ChaitanyaGaatha

।।श्री ।।

।।अध्याय दुसरा।।

श्री गणेशाय नमः । श्री  सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै  नमः । श्री गुरुभ्यो नमः: ।।१।। विलेपार्ल्याच्या पूर्व विभागात । गच्च भरलेल्या रस्त्यात ।  जवाहर डेपोच्या लगत । ‘धावा पळा‘ ओरडा सुरु झाला ।।२।।  कुणा न कळतसे कारण । जो तो पळे जीव घेऊन । सामान रस्त्यात सोडून । फेरीवाले पळाले सैरावैरा ।।३।। पार्लेश्वर मंदिराचे रस्त्यावर । लोक-वाहनांचा होता वावर । तेथे भटक्या साधूंचे बरोबर । एक हत्ती होता पाळलेला ।।४।। कळे न कैसा तो पिसाळला । त्याच्या माहुताचा  ताबा सुटला ।  तो रस्त्यावरती उधळला । चित्कार करुनी पळतसे ।।५।।  काही वाहनांना मारूनी  धडक ।  काही लोकांना देऊनी ठोक । हत्ती उधळला बेधडक । रस्ता रिकामा झाला असे ।।६।। तोचि एक किडकिडीत व्यक्ती । धावत आली रस्त्यावरती । उभी राहिली मध्यावरती । हत्ती सन्मुख धैर्याने ।।७।। हत्तीवरती नजर रोखून । थांबण्याची केली असे खूण । तो हत्ती क्षणात थांबून ।  डोलू लागला शांतपणे ।।८।। शुंडेवरती फिरवुनी हात । त्यास केला असे शांत । लाडे  होते कुरवाळीत । खुशीत वाटे आला असे ।।९।। जवळील फेरीवाल्याकडुन । त्यांनी केळी घेतली मागून । सोंडेत त्याला देऊन । आशीर्वाद त्याला दिला असे ।।१०।।  तो ची माहूत आला धावत । म्हणे हत्तीला न करावे संतप्त । सांभाळुनी न्यावे नीट ।राग प्राण्यांवर काढू नये ।।११।। ऐसे सांगुनी  रस्त्याततुन । व्यक्ती निघुनी  गेली तत्क्षण  । कोणाही न आले कळून । कोण कोठून आली असे ।।१२।। जो तो झाला आश्चर्यचकित । कैसा चमत्कार घडला रस्त्यात । अकल्पितपणे टळला अपघात । परि कोण होता देव जाणे ।।१३।। परी एकाने ओळखीले तयाला ।  म्हणे हा तर वढावकर आपला । जाणून  त्याच्या दिव्यशक्तीला । प्रणाम मनोमनी केला असे ।।१४।।ऐसी कोणती होती अज्ञात शक्ती ।ज्याची प्राणीमात्रावर चाले युक्ती । प्राणी सहजरीत्या ओळखती । मनुष्यमात्र फसतसे ।।१५।। इथे मज झाले असे स्मरण ।बडोद्यातील तो पवित्र क्षण । एका अवलियाचे दिसले धैर्यपण । राजमहाल रस्त्यावरी ।।१६।।  हत्तीखान्यातून सुटला हत्ती । धावत आला रस्त्यावरती । पळा पळा म्हणून ओरडती । बेफाम होऊनी चालला ।।१७।। आकडे घेऊनी धावती ।  माहूत त्याचे मागुती । परी हत्तीची चपळ गती  ।  पकडू न शकती लाचारे  ।।१८।। जनता गेली घाबरून । पळते झाले जीव घेऊन । हात्तीस न  दिसावे म्हणून । प्रयत्न जो तो करीतसे ।।१९।। तोचि एक कृश व्यक्ती । धावत आली रस्त्यावरती । हत्तीला स्तब्ध करिती । केवळ नजरेने आपल्या ।।२०।। हत्ती झालासे शांत । ठाव मांडीला रस्त्यात । सोंड घालुनी गळ्यांत ।  व्यक्तीशी तो बोलत असे ।।२१।। हात फिरवीती अंगावरून । वाटे  उभयतांचे चाले भाषण । बच्चा शांत होई म्हणून  । वारंवार त्याला सांगतसे ।।