ChaitanyaGaatha

।।श्री।।

।।अध्याय तिसरा।।

  श्री गणेशाय नमः I  श्री सरस्वत्यै नमः I श्री कुलदेवतायै नमः I  श्री गुरुभ्यो नमः II १ II  जय जयाजी दत्तात्रेया I अनंत नमने  तुझीया  पाया I तुमची  अपरंपार माया I  मज  लाभावी वाटतसे II २ II तुम्ही दयेचे महासागर I आदिमाया तुमचा संसार I आमची नाव एैल तीरावर  I दोलायमान होतसे II ३ II तुमच्या संसार सागरावर I माझी  नाव डोलते वाऱ्यावर I  तिला न्यावे पैलतीरावर I  अभयकर शिडाने  आपल्या II ४ II  आपला  असता अभयकर I  आमचा स्थिर  होईल संसार  I नामांमृताचा मनावर I अखंड ध्यास लागावा II ५ II  संत आम्हास सांगती I  तुमच्या नावात पुण्यप्राप्ती I परि  आमची शंकित मती I भ्रम  चक्रात अडकते II ६ II  आम्हा  मुळी न कळते I पुण्य झिरपते पाप वाढते I  सर्व ज्ञानांधकारात  जाते I कर्मात गुंततो संचिताच्या II ७ II तुमचे पायी जडावा  विश्वास I  तुमच्या नामात रमवा  श्वास I  तुमच्या प्रेमाचा लागो ध्यास I आलिंगन द्यावे भक्तांला II ८ II  तुमचे पवित्र गुरुचरित्र I  सुखी संसाराचे सूत्र  I वाचन करीत असे पवित्र I  श्रद्धाभक्ती  दृढावते II ९ II श्री गिरिनारी  पर्वतावर  I देवदत्तास  दाखविला अभयकर I  दर्शन देऊनी त्यांचेवर I  कृपा ओपली  तुम्हीच तुम्हीच ना II १० II तुम्हीच या कथेचे सूत्रधार I श्री देवदत्ताचे शुभंकर  I तुमच्या वरती वाहुनी भार I  सत्कर्म सिद्ध झाले असे II ११ II  तरी मजकरवी घ्यावे लिहून I  देवदत्तांचे  चरित्र गुणगान  I तुमच्या पायाचे करुनी स्मरण I  पुढील अध्यायी वळतसे  II १२ II असो,  पार्लेश्वराचे मंदिरात I  काका नित्य होते बैसत I  प्रश्नार्थी येती बहुत संख्येत I  गर्दी अधिक वाढतसे II १३ II  तैसे  मंदिराचे विश्वस्त  I गर्दीला घेती हरकत  I उपाय होता एकच फक्त  I अन्य पर्याय शोधण्याचा II १४ ii  उत्कर्ष मंडळ  म्हणून I  पार्ल्यात आहे  प्रशस्त छान I  तो हॉल  घेती भाडे देऊन  I मर्यादित वेळेपुरता हो II १५ II  प्रत्येक गुरुवारीच्या दरबारी  I  काकांची बैसतसे श्री स्वारी I  भक्तांची चालत असे प्रश्नोत्तरी I  सुखसंवाद चालत असे II १६ II ऐशा  सुख संवादातून I लोकांचा मानस  येई दिसून I  चिंतेने ग्रासलेले तनमन I प्रफुल्लित होऊनि जातसे II १७ II  काका  महाराज म्हणून I  भक्तीयुक्त करिती  वंदन  I मनीचा भाव सांगून I हृदय मोकळे करती ते II १८ II  काकांची प्रसन्न मुद्रा पाहून I  एक विश्वास होई उत्पन्न I त्यांच्या शांत डोळ्यातून I करुणा ओसंडून वाहतसे II १९ II  कधी सुरुवार  झब्यात I  कधी विजार  साधा शर्ट I काका प्रसन्न शांत मुद्रेत I आकर्षक वाटती मनाला II २० II त्यांचे प्रेमळ हसून बोलणे I  विश्वासाने समजून घेणे I  हे तर वाटे दैवी देणे I  गुरुकृपे प्राप्त झाले असे II २१ II तेणे भक्त  सुखावती मनात I भाव दाटतसे आदरयुक्त I