ChaitanyaGaatha

॥ श्री ॥

॥ अध्याय सहावा ।।

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ आता नमन शेगावेश्वराला । ब्रह्मस्वरूपी श्री गजाननाला । ज्याच्या पाहुनी अनंत लीला । दासगणूही वेडावला ॥२॥ श्री गजानन विजय लिहून । सकल जनास घडविले  दर्शन । ग्रंथ  झालासे वेदसमान । सुभक्त ब्रह्मानंद भोगती ।।३।। पत्रावळीतील शिते खाऊन । अन्नब्रह्माचे दिले ज्ञान । पातूरकरांना धन्य करुनी । प्रकटले असे शेगावी ।।४।। गण गण गणांत बोते म्हणून । मंत्राचे केले अखंड भजन । भक्तांना देऊनी नामसाधन । परमार्थपथ दाखविला ।।५।। व्यंकटाची पाहुनी अमल प्रीती । महाराज प्रसन्न होती चित्ती । त्याचे घरी केली अखंड वस्ती । शेगाव पंढरपूर जाहले ॥६॥ भक्तप्रेमाचे स्मरण म्हणून । चिलीम स्वीकारली आनंदून । भावभक्तीने आणलेले भोजन । सेवुनी भक्तां तोषविले ।।७।। कोरड्या विहिरीत आणले पाणी । सुकलेला वृक्ष फुलविला फिरुनी । बापू काळेला दिले दिव्यदर्शनी । पांडुरंग रूप दाखविले ।।८।। बाळकृष्णाची भक्ती जाणून । रामदासस्वामींच्या रूपात दिले दर्शन । वरी आम्ही उभय एकच म्हणून । समाधान त्यांचे केले असे ॥९॥ अशा अतर्क लीला पाहून । माझे हृदय आले उचंबळून । सर्व सद्गुरूंचा ऐक्यभाव जाणून । द्वंद्वातीत भाव जाणवला ।।१०।। श्री देवदत्तांचे गाता गुणगान । मज आपल्या लीलांचे होते स्मरण । वाटे तो प्रवाह वाहे सरिता होऊन । सकलजन हित साधावया ॥११॥ तरी आपलाही असावा वरदहस्त । मज सत्कर्मी ठेवावे जागृत । म्हणुनी मी होतो नतमस्तक । आशीर्वाद आपुला जाणुनी ।।१२।। सकल संतचरित्रामृतात । चमत्कारातून होतो बोध प्राप्त । सुलभ चर्चेविना येते लक्षात । सोपानमार्ग भक्तीचा ।।१३।। त्याचा लाभ मिळावा भक्तांना । त्यांच्या प्रदीप्त व्हाव्या सुप्त भावना । म्हणुनी संताच्या गुणगायना । वेडावलो असे मी ।।१४॥ तरी पाहावे हे अमृत कथन । कैशा आनंद ऊर्मी येतात दाटून । माझे अधीर झाले असे मन । पुढील प्रसंग वर्णावया ।।१५।। “प्रकाश, साला किधर है,” म्हणून । शिव्यांचे लावुनिया विशेषण । पुलैय्या नामे सन्मित्र असून । नित्य येतसे भेटीला ॥१६॥ जेव्हा जेव्हा भेटे आनंदून । मिठी मार क्यों बे साला ! म्हणून । मनाने निर्मळ प्रेमळ असून । बंधूभाव उत्कट जागतसे ।।१७।। घसवट होती घरापर्यंत । भाभीशी बोले आदरयुक्त । इतकी त्याची मैत्री होती दाट । काका गमतीत बोलले ।।१८।। तू दरवर्षी जातोस तिरुपतीला । पुण्य कमवितोस एकट्याला । यावर्षी मी येईन तुझे संगतीला । पुण्य मलाही लाभू दे ।।१९।। तैसा तो गेला आनंदून । त्याचे हृदय आले भरून । भाभीला फोन केला तत्क्षण । भाभीजी, पुलैय्या बात करता हूँ ।।२०।। पुढच्या महिन्यात जाणे तिरुपतीला । साला, प्रकाशला नेणार सोबतीला । ही गोड बातमी  सांगतो तुम्हाला । हरकत नसावी वाटत असे ।।२१।। तैसे दिवस झालासे निश्चित  । रात्रीचे आले   तिरुपतीत । सामान ठेवुनिया खोलीत । देवदर्शना आले उभयता ।।