२२।। पुढे त्याला नेती पकडून । परी लोकांत चाले संवाद भाषण । कोण व्यक्ती आली कोठून  । गौरव दरबारी गेला असे ।।२३।। स्वये राजे येती भेटण्यास । या परमपुरुष अवलियास । आभार मानुनी त्या संतास । राजाश्रय त्यांनी दिला असे ।।२४।। श्री परमपुरुष अवलियास  आभार मानून I त्या संतास कुबेरेश्वर म्हणून । दत्तमंदिर उभारले छान । त्या अवलियाचे चिरंतन । स्मरण आज दिसतसे ।।२५।। परी इथे न घडले ऐसे काही । कोणाच्या लक्षातच आले नाही । कोणाची ही  न जागली पुण्याई । ओळखण्यास या व्यक्तीला ।।२६।। अशा व्यक्ती राहती  अज्ञात । जनतेच्या न भरती मनांत ।  गौरवापासुनी राहती  अलिप्त  । सुख-दुःख त्यांना काही नसे ।।२७।। अशी ही  प्रकाशची कीर्ती । हळूहळू प्रकाशित होत होती । काका नावाने ओळखिती । आदरयुक्त भावाने ।।२८।। पुढे काकांचे नाव घेऊन । चालवु हे सु-सूत्र प्रकरण । त्यांच्या उन्नतीचे पाहू कारण । कृपा बहरली कैशी ती ।।२९।। काकांना भेटली जी संत मंडळी । त्यांची सांगतो मी नामावली । सर्वांनी जणू कृपा ओपली । अंतःकरण भरून प्रेमाने ।।३०।।  दहिसरच्या भाटलादेवी मंदिरात । भेटती नानामहाराज सरखोत । त्यांनीही अनुग्रह देऊनी  उपकृत । काकांना या केले असे ।।३१।। तसेच श्री मोरेबाबा भेटती  । अनेक गोष्टी त्यांना शिकविती । अनुग्रह करूनी त्यांचे वरती । अभ्यास साधना दाखविती  ।।३२।। वरी जानकी आहे पाठीशी । ती परंपरेने राहिली संगतीशी । शांताबाईला दिलेल्या वचनाशी । प्रामाणिकता जिने जोपासली ।।३३।। काकांच्या आई वरती । बायजीची होती अनन्य प्रीती । अडचणीत  त्यांच्या धाव घेती । हजर होती प्रत्यक्ष ।।३४।। ‘शांते कशास केली आठवण । उगाच का जाते घाबरून ।  मी करते ना गे रक्षण । देवही आहे पाठीशी‘ ।।३५।। ऐसे देऊनी आश्वासन । संसार उभारती अडचणीतून । वरी रुपया पित्यास देऊन । संरक्षण कुटुंबास दिले असे ।।३६।। ही त्यांची वचन जागृती । आज उभी आहे मुलांचे संगती । काकांचेवर असता अति प्रीती । सत्कार्यास सहाय्य करीतसे ।।३७।। गुळवणी महाराजांच्या दीक्षेनंतर । काका आठवणीने करती मंत्रोच्चार । हळूहळू घडे शक्तीसंचार । साधना सिद्धी येतसे ।।३८।। एका नवरात्रीच्या अष्टमीला । घागरी फुंकण्याच्या विधीला ।  काका हजर होते यज्ञाला । भाटलादेवीचे मंदिरात ।।३९।। यज्ञकुंड होता धगधगत । सर्व मंडळी आली होती रंगात । तेव्हा नानामहाराज होते लोळत ।  असह्य वेदनेने तळमळत ।।४०।। काकांच्या येता लक्षात । साह्यार्थ धावले क्षणात । परिस्थिती आली लक्षात । करणी कोणी केली असे ।।४१।। दुर्गादेवीचे केले स्मरण । हनुमंतास केले आव्हान । करणी थांबविली तत्क्षण । सहज आपुल्या शक्तीने ।।४२।। नाना महाराजांच्या अंगावरून । श्रीफळ घेतले ओवाळून । ते कुंडात दिले टाकून  । नाना जागृत झाले ।।४३।। अनेक उत्तम आशीर्वाद देऊन । काकांचा केला बहुमान । तुझे होईल रे कल्याण ।  सकल जन हित साधावे ।।