राजा दुष्यन्त फारच अस्वस्थ झाला. त्याने नगरात प्रतिवर्षी होणारा वासंतिक उत्सव बंद केला. आता त्याला शकुंतलेचा तीव्र ध्यास लागला . मनास शांति मिळावी म्हणुन राजा दुष्यन्त प्रमदवनात येऊन बसला. चतुरेका दासीने आणलेले शकुंतलेचे चित्र पाहुन राजाच्या डोळ्यात अश्रू आले . शकुंतलेला त्याने झिडकारले असता, तिची झालेली दीन मुद्रा त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली . गोरामोरा झालेला तिचा चेहरा त्याला आठवू लागला. शकुंतलेन दर्शविलेल्या खुणांचे त्याला आता स्मरण होऊ लागले. चित्रातली शकुंतला जणू आपल्याशी बोलत आहे, असे त्याला वाटू लागले. अश्रुभरल्या डोळ्यांनी तो म्हणाला, “शकुंतले , माझ्या हातून अपराध घडला आहे, पण शिक्षा मात्र तुला भोगावी लागत आहे .”——-” अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी “—–
राजा दुष्यन्त : अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी
विरहाग्नि तीव्र माझ्या परि अंतरास जाळी II धृ II
येऊन आश्रमात तुज प्रीति गुंतवीले
निष्पाप जीवनाला मी व्यर्थ डागळीले
तो ‘डाग’ सांगतो मी चारित्र्य हीन भाळी II १ II
मी सत्य प्रीत केली आण भास्कराची
मति भ्रष्ट जाहली ती अक्षम्य चूक साची
ती ‘चूक’ भूषवी या, जिवनात रेख काळी II २ II
प्रतिमा तुझी समोरी, मी ठेवितो सदैव
नयनी भरुन देतो, तुज अंतरात ठाव
तो ठाव ध्यानि आला, मजला मुळी अवेळी II ३ II
या राज वैभवाचा नच मोह या मनाला
सारेच शून्य झाले, तुजवीण जीवनाला
चिंता कुठे तू असशी, प्रत्यक्ष याच वेळी II ४ II
जो राजवंश उदरी कांते तुझ्याच येई
सानंद भाग्य बघणे, नशिबी मुळीच नाही
निर्वंश जाहलो मी करुनि तुला निराळी II ५ II
विरहाग्नितून अपुली ही प्रीत शुद्ध झाली
या सत्य भावनांची हृदयास साक्ष पटली
येईल मीलनाची घटिका पुन्हा सुवेळी II ६ II
गंधर्वाच्या हेम कुटावर पवित्र एक ठिकाण >>