ChaitanyaGaatha

॥ श्री ॥ 

॥ अध्याय पाचवा

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ आता नमन शिरडीश्वराला । साईबाबांच्या पदकमला । ज्यांच्या ऐकून अनंत लीला । नतमस्तक झाले भलेबुरे ॥२॥ वाटे ब्रह्मा विष्णू महेश्वर । साई होऊनी आले धरणीवर । का पंढरीचा श्री रुक्मिणीवर । शिरडीमाजी अवतरला ॥३॥ सर्व प्राणिजात एकसमान । कोणी नसे सान महान । सर्व रूपे देवाची जाण । सर्वात्मक सर्वेश्वर दाखविला ॥४॥ श्रद्धा आणि सबुरी । याची वाजविली तुतारी । सबका मालीक एकच हरी । निक्षून सांगती भक्तांना ।।५।। प्रेमाची दिली शिकवण । गुरुभक्तीचे गायीले भजन । सेवाभाव दाखविला आचरून । जीव सेवा सत्य भक्ती ॥६॥ वरी दिले अभय वचन । समाधीचे घेईल जो दर्शन । त्याचा योगक्षेम चालवीन । रक्षील माझ्या सुभक्तांना ।।७।। जो जो माझा होईल मनोभावे । त्याचा होईन मी सर्वभावे । सांभाळीन तया प्रेमभावे । माय होईन लेकराची ।।८। ऐसी तुमची ऐकून कीर्ती । मी आलो घेऊनी विनंती । मज असावी आपुली अनुमती । संतचरित्र लिहिण्याची ॥९॥ आपल्या सत्कार्य प्रवाहात । संत झाले जे बहुत । त्यात श्री सद्गुरू देवदत्त । महाराज मजला भेटले ॥१०॥ त्यांचे सुंदर चरित्रगान । सुभक्तांस सांगावे म्हणून । माझा चालला असे यत्न । आशीर्वाद आपुला असावा ।।११।। ऐसा भाव मनात घेऊन । मी मनोमनी घेतसे दर्शन । चरणरज भाळी लावून । पुढील प्रकरण लिहीत असे ।।१२।। जे जे भक्त येती प्रश्न घेऊन । त्यांचे होत असे पूर्ण समाधान । परि काकांचे उत्तर ऐकून । आश्चर्य पावती मनोमनी ॥१३।। काका जे करावयास सांगती । त्याची मनात वाटतसे भीती । शंकेने होतसे भ्रमंती । प्रथमदर्शनी पटेची ना ॥१४॥ ऐसे कधी न ऐकिले पाहिले । कोण्या संतानी सांगितले । काका मज एकटेच की दिसले । विचित्र उपाय सांगणारे ।।१५।। कळे न कोणती आहे शक्ती । जी उपायांत दाखविते विसंगती । परि परिणाम पावती निश्चिती । भक्त सुखानंद पावती ।।१६।। एक माऊली आली दर्शनाकारण । आपुल्या उपवर कन्येला घेऊन । काका हे परक्याचे धन । कैसे उजवावे आम्ही हो ।।१७।। जिथे जिथे जावे घेऊन । अकल्पित अडचणी येती समोरून । नकाराची घंटा ऐकून । निराश अंतरी झालो असे ।।१८।। पत्रिका पाहिली तपासून । त्यात योग दिसती सुंदर छान । उत्पन्न होती आशेचे किरण । परि अंतिम विफलता लाभतसे ।।१९॥ चांगली चांगली स्थळे येती । परि किंचित कारणाने अडकती । कळे न काय असावी दैवगती । कृपया मार्गदर्शन करावे ।।२०।। काका सांगती हसून । एक प्रयोग पहावा करून । कोण मुलगा येईल समोरून । हिज पाहावया तुमचे घरी ।।२१।। हिच्या संगती हिची मैत्रीण । संगती असावी सोबतीण म्हणून । तिने पोहे यावे घेऊन । चहा आणावा वधूने ॥२२॥ ऐसे करिता वरसंशोधन । हिचे जमेल हो लग्न । तुमची काळजी मिटेल तत्क्षण । प्रयोग करून पाहावा ।।२३।। पुढे आठच  दिवसानंतर । एक स्थळ आले सुशिक्षित छान । मुलीच्या मैत्रिणीबरोबर । पाहण्याचा कार्यक्रम झाला असे ॥२४॥ मुलीला होकार आला मुलाकडून । आईचे आनंदाने भरले मन लोचन । काकांचे हे मार्गदर्शन । सौभाग्यदान ठरले मुलीला ॥२५।। ऐसे कैसे आले घडून । ऐसा विचारला असता प्रश्न । काकांचे उत्तर ऐकून । मलाही आश्चर्य वाटले असे ।।२६।। एखादे यंत्र चालविण्याकरिता । एक सेल टाकितो शक्तीकरिता । परी  तो अपुरा वाटे यंत्राकरिता । यंत्र न चाले मुळीच की ॥२७॥ दुजा लाविता त्याचे संगती । विद्युत जागृती होय कार्यापुरती । तैसीच आहे दैवसंगती । या मुलीची वाटतसे ॥२८॥ हिच्या लग्नयोगाची ग्रहस्थिती । कमी होती कार्यापरती । तिज मैत्रिणीची देता ग्रहशक्ती । हिची ग्रहशक्ती पुष्टावली ।।२९।। तेणे योग आलासे जुळून । अडचण गेली असे निघोन । मैत्रिणीच्या संगतीचे सेल वापरून । कार्यसिद्ध झाले असे ॥३०॥ आपल्या कन्येला घेऊन । एक पालक आले घेण्या दर्शन । काकांना विनम्र वंदून । कारण सांगती येण्याचे ॥३१॥ माझी कन्या आहे सुज्ञ । शिक्षणात आहे परिपूर्ण । परी परिक्षेमाजी लिखाण । होत नाही चांगले ॥३२।। सर्व तयारी होत छान । परि लिहिताना जाते विसरून । बुद्धीला येते  विस्मरण । अचानक कैसे कळे ना ।।३३।। परीक्षेत होते नापास । प्रत्येक वर्षीचा हा दोष । तिची पत्रिका आहे निर्दोष । शिक्षण आहे चांगले ॥३४।। आता ती फायनलला येईल । परि नापासचा शिक्का लागेल । भविष्य न होईल उज्वल । पदवीविना व्यर्थ आहे पुढती ।।३५।। काका पाहती न्याहाळून । पत्रिका पाहती तपासून । सर्व व्यवस्थित आहे छान । मग अडचण कोठे असावी ।।३६।। तोची त्यांच्या आले लक्षात । हिचे कपाळ आहे फटफटीत । आधुनिक विचारांच्या मुलीत । कुंकू लावणे मूर्खपणा ।।३७॥ तेव्हा काका सांगती हसून । एक कल्पना सांगतो छान । भाळी लाल टिकली लावून । परीक्षेस जावे तुम्ही हो ।।३८।। मुलगी थोडी झाली नाराज । परि नापासची वाटत होती लाज । तेव्हा दुसरा नव्हता इलाज । ‘हो’ म्हणाली निरिच्छेने ।।३९।। परीक्षा दिली टिकली लावून । तैसे आश्चर्य आले घडून । पहिल्याच प्रयत्नांत झाली उत्तीर्ण । नापासची परंपरा मोडली असे ॥४०॥ कपाळ नसावे फटफटीत । त्यावर गंध असावे सुगंधीत । टिकली, कुंकवाने सुशोभित । नित्य असावे ललाटी ।।४१।। जेव्हा सटवी येते जन्मदिनी । पाचवी पूजेच्या शुभदिनी । भविष्य जाते ती लिहुनी । कपाळावरती बाळाच्या ।। ४२।। शुभकार्याला जाता येताना । कुंकू लावुनी देतो शुभकामना । तेणे करू नये कधी विटंबना । कपाळी कुंकू लावण्याची ।।४३।। पूजाअर्चा मंगलकार्यात । कुंकवानेच होते सुरूवात । याला अर्थ असावा शास्त्रसंमत । कपाळी गंध-कुंकू लावण्याचा ।।