होते चांगले ॥३६।। काही वर्षे चालले छान । पुढे थोडी लागली घसरण । प्रत्येक कामात होई नुकसान । धंदा बसत चालला ।।३७।। पूजाअर्चा मंत्रतंत्र केले । परि सारेच यत्न फसले । कोणी काकांचे नाव सुचविले । आशेने चाचा आला असे ॥३८॥ काकांनी बैसविले खुर्चीवर । मंत्राचा केला असे उच्चार । तैसे चित्र दिसले हातावर । ते सांगितले चाचाला ।।३९।। वीसबावीस वर्षांपूर्वीची । गोष्ट आहे एका तरुणीची । तिजवर झालेल्या बलात्काराची । शिवाय खून केला असे ।।४०।। ती चणियाचोळी होती घालत । डोक्यावर पाण्याचा होता माठ । गुजराती कन्या होती बहुतेक । फिरत आहे वास्तूवर ।।४१।। तुझ्या दुकानाच्या मागील बाजूस । पिंपळाचे झाड आहे सरस । तिच्या आत्म्याचा आहे वास । तोची बरकत रोखीत असे ।।४२।। तैसे चाचा म्हणाला बरोबर । मज आठवतो तो प्रकार । इतकी  वर्षे झाल्यानंतर । मुक्ती नाही का मिळाली ।।४३।। मी तिला नव्हतो ओळखत । ना मी  होतो नात्यागोत्यात । मज का करिते ती त्रस्त । मी काय बिघडविले ।।४४।। तिची इच्छा राहिली अपूर्ण । ती तू करावीस पूर्ण । म्हणुनी तुला त्रास देऊन । मुक्त होऊ पाहतसे ।।४५।। चणियाचोळी, बांगडी तिला । दहीभात आणि पाण्याचा पेला । झाडाजवळ ठेवा पौर्णिमेला । रात्रीचे वेळेस एकदा ।।४६।। जशी तिची इच्छा होईल पूर्ण । तशी ती जाईल निघून । तुझी बरबादी होईल शमन । पूर्ववत होईल सर्व रे ।।४७।। तसे पहिल्याच पौर्णिमेला । चाचाने वरील प्रकार केला । त्याचा धंदा पूर्ववत झाला । काका अल्ला सम भेटल्यामुळे ।।४८।। सुरेखा राजेशिर्के यांनी । सुपुत्राची सांगितली कहाणी । वर्सेवा अंधेरीचे ठिकाणी । घडली असे जी ।।४९।। त्यांचा सुपुत्र अक्षय । अडीच वर्षांचे असता वय । एक अनामिक भय । वाटुनी चिडचिडा जाहला ।।५०।। अक्षय गोंडस आणि सुंदर । बोबडे बोल वाटती मधुर । कुणाचीही लागावी नजर । लोभस बाळ होते जे ।।५१।। तिच्या मैत्रिणी सांगती । अक्षय प्रेमळ लाघवी अती । रोज रोज दिवसाप्रती । नजर त्याची काढावी ।।५२।। तिलाही वाटे अभिमान । या बालकृष्णाला पाहून । वाटे देवाचे हे वरदान । माझ्यापोटी आले असे ।।५३।। ऐसे अक्षयचे बालपण । सतत पाहती लक्ष देऊन । आबाआजीचे नंदनवन । बाळ नातू वाटतसे ।।५४।। परि अचानक काही घडले । बाळ एकाएकी चिडू लागले । अपशब्दही बोलू लागले । घाबरू लागले घरातही ।।५५।। आईबाबावर उचले हात । आबा आजीला मारी लाथ । वेडेवाकडे करीतसे हात । मग्रूर  कैसा झाला असे ।।५६।। आश्चर्य वाटतसे सकला । एकाएकी कैसा वैतागला । काय झाले असे या बाळाला । शंकाकुशंका जागती ।।५७।। बेडरूमच्या न जाई खोलीत । कोंबडी कोंबडी राही ओरडत । चावेल चावेल ऐसे घाबरत । भीतीने बोबडी वळतसे ।।५८।। ऐसा आठवडा गेला निघून । सासूबाई गेल्या घाबरून । काकांना फोन करून । विचारत्या झाल्या भीतीने ।।५९॥ सर्व सांगितली हकीकत । काका म्हणे न व्हावे चिंतीत । दृष्ट काढावी तीन दिवस । सांजवेळेला बाळाची ।।६०।। तैसी काढली ती रात्रीत । सर्वत्र झाले शांत शांत । झोपण्याचे असता तयारीत । बेल वाजली दाराची ।।