ChaitanyaGaatha

॥ श्री ॥

॥ अध्याय चवथा ॥

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। जय जय स्वामी समर्था । भक्तहृदय साम्राज्य विधाता । संतविभूतीचा उदयकर्ता । परात्पर गुरू तुम्ही सर्वांचे ॥२॥ कर्दळी वनांत होऊनी जागृत । भक्तहिताची आस मनात । भ्रमण करुनी पूर्ण भारतात । अक्कलकोटी स्थिरावलात ।।३।। ‘भिऊ नको बाळा म्हणून । भक्तांना दिले अभयाचे दान । तुमच्या पाठीशी उभा राहीन । संरक्षिन मी वंशोवंशी’ ।।४।। तुमच्या वचनावर विश्वासून । भक्त निश्चिंत झाले मनांतून । आनंदाने जगती जीवन । अक्षय वचन श्री दत्ताचे ॥५।। कधी न केली भक्तनिराशा । सदैव पुरविली भक्त शुभेच्छा । सन्मार्गाच्या दाखविल्या दिशा । भक्तिमार्ग प्रदीप्त केला असे ॥६॥ भक्तांचे होऊनी माय-तात । लालनपालन केले अतिलाडात । संसारातुन केले भयमुक्त । भक्ति वैभवात बसविले ।।७।। संसारातून परमार्थात । कैसे व्हावयाचे मार्गस्थ । हा भक्तीचा सोपा सिद्धांत । नामसाधने शिकविला ।।८।। तुमचे अनेक शिष्योत्तम । स्वामिकृपेने पावले परधाम । काहींनी पाहिला आत्माराम । चरणकमळे सेवेने ।।९।। माझी मात्र विनम्र विनंती । श्री चरणरज लावितो ललाटी । माझ्यावर असो अमल प्रीती । कार्य सिद्धीस न्यावया ।।१०।। आपली इच्छा वंदनीय मानून । आपल्या आदेशाचे करितो पालन । पुढील चरित्राचे करितो विवेचन । भक्तीयुक्त अंतःकरणाने ।।११।। असो, मागील अध्यायी पाहिले । काकांचे सांगणे वेगळे । त्यातून अर्थ निघती निराळे । तर्कातीत जणू वाटतसे ।।१२।। एखादी वस्तू वा प्राणी । घरांत असती म्हणुनी । कैसे भाग्याला आणती अडचणी । वा वैभवास कारण होतील ।।१३।। हा विचार जरी नाही पटला । तरी त्याचा अनुभव मात्र आला । हीच काकांची वाटतसे लीला । विचित्र उत्तरे देण्याची ।।१४।। अशीच एका कुटुंबाची कथा । आपल्या सांगती दुःख व्यथा । काकांच्या येती दर्शनाकरिता । प्रश्न विचारला आशेने ।।१५।। म्हणे, असंख्य आहेत अडचणीत । दुर्दैवाने केली मात । पैशांची सोय नाही होत । फासे उलटेच पडती ।।१६।। पूर्वी दिवस होते चांगले । वाटे भाग्य आपुले स्थिरावले । परि कळे न काय बिघडले । दिवस फिरले कसे हो ।।१७।। त्यांच्या डोळ्यात आले पाणी । काकांचीही ओलावली पापणी । परि त्यांना शांत करोनी । उपाय एक सुचविला । म्हणे कुत्र्याचे पिल्लू आणुनी । त्याला पाळावे लाडानी । तुमची ही दुःखद कहाणी । सुखद होईल निश्चित ।।१९।। अहो, मस्करी करिता का म्हणून । काकांना बोलती ते सज्जन । असे अडचणींचे निरसन । श्वानपिल्लू करेल का ।।२०।। तरीही काका सांगती हसून । प्रयत्न कराव विश्वासून । आठच दिवसांनी येऊन । मज सांगावे उत्तर ।।२१।। शेवटी काकांचेवरती विश्वासून । एक पिल्लू आले ते घेऊन । त्याला प्रेमाने सांभाळले आठ दिन । अनुभव सुंदर आला असे ।।