गुरु परी  ध्याती अंतरात I  गुरुभक्ती जागतसे  II २२ II परि  काकांचे सांगणे विक्षिप्त I  मनास न पटे ती गोष्ट I वास्तुशास्त्रात वाटे विसंगत I आश्चर्य मनी वाटतसे II २३ II  एक निवेदिता दुर्वे  म्हणून I  काही अडचणी येती  घेऊन I  वरी उपाय सांगावा म्हणून I काकांच्याकडे येती  आदरे  II २४ II  म्हणे निळा गणपती काढावा शोधून I  तुझ्या घरात बैसला लपून I  त्याचे त्वरित करावे विसर्जन  I अडचणी दूर होतील  II २५ II  हि विपरीत ऐकून गोष्ट I  निवेदिता पडली  विचारात I  वाटे खोटे असावे बोलत I श्री विघ्नहर्ता कैसे होईल II २६ II तरीही घरात पाही  शोधून I कोठे लपले श्री गजानन I तोची  कपाटावर निळे ध्यान I स्टिकर होते लावलेले II २७ II  क्षमा मागुनी  केले विसर्जन I तोची विचित्र  आले घडून I  हळूहळू सुटती अडचणीतून I  संसार सावरला ऐसा की  II २८ II गणपतीचे निळे ध्यान I कधी न ठेवावे घरातून I  ऐसे  काकांचे मनातून I  सांगणे असावे वाटतेसे  II २९ II  स्मिता नकाशे  यांनी I  सांगितली एक कहाणी I  त्यांच्या बाल मैत्रिणीने I  नवीन घर घेतले असे II  ३० II नव्या घरात जाताना I  काही वस्तू दिल्या शेजाऱ्यांना I  नव्या घराच्या नव्या योजना I  अडगळ  नको म्हणुनीया II  ३१ II  नव्या घरात आल्यावरती I अडचणीवर  अडचणी येती I  वाटे की या वास्तूसंगती I दोष असावा वाटतसे II  ३२ II  वास्तू असावी निर्दोष I  राहणाऱ्याची पुरवावी हौस I  भाग्यही यावे उदयास I  घराला घरपण देणारे II ३३ II  जिथे मनाला लाभेल शांती I उद्या येईल प्रीती  I तीच खरी  वास्तुशांती I  माझे पणाचा अभिमान असावा II ३४ II  हिरमुसली ती मनातून I  म्हणे इतके पैसे खर्चून I  वास्तू बांधली सुंदर छान I  परि भाग्यास  विपरीत झाली असे  II ३५ II  तेव्हा काकांचे आली  जवळ I  मनातली सांगितली तळमळ I  काका हळुवारे बोलती प्रेमळ I प्रसंग सांगती उकलून II ३६ II  तुम्ही जुने घर बदलताना I काही वस्तू दिल्या शेजाऱ्यांना I त्यात खलबत्ता होता जुना Iकामवालीला दिला असे  II ३७ II  तो मागून आणावा परतून I  त्यात भाग्य पडले अडकून I  तो पुनश्च आणता जाण I अडचणी निघून जातील II ३८ II  आश्चर्य आले घडून I जे  खलबत्त्यात पडले होते अडकून I  ते भाग्य लाभले परतून I  मैत्रीण कुशल क्षेमात  रंगली  II ३९ II  अशोक पाटील म्हणून I  गृहस्थ आले डोंबिवलीहून I  मनात काळजीने ग्रासून I  सन्मुख पुढती काकांच्या II ४० II  बरेच केले वरसंशोधन  I परी काही न आले जुळून I चिंतेने निघालो पोळून I  चपला झिजवल्या पुष्कळ II ४१ II मम  कन्या सुंदर छान I  परी लग्न न येते  जुळून I  पत्रिका आलो असे घेऊन I  योग पाहावा आहे का II ४२ II  रीडिंग घेतो म्हणून I काकांनी हात घेतला ओढून I  तो स्वहातावर  ठेवून I मंत्र पुटपुटला मनात II ४३ II  स्वहाताचे करुनी दर्पण I  काही चित्र पाहिल्याची