२२।। रात्री नऊ वाजता आले मंदिरात । पूजेची ताटे होती हातात । प्रचंड गर्दी होती दिसत । काकांनी प्रश्न विचारला ।।२३।। ‘ये कौनसा लाईन है’ म्हणून । काकांनी पृच्छा केली परतून । ही दुसरे दिवशीची असून । रात्रभर उभे राहतील ते ।।२४।। सकाळी त्यांना मिळेल दर्शन । ऐसी रात्र काढतील तिष्ठत राहून । ऐसा येथील प्रघात ऐकून । आश्चर्य वाटले काकांना ।।२५।। तोची पुलय्याचे लक्ष गेले समोर । प्रवेशद्वार बंद झाले लौकर । म्हणे ऐसा कैसा कारभार । चौकशी करून येतो मी ।।२६।। तैसा दरवाजाजवळ धावला । पहारेकरी होते बाजूला । रागानेच प्रश्न असे विचारला । दरवाजा बंद क्यू हैं ।२७।। म्हणे रात्र झाली असून । दरवाजा बंद केला आतून । ऐसे कैसे होईल म्हणून । पुलैय्या वाद घालीतसे ।।२८।। मी रात्रीच येतो अनेक वर्षांपासून । मज कधी न आली अडचण । आज कैसे झाले हे चुकून । किती वाजले ते बघावे ।।२९।। साडेनऊ गेले असती वाजून । दरवाजा बंद होतो नऊपासून । अरे, आपणच उशिरा आलो म्हणून । वैतागला तो स्वतःवरी ।।३०।। तैसा त्वेषाने आला उसळून । ‘कैसे बदनसीब आदमी है’ म्हणून । प्रकाशचे वरती गेला संतापून । अद्वातद्वा बोलू लागला ॥३१।। दरवर्षी येतो मी रात्रीतून । संतोषाने निघतो दर्शन घेऊन । आज ही * ‘पनौती’ आलो घेऊन । दर्शन न घडले तुझ्यामुळे ॥३२॥ वाटे माझे दुदैव म्हणून । तुला आलो असे मी घेऊन । वंचित झालो दर्शनाकारण । पाप संगती आणले असे ॥३३॥ आता चलावे परतून । फक्त कलशाचे घेऊनी दर्शन । सकाळीच जाणे परतून । खेचू लागला प्रकाशला ।।३४।। तुझ्यासारख्या दुर्दैवाला आणून । माझ्या मूर्खपणाचे कळले लक्षण । आता नशिबात ते नाही समजून । निमूट चलावे खोलीवरी ।।३५।। तेव्हा प्रकाश बोलला ठासून । मी मुळीच हालणार नाही इथून । प्रथमच मी आलो असून । दर्शन घेऊनच जाईन ॥३६।। नक्की हसावे की रडावे म्हणून । हे न आले असे कळून । पुलैय्या मनात गेला गोंधळून । बडबड करीत राहिला असे ।।३७।। ऐसा अर्धा तास गेलासे निघून । तोची मंडळी आली समोरून । सहज पाहिले असता वळून । घोळका सन्मुख आला असे ॥३८।। त्यात एक व्यक्ती होती प्रतिष्ठित । अंगरक्षक होते रक्षित । शुभ्रवस्त्र होते परिधानित । मध्यम उंची, कुरळे केश ॥३९॥ जैसे सर्वजण जवळ येती । मंदिराचे दरवाजे उघडले जाती । त्या व्यक्तीची नजर गेली प्रकाशवरती । ‘हॅलो,’ म्हणुनी अवकारिलै ॥४०॥ ‘व्हेन डिड यू कम !’ म्हणून । प्रकाशला विचारला प्रश्न । ‘जस्ट नाऊ’ म्हणून । प्रकाशने उत्तर दिले असे ॥४१।। ‘ओके’ म्हणून हात खांद्यावर ठेवून । ‘कम’ म्हणून बोलले हसून । आपल्या बरोबर जाती घेऊन । मंदिरात ते प्रकाशला ।।४२।। तैसी पुलय्याला केली खूण । तोही गेला घोळक्यामधून । गाभाऱ्यात बैसले सर्वजण । भजन कीर्तन करावया ॥४३।। गोविंदा गोविंदा, म्हणून टाळमृदंगात रंगले सर्वजण । अर्धा तास चालले हे भजन ! आनंद गगनात मावेना ।।