४४।। ऐसी  घडता चमत्कृती । काका थोडे सावध होती ।गवगवा न व्हावा लोकांती ।  प्रसिद्धी परान्ग्मुखता जागतसे ।।४५।। इंजिनिअरिंगची डिग्री मिळवून । मार्केटिंग क्षेत्रात केले पदार्पण । तेथे जम बसलासे छान । संसार सुरळीत चालतसे ।।४६।। परी कुणाच्या मनी येई मत्सर ।  विघ्न आणले नोकरीवर । काका ऐसे झाले बेकार । वणवण फिरू लागले ।।४७।। छोटी किरकोळ कामे करून  । दोन टोके पाहती मिळवून । परी अपार कष्ट करून । यश हाती येत नसे ।।४८।। जे जे करिती ते काम । दुजा करीतसे तो निष्काम । त्यामुळे न मिळे विश्राम । सतत कार्यरत राहावे लागे ।।४९।। त्यात मांडला होता संसार । तेणे सतत चिंतेचा भार । उभय करिती ते विचार । परिस्थितीशी झगडण्याचा।।५०।। परिस्थिती इतकी खालावली । दोन वेळची भ्रांत पडली । पत्नी मनात संतापली ।  दोष देवाला देत असे ।।५१।। हे दत्तात्रेया दयाघना । आमच्या सोडवाव्या विवंचना । आयुष्यभर केलेल्या प्रार्थना । निष्फळ सर्व गेल्या का ।।५२।। तुला का न येते आमुची दया । का पातळ केली असे माया । कोण्या पापाची निर्दया । शिक्षा भोगतो आम्ही रे ।।५३।। रागाच्या असता भरात ।  देव गुंडाळले गाठोड्यात । म्हणे फेकून देते नदीत । अडगळ घरात नकोच की ।।५४।। तोचि काका येती स्नान करून । पुजेस बसता पाटावरून । देव न दिसती म्हणून । पत्नीस त्यांनी विचारले ।।५५।। म्हणे देव ठेविले गुंडाळून । जे प्रसंगी न येती धावून । त्यांचे काही नसे कार्यकारण ।  भ्रमात राहणे योग्य नसे ।।५६।। तेव्हा काका सांगती पत्नीस । दोष न द्यावा देवास । कर्मात असती जे दोष । भोगणे प्राप्त असे की ।।५७।। मनुष्य जे जे कर्म करितो ।  तैसे तैसे भोग भोगतो । कर्म सिद्धांत ऐसे सांगतो ।  देवा हाती काही नसे ।।५८।। ‘मना त्वांचिरे पूर्वसंचित केले । तयासारखे भोगणे प्राप्त झाले‘ । ऐसे सांगुनी  पत्नीस समजावले । भोग संपतील गुरुकृपेने ।।५९।। जैसी पूजा गेली संपून ।  एका धंद्याचे झाले स्मरण । दूध विक्री करावी पाहून । विचार मनांत  स्फुरला असे ।।६०।। म्हणे पाहूया करुनी  यत्न । कृष्ण दुधास पाहती विचारून । तो विक्री अधिकार दिला आनंदून । विशिष्ट विभागापुरता तयांना ।।६१।। पहाटे लवकर उठून I  दूध गिऱ्हाईकांना देती नेऊन I  अपार ऐसे कष्ट करून I  धंदा वाढविला जोमाने II ६२ II जिथे घेतले होते दुकान I  तिथे धंदा चालत असे पूर्ण दिन I  परी अन्य काही घडतसे  कारण I  सतत गर्दी वाढतसे  II ६३ II  कोणी येती  प्रश्न घेऊन I त्याचे काका करिती निवारण I  हळूहळू लोका आले कळून I उत्सुकता अंतरी जागतसे II ६४ II  काका जे जे सांगती I  त्याची लोकांना येत असे प्रचिती I  लोकांची वाढत असे भावभक्ती I आदरयुक्त श्रद्धेने II ६५ II  तेणे  विक्री ऐवजी विचारणाऱ्यांची I  अधिकच गर्दी व्हावयाचीI   पोलीस येऊनी  करती चौकशी I  काय  येथे चालले असे  II ६६ II  