झाली  जाणं I त्वरित बोलती ते हसून I  एक उपाय मज  दिसतसे II ४४ II  अशोक आनंदला मनातून I कोणता म्हणून ओरडला आनंदुन I चाळीस गावाला जावे धावून I उपाय सांगतो तो करावा II ४५ II चाळीस  गावातला का म्हणुन I  विचारता झाला तो प्रश्न I परी  तो नाही म्हणून I  काका सांगते झाले की  II ४६ II चाळीस गावात जावे लौकर I  तेथे घोड्याचे आहे मंदिर I  मुलीचे नाव लिहावे चिठ्ठीवर I अश्वपदी  बांधावी  ती II ४७ II उपाय ऐकून झाला स्तिमित I  कधी  न गेलो चाळीसगावात I परी हा उपाय वाटे विक्षिप्त I विश्वास अंतरी बैसेना II ४८ II  पत्नीस सांगितली हकीकत I म्हणे ही तर सोपी रीत I उदयीक जावे चाळीसगावात I उपाय करुन पहावा II ४९ II  पत्नीचा विश्वास जाणून I  अशोक आलासे  जाऊन I चौकशी अंती काढले शोधून I अश्व मंदिरं गावातले II ५० II वासंतीचे  नाव लिहून I  चिठ्ठी  पायात दिली बांधून I  तो रात्रीच आला  परतून I निराश मनाने घरात II ५१ II  तोची पत्नी आली घेऊन I थंड पाण्याचा पेला भरून I  हसत उत्तरलीसे  वचन I अहो, गोड बातमी आहे छान II ५२ II  गेल्या आठवड्यात पाहीलेले I प्रमिलाबाईने दाखविलेले I जे  स्थळ आहे चांगले I त्यांचा होकार आला असे II ५३ II  हे गोड वाक्य ऐकताचि  अशोक झाला अचंबित I  अश्वकृपेची  आश्चर्यचकित I  किमया कैसे घडली असे II ५४ II काकांचे मानले आभार I  म्हणे वरात काढीन घोड्यावर I अश्वकीर्तीचे  सत्कार  I  लग्नात करीन प्रेमाने II ५५ II  एक बौद्ध धर्मीय मुलगा I एसएससी  पर्यंत शिकलेला I काकांच्या दर्शनाला आला I हताश  मनस्थितीत II ५६ II  खूप खूप प्रयत्न करून I  वशिलाही पाहिला लावून I परि  व्यर्थ झाले सर्व यत्न I नोकरी न मिळे अभाग्याला II ५७ II  कुटुंबाचा सर्व भार I आहे माझ्या शिरावर I चिंतेने झालो बेजार I  काय नशिबी लिहिले असे II ५८ II माझ्या खडतर नशिबात I काही सौख्य आहे का दिसतं I का भोगाच्या चक्रव्यूहात I भटकत राहणे असे का II ५९ II  त्याला करुनीया  शांत I  दिलासा दिला गोड शब्दात I सर्व होईल सुखाप्रत I  निराश अंतरी होऊ नये II ६० II दादरच्या चैत्यभूमीवर I आंबेडकरांच्या समाधीवर  I अकरा  मेणबत्त्या लावुनी लौकर I घरी जावे शांतपणे II ६१ II  जरी  उपाय न पटला मनांतरी I  विश्वास ठेवुनी  काकांचेवरी I चैत्यभूमीला गेला झडकरी I अकरा  मेणबत्त्या लाविल्या II ६२ II  पंधरा दिवसानंतर त्याला I बेस्ट कंपनीचा कॉल आला I  मनात  तो अति सुखावला I  काका दैवत जाहले II ६३ II आज तो  ड्रायव्हर म्हणून I कायम झाला असे नोकरीतून I  काकांचे आयुष्यभराचे ऋण I कैसे विसरेल  सांगा हो II ६४ II  महेश नेवरेकर म्हणून I  निराश झाला मनोमन I  आशेचा घेऊनिया किरण I  काकांच्याकडे आला असे  II ६५ II  राजेश गावडेने सांगितले I प्रश्न सुटतील रे भले भले I परी विश्वासाने पाहिजे गेले I  श्रद्धा भक्ती