२२।। आठच दिवसानंतर । परिस्थितीत झाला सुधार । पूर्वपदावर आला व्यवहार । कुत्र्याने भाग्य दिले असे ।।२३।। काकांना करिती नमस्कार । म्हणे पिल्लाने केला चमत्कार । विश्वास केला तुमचे शब्दावर । चिंतामुक्त झालो असे ।।२४।। ऐसे हे काकांचे असे सांगणे । संभ्रमात आपणास पाडणे । न ऐकल्यास होते उणे । तर ऐकल्यास फल पावणे ।।२५।। अशीच एक अन्य गोष्ट । ऐकता वाटेल गंमत । मनात व्हाल आश्चर्यचकित । अशक्य शक्य होतसे ।।२६।। सुखवस्तू घरातील तिघेजण । काकासन्मुख बैसले येऊन । मोठ्या मुलास आले घेऊन । भविष्य त्याचे जाणावया ।।२७।। हा मुलगा सुशिक्षित असून । नोकरी न येते कोठे जुळून । लग्नाचे वयही जाते निघून । यत्न असफल झाले पहा ।।२८।। तैसे ते न्याहळून पाहती । म्हणे तुझ्या कोण्या पायावरती । डाग आहे का विचारती । तैसा तो चपापला मनात ।।२९।। जैसी पॅन्ट केली असे वरती । कोडाचे डाग स्पष्ट दिसती । त्वरित त्याला विचारती । मांजर मारल्याचे स्मरते का ।।३०।। तैसे खजील झाला मनातून । अपराधाची झाली जाण । आठवले माझे लहानपण । मावशी घरी असताना ।।३१।। तेथे एका मांजराला । धोंडा फेकून मारला । जरी गंमत वाटली त्यावेळेला । आज दुःख होतसे ।।३२।। त्या आत्म्याचा शाप म्हणून । ही डागाची आहे खूण । जोवरी न होईल निराकरण । तोवरी लग्ननोकरी अशक्य रे ।।३३।। तैसे खिन्न झाले मनातून । अणूंची धार लागली नयनातून । कैसे मुक्त व्हावे शापातून । उपाय काका सुचवावा ।।३४।। नरसोबावाडीस जाऊन । श्री दत्तात्रयांना जावे शरण । अपराधाची कबुली देऊन । क्षमायाचना करावी ।।३५।। त्यांच्या स्नानाचे तीर्थ घेऊन । तांब्यात आणावे ते भरून । नित्य थोडे बादलीत टाकून । स्नान करावे प्रतिदिनी ॥३६।। डाग हळूहळू कमी होईल । तैसे भाग्य हळूहळू उमलेल । परि किंचीत डाग राहील । शापस्मृती असेल ती ।।३७।। पुढे तैसेची आले घडून । दत्तकृपा लाभली म्हणून । त्यांचे सावरले जीवन । काकांच्या या मार्गदर्शने ।।३८।। तिसऱ्या कथेची सांगतो गंमत । कैसा नकळत घडतो अपराध । आपणास नसते सूयरसुतक । परि पातक न सोडते कुणाला ॥३९॥ पाय पडता ठिणगीवरती । चटका देणारच निश्चिती । तैसी आहे पापाची प्रकृती । नकळत कृती घडलीया ।।४०।। एक बाई आल्या काळजी घेऊन । पूर्वी परिस्थिती होती छान । आनंदात होते भाग्यवान । जीवन सुखमय वाटतसे ॥४१॥ वाटे ईश्वराची कृपा म्हणून । सर्व ईच्छा झाल्या परिपूर्ण । होते सर्वत्र सुखसमाधान । आनंदात होतो आम्ही की ।।४२।। परि कळे न काय घडले । वाटे दिवस थोडे फिरले । चिंतेने आम्हास घेरले । ओहटी लागली सुखाला ॥४३।। वाटे घराचे वासे फिरले । ग्रहांनी नशिबाला घेरले । जे जे होते भले चांगले । दृष्ट लागली वाटतसे ॥