४४।। ज्या मूर्तीचे दिव्य दर्शन । क्षणमात्रेच होते गर्दीतून । त्या मंगल मूर्तीला पाहून । नयन-मन संतुष्ट जाहले ।।४५।। रत्नजडित ध्यान बालाजीचे । पाहता भान हरपले पुलय्याचे । वाटे सार्थक झाले आजन्माचे । नेत्राद्वारे हृदयात साठविले ।।४६।। प्रकाशने पाहिले मागे वळून । मंत्रमुग्ध पुलय्या होता बसून । आनंदाश्रूनी भरले लोचन । अश्रू टपटपती थाळीत ।।४७।। तोची पुजाऱ्याने थांबविले भजन । थाळीसह उभे राहिले सर्वजण । पुजाऱ्याने थाळी स्वीकारुन । प्रसाद दिला कस्तुरीलेपाचा ।।४८।। तृप्त मनाने बाहेर आले सर्वजण । त्या व्यक्तीने केले हस्तांदोलन । ओके-बाय बोलले हसून । प्रकाशचा निरोप घेतला असे ।।४९।। माननीय व्यक्ती गेली निघून । अंगरक्षक धावले मागून । उभय मोकळे झाले गर्दीमधून । द्वारपालास विचारले ।।५०।। कोण व्यक्ती होती म्हणून । आश्चर्याने विचारलासे प्रश्न । ‘पाण्डेचरीचे राज्यपाल’ म्हणून । शिपायाने सांगितले मोठ्याने ॥५१।। तैसे पुलय्या गेला गहिवरून । आनंदाश्रूंनी  डबडबले लोचन । अपराधाचे करण्या क्षमायाचन । शब्द फुटेना मुखातून ॥५२॥ माझ्या आयुष्यात संपूर्ण । ऐसे कधी न घडले दर्शन । साला तू आहेस रे कोण । प्रश्न विचारला प्रकाशला ॥५३।। पूर्ण शरणांगती पत्करून । प्रकाशला केले वंदन । त्याची प्रसन्न मुद्रा पाहून । काका अंतरी सुखावले ॥५४॥ खांद्यावरती ठेवुनी हात । पुलय्याला केले शांत । संतसंगतीने लाभतो अद्भुत । ऐसा योग जीवनी ।।५५।। संतसंगतीची महती गाती । जेणे लाभे अमृताची प्राप्ती । सर्व संत एकची मागती । संतसंग देई सदा ।।५६।। संतसंगतीत लाभे प्रीती । संतसंगतीत लाभे भक्ती । संतसंगतीत लाभे  गोडी । भक्ती वृद्धिंगत करण्याची ।।५७।। जैसी सुमने पडती मातीत । मातीही होतसे  सुगंधित । तैशी संतसंगतीची आहे गंमत । मने अमल होती त्वरित ।।५८।। परी पुलय्याने विचारला जो प्रश्न । काका कोण आहेत म्हणून । त्याचे उत्तर जाणून । उत्सुक जाहलो अंतरी ।।५९।। काही पूर्वपुण्याई असते म्हणून । इहजन्मी लाभे संतपण । सत्कार्य करण्या होती जन्म । मानवकल्याण साधावया ॥६०।। ईशकार्य बहुतेक संताच्या पाठीशी । पूर्वजन्माच्या असती पुण्यराशी । ईश्वरनिर्मितीच्या कार्याशी । संमिलित असती कोठेतरी ।।६१।। किंवा ईश्वरच पाठवितो संताना । आपल्या पूर्वनियोजित योजना । पूर्ण करण्या देऊनी आज्ञा । जन्म होती धरतीवरी ।।६२।। संस्कृतमध्ये होते गीताज्ञान । परि अज्ञानात राहिला सामान्य । ते गीर्वाण भाषेत लिहून । उपकार सामान्यावरी केले असे ॥६३।। हे कार्य केले ज्ञानेश्वरांनी । तैसेची कार्य केले रामदासांनी । वेदांचा अर्थ सांगितला तुकारामांनी । ‘ईश्वर इच्छा बलीयसी’ ।।६४।। दुर्वासांनी शाप दिला अंबरीषाला । तो स्वये विष्णूनी स्वीकारला । म्हणे जन्म घ्यावा वेळोवेळा । धरतीवरी दयाघना ॥