ठेवुनिया  II ६६ II  आजवरी आहे ऐकीवात I  विन्मुख न कोणी आला परत I  निराश होऊनी अंतःकरणात I  काका सन्मुख आला जो II ६७ II चाळीस  वर्षेपर्यंत I  महेश राहत असे वांद्र्यात I गव्हर्मेंटच्या  कॉलनीत I  रिकामे  करण्यास सांगितले II ६८ II त्यांनी घर टाकले पाडून I उघड्यावर पडले सर्वजण I लवलेश नाही दयेची जाण I  निर्दय  निष्ठुरता जागली  II ६९ II माऊली सत्तर वर्षाची I  भक्ती पाच महिन्यांची  I  पत्नीला कशी सावरायची I निवाराच  हरवला  ऐसा  की II ७० II जेव्हा संकटाची होते बरसात I तेव्हा घराचे वासेही फिरतात I नातेवाईक न देती साथ I सत्वपरीक्षा होत असे  II ७१ II  पैसे भरले होते वांद्र्यात I परी घर  नव्हते लाभतं I  आश्वासने होती खिशात II ७२ II  अडकित्यात जैसी  सुपारी I कात्रीत सापडली स्वारी I  भाड्याने राहावे कसे तरी I  अन्य उपाय नव्हता की II ७३ II परी गावडे ने दिला विश्वास I  काका हे मानवी परिस I  त्यांचा  लाभता सहवास I  प्रश्न  सुटतील लीलया II ७४ II  उभय पती-पत्नी जाती I  काकांचे सन्मुख बैसती I  त्यांची पाहुनी लोभस मूर्ती I अंकुर फुलला आशेचा II ७५ II  महेशचा  घेऊनी हात I म्हणे तुझ्या काय आहे खिशात I ते  सर्व काढावे त्वरित I  टेबलावरती माझीया II ७६ II  महेश चपापला मनात I टेबलावर ठेविले  पाकीट I  परि काका न  झाले संतुष्ट I म्हणे अजून पहावे तपासून II ७७ II  खिसे  पाहता चाचपडून I  तो पुडी  निघाली त्यातून I म्हणे का ठेवली दडवून I त्वरित टाकून द्यावी रे II ७८ II  एका बाबाने दिली विभूती I  म्हणे होईल तुझी प्रगती I परी तुझी झाली अधोगती I कारण तीच पुडी  असे II ७९ II  तैसी पुडी दिली  टाकून I तोची  हात घेतला ओढून I कोठे घर हवे म्हणून I प्रश्न केला असे तयाला II ८० II वाटे  परमेश्वर प्रकटून I  विचारता झाला असे प्रश्न I माग  हवा तो वर म्हणून I  इतका आनंद झाला असे II ८१ II  वांद्र्यात मिळावे म्हणून I त्याने वर मागितला आनंदून I  वाटे  तथास्तु म्हणून I काकांनी आशीर्वाद दिला  असे II ८२ II पुढे त्यांना घर मिळून I संसार सावरला परतून I  चिंतेचे न उरले कारण I काका सद्गुरु परी लाभले II ८३ II विश्वासाने लाभते प्रेम I विश्वासाने होतसे काम I विश्वासाने लाभतो विश्राम I  प्रभुपदी विश्वास ठेवावा II ८४ II राजहंस  सावंत म्हणून I परळला राहती सज्जन I  काकांची  कीर्ती ऐकून I दर्शनास येती एकदा II ८५ II मित्र प्रेमनाथ  राजपुतांनी I  काकांची सांगितली कहाणी I त्या ऐकून मनोमनी I उत्सुकता अंतरी जागली असे II ८६ II  म्हणे काकांचे घ्यावे दर्शन I  संत पाहावा जवळून I  काही पुण्य असेल म्हणून I योग आलासे वाटतसे II ८७ II  विनम्र होऊनी घेती दर्शन I समस्या सांगती  लीन होऊन I  म्हणे लक्ष्मीस दिले लोटून I  वैभव कसे इच्छिता II ८८ II  तुमची लक्ष्मी अज्ञानांती I  धूळ खाते माळ्यावरती