ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय आठवा ॥

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः ।। श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ आता नमन राजाधिराज योगेश्वराला । गरुडेश्वरीच्या श्री दत्तात्रेयाला । परमपुज्य वासुदेवानंद सरस्वतीला । श्री दत्त शरणं मम ।।२।। तुम्ही ऐसे परमहंस स्वामी । सरस्वती वसतसे हृदयधामी । ग्रंथ रचिले उत्कृष्ट नामी । अलंकार सरस्वतीच्या कंठीचे ॥३।। एक एक ग्रंथाची रचना । अमृताने भरली शब्दभावना । भक्तीचा भांडार खजिना । उघडा करुनी लुटविला ।।४।। दत्तपुराण, लीलामृत सिंधू । दत्तमहात्म्य व श्रीदत्त चंपू । दत्तलीलेचा ज्ञानसिंधू । चरित्रामधून दाखविला ।।५।। द्विसहस्त्री गुरुचरित्र, त्रिशती गुरुचरित्र । समश्लोकी चरित्र, सप्तशती चरित्र । अनेक देवीदेवतांचे समंत्रक स्तोत्र । करुणापदी अतिसुंदर ।।६।। नर्मदालहरी, कृष्णालहरी । प्रसन्न केल्या सरितासुंदरी । भारतात केली अनवाणी फेरी । धर्मभावना जागविण्या ।।७।। श्री दत्तआज्ञेचे केले पालन । वर्णाश्रम सांगितला समजावून । कडक शिस्तीचे देऊनी शिक्षण । ज्ञानैकनिष्ठ भक्ती शिकविली ॥८॥ लाखो भक्तांना केले दुःखमुक्त । लाखोंना समृद्ध केले परमार्थात । काहींना प्राप्त झाले संतत्व । पुढील कार्य चालविण्या ।।९।। समाधी घेतली गरुडेश्वरी । भक्तांचे होऊनी कैवारी । वैकुंठ आणला भूवरी । कैलासासहित वाटतसे ॥१०।। स्तोस्त्रांची ऐसी केली रचना । की देवासही यावी करुणा । भक्तांच्या सोडविण्या विवंचना । भिक्षा मागितली प्रेमाने ।।११।। म्हणूनि मज करुणात्रीपदी । गाताना लाभतसे धुंदी । नकळत तन्मय होतो श्रीपदी । आनंदाश्रू ओघळती प्रेमाने ।।१२।। या एकाच परममंगल स्तोत्राने । स्वयं दत्तात्रेय पाझरती प्रेमाने । भक्तांना देती आशीर्वचने । सहकुटुंब रक्षिण्याचे ।।१३।। आता हेच ब्रीद रक्षिती सरस्वती । स्वये होऊनि दत्तमुर्ती । भक्त सहाय्यास धावती । परम कृपाळू होऊनी ।।१४।। म्हणुनी मधुकराची नम्र विनंती । माझी करावी इच्छापूर्ती । श्री देवदत्ताची गावया सुकीर्ती । अभयकर शिरी ठेवावा ।।१५।। चांगले ज्योतिषी म्हणून । काकांना ओळखती काही जण । प्रत्यक्षात तसे काही नसून । व्यतिरिक्त विशेष काही जाणती ।।१६।। ज्योतिषी सांगती भविष्यकाळ । काही अचूक सांगती वर्तमानकाळ । काका सांगती परा. भूतकाळ । मागील जन्माच्या हकीकती ।।१७।। ज्याला आपण म्हणू संचित । ते काकांना दिसते नजरेत । आपणास नाही ते आठवीत । विस्मृती मागील जन्माची ।।१८।। मागील जन्माचे काही ऋण । इहजन्मी फेडणे म्हणून । ऋणानुबंध येतात जुळून । परिवारांत गुंततो मायेने ।।१९।। काही संबंध जुळती नात्यामधून । काही देण्याघेण्याचे असती ऋण । काही शिल्लक राहिले म्हणून । परत फेडणे या जन्मी ।।२०॥ जोवरी न फेडू मागील ऋण । तोवरी न लाभे समाधान । अडचणी उद्भवती । विनाकारण । अज्ञान निवारण होई तो ।।२१।। हे ज्योतिषी न सांगू शकती । त्याला पाहिजे अतिंद्रिय  दृष्टी । जी काकांना दिली असे शक्ती । परम कृपाळू श्रीदत्ताने ।।२२। विविध धर्मांचे लोक येती।। त्यांच्या पूर्वजन्मास ते जाणती । मागील जन्मात कोण होती । तैसे धर्माचरण सांगती करावया ।।२३।। एका सांगती यवन भक्ताला । तुज जाणे असे त्र्यंबकेश्वराला । कालसर्प विधी पाहिजे केला । श्रापमुक्त व्हावया ।।२४।। दुसऱ्या यवन भक्ताला सांगती । सिद्धिविनायकाला जावे दर्शनाप्रती । तैसे अनिल साटमला सांगती । चादर चढवावी दर्ग्यावरी  ।।२५।। ऐशा काकांच्या विविध कृती । आपणांस वाटतसे चमत्कृती । परी प्रश्न हमखास सोडविती । भक्त समाधान पावतसे ।।२६।। देशपांडे नामे मध्य वयीन । व्यक्ती आली चिंता घेऊन । काळजीने चेहरा गेला काळवंडून । काका सन्मुख बैसली ।।२७।। काका, मला नोकरी होती छान । परि एकाएकी गेली ती सुटून । चार वर्षे गेली असे उलटून । बेकार बैसलो असे घरी ।।२८।। वणवण फिरतो नोकरीसाठी । ओळखितांच्या घेतो भेटीगाठी । प्रयत्नांची करितो पराकष्टी । यत्न विफल जाती हो ।।२९।। मुलाबाळांचा आहे संसार । पत्नी, मुले आहेत सुकुमार । कैसा प्रतिपाळावा व्यवहार । जीव द्यावासा वाटतसे ।।३०।। प्रश्न सुटतो का जीव देऊन । बायकामुलांनी कैसे जगावे जीवन । ऐसा वेडावाकडा विचार करून । जीवन भकास करू नये ।।३१।। तुझे रीडिंग घेतो म्हणून । सन्मुख बैसविले समजाऊन । मनात काही मंत्र पुटपुटून । सांगू लागले देशपांडेना ।।३२।। पहा उपाय जो मी सांगेन । तो कराल का म्हणून । हो हो, नक्कीच मी करीन । आत्मविश्वासाने बोलले देशपांडे ।।३३।। आताच्या आता जावे शिरडीत । रात्री पोहचाल तुम्ही मंदिरात । सकाळ होऊनी सस्नान । एक झाडू विकत घ्यावी ।।३४।। सकाळपासून दुपारपर्यंत । झाडत राहावे द्वारकामाई मशिदीत । कंटाळा न करिता असावे कार्यरत । दुपारी दर्शन घेऊन निघावे ।।३५।। थोडासा मनात विचार करून । निश्चयाने बोलले ते आनंदून । मनोभावे सेवा करीन साईचरण । आपण सांगितल्याप्रमाणे ।।३६।। तडक घरी जाती धावून । पत्नीस करीत सर्व कथन । पैसे जमविले मुलांच्या गल्ल्यातून । किडूकमिडूक थोडी जमविली ।।३७।। तैसे रात्रीच जाती शिरडीत । झोपले भक्तनिवास पडवीत । काकड आरतीने झाले जागृत । स्नानादी उरकून पळाले ।।३८।। झाडू घेतली असे विकत । द्वारकामाईत गेले धावत । दुपारभर राहिले झाडत । अविश्रांतपणे नामस्मरण करीत ।।३९।। जैसी दुपार गेली असे उलटून । तैसे निघाले ते दर्शन घेऊन । दुपारची एसटी पकडून । रात्री घरात आले शांतीने ॥४०।। रात्री अकरा वाजता आले घरात । मुले झोपली होती शांत । पत्नीने स्वागत केले हसत । पाणी दिले पिण्यास आणून ।।