ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

अध्याय सातवा ॥ 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। शंकर महाराजांना करिता वंदन । माझे आनंदाने भरती लोचन । माझे मनही येते गहिवरून । अवतारकहाणी ऐकून ।।२।। चिमणाजीला दिला दृष्टांत । मज घेण्यास यावे रानात । व्याघ्रसमूहाच्या घोळक्यात । बालरूपात आहे मी ॥३॥ चिमणाजी झाले भाग्यवंत । शिवभक्तीचे लाभले फलित । अपर्णा पती आले प्रत्यक्षात । अंतापूरच्या गावाला ॥४॥ त्यांचे वागणे अतर्क्य  । त्यांच्या लीला अतर्क्य  । त्यांचे बोलणे अतर्क्य  । सारेच गूढ वाटतसे ॥५॥ संचार केला हिमालयात । संचार केला पूर्ण विश्वात । अनंत नामाने होते प्रचलित । वेगळ्या जातीजमातीत ते ॥६।। शुभरायाच्या आले मठात । जनार्दनाला दिसले दत्तरूपात । अनेक भक्तांच्या संगतीत । शिवरूप दाखविती सर्वांना ।।७।। उत्सव असता तो पुण्यात । स्वये हजर असती साक्षात । तरीही असंख्य पत्रे येतात । हजर असती तेथेही ।।८।। जेव्हा जाती ते गाणगापूरात । ब्राह्मण पूजा करिती मठात । ती महाराजांना होतसे प्राप्त । रुद्रघाटावरती असताना ॥९।। अवताराची सांगती महती । स्वये मी आहे कैलासपती । समज द्यावया आलो जगती । करुणा उपजोनी मनात ।।१०।। मी कोण आहे म्हणून । जरी वाटतसे व्हावी जाण । तरी स्वतःस घ्यावे ओळखून । तिथेच त्याला दिसेन मी ।।११।। जरी धनदौलत उधळाल । तरीही मला न ओळखाल । परि माझे जराही न अडेल । तुमच्यावीना कधीच हो ॥१२।। तुमचे मजवाचुनी अडेल । सांगा कोण तुम्हा उद्धरील? । माझे हे अनमोल बहुमोल । शब्द तुम्हा स्मरतील ।।१३।। जे मज शरणागत झाले । त्यांनाच मी पावन केले । मज अशक्य काही न राहिले । सर्वत्र शक्य मलाच ते ।।१४।। महाराजांची ऐकून शुभवाणी । मी शरणागत झालो श्रीचरणी । कृपा करावी मज सदिच्छा साधनी । शुभाशीर्वाद ऐसा मागतसे ।।१५।। रामराव कदम नावाचे गृहस्थ । मनात होऊनि अतित्रस्त । परिस्थितीने झाले अगतिक । काकांकडे येती एकदा ।।१६।। मुंबई-पुणे या रस्त्यावरती । भव्य वास्तूची केली निर्मिती । परि कबुतरांनी केली हैराणगती । वास्तूवरती बैसुनिया ।।१७।। थव्याथव्याने कबुतरे येती । पूर्ण दिवसभर ठाण मांडिती । घाण करिती ते गच्चीवरती । दुर्गंधी पसरे सर्वत्र ॥१८॥ कैसे येती कोठून येती । दाणेपाण्याविना बैसती । कदमास झाली हैराणगती । त्रस्त जाहले कारणाने ।।१९।। फटाके पाहिले फोडून । अन्य प्रयत्नही पाहिले करून । परि सर्वच फसले यत्न । त्रास काही सुटेचिना ।।२०।। जवळपासचे घरावरती । एकाही कबुतराची नसे वसती । फक्त कदमांचे घरावरती । गुटरगुम,  गुटरगुम चालतसे ।।२१।। तीनशे, चारशे कबुतरे येती । संपूर्ण घराभोवती बैसती । नवीन रंगविलेल्या वास्तूवरती । नक्षी काढती विष्ठेने ।।