अनसूयेच्या विनवणीचा विचार करुन दुर्वास ऋषिंनी शकुंतलेला उ:शाप दिला आणि पुढे मार्गस्थ झाले. शकुंतलेचे मन कोमल असल्याने उ:शापाची वाच्च्यता कोणीही केली नाही. इकडे कण्वमुनींच्या आश्रमातील यज्ञ रक्षणाचे काम संपवून राजा दुष्यन्त आपल्या राजधानीत जाऊन बरेच दिवस झाले. त्याचेकडून काहीच निरोप नसल्यामुळें शकुंतला अधिकच चिंताग्रस्त झाली. ग्रहशांती करून आल्यावर कण्वांना शकुंतलेचा वृत्तांत कळला . त्यांनी तिचे प्रेमपूर्वक अभिनंदन केले व तिला हर्षितानुमती देऊन ऋषिजनांबरोबर पतीकडे पाठविण्याचे निश्चित केले. प्रियंवदा व अनसूया यांना फार आनंद झाला. परंतु आपली सखी आपल्याला अंतरणार याचे वाईट वाटले. शकुंतलेच्या पाठवणीची तयारी होऊ लागली. सर्व सख्या तिला सजवू लागल्या ,नटवू लागल्या आणि आनंदाने गाऊ लागल्या….. “होईल अमुची सखी लाडकी, राजाची राणी “
सर्व सख्या : होईल अमुची सखी लाडकी, राजाची राणी
पाठवणीची करु तयारी, करुया वेणीफणी II धृ II
तिच्या भोवती फेर धरुनिया ,उभी करु रिंगणी
लाजलाजूनी दिसे जणू ही , बावरली हरिणी
उज्ज्वल भवितव्याचे तरळे मनोराज्य नयनी II १ II
एके दिवशी अवचित प्रकटे कल्पतरु अंगणी
सहज गवसली शकुंतलेला सौख्याची पर्वणी
फुलराणी ही आज आमुची , भावि महाराणी II २ II
मंगल घालूनी स्नान कस्तुरी , चंदन उटी चर्चुनी
ओवाळुनिया सौभाग्याचे वाण तिला अर्पुनी
सजवू नटवू वनदेवीचे अलंकार घालुनी II ३ II
वनदेवींनी अर्पियलेले अलंकार लेऊनी
प्रिया समोरी जाता अधिकच नृपा पडे मोहिनी
घालिल पिंगा तिच्या भोवती भृंग जसा सुमनी II ४ II
प्रेम चिरंतन तुमचे राहो , सौख्य सदा जीवनी
अखंड सौभाग्याचे लेणे, मागू प्रभु चरणी
राणी साठी करी अकल्पित प्रभुही तत्करणी II ५ II
पति सदनाला जाता लोचन करु नको ओले >>