I  तिला शोधून काढा वरती i  भाग्य उदयास येईल  II ८९ II तेव्हा प्रकाश पडला डोक्यात I  ती तलवार होती वडिलोपार्जित I माळ्यावर पडली होती शांत I  दुर्लक्षित झाली असे II ९० II तिला स्वच्छ करून घ्यावी I नव्या म्यानात बैसवावी I अष्टमीला पूजाविधी करावी I  आदरे ठेवावी ती घरात II ९१ II  प्रत्यक्ष लक्ष्मी असता घरात I  का वणवण फिरता दारात I  ती दाखवील अपुले तेज I  अभ्युदयाची वाट उघडेल II ९२ II तैसी शोधून काढली समशेर I प्लेटिंग  करुनी केली सुंदर I  पूजाविधीने केला नमस्कार I देवात बैसविली लक्ष्मीला II ९३ II  जय जय लक्ष्मी दुर्गेश्वरी I अपराधाची क्षमा करी I कोप न करावा बाळावरी I  क्षमायाचना करीतसे II ९४ II अज्ञात भीतीचे कारण I  अपराध घडला दारूण I परि  काकांनी केले मार्गदर्शन I चूक दाखविली  आम्हाला II ९५ II  तुझी शोभा दुर्गेच्या पाणी I भक्तांच्या रक्षणा  कारणी I  आम्हीं नोळखिली  तुझी करणी I दैव फेकीले  स्वहस्ते II ९६ II तरी आता कृपा करून I अपराधाची क्षमा करून I पदरात घ्यावे बालक म्हणून I  प्रेमाची भीक मागतसे II ९७ II ऐसी  त्याची विनंती ऐकून I आईचे  हृदय आले भरून I  त्यांची वैभवलक्ष्मी आली परतून I  सांगणे न लगे तुम्हाला II ९८ II एकदा  पार्ल्यामधे  होते फिरत I काका विवेकच्या संगतीत I काही कामाचे होते निमित्त I गप्पा रंगती  रस्त्यात II ९९ II एक व्यक्ती आली समोरून I  विनम्रपणे उभी राहून I सस्मित हास्य करून I काकांचे चरण वंदिले II १०० II  झोळी होती  खांद्यावरती  I शांत किरकोळ होती व्यक्ती I आणखी राहिले दिवस किती I प्रश्न  विचारला काकांना II १०१ II  अजून तीन महिने म्हणून I काकांनी उत्तर दिले हसून I पुनश्च नमस्कार करून I व्यक्ती निघून गेली असे II १०२ II कोण  होते म्हणून I  विवेकाचा प्रश्न घेण्या जाणून I अरे ती  व्यक्ती नसून I एक  प्रेतात्मा  होता आलेला II १०३ II त्याने मला असे विचारले  I  मुक्तीला किती दिवस राहिले I  फक्त तीनच महिने उरले I  सांगितले असे त्याला मी II १०४ II  आश्चर्य  वाटले विवेकला  I आत्मा सहज कैसा भेटला I पाहुनिया अतर्क्य  शक्तीला I  स्तिमित झाला अंतरी II १०५ II  ऐसी  काकांची अतर्क्य शक्ती I  मनोभावे करिता भक्ती I त्यालाच येईल दिव्यानुभूती I  संत संगतीत राहिल्याने II १०६ II  संताच्या राहावे संगतीत I त्याने भक्ती होईल उन्नत I जीवन होईल अमृत I  परमार्थ पथ सापडेल II १०७ II  संतांच्या संगतीत I  देवाची होईल ओळख I  संसाराचे संपूर्ण हित I विनासायास लाभेल II १०८ II 

इतिश्री भाऊदास विरचित I  श्री देवदत्त चैतन्य गाथा प्रस्तुत I   

भक्तेच्छा करोत संतृप्त I अध्याय तिसरा गोड हा I

इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु  शुभं  भवतु श्री रस्तु I

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]