राजा दुष्यन्त, शकुंतला व पुत्र सर्वदमन हे भगवान मारिच ऋषिंचे दर्शन घेण्यास आश्रमात आले. तिघांनी त्यांना नम्रपणे प्रणाम केला. तेव्हा ऋषि तिला म्हणाले, “ वत्से ! दुर्वास ऋषिंच्या शापामुळे राजाची स्मृति नष्ट झाली. म्हणुनच त्याने तुझा पतिषेध केला. त्याचा रोष आता पार नष्ट झाला आहे. तू शापमूक्त झाली आहेस. तुला हवे होते ते प्राप्त झाले आहे. या सहधर्मचारी पतीवर आता राग धरु नये. तुझा पुत्र सर्वदमन चक्रवर्ती होईल व तो “भरत ‘ नावाने कीर्ति मिळवील.” असा प्रेमाशिर्वाद दिल्यावर ही शुभवार्ता कण्वांना कळविण्यासाठी मारिच गालवाला म्हणाले,
” वायुगतीने जाऊनि बोला , शुभवार्ता ही कण्व मुनीला “
मारिच ऋषि भगवान : वायुगतीने जाऊनि बोला
शुभवार्ता ही कण्व मुनीला II धृ II
दुर्वासांचा शाप जाहला
विस्मरला तो शकुंतलेला
शाप विमोचन होता स्मरला
प्रिय आपुल्या कांतेला II १ II
अंगुलिका गवसली नृपाला
विस्मृती तमप्रति प्रकाश पडला
ओघ नदीचा मिळे सिंधूला
संगम आश्रमी झाला II २ II
भाग्यवती तव शकुंतलेला
‘सर्वदमन’ कुलदीप जन्मला
चक्रवर्ति गुणयुक्त निपजला
उज्ज्वल पुरु वंशाला II ३ II
पुत्र नृपासह जणू शकुंतला
श्री-विधि-श्रध्दा योग जाहला
आशीर्वच तव येई फळाला
मीहि तया अनुग्रहिला II ४ II
मातपित्यापरी पुत्र शोभला
त्रिखंडात यश कीर्ति ज्याला
नाम ‘भरत’ – दिपवील जगाला
शुभ आशिष दिधला II ५ II
————————————————————————————————————
II इति क्षम II