६५।। त्यांच्या शापाशीर्वादाकारण । मानवास दिसले ‘श्री’ चरण । जन्म घेती श्री कार्याकारण । गर्भवास सोसती पुन्हा पुन्हा ।।६६।। श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती । स्वामी समर्थ, कृष्णसरस्वती । शंकरमहाराज, वासुदेवानंद सरस्वती । साई गजानन अनंत किती ।।६७।। श्रीकृष्णाने दिले अक्षय वचन । संभवा मी युगे, युगे म्हणून । ते संत चालविती जन्म घेऊन । गर्भवास सोसती आनंदे ॥६८॥ तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी । अशी संतांची सर्वसाक्षी । वचने जन्मती संतरूपे ।।६९।। मज काही संतांची  माहिती  । कैसी पूर्वजन्मीची स्थिती । अमलानंद होते नाथपंथी । अमलनाथ म्हणोनिया ।।७०॥ चंद्रकिरणस्वामी, कानळद्याचे । कण्वऋषी होते गतजन्मीचे । आमचे भाऊकाका बडोद्याचे । सुदामा होते अनंत जन्मापूर्वीचे ॥७१।। सर्व नवनाथ आहेत चिरंजीव । जन्म घेती ते कार्यास्तव । साईनाथ, गजानन, जानकी । अवतारी संतांच्या श्रेणीच या ॥७२॥ कोणी असती दत्तावतारी । कोणी हरिहर वा कृष्ण मुरारी । कोणी देवीचे रूपावधारी । परि ब्रह्म सर्व एकची ।।७३।। ऐशा या ब्रह्मसूत्राच्या माळेत । काका तेजस्वी मौतिक असावेत । अवतारकार्यास्तव प्रकटलेत । दत्तावतारी म्हणुनिया ।।७४।। त्यांचा जाणून घेण्या पूर्वावतार । मी प्रश्न विचारला सुंदर । स्वमुखाने दिले असे उत्तर । त्यांच्या शब्दांत पाहूया ।।७५।। “सिंधु नदीच्या परिसरात । माझा जन्म झाला खेड्यात । तिथल्या दुर्गादेवीच्या मंदिरात । माझी साधना झाली असे ।।७६।। पुढे पायी प्रवास करीत । मी आलो असे हिमालयात । तेथे ऋषी मुनींच्या संगतीत । ज्ञानार्जन प्राप्त झाले असे ।।७७॥ तेथुनी माघारी फिरलो परत । हिंदकुशाच्या आलो गावात । परि दंगलीने होऊनी त्रस्त । अफगाणिस्तानात आलो असे ।।७८॥ अफगाणिस्तानातून फिरत फिरत । आलो असे मी पाकिस्तानात । पाकिस्तानातून हिंडत फिरत । भारतात मी स्थिरावलो ॥७९।। तेथील ज्वालादेवीच्या मंदिरात । जे प्रसिद्ध आहे काश्मीरात । तेथील सुंदर झऱ्याचे संगतीत । वास्तव्य माझे झाले असे ।।८०॥ पूर्वी घनदाट होते अरण्य । आज वेदशाळा झाली असून । साधनेला उत्तम वातावरणात । आनंदात मी राहिलो असे ।।८१।। पुढे चार महिने हिमालयात । चार महिने भूतानात । चार महिने नेपाळात । असा मी फिरत असे ।।८२।। अशा प्रकारे फिरत राहून । माघारी परतसे फिरून । तेथे सहा आठवडे राहून । कालक्रम माझा राहतसे ।।८३।। फकीरदास बाबा म्हणून । मज ओळखितात तेथील जन । तिथे माझी समाधी असून । आजही जत्रा भरतसे ।।८४॥ एका पत्र्याचे झोपडीत । माझे स्थान आहे जागृत । भगवा झेंडा फडकत । ओंकारचिन्ह वरी असे ।।८५।। आजही त्या समाधीवरती । लोक श्रद्धेने ‘मन्नत’ मागती । त्यांच्या इच्छेची होतसे पूर्ती । लाल दोरा बांधती स्मृतीरूपे ॥८६।। माझे दुसरे स्थान आहे भूतानात । हिमालयाचे पायथ्यालगत । तेही प्रसिद्ध आहे जागृत । विविध पंथी येती दर्शना ।।