६१।। रात्रीचे अकरा गेले वाजून । आता कोण आले म्हणून । तोची दारात काकांना पाहून ।  आश्चर्य वाटले सर्वांना ।।६२।। जवळच आलो होतो म्हणून । वाटले घरात पहावे डोकावून । अक्षयला घ्यावे पाहून । सहज आपुल्या डोळ्यांनी ।।६३।। पुढे कॉफीपान झाल्यावरती । काका स्पष्ट सर्व सांगती । अक्षयला ती दृष्ट नव्हती । फेऱ्यात सापडला असे तो ॥६४।। विहीर आहे का सोसायटीत । तैसे हो सांगती सुरेखासहित । तिच्यात मृत्यू झाले आहेत । दोन आत्म्यांचे कधीतरी ।।६५।। त्या दोन आत्म्यांच्या फेऱ्यात । अक्षय सापडला असे पकडीत । दुपारी असता तो खेळत । वाईट गोष्ट आहे ती ॥६६।। डोळ्यात तेल घालून रात्रीत । अक्षयवर ठेवावी पाळत । तो पळून जाईल मध्यरात्रीत । दरवाजा उघडून एकटा ।।६७।। मध्यरात्रीचे प्रहरात । वाईट शक्ती येती जोरात । जरी का त्याला नेले ओढत । कधीच दिसणार नाही तो ।।६८।। तैसे सर्व गेले घाबरून । कल्पनेने आले रडवेपण । काका म्हणे हेची कारण । मज येणे झाले रात्रीत ।।६९।। तुम्ही न जावे घाबरून । मी दैवी उपचार करून । त्याला देत असे संरक्षण । दुसरा उपायही सांगतो ॥७०।। काही वेळ उशाशी बसून । मंत्र घातला डोक्यावरून । अदृश्य शक्तीला तंबी देऊन । काका घरी गेले असे ।।७१।। तीन दिवस दृष्ट काढून । चवथ्या रात्रीत बैसवून । एक काळी कों बडी आणून । ओवाळून उतारा करावा ।।७२।। ती तीन रस्त्यावर द्यावी सोडून । घरी येऊन करावे स्नान । बाकी सर्व मी करीन । धीर दिला असे विश्वासाने ।।७३।। जैसा कोंबडीचा उतारा केला । अक्षय पूर्णपणे बरा झाला । काकांनी त्याला वाचवला । अक्षयला अक्षय जीवदान देऊनि ।।७४।। भिऊ नको बाळा म्हणून । संत देती जे अक्षय वचन । त्याची प्रचिती आली म्हणून । अंतरी सुखावली सुरेखा ।।७५।। मिथील भोगले म्हणून । एक आहेत सज्जन । एकदा भटकंती करून । घरी आले सायंकाळी ।।७६।। परि कळा येऊनी पोटात । ते सतत राहिले दुखत । परि काय घडले अकस्मात । कळलेच नाही मिथीलला ।।७७।। उठता बसता नव्हते येत । नीट निजताही नव्हते येत । दाखल केले दवाखान्यात । जुहूमधील चांगल्या । तापही भरला अंगात । रिपोर्टही काढती त्वरित । इंजेक्शन गोळ्या होते देत । प्रयोग करिती सर्वथा ।।७९।। झोप न येई रात्रीरात्रीत । मिथील राहतसे तळमळत । बेचैनीत होता काढत । दिवस बिचारा कसेतरी ।।८०।। खाणेपिणे दिवसातुनी । काहीच न टिके पोटातुनी । तापही भरे फणफणुनी । अगतिक झाला दुखण्याने ।।८१।। रात्री बाराचे सुमारास । त्याला ऐसा होई भास । कोणी खेचतसे पायास । ओढत आहे वरती वरती ।। ८२।। त्याचा आईचा सुटला धीर । काकांना सांगितले सविस्तर । म्हणती येतो मी लवकर । आजच त्याला पाहावया ।।८३।। काका येणार म्हणून । सर्व मनात पावले समाधान । रात्री आठ वाजता दत्त म्हणून । मिथीलसन्मुख परतले ।।८४।। जैसे मिथीलला घेतले पाहून । तैसे अंतर्ज्ञानाने घेतले जाणून । हिरव्या वेलचीचे दाणे देऊन । तोंडात चघळण्यास सांगितले । म्हणे हे न खावे चावून । तोंडात ठेवावे चघळून । अंगावरती हात फिरवून । निघून गेले शांतपणे ।।