४४।। कळे न काय चुकले । कोणते अपराध हातून घडले । वा कोणी नजरबंद केले । भविष्य आमुचे मत्सरे ॥४५।। तेव्हा काका सांगती हसून । एक दृश्य येते दिसून । मांजरीला लाथ मारून । हाकलले होते का सांगावे ॥४६॥ होकारार्थी मान हलवून । एक पिल्लू येतसे घरातून । लुडबुड करीतसे पायात येऊन । तीज लाथेने बाहेर फेकले असे ॥४७।। इथेच चुकलात म्हणून । काका स्पष्ट सांगती उद्देशून । ती लक्ष्मीच होती संपूर्ण । स्वये ढकलली बाहेर ।।४८।। तुम्ही लक्ष्मीला मारली लाथ । तेणे ती झाली असे कोपिष्ट । कैसी देईल ती साथ । मांजरीचा शाप आहे हा ॥४९॥ बाई हळहळती मनात । कैसे अवधानाने घडले पातक । आता कैसे होईल ते समाप्त । कृपया मार्ग सुचवावा ।।५०।। आता मांजर आले दिसून । तिला घरात आणावे गोंजारून । दूध पाजावे बशी भरून । लाडे प्रतिपाळ करावा ॥५१॥ अपराधाची क्षमा मागून । श्री लक्ष्मीचे करावे आराधन । मांजराच्या माध्यमातून । कृपा भाकावी देवीची ।।५२।। मांजराचा आत्मा होईल प्रसन्न । तुमचे होईल पापविमोचन । पूर्वीचे दिवस येतील परतोन । कोण्या जिवास दुखवू नये ।।५३।। पुढे तैसेची आले घडोन । हळूहळू पातले त्यांना सुदिन । कुण्या जिवाचा न करावा अवमान । बोध ऐसा घ्यावा हो ।।५४।। काका जे जे काही सांगती । जरी वाटल्या गमतीजमती । त्यातून काहीतरी सुचविती । बोध घ्यावा प्रत्येकाने ।।५५।। संत न बोलती फोल । संताचे शब्द असती अनमोल । त्याचा अर्थ असतो खोल । द्वयर्थी बोलती जाणावे ।।५६।। अशीच एक गोष्ट तिसरी । दोन मित्र आले बरोबरी । पैकी एकास होती नोकरी । दुसरा बेकार वाटतसे ।।५७।। त्याने काकांना केला नमस्कार । देवा, कृपा करा पामरावर । नोकरीविना झालो बेजार । प्रयत्न थकले सर्व हो ।।५८।। देवासही केल्या प्रार्थना । परि कोणास न येई करुणा । माझी होतसे अवहेलना । घरीदारी समाजात ।।५९।। वाईट विचार येती मनात । ते मित्राला होतो सांगत । तो घेऊनी आला तुमच्याप्रत । अगतीक झालो मनोमनी ।।६०।। परि काका सांगती मित्राला । लाथ मारली होती कुत्र्याला । जो दुःखाने अतीकळवळला । स्मरते का असे काही ।।६१।। प्रथम नकार दिला म्हणून । मित्राने करून दिली आठवण । पंधरा दिवसांपूर्वीचा प्रसंग सांगून । स्मृती जागृत केली असे ।।६२।। मी माझ्या विचारात होतो चालत । तेंव्हा एक कुत्रा आला भुंकत । त्याला लाथ मारली मी पोटात । रागाच्या भरात तेव्हा हो ।।६३।। तो बराच वेळ होता कळवळत । जमिनीवर होता लोळत । मी मनात झालो भयभीत । घटना मज स्मरते हो ।।६४॥ त्या कुत्र्याने तुला दिला शाप । हेच नकळत घडले पाप । आता यावर उःशाप । सांगा देवा झडकरी ।।६५।। मला कुत्र्याची वाटतसे भीती । चावल्यास काय होईल गती । म्हणुनी मी श्वानसंगती । टाळत असतो सावधाने ।।