२२।। वाटे ही नवीन वास्तू नसून । पूर्ण भयाण वाटे लांबून । दुर्गंधीने केले हैराण । गुटर गुमने डोके फिरतसे ।।२३।। ऐसे ते असता मनःस्थितीत । कोणी काकांचे नाव सुचवीत । परि ते असती नुसते ज्योतिष । उपाय कैसा सांगतील । मित्र सांगतसे ठासून । अरे तेच सांगतील कारण । त्यांच्यात दैवीशक्ती असून । अतिंद्रिय दृष्टी लाभली असे ॥२५।। तैसे मनात थोडे विश्वासून । कदम जाती एके दिन । काकांना सांगती आपुला प्रश्न । उत्तर ऐकून गारठलेच ॥२६।। तुमच्या प्रशस्त दिवाणखान्यात । मध्यभागी खोदावे त्वरित । तैसे कदम होऊनी संतप्त । अडवू लागले काकांना ।।२७।। भारी किमतीच्या वस्तू लावून । दिवाणखाना सजविला छान । तिथे इटालियन टाइल्स लावल्या असून । खोदणे मला शक्य नसे ।।२८॥ तेव्हा काका बोलती रागावून । वास्तू ठेवावी सांभाळून । का सत्वर सुटावे त्रासातून । निर्णय तुम्ही करावा ।।२९।। पत्नी कदमांना करिती शांत । म्हणे ऐकावे काय बोलतात । तेव्हा काका पुढे सांगती गोष्ट । शांतपणे कदमांना ।।३०।। दिवाणखान्याचे मध्यभागात । आठ फूट खालील खड्डयात । एक मानवकवटी आहे दिसत । काळ्या वस्त्रात बांधलेली ॥३१।। तिज काढावे तुम्ही खणून । त्वरित द्यावे तिज फेकून । हे ऐकून किंचाळले दोघेजण । भीतीने कंप सुटला असे ॥३२।। त्यावरी शास्त्रोक्त विधीकरून । जाळावी ती लांब नेऊन । तुम्ही मुक्त व्हाल त्रासातून । निश्चिंत असावे  सांगती ।।३३।। तैसे दोन मजूर लावून । कवटी काढली असे खणून । वरी शास्त्रोक्त विधी करून । दूर जाळून टाकली असे ।।३४।। दोनच दिवसात आले कळून । सर्व कबुतरे गेली उडून । पुन्हा कधीही न फिरकली चुकून । वास्तू त्रासमुक्त झाली असे ।।३५।। वास्तू झाली असे भाग्यवंत । कदम परिवार राहतसे सुखात । सुखशांती आणि प्रसन्नचित्त । याचा अनुभव घेती ते ॥३६।। मनीषा साटम म्हणून । माहीमला राहती वास्तव्य करून । तीन रूमचा फ्लॅट असून । तिथे विचित्र घटना घडतसे ।।३७।। किचनच्या खिडकीबाहेर । कबुतराचे घरटे आहे उंचावर । तिथे पिल्लेही येती सुंदर । परि अल्प आयुष्य लाभतसे ॥३८॥ आई न सांभाळी पिल्लास । जन्मताच मारीतसे त्यास । टोचून टोचून देई त्रास । मातृत्व निर्दयी होतसे ।।३९।। नरही होतसे बदमाश । घरटे न करी तो साफ । तोही मारतसे पिल्लास । शवांचे थर जमले असे ।।४०।। मनीषा पाहे खिडकीतून । तिज विचित्र वाटे पक्षिवर्तन । मातृत्वभाव न ये दिसून । आश्चर्य तिला वाटतसे ।।४१।। तिने कधी न पाहिले ऐकिले । पक्षी मारतात स्वतःची पिल्ले । तिज विचित्र वर्तन वाटले । शंका अंतरी जागली ॥४२॥ कधी कधी दिवाणखान्यात । मिरची दिसतसे अकस्मात । कैसी कोठून येते घरात । शंका दुणावत जातसे ।।४३।। तिने सर्वत्र पाहिले शोधून । या मिरच्या येतात कोठून । परि शंकेचे  न झाले निरसन । शंका चिंतेत परिवर्तली ॥४४॥ त्यांचे घरातील पाळीव श्वान । मध्यरात्रीला जागा होऊन । प्रवेशदाराकडे जाई धावून । भुंकतसे तो मोठ्याने ।।४५।। कधी त्याचे रडणे ऐकून । उभयता त्रस्त होती मनातून । काही अशुभ वाटे मनातून । द्वार उघडून पाहती ते ।।४६।। परि कोणी न ये दिसून । सर्वत्र शांत वाटे जिन्यातून । परि कुत्रा न होई शांत म्हणून । भीती मनात जागतसे ।।४७।। विचित्र शंकाकुशंका उद्भवती । तेणे काकांची झाली तीव्र स्मृती । लगेचच फोनवरती बोलती । प्रकार सांगितला काकांना ।।४८।। मुळीच घाबरू नको म्हणून । तिज सांगती ते समजावून । महालक्ष्मीचे कुंकू आहे का म्हणून । काका विचारती मनीषाला ।।४९।। नाही म्हणून सांगितले घाबरून । परि पतीने करून दिली आठवण । सासूबाईने दिले असे आणून । स्मरत नाही का तुजला? ।।५०।। तैसे आहे म्हणून सांगे आनंदून । वाह ! मग काम झालेच घ्यावे समजून । मी सांगतो तैसे करावे रात्रीतून । दरवाजाच्या आतील बाजूस ।।५१।। तुमच्या प्रवेशद्वाराचे आत । कुंकवाच्या तीन रेषा काढाव्यात । प्रार्थना करोनी शांत । निश्चिंत तुम्ही झोपावे ॥५२॥ तैसे विश्वासुनी केले रात्रीत । कुत्रा न उठला रडत । शांतपणे होता घोरत । मिरच्याही न आल्या पुढे कधी ।।५३।। दुसरे दिवशी फोन करून । काकांना केले सर्व कथन । परि पतीला फोन द्यावा म्हणून । काकांनी तिला सांगितले असे ।।५४।। काका सांगती मनोजला । मज एक दोष असे दिसला । तुमचेवरती आहे जो  मजला । तिथे खून कोणाचा झाला असे ॥५५॥ तो आत्मा राहतसे फिरत । पिल्लांना राहतसे मारीत । मिरच्या तोच आहे टाकीत । कुत्र्यास सर्व दिसते हे ।।५६।। पुढे हा प्रकार जाईल वाढत । तुमचे भाग्य करील उध्वस्त । माझा सल्ला असे सांप्रत । जागा सोडून जाणे योग्य असे ।।५७।। ठीक आहे काका म्हणून । मनोज प्रयत्न पाहे करून । परि तीन महिने गेले निघोन । घर कोठे मिळेचीना ।।५८।। तैसे पुनश्च गेले दर्शनाकारण । तेव्हा नारळ दिला असे मंत्रून । कुलस्वामिनीचे नाव घेऊन । घरात ठेवण्यास दिला असे ॥५९।। त्यांचा फ्लॅट विकला गेला त्वरित  । दुसरा मिळाला सुंदर प्रशस्त । साटम झाले भयमुक्त । केवळ आशीर्वादाने काकांच्या ॥६०।। जहूरमामा म्हणून । एक धंदेवाईक सज्जन । त्यांचा मित्र आला घेऊन । काकांच्याकडे एकदा ।।६१।। एमआयडीसीच्या परिसरात । त्यांचा एक गाळा आहे प्रशस्त । तो भाड्याने असे तो देत । एक व्यवसाय म्हणुनिया ॥६२।। स्वतः गल्फमध्ये होता नोकरीत । तेणे गाळा देई अल्प भाड्यात । त्याचा धंदा चालतसे जोरात । जागा लाभदायक वाटतसे ।।६३।। बरेच वर्षे दिली  अल्प भाड्यात । आजूबाजूचे भाडे होते भरमसाट । तेणे भाड्यात करावी वाढ । म्हणूनी त्याला सांगितले असे ।।६४॥ परि तो करीतसे कटकट । भाडे वाढविण्यास करी विरोध । गाळाही न सोडे तो उद्धट । वादावर वाद वाढतसे ॥६५।। जेव्हा मालक झाला शिरजोर । तेव्हा सोडण्यास झाला तयार । परि मनात उपजोनी मत्सर । मालकास तो बोलला ।।