८७।। तिथे एका शिळेवरती । माझी पदचिन्हे उमटली असती । तसीच घोंगडी व काठी । सांभाळली असे आजही ।।८८॥ आजही हे पवित्र स्थान । जन मानती परमपावन । केवळ जागृतीचे कारण । उत्सव, जत्रा भरतसे ।।८९।। आता जन्म लाभला भारतात । कार्यास्तव आलो उर्वरित । गुरूआज्ञेने झालो प्रवृत्त । शिरसावंद्य मानुनी” ।।९०।। ऐसे हे काकांचे पूर्वसुकृत । फलद्रूप जाहले इहजन्मात । देवदत्त नामे झाले प्रकट । सौभाग्य लाभले भक्तांना ॥९१।। सप्तऋषींची सांगितली कहाणी । अनेक दैवतांचे आशीर्वाद  म्हणोनी । कार्य करावे ‘देवदत्त’ या नावाने । सहकार सर्वांचा असेल ।।९२॥ शंकर महाराजांचीआठवण झाली । समाधीस्थाने जगात पसरली । तरीही रक्षिती भक्त खुशाली । बाहेर येती भूमीतून ।।९३।। स्वये जेव्हा होते वावरत । अनेक नावाने होते प्रचलित । सुपड्या बाबा सातपुड्यात । गौरीशंकर मध्यप्रदेशी ॥९४।। देवियाबाबा गुजरातेत । जॉनसाहेब युरोपात । एकाच वळी अनेक रूपात । उत्सवात हजर असती ते ।।९५।। संताच्या ऐशा अद्भूत लीला । वेदही जाणण्या पारखा झाला । तेथे मानवाच्या बुद्धीला । अतीत सारे वाटतसे ।।९६।। असो एकदा कामानिमित्त । बँगलोरला जाणे होते प्राप्त । त्यांच्या परतीच्या प्रवासात । विमानस्थळी थांबले असे ।।९७॥ किंगफिशर नावाचे होते विमान । त्याचे उशिरा होते उड्डाण । तेणे विश्रांतीचे कारण । काका बागेत बैसले ।।९८।। बॅग ठेवुनी मांडीवरती । स्वये विचारमग्न होती । एक मुलगा येऊनी पुढती । सन्मुख उभा राहिला असे ।।९९॥ हळूहळू त्यांचे पुढती । ऐशी पंचवीस मंडळी जमती । काकाचे लक्ष गेले त्यांचेवरती । प्रश्न विचारला क्या है? ॥१००। कानडी भाषेत बडबडती । उजवीकडे बोट दाखविती । काका वळून सहज बघती । आश्चर्य देखिले त्यांनीही ।।१०१।। एक नागिणीचे पिल्लू लहान । काकांना बैसले होते टेकून । त्यांचेकडे पाहे फणा काढून । बाळभावाने खेळतसे ॥१०२।। ते मांडीवरती होते फिरत । गर्दी पाहतसे ती गंमत । भयभीत होते सर्व मनात । उठा, पळा सांगती ते ।।१०३।। तोची एक पोलीस जवान । धावत आला बंदूक घेऊन । काकांनी त्याला अडवून । मारू नको सांगितले असे ।।१०४।। ते काकांकडे पाहे आनंदून । गर्दीकडे पाहे फूत्कारून । तैसे काका सांगती जावे निघून । सरसर निघून गेले असे ।।१०५।। एक वृद्ध व्यक्ती आली समोरून । ‘यू मस्ट बी ए गॉड मॅन’ म्हणून । काकांना वदली नमस्कार करून । ऐसे कधी न देखिले ।।१०६।। तोची फोटोग्राफर आला धावून । परि काका पळाले तेथून । परि याचा भाव घ्यावा जाणून । सर्वत्र समभाव जागला असे ॥१०७।। चराचरी अणूरेणूंत । ज्याचा ईश्वरभाव झाला जागृत । तो प्रत्यक्ष असतो भगवंत । वेगळे सांगणे न लगे ।।१०८।। 

तिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

 भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय सहावा गोड हा । 

 इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]