८६।। पाय न ओढले रात्रीत । झोप लागली असे शांत । फरक पडला पोटदुखीत । हळूहळू सर्व स्थिरावले ।।८७।। डॉक्टरांना आश्चर्य वाटले । ऐसे काय कारण घडले । आपोआप कैसे बरे वाटले । तपासाअंती न सापडले जे ।।८८।। जे न घडले डॉक्टरी उपायांनी । ते घडले वेलचीच्या दाण्यांनी । काकांच्या मंत्रसामर्थ्यांनी । मिथील बरा झाला असे ।।८९।। काही अदृश्य पिशाच्चयोनी । त्रास देतात वासनाशमनी । हे फक्त जाणती संतज्ञानी । मुक्ती देती । एकलेची ॥९०।। लालबागच्या राजेंद्र कदमांनी । सांगितली स्वतःची कहाणी । कैशा त्यांच्या सुटल्या अडचणी । विचित्र घटना घडली असे ।।९१।। संसारातल्या अनेक अडचणी ।। कामधंद्यातल्या सर्व मिळुनी । अनेक समस्यांची झाली जुळवणी । चिंतेवर चिंता दुणावली ।।९२।। कोणाला विश्वासाने विचारावे । कोणाचे श्रद्धेने मार्गदर्शन घ्यावे । कोणाला शरण जावे मनोभावे । गोंधळ मनांतरी चालला ।।९३।। मित्र ऐसे कोणी न भेटती । जे मनाचे समाधान करिती । नातेवाईकांची तीच स्थिती । गोंधळ गर्तेत फेकती ।।१४।। कोणास विचारावे कारण । कोण चिंतेचे करील हरण । देव भेटेल का समोरून । मनात प्रार्थिती ते देवाला ।।९५।। ऐसे असता ते विचारांत । एकदा गाढ झोपले ते शांत । एक तेजस्वी बाई आली स्वप्नात । कानशिलात दिली ठेवून ।।९६।। ताबडतोब पार्ल्याला जाऊन । काकांना यावे भेटून । ऐसे बोलली ती रागावून । खडबडून जागा झाला असे ।।९७।। परि हे काका कोण म्हणून । त्या बाईची नव्हती ओळखजाण । स्वप्नाचा अर्थ न ये कळून । विचारात पडला राजेंद्र ।।९८।। तरीही पार्ल्यात पाहे विचारून । तपासाअंती झाले फलक दर्शन । काका एक संत महान । बाई स्वप्नात पाहिलेली ।।९९।। तैसे धावले सभामंडपात । काका सन्मुख दिसले शांत । स्वप्नातील बाई होती हसत । फोटोमधून राजेंद्रकडे ।।१०।। जैसा राजेंद्रचा आला नंबर । काकांना विनम्र केला नमस्कार । तैसा त्यांनी प्रश्न विचारला सुंदर । काय कशी बैसली कानशिली? ।।१०१।। तैसे राजेंद्र झाला चकित । कैसे काकांना झाले ज्ञात । काका फक्त राहिले हसत । राजेंद्र मनांतरी समजला ।।१०२।। तपासाअंत त्याला समजले । जानकी आईचे नाव ऐकले । वाटे काही पुण्य होते भले । माऊली आली स्वप्नात । तिनेच समज देऊन । चिंतेतून दिले सोडवून । सुरक्षित केले त्याचे जीवन । सद्गुरू छायेत धाडुनी ।।१०४।। सद्गुरू न सापडे शोधून । ते स्वये येतात चालून । परि राजेंद्रचे पुण्य महान । माऊलीने मार्ग दाखविला ।।१०५।। जैसा काकांचे आला सहवासात । तैसा चिंतेतून जाई सुटत । एक एक मार्ग मोकळे होत । भक्तीत रंगला काकांच्या ।I १०६II  काकांच्या मार्गदर्शनाखाली । त्याची बदलली जीवनशैली । गुरुकृपेची लाभली सावली । थप्पड फलद्रूप झाली ।।१०७।। म्हणोनी माझी नम्र विनंती । थप्पड मारुनी आणा मार्गावरती । संत संगतीची इतकी प्राप्ती । जरी झाली तरी धन्य मानावे स्वतःला ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत

 भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय नववा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]