६६।। हा गाळा न लाभेल कोणाला । ऐसा शाप माझा या जागेला । पुन्हा द्यावा लागेल तो मला । शरणागत होऊनिया ॥६७।। जैसा तो गाळा गेला सोडून । भाडेकरू आला असे नवीन । परि जागा न लाभे म्हणून । अल्पावधीत गेला असे ।।६८। ऐसे अनेक भाडेकरी येती । परि धंद्यात न होतसे प्रगती । तेव्हा त्याच्या शापाची झाली स्मृती । वाटे प्रयोग काही केला असे ।।६९।। म्हणुनी बोलावीतसे तो फकीर । पूजाअर्चा करीतसे सुंदर । गंडेदोरे, नजर प्रकार । करुनी सर्व पाहिले ।।७०।। परि विफल गेले सर्व यत्न । भाड्याने न जातसे दुकान । बिचारा चिंतेने झाला हैराण । नशिबाला दोष देत असे ।।७१।। जे जे भाड्याने घेती दुकान । ते जाती बरबाद होऊन । काही न कळतसे कारण । तपासही थंडावला ।।७२।। तेव्हा अल्ताफभाई म्हणुन । त्याचा मित्र आला असे धावून । काकांच्याकडे आला घेऊन । हताश जहूरमामाला ॥७३।। त्याचा हात घेऊनी हातात । त्याला सांगती ते त्वरित । यूपीच्या माणसाने केला घात । जबरदस्त करणी केली असे ।।७४।। तेणे भाडेकरू न टिकतील । धंदा त्यांचा धुळीत मिळेल । या जागेला केली निफल । कृष्णकृत्याने आपुल्या ।।७५।। जागेच्या डाव्या कोपऱ्यात । दीड-दोन फुटाच्या खड्ड्यात । एक वस्तू पुरली आहे गुप्त । ती काढून फेकून द्यावी ।।७६।। वरी पाणी दिले असे मंत्रून । त्या जागेवर टाकावे शिंपडून । त्याचा प्रभाव कमी होऊन । निष्क्रिय होईल वस्तूती ।।७७।। जसे मजुराने पाहिले खोदून । तो शिंगवाले डोके आले दिसून । काळ्या कपड्यात ठेवले छान । कपट उघडकीस आले असे ।।७८।। ते जहूरने दिले फेकून । वाटे अनिष्ट गेले निघोन । भाग्य लाभलेसे फिरून । जहूरमामा सुखावले ।।७९॥ एका लोखंडी पट्टीवरती । कुराणातल्या अल्फाज कोरून घेती । त्या वायव्य दिशेला ठेवती । तैसे शापविमोचन जाहले ।।८०।। त्यानंतरच्या भाडेकरूला । गाळ्याचा लाभ झालासे भला । धंदा जोरात असे चालला । काकांच्या शुभ आशीर्वादाने II ८१II ऐसी काकांची महती । कोण्या शब्दात गावी कीर्ती । मज फक्त आनंदाश्रू येती । गहिवर येतो प्रेमाने ।।८२।। काही घटना ऐशा घडती । विश्वास ठेवावा प्रमाणात किती । न ठेविल्यास अनुभव येती । मन भ्रमात पडतसे ।।८३।। मुंबईसारख्या लोकवस्तीत । भरगच्च ऐशा या शहरात । भुतांचे असावे अस्तित्व । हे मनास काही पटेना ॥८४।। इथे माणसेच राहती गर्दीत । श्वास न घेऊ शकती शुद्ध । तिथे भूते कैशी वावरावीत । स्मशान मोकळे असे त्यांना ।।८५।। जरी विनोदाचे असावे बोल । तरी प्रत्यक्षात काय असेल । हे अनुभवानेच कळेल । अंधश्रद्धा आंधळी पडेल ।।८६।। एक साठीच्या बाई येती । सालस, मध्यम स्थितीतल्या असती । शालीन, लीन नम्र दिसती । परि विषण्ण होत्या दिसत ।।८७।। त्यांना त्रास असावा गुप्त । बोलू न शकती उघडपणात । लाज वाटतसे सांगण्यात । तोंड दाबून बैसणे असे ।।