६६।। ते योग्य जरी असले काही । ते टाळण्याची ही पद्धत नाही । जरी दया न वाटली काही । झिडकारू नका प्राण्याला ।।६७।। प्राणिमात्राला असते ज्ञान । कोण कैसे वागतो समोरून । सर्व भाव येतात त्यांना कळून । निसर्ग देणगी असे ती ।।६८।। त्याच्या या शापाकारण । तू भटकत आहेस रे वणवण । जोवरी त्याचे न होईल शमन । नोकरी अशक्य बाळा रे ।।६९।। तुज उपाय सांगतो छान । एक कुत्रा आणावा शोधून । त्यास दूध पाजावे बशीतून । सात गुरुवारपर्यंत रे ।।७०।। त्याचे पिणे होईपर्यंत । त्यास जवळ घ्यावे गोंजारून । क्षमेची जाण ठेवावी मनांत । माफी मागावी मनोमनी ॥७१।। ऐसे गुरुवार भरता सप्त । तू होशील शाप मुक्त । आठव्या गुरुवारी सुरळीत । होईल सर्व चांगले ॥७२।। तैसे त्याने केले विश्वासून । आठवा गुरुवार आला भाग्य घेऊन । आनंदाने आला पेढे घेऊन । श्रद्धाभक्ती दृढावली ।।७३।। दुसरी कथा एका जोडप्याची । व्यथा सांगती व्याधीची । पत्नि सांगतसे पतीची । पाठ दुखतसे भयंकर ।।७४।। औषध-उपचार झाले बहूत । एक्सरे काढले अमित । हाडाचे डॉक्टर झाले निष्णात । शेकलेप झाले वैद्यांचे ।।७५।। रात्ररात्र राहती तळमळत । उठण्याबसण्याची होते हालत । झोपही नाही लागत । शांतता नाही जिवाला ।।७६।। जोवरी दुःख आहे पाठीत । तोवरी लक्ष नाही लागत । देवाचे नाव नाही सुचत । चित्त भ्रमिष्ट होतसे ।।७७।। अखेरचा उपाय म्हणून । आम्ही धरिले तुमचे चरण । विश्वासुनी आलो आशा घेऊन । उपाय काही सुचवावा ।।७८।। घरी कुत्रा आहे का म्हणून । काकांनी विचारला त्यांना प्रश्न । आहे म्हणुनी सांगती हसून । लॅबरॉन जातीचा आहे तो ॥७९॥ येथून घरी गेल्यावरती । तूप चोळावे त्यांचे पाठीवरती । कुत्र्याला न्यावे पाठीसंगती । पाठ चाटेल का बघावे ।।८०॥ जर त्याने पाठ चाटली । तर समजा व्याधी गेली । जर त्याने नाही चाटली । तर पाठ न थांबेल कशानेही ।।८१।। ऐसा तोडगा ऐकून । दोघांचे झाले समाधान । परि शंकेने घेरले मन । कुत्रा ऐसे करेल का? ॥८२।। काकांचेवरती विश्वासून । तूप चोळले पाठीवरून । कुत्र्याला आणले बोलावून । पाठीजवळ पतीच्या ।।८३।। कुत्र्याने पाहिले हुंगून । मालकाच्या दुःखाची झाली जाण । पटापट गेला पाठ चाटून । शेपटी हलवून आनंदाने ।।८४।। आणि आश्चर्य आले घडून । हळूहळू दुखणे गेले पळून । काकांच्या तोडग्याने दिला गूण । विनम्र चरणी झाले ते ।।८५।। कधी घडती गमती जमती । जैसे प्रश्न तैशा रीती । काकांच्या वेगळ्या पद्धती । नवल वाटतसे ऐकताना ।।८६।। एक दांपत्य आले विश्वासून । उपवर कन्येला घेऊन । म्हणे योग कधी येती जुळून । कृपया पत्रिका बघावी ॥८७।। कन्या सुविद्य आणि रूपवान । नोकरी आहे उत्तम छान । पत्रिकेचे दाखवुनी कारण । नकार लाभे सर्वत्र ॥