याचा परिणाम झाला धंद्यावर I  लोक पैसे न देती वेळेवर I  प्रामाणिकपणा करितो लाचार I  सत्यनिष्ठ माणसाला II ६७ II   म्हणुनी सत्य असते कडवट I  त्याचा फायदा घेती उध्धट I  अशीच संसाराची वहिवाट I  सर्वत्र आपणा दिसतसे II ६८ II  काकांच्या येती जे नजरेत I  त्याचे भूत-भविष्य होते जाणत I  तेणे  विश्वास गेला दृढावत I  भक्तगण वाढू लागले  II ६९ II  सकाळी लवकर उठती  म्हणुन I  शरीरावर पडत असे ताण I  शरीर मनाने जाती थकून I  तरी आदेश त्यांना मोडवेना  II ७० II जागाही नव्हती सुरक्षित I गैरसोय होती जाणवत  I काही सन्मित्र होते सुचवीत I  पार्लेश्वर  मंदिरात बैसावे  II ७१ II त्यात  गुरुनी  केले आज्ञापित I आता कार्य करावे जनहित I  आम्ही सदैव आहोत संगत I   निर्भयता अंतरी असावी  II ७२ II  तेव्हा आपला धंदा सांभाळून I  एक उपाय काढला शोधूनI  चार तास दिले भक्ता कारण I   आयुष्याचे आपल्या की II ७३ II  नित्य बैसती ते  मंदिरात I दुपारी बारा ते चार पर्यंत  I भूत-भविष्य होते सांगत I  भ्रमर झेपावती  पुष्पाकडे  II ७४ II जैसा सौरभ पसरे आसमंतात I   परिसर होतसे सुगंधित I तैसी सुकीर्ती जाई पसरत I  पवन गतीने सर्वत्र II ७५ II  एकदा मी विचारले काकींना  i ऐसी  कोणती घडली घटना I  जिने तुम्हास आली कल्पना  I काका अतर्क काही सांगती II ७६ II  म्हणे  आमची कामवाली I नवऱ्यास  घेऊनी  निघाली I  म्हणूनी तिने रजा मागितली I  गावी औषध करण्यास  II ७७ II  म्हणे चार दिवसांनी येईन I तोवरी घ्यावे सांभाळून I  हे काकांचे जवळ गेले बोलून I  सहजपणे एकदा  II ७८ II  म्हणे तिला काढावे शोधुन । उपाय सांगावा करून । त्वरित जावे स्नान करून । सदाशिवाचे मंदिरी ।।७९।। श्रीफळ  पुढती ठेवून । मागावे सौभाग्याचे दान । नंतर जावे त्याला  घेऊन । आरोग्य लाभेल वाटतसे ।।८०।। परि काकी हुज्जत घालती ।  या लोकांची शंकित प्रवृत्ती । काही भलतेच घडल्यास देती । दोष आपल्याला उगाच ।।८१।। जैशी तुझी मर्जी म्हणून । काका सोडून देती प्रश्न । चार दिवसांनी आले कळून । पतीस मृत्यू आला असे ।।८२।। तेव्हा हळहळत्या मनात । अपराधाची झाली जाणं । तिच्या दैवघातास झालो कारण ।  शंकेत कैसे अडकलो ।।८३।। ऐसी दुसरी घडलीसे कहाणी । काका रिक्षेत आले बैसोनी । घरा सन्मुख गेले उतरोनी । परी चालकास त्यांनी हटकले ।।८४।। काय रे पत्नीवरती रागावोनी । उपाशी राहतोस का प्रतिदिनी । ऐशी  ऐकून त्यांची वाणी । रिक्षेवाला चपापला ।।८५।। म्हणे यांना कैसे कळले । रहिवाशी नाहीत विभागातले ।।८६।। पुढे काका. त्याला सांगती । तुझ्या लहानग्या मुला संगती । तुझ्या भावाची आहे अति प्रीती । लाड त्याचे करतो ना ।।८७।। परि तुझ्या पत्नीस नाही आवडत । ती नित्य असे ओरडत । कारण  तो आहे क्षयपिडीत । भांडणे होतात यामुळे ।।