८८।। गंडे, दोरे, मशीद, फकीर । देव, देवी, मांत्रिक मंदिर । उतारे, तुतारे आणि पीर । सर्व व्यर्थ झाले असे । त्यांचे सांसारिक जीवन । सर्व उद्ध्वस्त झाले या कारण । परि पती घेतसे सांभाळून । प्रयत्नांची पराकाष्ठा करीतसे ॥९०।। अपत्य नव्हते घरात । तेणे सर्व सुख वाटे वंचित । परि त्रासाने झाल्या संत्रस्त । जीवन व्यर्थ वाटतसे ।।९१।। काकांच्या सन्मुख बैसती । नयनातून अश्रू ओघळती । काका, कैशी सांगू मनःस्थिती । लाज वाटते सांगण्यास ।।९२।। तुम्ही अंतर्ज्ञानी आहात सर्वज्ञ । माझे दुःख जाणावे गुप्त । मज बोलणे वाटतसे लज्जित । परपुरुषापुढे तुमच्या हो ।।९३।। बाईची जाणून मनःस्थिती । काका शांतपणे सांगती । तुम्ही न सांगावी वस्तुस्थिती । मीच सांगतो तुम्हाला ।।९४॥ चाळीस वर्षांपूर्वीची हकीकत । राजभवनात होता राहत । तेव्हा तुम्ही होता नवविवाहित । ज्येष्ठातली गोष्ट असे ॥९५।। वटपौर्णिमेच्या शुभदिनी । पूजासाहित्य गेला घेऊनी । पूजा केली सर्व सौभाग्यवतींनी । सूत गुंडाळून वृक्षाला ।।९६।। तुम्ही सुंदर होता तरुणपणी । त्यात नटला सर्वालंकारांनी । तुमची पडली असे मोहिनी । वृक्षावरील पिशाच्चाला ।।९७।। त्याच्या मनात तुम्ही भरलात । तो रात्रीचा आला खोलीत । तुमचे शरीर घेतले ताब्यात । उपभोग घेऊ लागला ।।९८।। तुमचे पती असती जवळ । त्यांना न कळे तुमची तळमळ । सर्व प्रयत्न झाले निष्फळ । चाळीस वर्षे प्रकार चालला ।।९९।। स्वतःची ऐकून ही कहाणी । बाई रडू लागल्या ठसठसूनी । काका, कैशी सुटेल संकटातुनी । सुटका होईल का सांगावे ।।१००।। तेव्हा काकांनी दिले आश्वासन । खात्रीने सुटाल त्रासातून । विभूतीची पुडी दिली मंत्रून । भाळी उभयतांनी लावावी ।।१०१।। रात्री पसरावी खोलीत । जरी आला तो तुमचे लगत । त्याला सांगावे दटावीत । काकांना नाव सांगेन ।।१०२।। जैसे तो आला रात्रीत । त्याला दटावल्या त्या जोरात । काकांच्या नावाने झाला भयभीत । लांब उभा राहिला असे ।।१०३।। ऐशा तीन रात्री होत्या रागावीत । तेव्हा घराबाहेर गेला त्वरित । पुन्हा न आला दृष्टीपथात । भयभीतीने पळाला असे ॥१०४।। चाळीस वर्षांच्या त्रासातून । बाईची सुटका झाली भुतापासून । नयनाश्रृंनी धुतले श्रीचरण । आनंद गगनात मावेना ।।१०।। जो दुःखातून सोडवितो । जसे आर्त हाकेला धावतो । तो अन्य न कोणी असतो । दत्तप्रभूच तो जाणावा ॥१०६।। जो प्रेमाने जवळ घेतो । जो मायेने कुरवाळतो । तो दुसरा न कोणी असतो । सद्गुरू तोची जाणावा ।।१०७।। मज सांगताना या अनंत लीला । वाटे संतसंगतीचा लाभ झाला । त्या करुणाकर प्रभूला । शत दंडवत घालावे प्रेमाने ।।१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय सातवा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]