४४।। कुंकू हे  ललाटीचे भूषण । कुंकू हे सौभाग्याचे लक्षण । कुंकू मांगल्याचे वरदान । देवदेवी स्वीकारती  प्रेमाने ।।४५।। अशीच एक कथा गमतीची । एक बाई ट्रॅव्हल कंपनीची । काकांचेकडे आली सकाळची । चिंता आपुली घेऊनिया ।।४६।। एक गाडी घेतली प्रवासाची । टाटा सुमो भारी किमतीची । प्रवाशांना वाटावी सुखाची । आरामदायी म्हणुनिया ॥४७।। परि गाडी घेतल्यापासून । ती नित्य बिघडते म्हणून । फायद्यापेक्षा खर्चातून । मी वरच येत नाही हो ॥४८।। रोजरोजचा बिघाड जाणून । माझे उतरून गेले मन । वाटे टाकावी गाडी विकून । धंद्यात तोटा होतसे ॥४९।। गाडी कोरी करकरीत । अजुनी नाही नेली प्रवासात । तोची अडचणींच्या कैचीत । कशी सापडते कळे ना ।।५०।। काका गमतीचा उपाय सांगती । म्हणे गाडीच्या नंबरपाटीवरती । लाल टिकली लावावी अतिप्रीती । द्वय बाजूला नंबरच्या ।।५१।। ऐसे पाहावे करून । काय परिणाम येतो घडून । मज सांगावे येऊन । पंधरा दिवसानंतर हो ।।५२।। बाई नाराज होती मनातून । जिथे दुरुस्तीचे असता कारण । टिकलीने काय येईल घडून । शंकित मनाने निघती त्या ।।५३।। काकांची ऐकून होत्या कीर्ती । टिकलीने घडेल का चमत्कृती । थोडी विश्वासाची झाली जागृती । टिकली लावली पाटीवर ।।५४।। पुढे तीन महिन्यांनी केला फोन । ‘काका टिकलीने दिला गुण’ । टिकली लावल्यापासून । गाडी सुरळीत चालत आहे ॥५५।। कधीही न अडली रस्त्यात । मुळी नच पडलो खर्चात । धंदा चालत असे फायद्यात । टिकलीने भाग्य खुलविले ॥५६॥ ऐसा हा टिकलीचा चमत्कार । काका जाणती कारण-उत्तर । आपणास तो फक्त शुभंकर । शब्द वाटे मोलाचा ।।५७।। पंकज जैन म्हणून । काकांचे मित्र सज्जन । त्यांचा आला असे फोन । अचानक एकदा घरी ।।५८।। वृद्ध आई पडली आजारी । डॉक्टर उपाय झाले सर्वतोपरी । ताप सतत राहतसे शरीरी । तीन महिन्यांपासून ।।५९।। अशक्त झाली असे खूप । तेणे सतत लागतसे झोप । बसल्यास लागतसे धाप । शरीर कंप पावतसे ॥६०॥ जोवरी न उतरेल ताप । तोवरी न लागेल भूक । शरीर शक्ती न येईल । चिंता मज वाटतसे ॥६१।। काका विचारती प्रश्न । वडिलांची काठी आहे का म्हणून । होकारार्थी हलविता मान । पुढील उपाय सांगती ॥६२।। म्हणे ती काठी घेऊन । आईच्या पथारीवर द्यावी ठेवून । ताप उतरेल तत्क्षण । चिंता मुळीच करू नये ॥६३।। शंका उत्पन्न झाली मनात । जे औषधाला झाले नाही प्राप्त । त्याची काठीला कैसी हिंमत । येईल ते कळेना ॥६४। परि मित्र जाणून होता महती । काकांची ती पराशक्ती । म्हणुनी ती वडिलांची काठी । पथारीवरती ठेवली असे ।।६५।। रात्री काठी ठेवली उशाशी । ताप उतरला दुसरे दिवशी । शक्ती आली तिसरे दिवशी । जेवणही जाऊ लागले ॥