८८।। तुझा भाऊ प्रेमळ असून । तुझा मुलगा आवडतो मनापासून । त्याला अंतर  न  द्यावे म्हणून । विचार द्वंद चालतसे  ।।८९।। म्हणे माझा ऐसाच आहे विचार । परी पत्नी न देते सहकार । भांडणे होती वारंवार।  उपाशी निघतो त्यामुळे ।।९०।। हे काकांनी ऐकले संभाषण । मनात गेल्या की चपापून । कैसे काकांना येते कळून । विचार दुसऱ्यांच्या मनातले ।।९१।। आजवरी नव्हते माहित I  काका  कैसे सांगती हकीकत I  कोणी मार्गदर्शन आहे करीत I  अंतरी जाणं झाली असे II ९२ II  तेव्हापासून काकींनी I खडा लावला असे कानी  I  काकांना न आडवावे  म्हणुनी  I  शपथ अंतरी  घेतली असे  II ९३ II कोणाचे होत असेल कल्याण I  तेथें करावा अपशकुन I  हेची  खरे आहे शहाणपण  I  सत्कर्मास  सहाय्य करावे II ९४ II पुढे जैसी जैसी  आली प्रचिती  I पतीची कळून आली शक्ती  I  दैवी शक्तीची आली अनुभूती  I काकी अंतरी संतोषल्या II ९५ II  त्यात काकांनी  सांगितली हकीकत I कैसा  दृष्टांत झाला अद्भुत I वाटे गुरुचे असावे मनोगत ईश्वरी संकेत की असावा II ९६ II काका नित्य बैसती ध्यानात I  संवाद साधती स्वामीसंगत I  मार्गदर्शन राहती करीत I  सुलभ कार्य करावया  II ९७ II स्वामींच्या आज्ञेबाहेर I काका न जाती तसूभर I कृती कार्य वा संसार I स्वामी इच्छा प्रमाण असे  II ९८ II असे असता झाला दृष्टांत I सप्तऋषी बैसलेले दिसत I  मध्ये काका त्यांचे वर्तुळात I सस्मित ऐसे दिसले II ९९ II  मुख्य ऋषी उठले त्यातून I काका कपाळी केल तिलकचंदन I इतरांना बोलले उद्देशून  I आपल्या शुभ ऐशा वाणीने II  १०० II वरद हस्तशिरी ठेवून I मंगल आशिर्वाद देऊन I म्हणे आजपासून हा नंदन I ‘देवदत्त” नावाने ओळखावा I देवदत्त नाव घेऊन I पुढील  जगावे सर्व जीवन I  आम्ही सहाय्य करू सर्वजण I  ऐसे त्याला सांगावे II १०२ II  ऐसा दृष्टांत पाहून I काकांचे भरून आले लोचन I  हृदय हेलावले आनंदून I प्रेमाने न्हाऊन निघाले II १०३ II  परि  कर्तव्याची झाली जाणं I  जनहित कार्याकारण I सेवा सत्कार्य मानून I  स्वामी आज्ञा लक्ष असे II १०४ II  काका भक्तांना सांगती I माझे नूतन नामकरणविधी I झाला सप्तऋषि संगती I  भविष्य उघड केले असे II १०५ II देवदत्त काका म्हणून I  सर्व जाणते झाले भक्तगण I  परि  काका नावात  आपलेपण I सर्वांना प्रिय वाटले  असे II १०६II   काकांचे झाले परिवर्तन I  देवदत्त महाराज म्हणून I अनन्यभावे जाऊ शरण I  शिरी पदपंकज वंदुनी II १०७ II  ऐसे देव दत्ताचे जीवन I सांगता नाचे माझे मन I  वाटे श्री दत्ताचे दर्शन I  सन्मुख मज घडत असे II १०८ II  

इतिश्री  भाऊदास विरचित I  श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत I

 भक्तेच्छा  करोत संतृप्त I अध्याय दुसरा गोड हा I 

इति श्री  श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु  शुभं भवतु श्रीरस्तु I


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]