अशी ही करुण गंभीर अवस्था पाहुन एका स्त्रीच्या आकाराच्या अदभूत ज्योतीने तिला उचलून अंतरिक्षात नेले. हा चमत्कार पाहून सर्वांना फारच आश्चर्य वाटले. नंतर बऱ्याच वर्षांचा अवधी गेला. राजा दुष्यन्त राजदरबारात बसला असता , एका कोळ्यास सापडलेली रत्नजडीत मुद्रिका त्याच्या पुढे सादर करण्यात आली. ती मुद्रिका पाहताच राजा दुष्यन्तास शकुंतलेशी केलेल्या गांधर्व विवाहाचे स्मरण झाले. तिला दिलेल्या वचनाची आठवण झाली .तिचा अव्हेर करुन तिला परत पाठवून दिल्याबद्दल त्याला फारच पश्चात्ताप झाला. कंठ दाटून आला. प्राणाहून प्रिय अशी मुद्रिका , तिच्या वियोगाने प्रिय सखी अंतरली –अशा त्या राजमुद्रिकेला तो म्हणाला ,
‘कोमल कर अंगुली त्यजूनि शचि तीर्था पडली ….. “
राजा दुष्यन्त : कोमल कर अंगुली त्यजूनि, शचि तिर्था पडली
परि मुद्रिके तुझ्या वियोगे ,प्रिय सखी अंतरली II धृ II
तुला पाहता हृदयातिल गे , वचने मज स्मरली
कुभांड रचिले म्हणुनि सखीला नकळत सोडियली
पुजा प्रीतिची बांधुनि हृदयी, मूर्ति स्वये भंगली II १ II
प्राणाहुनि प्रिय सखी कर-अंगुली, तुलाच अर्पियली
विरहातिल तू ‘दुवा’ प्रीतिचा मनि आशा धरली
दैव घात नच कुणास सुटला, निज आसन ढळली — II २ II
तुझ्याच हृदयी नांव कोरले ‘नृप’ दुष्यन्ताचे
सवती मत्सर शकुंतलेच्या वाटे भाग्याचे
व्यर्थ जीवनी जिवनाविण कां जीवनी तू पडली— II ३ II
“मुद्रिकेतला एक शब्द मम नित्य मनीं घेई
नाम पूर्तिच्या पूर्विच तुजला नगरांतरी नेई “
बद्ध जाहलो वचनी तरिही बुद्धि भ्रष्ट झाली — II ४ II
स्वप्नी मनोरे बांधुनि लक्ष्मी पति सदना आली
उंबरठा नच उल्लंघियला , दैवें परतविली
मुक्या कळीला उमलुन देता, मी निर्दय खुडली — II ५ II
विरही व्याकुळ जीव जाहला, तळमळ ही उरली
शकुंतलेच्या दर्शनास ही नयने आसुसली
घाव घातला तिच्या जिव्हारी, जखम मला झाली II ६ II
अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी >>