
॥ श्रीदेव वेतोबा बावनी ॥
जय आरवलीच्या देवा । श्रीवेतोबा सदाशिवा ॥१॥
प्रभो घडुदे तव सेवा । वरद शिरीकर हा ठेवा ॥२॥
श्री योगेश्वर भुमियाने । आळविले तुज प्रीतिने ॥३॥
भक्तिला तू भुललासी । वचनी गुंतुन गेलासी ॥४॥
श्री पूर्वस ते भक्तमहान । देवा परि त्या दिधला मान ॥५॥
दोघांनी तुज गौरविले । आरवलिला स्थापियले ॥६॥
तेंव्हा पासुनि आरवली । दुसरी पंढरी भूवरली ॥७॥
झाली पावन आरवली । सुजलां सुफलां ती बनली ॥८॥
विमुक्त दुःखातुन झाली । जनता सर्व सुखी झाली ॥९॥
कितीक झाले संत महान । त्यांत असे जे श्रेष्ठ महान ॥१०॥
श्री बापूमामा केणी । संतामधले शिरोमणी ॥११॥
श्री वेतोबाची मूर्ती । म्हणति विठ्ठल प्रतिकृति ॥१२॥
विठ्ठल वेतोबा झाला । प्रसन्न बापूंना झाला ॥१३॥
श्री योगेश्वर बापूंनी । मृतास दिधली संजिवनी ॥१४॥
दळवींच्या ह्या वंशाला । सुपुत्र देऊनि वाढविला ॥१५॥
पांडुरंग या दिपकाला । बापूंनीही वर दिधला ॥१६॥
वेतोबावर करा प्रीति । उद्धारील तो कुला प्रति ॥१७॥
किर्तन संकीर्तन करुनी । भक्तिध्वज फडफडवी जनी ॥१८॥
महाराज श्री बापूंना । अनंत करितो मी नमनां ॥१९॥
श्री वेतोबा देव महान । गावे त्याचे नित गुणगान ॥२०॥
प्रीतिने जो आळवितो । देव तया संगे वसतो ॥२१॥
संकट हारुनि भक्तांचे । रक्षण करितो हा त्यांचे॥२२॥
आरवलीचा व्यापारी । गुन्ह्यांत गवसे सरकारी ॥२३॥
दंडही लाखाचा झाला । श्री वेतोबाला तो स्मरला ॥२४॥
देव धावला कोर्टात । भक्तां केले ऋण मुक्त ॥२५॥
जन्मुनि मरती जिची मुले । तिच्या मुलांना वाचविले ॥२६॥
मामलेदाराची कीर्ति । कलंकीत झाली होती ॥२७॥
वेतोबाला तो स्मरला । कलंक पुसुनि वर चढला ॥२८॥
दृढ श्रद्धा ही पाहून । पास करविती भक्त गण ॥२९॥
समक्ष पुढती राहून । प्रदिप्त करि त्यांचे ज्ञान ॥३०॥
पाहुनि भक्तांची प्रीति । याचक होऊनी घरी येती ॥३१॥
भिक्षा घेति मागून । भक्तांवर संतोषून. ॥३२॥
प्रसन्न वेतोबा होता । भक्ताला नच मुळी चिंता ॥३३॥
अष्टकोटी या भूतांचा । नायक वेतोबा साचा ॥३४॥
अष्ट सिद्धींचा दायक हा । रिद्धी-सिद्धीचा मालक हा ॥३५॥
एकादश हा रुद्र स्वये । अनंत रुपे हा धरि माये ॥३६॥
भाऊकाकांना दिधले । दर्शन सगुण रूपामधले ॥३७॥
गुरुमंत्र हा देऊनी । धन्यही केले ह्या जीवनी ॥३८॥
श्री योगेश्वर भुमियांनी । तसेच पूर्वस देवांनी ॥३९॥
सवे येई श्री सातेरी । सदैव भाऊस साह्य करी ॥४०॥
प्रपंची आणि परमार्थी । उत्तम कीर्ति यश देती ॥४१॥
ऐसा आहे देव महान । गावे त्यांचे नित गुणगान ॥४२॥
प्रीतिने जो गाईल । विमुक्त चिंता होईल ॥४३॥
पूर्ण कामना होतील । जो श्रद्धेने वाचील. ॥४४॥
असे जयाचा भाव जसा । देवही पावे त्या तैसा ॥४५॥
जयजय वेतोबा देवा । जयजय सांब सदाशिवा ॥४६॥
गोड नांव जो घेईल । श्रीवेतोबा पावेल ॥४७॥
असे देव हा कल्पतरू । नांव तयाचे नित्य स्मरु ॥४८॥
ऐसे पावन हे गीत । सवडीनुसार जरी गात ॥४९॥
धर्म, अर्थ ही लाभेल । काम, मोक्ष ही साधेल ॥५०॥
जयजय वेतोबा देवा । कृपा बालकावर ठेवा ॥५१॥
आजन्म घडू दे तव सेवा । जय श्री वेतोबा देवा ॥५२॥
जय-जय वेतोबा देवा