६६।। ऐसा काठीचा चमत्कार । तापाला आला उतार । शक्तीचा झाला संचार ।  आई पूर्ण बरी झाली असे ॥६७॥ काका उपाय सांगती विचित्र । कळे न काय आहे त्यांचे सुत्र । परि यश लाभतसे सर्वत्र । भक्त आनंदे सुखावती ।।६८।। एक बाई आल्या  स्थानात । प्रश्न घेऊनिया मनांत । काकांना बोलल्या चिंतेत । प्रश्न घरगुती आपला ।।६९।। आजपर्यंत होते सर्व चांगले । गुण्यागोविंदाने चालले । परि कळे न काय बिघडले । कटकटी होती घरांत ।।७०।। अगदी शुल्लक कारणावरून । भांडणे होती कडाडून । सर्व शांती गेली दुभंगून । घर भकास वाटतसे ।।७१।। मुलांचे लक्ष न लागे शिक्षणात । सारख्या उनाडक्या राहती करित । धंदाही नाही चालत । पैशाच्या अडचणी उद्भवती ।।७२।। आजवरी सर्व होते सुरळीत । कळे न कैसे झाले विस्कळीत । गोजिरवाण्या आमच्या घरात । केविलवाणे झालो असे ||७३।। काका बोलती विचार करून । तुमच्या कोकणातील गावाहून । तुम्ही माती आलात का घेऊन । ती कोठे ठेवली ते सांगावे ।।७४।। आम्ही आणली जी माती । कुंड्यात भरली उत्तम रीती । फुले बहरली पहा किती । व्हरांड्यात जी ठेविली ॥७५।। अहो त्या मातीतच आहे दूषण । तीच आहे दुःखाचे कारण । ऐसे कैसे म्हणता म्हणून । बाई नाराज झाल्या असे ॥७६।। आमच्या शेतावरची माती । भरघोस पीक देते समृद्ध रीती I  कैशी दोषयुक्त म्हणावी माती । मज पटत नाही हो ॥७७।। काका सांगती समजावून । नीट ऐकावे लक्ष देऊन । शेतात एक झाड आहे छान । सावलीत बसण्यासारखे ॥७८।। तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती । काळ्या विद्येची करितो प्राप्ती । विधी करीतसे झाडा खालती । दूषित भूमी झाली असे ।।७९।। जो दोष आला असे मातीत । ती तुम्ही आणली घरात । तो तुम्हाला त्रास देतो सतत । काळी करणी त्या व्यक्तीची ।।८०।। जोवरी माती आहे घरात । सुखशांती न लाभेल नशिबात । मलिन विद्येचा प्रभाव आहे मातीत । निर्णय तुम्ही घेणे असे ।।८१।। तैसी पूर्ण माती दिली फेकून । मुक्त झाली दुःखातून । सुखशांती आली परतून । काकांच्या या दूरदृष्टीने ।।८२।। वाटे काकांचे मार्गदर्शन । सुखशांतीला देणे आमंत्रण । विश्वासाने वंदावे चरण । श्रद्धा, भक्ती, निष्ठेने ॥८३।। काकांचे सन्मित्र पुण्याचे । शिक्षक होते शाळेचे । भेटण्याचे योग यायचे । महिन्यातून एकदा तरी ॥८४॥ एकदा त्यांचा आला दूरध्वनी । स्वरांत कंप आला दिसुनी । काका, भाची नये दिसुनी । कोठे हरवली कळेचिना ।।८५।। मज सांगावे सविस्तर । काय घडला असे प्रकार । मन शांत ठेवा स्थिर । घाबरू नका जराही ।।८६।। माझ्या घरी पुण्यास । भाची आली राहावयास । ती मंदिरात गेली दर्शनास । घराजवळील देवळात ।।८७।। ती गेली सकाळपासून । आता दूपार गेली टळून । आम्ही सर्वत्र पाहिले शोधून । प्रसंग बाका आला असे ।।