८८॥ उपवासतापास केले बहुत । व्रतवैकल्ये केली अमित । कोणाचीही न लाभे साथ । नशिबी योग आहे का ।।८९।। वरसंशोधन केले बहूत । परि निराशा आली पदरात । तुमची कीर्ती ऐकून बहुश्रुत । आशा घेऊनी आलो असे ।।९०॥ एक उपाय सांगतो गमतीचा । तुम्ही तो करून बघायचा । मज वाटतसे तो खात्रीचा । विश्वासुनी माझ्यावरी ।।९१।। संध्याकाळची वेळ साधून । आईने बोलावे कन्येलागून । किती दिवस राहणार अजून । आमचे घरी अशीच तू ॥९२।। आता जावे तू निघून । आपल्या घरी आनंदून । तैसे दुसऱ्याने ‘तथास्तु’ म्हणून । त्वरित उच्चारावे शब्द हे ॥९३।। याने काय होईल म्हणून । शंकेने विचारले कारण । आठच दिवसांत येईल दिसून । कारण या प्रयोगाचे ।।९४।। कन्या येता नोकरीवरून । आईने उच्चारले वरील वचन । भावाने ‘तथास्तु’ म्हणुन । कौल दिला यशाचा ।।९५।। जे पाहिले होते स्थळ ठिकाण । त्यांचा होकार आला समोरून । आठव्या दिवशी साखरपुडा करून । लग्न नंतर झाले असे ।।९६।। डॉ. जोगळेकर म्हणून । चिपळूणचे असती सज्जन । त्यांचा फोन आला समोरून । अचानक एकदा काकांना ।।९७।। माझी मुलगी सात वर्षाची । तापाने फणफणलेली असायची । शर्थ झाली माझ्या उपायाची । कारण सापडत नाही हो ।।९८।। सर्व पाहिले असे तपासून । गोळ्याही पाहिल्या बदलून । एक्सरेही झाले पाहून । ताप तिचा उतरत नाही ।।९९।। तुमची झाली असे आठवण । म्हणुनी केला असे फोन । लक्षात येते का कारण । सांगणे शक्य आहे का ।।१००।। अहो, तुमच्या अंगणात । भेंड्याचे आहे का झाड । कुठे आहे ते पाहून । मज सांगावे हो त्वरित ।।१०१।। तैसे डौक्टर सांगती घाईत । झाड आहे मागील अंगणात । त्याला भेंडी येतात छान । मोठे झाड आहे ते ।।१०२।। तीन भेंड्याची जुडी करून । मुलीच्या डोक्यावरती धरून । एका फटक्यात टाकावी तोडून । फेकून द्यावी बाहेर ।।१०३।। ऐसे पहावे तुम्ही करून । निःशंक असावे मनातून । प्रयोगाचे विचारू नये कारण । अनुभव घ्यावा इतुकेच ॥१०४।। जेव्हा आपले प्रयत्न फसती । तेव्हा दुसऱ्याची घ्यावी मती । ही शहाणपणाची युक्ती । सामान्यपणे आचरावी ॥१०५॥ डॉक्टर प्रयोग पाहती करून । त्या रात्रीच आला गुण । संपूर्ण ताप तिचा उतरून । खडखडीत बरी झाली असे ।।१०६।। जे न लाभले औषधाने । तेच लाभले आशीर्वादाने । काकांच्या या तोडग्याने । जोगळेकर समाधान पावले ।।१०७।। ऐसी ही देवदत्त महती । सांगता नाचे माझी मती । त्यांचे पायी ठेवा अमल प्रीती । नतमस्तक व्हावे भक्तीने ।।१०८॥ 

इतिश्री भाऊदासविरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत संतृप्त । अध्याय चवथा गोड हा । 

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु | शुभं भवतु श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]