वैखानसाच्या म्हणण्याप्रमाणे राजा दुष्यन्ताने त्या पाळीव हरीणास वधिले नाही. जवळच असलेल्या मालिनी नदीच्या तिरी कण्वाश्रमाकडै आपला रथ नेण्याची आज्ञा केली. सारथी रथ चालवू लागला आणि राजा दुष्यन्त त्या रमणीय तपोवनाची शोभा न्याहाळू लागला. त्याचे मन फारच प्रफुल्लित झाले. ती शोभा त्याला अत्यंत आल्हाददायक वाटली . त्यावर राजा आपल्या सारथ्यास म्हणाला—-
“ हे रम्य तपोवन खचित किती , मालिनी नदी विस्तीर्ण तटी I “
राजा :
हे रम्य तपोवन खचित किती
मालिनी नदी विस्तीर्ण तटी II धृ II
ही शीतल झाडी गर्द किती
बहरले तरु फळ फूल अती
वनीं कुंद गंध अति दरवळती
घरट्यात पक्षि बहु किलबिलती II १ II
शुक चंचूतुन ह्या भूवरती
बहु ‘राजगिरी ‘ कणसे पडती
हे इंगुदी फुटलेले दिसती
जणू साक्ष ऋषि वनीं बावरती II २ II
कूपमार्गि जलरेखा दिसती
ऋषि वल्कलं पिळता टपटपती
जलपाट रुपेरी झुळझुळती
उपवनी किती गोधन चरती II ३ II
पशु पक्षी पाळिव जणू दिसती
विश्वासें रथ रव मृग श्रवती
किती निर्भय हरिण इथे फिरती
परशब्द श्रवती परि मुळी न भिती II ४ II
थांबवी रथाला तरु निकटी
सोडुनी अश्व ने नदीवरती
मी जात सारथ्या मठाप्रती
ऋषि दर्शन घेणे उचित अती II ५ II