४१।। अहो, गोड बातमी म्हणून । एक लिफाफा दिला आणून । मोठ्या आशेने पाहती उघडून । आनंदा पार न राहिला ।।४२।। एका औषध कंपनीकडून । कॉल लेटर आलेले पाहून । साईसेवा फळली म्हणून । नतमस्तक झाले मनोमनी ।।४३॥ काकांच्याकडे जाती धावत । पेढे घेऊनिया हातात । सेवा राहिली जी मागील जन्मात । फलद्रूप आज झाली असे ।।४४।। आता तुम्हीच माझे साई म्हणून । विनम्र वंदिले श्रीचरण । देशपांडे झाले भाग्यवान । काका गुरूपरी लाभले ।।४५।।  एका सुखवस्तू घरातील बाई । नाव होते इंदिराबाई । त्याची ऐकावी नवलाई । कहाणी मी सांगतसे ।।४६।। पूर्वी स्थिती होती चांगली । सुखवस्तू होत्या वैभवशाली । पतीची कीर्ती होती उंचावली । समृद्धी होती घरात ।।४७।। बंगला, गाडी, घरची शेती । सुखसमाधान होती शांती । कुटुंबात होती अमल प्रीती । सुखे नांदती प्रेमाने ।।४८॥ परि कळे न काय घडले । विपरीत सर्व होऊ लागले । हळूहळू खालावत गेले । घसरण लागली सुखाला ।।४९।। वाटे कुणाची लागली दृष्ट । धंद्यात आली असे खोट । सुखाला लागले गालबोट । मतभेद होऊ लागले ।।५०॥ इंदिराबाई झाल्या निराश । परिस्थितीने आवळले पाश । कुटुंबाला वाटतसे लाज । समाजासन्मुख येण्याची ।।५१।। आपली ही दयनीय स्थिती । कुणा समोर न सांगू शकती । मानसरीत्या खंगून जाती । आधार शोधती कुणाचा ।।५२।। तोची भेटली एक मैत्रीण । तिचे पुढे उघडे केले मन । तिने काकांचे नाव सांगून । दर्शन घेण्या सांगितले ।।५३।। इंदिराबाई जाती आशा घेऊन । विनम्र काकांना केले वंदन । आपल्या सद्यस्थितीचे केले कथन । अश्रूभरल्या नयनांनी ॥५४॥ ही ढासळलेली परिस्थिती । जाऊनी येईल का पूर्वस्थिती । सांगावी एखादी युक्ती । आशा घेऊनी आली असे ।।५५।। त्यांची हताश वाणी ऐकून । काका तिला सांगती हसून । एक उपाय मज येतो दिसून । परि विचित्र तुम्हाला वाटेल ।।५६।। अवघड वाटेल तो करण्यास । तुमचे न होईल धाडस । परि उपाय आहे हमखास । केल्यास यश लाभेल ।।५७।। बाई मनात झाल्या अधीर । सांगा , सांगा देवा लौकर । मी नक्कीच करीन विचार । कठीण असेल तरीही ।।५८।। मग ऐकावे तुम्ही तो नीट । कधी गेलात का शिरडीत । मनात होऊनी थोड्या धीट । हो म्हणुनी सांगती काकांना ।। ५९।। शिरडीला जावे चावडीत । दिवसभर उभे राहावे उन्हात । भीक मागावी दारात । अनवाणी उभे राहून ।।६०।। काय म्हणुनी दचकल्या बाई । उपायाची ऐकून नवलाई । अहो लोकांची असते गर्दीघाई । कसे शक्य होईल । मज तिथे कोणी ओळखेल । माझे बिंग बाहेर फुटेल । समाजात शी:थू  होईल । म्हणुनी कठीण हे वाटतसे ॥६२।। तेव्हा काका बोलती म्हणून । मी तुम्हाला विचारला प्रश्न । तो शक्य होईल का म्हणून । विचित्र उपाय ऐसा हा ।।६३।। न कचरता उभे राहावे । कोणी भेटल्यास न घाबरावे । भिक्षा मिळेतो थांबावे । बाबांशी प्रार्थावे मनोभावे ।।