दिन प्रतिदिनी शकुंतलेला राजा दुष्यंतचा विरह जाणवु लागला. त्याची मूर्ति तिला सदैव डोळ्यासमोर दिसू लागली . शकुंतला लता मंडपात पहुडलेली असता, तिच्या संख्या प्रियंवदा आणि अनसूया तिला कमल पत्राने वारा घालित होत्या . आज शकुंतला फारच अस्वस्थ होती. तिला काहीच सुचत नव्हते . तिचे सांत्वन करित अनसूया म्हणाली , ‘शकुंतले , हे कमल पत्र घे .त्यावर राजा दुष्यन्तास पत्र लिहून दे. मी ते पाठविण्याची व्यवस्था करिते.’ शकुंतलेने कमलपत्र हातात घेतले आणि म्हणाली — “ कमलपत्र हे करी घेऊनिया I चिंतीत मी बसते
राया पत्र तुला लिहिते II “
शकुंतला :
कमलपत्र हे करी घेऊनिया
चिंतीत मी बसते I राया पत्र तुला लिहिते II धृ II
कमल दलांवर दृष्टि खिळली
स्मृति चित्रे ही दिसू लागली
शब्दाविण कर अंगुली फिरली
नख अग्रे लिहिते —– II १ II
दृष्टि पुढती दिसे शून्यता
अथांग प्रीति नये बोलता
शब्दाची नच घडण बैसता
कमल दला खुडते —-II २ II
नये लिहीता , नये बोलता
अशी माझिरे झाली अवस्था
नसे मनाची होत सांगता
भान मला नुरते —– II ३ II
नयना मधुनी अश्रु गळती
नलिनी दलावर मौक्तिक बनती
अश्रु बिन्दुतुन प्रतिमा दिसती
टक लावुनी बघते —–II ४ II
अखेर कोरे पत्र राहते
शब्दविण मी तुला धाडते
अश्रु बिंदू मम कथितील तूंते
मम मानस पुरते —–II ५ II
कुरंग नयने शकुंतले तुज बघता जडली प्रीति >>