८८।। ती दिसायला आहे सुंदर । सोळा वर्षांची सुकार । मनात येती  वेडे विचार । पळवली कोणी असेल का ।।८९।। घरातील सर्व गेले घाबरून । गावचे लोक आले धावून । माझा जीव गेला असे उडून । सहाय्यार्थ फोन केला असे ।।९०।। तिचे नाव काय म्हणून । काकांनी विचारला असे प्रश्न । आणि पाहती डोळे मिटून । तोची चित्र एक दिसतसे ॥९१॥ कौलारू घर येते दिसून । शेजारी स्कूटर आहेत दोन । एक लाल दुसरी काळी असून । भिंतीचा रंग निळा असे ॥९२।। परि हे घर कोठे असावे । त्याला कोठे कैसे शोधावे । ते मज मुळीच न ठावे । काका सांगती मित्राला ।।९३।। मज पुण्याची नाही माहिती । परि उंच रस्त्याचे वळणावरती । मज दिसतसे ती घराकृती । आत कन्या निजली असे ।।९४।। संपूर्ण पुणे झाले शोधून । परि तैसे न दिसले लक्षण । अंती निराश झाले म्हणून । पुनश्च फोन केला असे ॥९५।। मित्र आला रडकुंडीस । काका, शोधास आले अपयश । मज लागलासे गळफास । बंधूस उत्तर काय देऊ ।।९६।। म्हणे वर्दी द्यावी पोलिसात । सांगतो तसे करावे त्वरित । मुलीचा कपडा घेऊनी हातात । देवासन्मुख ठेवावा ॥९७।। तो भिजवुनी घ्यावा पाण्यात । न पिळता घालावा वाळत । मंत्र म्हणावा होऊनी ध्यानस्थ । तासातच कळेल बातमी ।।९८।। तो कपडा वाळेपर्यन्त । मुलगी आलीच पाहिजे घरात । मन ठेवुनिया शांत । हा प्रयोग करावा तुम्ही हो ॥९९।। काकांचे वरती ठेवुनी विश्वास । सुरूवात केली प्रयोगास । पार न राहिला आश्चर्यास । कन्या सुखरूप आली असे ॥१०॥ तासाचे आतच आलेल्या मुलीस । प्रश्न विचारला, कोठे होतीस । मज आठवतच नाही खास । कैसी रस्ता चुकले मी ॥१०१।। मी रडत असता घराशेजारी । घरातून आली एक म्हातारी । घरात गेले मी तिजबरोबरी । रस्ता चुकल्याचे सांगितले ॥१०२।। माझी मुलगी गेली कामावरी । ती सायंकाळी येईल घरी । तुला पाठवीन तिजबरोबरी । तुझ्या घरी सुखरूप ।।१०३।। तिने मला जेवू घालून । निश्चिंत झोपविले छान । काळजी करू नको म्हणून । वारंवार समजाविले ।।१०४।। तिची कन्या येता घरात I  मज घेऊनी आली सोबत । तिचे आभार मानावे साक्षात । सुखरूप घरी आली असे ।।१०५।। आनंदाने केला असे दूरध्वनी । काकांचे आभार मानले मनोमनी । काका मुलगी आली परतोनी । चिंतामुक्त झालो असे ।।१०६।। तुमच्या प्रयोगाला आले यश । माझा  जिवंत झाला श्वास । नाहीतर आयुष्यभराचे अपयश । शिरी लागले असते हो ।।१०७।। ऐसे सांगता हे चरित्रकथन । हृदय आनंदाने येते भरून । श्री दत्ताची कृपा जाणुन । वंदन भक्तिभावे करीतसे ॥१०८।। 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय पाचवा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु I शुभं भवतु श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]