साऱ्या आश्रमी जनांना शकुंतलेच्या जाण्याबद्दल फारच हुरहुर वाटू लागली . शकुंतलेने वेद मंत्राने पूनित झालेल्या अग्नि नारायणाला प्रदक्षिणा घातल्या व सर्वांचा निरोप घेऊन जाण्यास निघाली. कण्व बाबांना तर फारच वाईट वाटले. आपली कन्या आपल्या पासून दूर जाते याचे त्यांना अनिवार दुःख झाले. त्यांचे डोळे निथळू लागले. कंठ दाटून आला. शकुंतलेच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून कण्व बाबा म्हणाले, “पति सदनाला जाता लोचन करु नको ओले “…
कण्व ऋषि : पति सदनाला जाता लोचन करु नको ओले ,
लाडके शकुंतले बाले II धृ II
पति गृही तू जाता बाले I शैशव सारे मजला स्मरले
वियोगिता गहिवरुनी आले I लोचन पाणावले II १ II
दुष्यंतापरी नृपति लाभले I भाग्य तुझे वनि चालत आले
दैवाने हे योग जुळविले I इच्छित मनी घडले II २ II
जीवनातली ईच्छा पूर्ति I सुख दु:खाविण येइ न हाती
पुरु वंशाचे भाग्य मंगले I तव उदरी दडले II ३ II
पर्ण फूले तरु लता ढाळती I मूक आसवे जणू गाळती
हरिण शावके तुला अडविती I खग शुभ रव वदले II ४ II
संन्याशाला मोह पडे किती I मानस कन्या वियोगिता प्रती
संसारिक किती कष्ट साहती I ते मी अनुभवले II ५ II
कण्वांना शोक आवरेनासा झाला . त्यांची पाऊले अडखळू लागली . ते शकुंतलेला म्हणाले,
वडिला सम जे सेवित जावे I सवतीशी तू प्रेम धरावे
पति कोपता नम्र असावे I शांत मधुर बोले II ६ II
सदय सेवका वरी रहावे I निज धर्मि तू दक्ष असावे
विकसित कमला परी रहावे I सदैव फुलले II ७ II
नकोस मागे वळुनी पाहू I नको लाडके जीव गुंतवू
शुभ मंगल होताच जाहले I मार्ग वेगळाले II ८ II
कनकासम ही कन्या परधन I अर्पुनि झालो मुक्त ऋणातुन
चक्रवर्ति तुज होईल नंदन I शुभ आशिष दिधले II ९ II