६४।। ज्याक्षणी भिक्षा मिळाली । त्याचक्षणी विवंचना संपली । जाणा चिंता चिता विरली । पूर्ववत स्थिती होईल ।।६५।। ठीक आहे मी विचार करीन । पतीचा सल्लाही घेईन । ऐसे काकांना सांगून । इंदिराबाई घरी गेल्या असे ॥६६।। पुढे सात-आठ महिन्यांनी । इंदिराबाई आल्या दर्शनाकारणी । मनात दिसल्या समाधानी । उदासपणा पूर्ण गेला असे ॥६७। काका तुमचे कृपेकरून । माझे वैभव लाभले परतून । मी पूर्ववत सुखी असून । तुमची ऋणी आहे सर्वस्वी ।।६८।। मी मनाचा केला निश्चय । साईबाबांचे धरिले पाय । धाडस करुनी केला उपाय । आपण सांगितल्याप्रमाणे ।।६९।। विटलेली साडी नेसून । कोणी न पाहावे म्हणून । पदर घेतला डोक्यावरून । अनवाणी उभी राहिले ।।७०।।  उन्हात पाय जरी भाजती । तरी ठाम उभी राहिले निश्चयावरती । बाबांना केली विनंती । कृपा करावी म्हणुनिया ।।७१।। वाटे बाबांना दया आली । एक वयस्कर व्यक्ती आली । दोन रुपयांची भिक्षा टाकली । माझ्या थाळीत प्रेमाने ।।७२।। तुमच्या शब्दाची प्रचिती आली । वाटे सेवा मान्य झाली । लक्ष्मी अनपगामिनी झाली । केवळ तुमच्या मार्गदर्शने ।।७३।। आज आम्ही सुखी आहोत । कारण तुम्ही झालात कृपावंत । आम्ही आजन्म राहू ऋणांत । देव तुमच्यातच पाहिला ।।७४।। धन्य धन्य संतसज्जन । मागील जन्माचे फेडविती ऋण । त्याचे पदी लीन होऊन । उतराई होऊ इहजन्मी ।।७५।। एक पुंडलीक नामे व्यापारी । काकांच्याकडे आला दुपारी । धंद्याच्या घेऊनी तक्रारी । अचानक उद्भवल्या ज्या ।।७६।। काही वर्षे चालला जोरात । पैसाही मिळतसे अमाप । मालही खपतसे बाजारात । नावारूपासी आला असे ।।७७।। परि अचानक चक्र फिरले । घोडदौड थंडावत चालले । पुंडलीक भीतीने गांगरले । कासव चाल लाभल्याने ।।७८।। तेव्हा काकांची झाली आठवण । सल्ला घेण्यास गेले धावून । काका आलो असे शरण । कृपया मार्गदर्शन करावे ।।७९।। रात्री जेवल्यानंतर । तू पडावेस घराबाहेर । आवडता शर्ट घ्यावा बरोबर । पिशवीत एका टाकुनी ।।८०।। तुला भिकारी दिसेल जो पहिला । त्याला तो शर्ट द्यावा चांगला । इतुकेच पुरे तुझ्या भाग्याला । परत लाभण्यास कारण हे ।।८१।। ज्याक्षणी तू शर्ट देशील । त्याक्षणीच भाग्य उघडेल । अडचणी आपोआप सुटतील । इतुकेच करणे असे तुला ।।८२।। बस इतकीच अल्पशी गोष्ट । मी आजच करीन ती रात्रीत । आमच्या नाक्यावर असती अड्डयात । भिकारी नित्य बैसलेले ।।८३।। पुंडलीक रात्री जेवला लौकर । तसाच पडला घराबाहेर । शर्टही घेतला असे बरोबर । न विसरता त्याने तो ।।८४॥ अधीर होऊनिया मनात । झपझप पावले होता टाकीत । भिकारी दिसतो का नजरेत पाहत तो चालला ।।८५।। अगदी रस्त्याचे टोकापर्यंत । पाहुनी तो आला परत । परि एकही भिकारी नव्हता दिसत । आश्चर्य वाटले पुंडलिकाला ।।८६।। डाव्या उजव्या रस्त्यावरून । त्याने पाहिले असे शोधून । परि एकही न दिसल्याकारण । थकून तो झोपला असे ।।८७।। दुसरे दिवशी पडला बाहेर । थोडे लांब गेला दूरवर । तेणे काढावया खबर । पान गल्ल्यावर विचारले ।।८८॥ येथे भिकारी असती बहुत । परि कोणी न दिसे नजरेत । सर्व कोठे झाले गायब । माहीत आहे का तुम्हाला? ।।८९।। तैसे नकार्थी हलवून मान । मज माहीत नाही म्हणून । उत्तर मिळालेले ऐकून । हैराण झाला बिचारा ॥९०।। ऐसे चार दिवस गेले निघून । भिकारी न दिसे समोरून । तैसे पुंडलीक गेला घाबरून । काकांना भेटावयास गेला असे ॥९१।। काय रे भेटला का भिकारी म्हणून । काकांनी प्रश्न विचारला समोरून । परि कपाळाला हात लावून । नाही हो म्हणाला निराशेने ।।९२।। कळतच नाही काय झाले । सर्व भिकारी गायब झाले । एकाएकी हे कैसे घडले । मलाही आश्चर्य वाटतसे ॥९३।। अरे तू मला गेला सांगून । हे काम करितो मी चटकन । मग आता कां गेला हिरमसून । श्रद्धासबुरी धरावी ।।९४।। जरी दिवसा कोठेही भेटेल । तरी त्याला शर्ट करीन बहाल । तेची मला शक्य वाटेल । चालेल का ते सांगावे ।।९५॥ मुळीच नाही सांगती स्पष्ट । रात्रीच शोधावे हे उद्दिष्ट । जोवरी न साधेल हे इष्ट । कार्य न होईल तुझे रे ॥९६।। पुंडलीक गेला निघून । पंधरा दिवसांनी आला परतून । भिकारी न भेटला म्हणून । निराशेने गळून गेला असे ।।९७।। परि काका पाठविती परतून । श्रद्धासबुरी ठेवावी मनातून । ऐसे आठ महिने गेले निघून । एकदाचा भेटला भिकारी ।।९८।। काकांना सांगे आनंदून । मज भेटला दरिद्रनारायण । सबुरीने दैव दिले उघडून । कृपा तुमचीच झाली असे ।।९९।। शेवटी पुंडलिकास भेटला पांडुरंग । जीवनाचे उडालेले सर्व रंग । रत मिळाले येऊनी उमंग । पांडुरंग सम काका पावल्याने ॥१००॥ एकदा सुलोचनाबाई येती । काकांना विनम्रपणे सांगती । सर्व सुखे पायी लोळती । परि शांती न लाभे मनाला ।।१०१।। महालक्ष्मीचा आहे वरदहस्त । पती सुस्वभावी आणि शांत । मुले नम्र विद्याविभूषित । मातृभक्त सर्वतोपरी ।।१०२।। रात्रीची झोप नाही लागत । देवाचे नाव न येई मुखात । अनामिक तळमळीने मनात । अशांतता वाटत असे जिवाला ॥१०३।। काका रीडिंग घेऊन सांगती । कुणाचे पैसे बुडविलेले दिसती । अथवा देण्याची झाली विस्मृती । प्रथम आठवून पाहावे ।।१०४।। अकरा हजारांची रक्कम असून । जोवरी न फेडाल ते ऋण । तोवरी मनःशांती म्हणून । लाभणार नाही तुम्हाला ।।१०५।। किंवा महालक्ष्मीला जाऊन । अकरा हजार टाकावे पेटीतून । पांढरी चप्पल जावे घालून । सोडून यावे तिथेच ती ।।१०६।। जरी गोष्ट न आली स्मरणात । तरी पैसे घेऊनी गेल्या देवळात । ते टाकीले असे दानपेटीत । चप्पल तिथेच सोडली ।।१०७।। पूर्वसंचित गेले निघून । बाई पावन झाल्या मनातून । काकांचे हे मार्गदर्शन । भक्तास अभयदान वाटतसे ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय आठवा गोड हा ।

 इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]